तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 June, 2016 - 11:20

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप
,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून
मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे
व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत
चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या
उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी
काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा
असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच
राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल
झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त
निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार
सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर
काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात
,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला
दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास
लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी
तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात
बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला
समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू
खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी
सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने
घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक
पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत
राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी
काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते
यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता
आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.>>
----- तुमची व्यसन सोडण्याची मनापासुन ईच्छा आहे हे वाचुन खुप समाधान वाटले. माहितगार लोक प्रकाश टाकतीलच.
शुभेच्छा.

येथे अशाच अर्थाचा (व्यसन, सिगरेट, दारु) एक धागा होता... कुणाला लिन्क शोधता आल्यास येथे डकवा.

१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
>>.>
लहानपणापासून कॉलेजात गेल्यावर सिगरेट ओढायची हे डोक्यात होते. का ते माहिती नाही. कॉलेजात गेल्यावर ते अंमलात आणले. सर्व प्रवास तुम्ही सांगितला आहे तसाच. सुरुवात १-२ सिगरेटी त्यासुद्धा शेअर करून. मात्र नोकरी लागल्यावर खिशात पैसे आले आणि २-३ सिगरेटी कधी दिवसाच्या २०-३० वर गेल्या ते कळले देखील नाही. परदेशात असताना सिगरेट परवडत नाही म्हणुन सिगरेट पेपर आणि सुटा सिगरेटचा तंबाखू घेऊन स्वतः वळू लागलो.
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
>>>
सकाळ उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे उशीखाली हात घालून पाकिट काढून सिगरेट शिलगवायचो. कुठलेही काम सुरु करण्याआधी वा संपल्यावर सिगरेट ओढल्याशिवाय कोल्जर झाले आहे असे वाटायचे नाही. हे सोडायला पाहिजे हे समजत होते. याचे शरीरावरचे दुष्परिणाम माहिती होतेच. पण खेळताना/सायकल चालवताना सुद्धा दम लागतोय हे दिसू लागले. मग पैसे किती खर्च होतात तो हिशोब केला. त्यात इतर काय करता येईल हा हिशोब केला. सिगरेट सोडायला हवी यापेक्षा दुसरे उत्तर येतच नव्हते. मग इन्टरनेटचा आसरा घेतला. फिलिप मॉरिसच्या साइटवर ही माहिती मिळाली: http://www.quitassist.com/default.htm
कोल्ड टर्की म्हणजे एके दिवशी थेट (म्हणजे कमी वगैरे न करता) सिगरेट सोडायची हे ठरवले.
सर्वात महत्त्वाची गोष्टः पहिल्या परयत्नात यशस्वी व्हा. कारण अपयशी होऊ लागलात की दरवेळी पुढचा प्रयत्न करताना तुमचा आत्मविश्वास अजून कमी झालेला असेल.
एक महत्त्वाचा दिवस ठरवला. माझ्यासाठी तो युरोपमधून भारतात परत जाण्याचा दिवस. शेवटच्या दिवसापर्यंट ओढायची तितकी ओढून घेतली. फ्रँकफर्ट एअरपोर्टवर ७-८ सिगरेटी एकामागोमाग एक ओढल्या. उलटी येऊ लागली. मग ते अर्धवट भरलेले पाकिट आणि झिप्पोचा ५०-६० युरोचा लायटर कचर्‍यात टाकले. माझ्यासाठी हे एक मोठे क्लोजर होते. पाकिटात अर्धी सिगरेट जरी असेल तर ती टाकून देणे किती मोठे पाप असते हे सिगरेट पिणार्‍याला माहिती आहेच.
त्यानंतर भारतात आल्यावर ७ दिवस कंपनीच्या गेस्टहाउसमध्ये राहिलो जे कंपनीच्या आवारात होते. बाहेर पडलोच नाही. त्यामुळे सिगरेट विकत घ्यायची संधी नव्हती.
जे सिगरेट ओढणारे मित्र होते त्यातले बरेचसे भारतात नव्हते व जे होते त्यांना पुढले काही महिने भेटलो नाही.
काही महिने दारु प्यायला बसलो नाही कारण दारु प्यायली की संयम सुटतो आणि दारु पिताना सिगरेटची तल्ल्फ अजून जोरात येते.
पहिला आठवडा जास्त विचारच केला नाही. मग हळूहळू ओढावीशी वाटणे कमी होत गेले. तरी ज्या नेमक्या वेळा आहेतः सकाळी उठल्यावर संडासच्या आधी, जेवल्यावर, चहा पिताना तेव्हा तल्ल्फ यायची. इग्नोर करत राहिलो. दोन दिवस गेल्यावर तिसर्‍या दिवशी नीट होते शौचाला. शरीर काय अडकून ठेवत नाही. महिन्याभरात आठवण येईनाशी झाली.
आता ८ वर्षे झाली आहेत.
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
>>
विशेष काही करावे लागले नाही. सिगरेट पिणार्‍या मित्रांपासून दूर रहा, परत पिणार नाही हा आत्मविश्वास येईपर्यंत दारू पिऊ नका.
व्यायाम सुरु करा. एकदा व्यायाम सुरु केलात की आपोआप सिगरेटचे दुष्परिणाम जाणवू लागतात व जितके जास्त दिवस सोडून होतील तसे स्वतःलाच बरे वाटू लागते. मग पिण्याची इच्छा होत नाही.
फाजील अति-आत्मविश्वास पण येऊ देऊ नका. मला १८-२० वर्षांनी रिलॅप्स झालेले लोक माहिती आहेत. तेव्हा ऑल्वेज बी ऑन युअर टोज.
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
>>
माहिती नाही.
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
>>>
तंबाखुमुक्त आयुष्य हे एक संपूर्ण वेगळे आयुष्य आहे. तुमचेच तंबाखूपुर्वीचे आयुष्य आठवा. सिगरेट / तंबाखूवर अवलंबून नसणे, तो कडवट वास/चव यापासून मुक्ती, मुख्य म्हणजे व्यायाम करू लागलात की तुम्हालाच जाणीव होईल की ही तंबाखूमुक्त जीवनशैली किती आनंद देणारी आहे.

बेस्ट ऑफ लक. ही मुळीच अवघड गोष्ट नाहिये. पहिल्या फटक्यात यशस्वी व्हा.

<<आता ८ वर्षे झाली आहेत.>>
----- टण्या ग्रेट जॉब.... निष्चय वाखाणण्याजोगा आहे.

शुभेच्छा. आणि खरंय मुळीच अवघड नाही.
मी दारूची सिगारेटची चव घेऊन त्याला नाकारलेय. अर्थात मी व्यसनापर्यंत पोहोचलो नाही म्हणून माझे उदाहरण तुम्हाला देऊ शकत नाही.
पण तरीही माझ्यामते हा मनाचा खेळ आहे की अमुकतमुक तल्लफ वा ते व्यसन केल्याशिवाय प्रेशरच येत नाही किंवा कामच सुचत नाही, डोकेच चालत नाही, फ्रेशच वाटत नाही वगैरे वगैरे.
आपण आपलाच ब्रेनवॉश करून मनात ठाम बसवलेले भ्रम असतात ते.. त्यामुळे तुमची काही ठराविक वेळ असेल तर तिथेच त्या व्यसनाला मारायला सुरुवात करा. जसे क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाची ऑफ साईड स्ट्राँग असेल तर त्याला तिथेच मारा करून तिथेच ज्यादा फिल्डींग लावायची. एकदा का तिथूनच त्याचे रन येणे बंद झाले तर त्याचा आत्मविश्वासच खच्ची होऊ शकतो. तुमच्या या व्यसनाचेही असेच करा. जिथे सर्वात जास्त तल्लफ येते तिथेच नाकाबंदी करा, बस तेवढाच वेळ मनाचा निग्रह करा. जर ती वेळ तुम्ही टाळण्यात यशस्वी ठरलात तर तिथेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यसन करणारे मित्र या दिवसांत टाळा. जर तुम्हाला व्यसन टाळायचे आणि तरीही ते तुम्हाला फोर्स करत असतील तर कायमचे टाळलेत तरी चालेल. हे लोक मित्र नसतात, फक्त व्यसनातले पार्टनर असतात आणि व्यसनच सोडायचे ठरवल्यास अश्यांची आयुष्यात गरजही नसते.

<< व्यसन करणारे मित्र या दिवसांत टाळा. जर तुम्हाला व्यसन टाळायचे आणि तरीही ते तुम्हाला फोर्स करत असतील तर कायमचे टाळलेत तरी चालेल. हे लोक मित्र नसतात, फक्त व्यसनातले पार्टनर असतात आणि व्यसनच सोडायचे ठरवल्यास अश्यांची आयुष्यात गरजही नसते.>>
------ ऋन्मेश सहमत.... विचार आवडला.

टण्या, तुम्हाला एकदम सोडताना काहीच त्रास झाला नाही?

क्रेविंग्स मुळे पोटात कळा, अ‍ॅन्झायटी अ‍ॅटॅक , घाम सुटणे वगैरे नाही आला/झालं?

क्रेविंग्स मुळे पोटात कळा, अ‍ॅन्झायटी अ‍ॅटॅक , घाम सुटणे वगैरे नाही आला/झालं?
>>>
नाही. सुरुवातीला एखादा आठवडा प्रेशर न येणे, थोडेफार डोकेदुखी झाली. विशेष त्रास काम करताना झाला. एखादी गोष्ट हातावेगळी केल्यावर सिगरेट प्यायली नाही की एकदम चुकल्यासारखे वाटे. ते हळुहळु कमी झाले.
सिगरेटचा विथड्रॉल दारू किंवा इतर ड्रग्ज्ज एव्हडा सिविअर येतो का? अर्थात जर वरील सिम्प्टम्स कॉमन असतील तर डॉक्टरला विचारा सोडताना.
मी माझा अनुभव दिला. ते टेम्प्लेट मानू नये हे डिस्क्लेमर.

१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?

वयाच्या 15व्या वर्षा पासून व्यसन लागले, तालमीतुन बाहेर पडले की अंगावरली माती धुस्तोवर थंडीच्या महिन्यात घाण काकडा बसत असे तेव्हा आमच्या तालमीतल्या थंडाई घोटणाऱ्या भय्या ने एक दिवस 'गर्मी का बुटी' म्हणत एक चिमूट सरकवली होती हातात त्यानंतर साधारण एखाद वर्षाने लक्षात आले की बुआ आपण दिवसाला दोन विडे सहज लावतोय. ट्रेनिंगचे अकरा महिने तंबाखू पूर्ण बंद होता अन त्याचा डोज नसल्याने काही फरकही पडत नव्हता, तेव्हा व्यसन हे मेंटल असते त्याची शारीरिक गरज काहीच नाही हे पटले, तूर्तास मुजफ्फरपुरी किंवा बक्सरी पत्ती खातो बिहारची प्रसिद्ध (ही आपल्याकडे असते तशी सुक्की पत्ती नसते तर cure केलेली लांब लांब कापलेली ओलसर पत्ती असते अन किक फर्मास लागते)

२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?

पहिले तर मी denial mode मध्ये होतो की बोआ आपल्याला व्यसनच नाही अन हे म्हणतानाच रोजचे एक पाकीट स्वाहा होऊ लागले होते, नंतर आपण करत असलेला वाय झेड प्रकार लक्षात आला अन मी 'हळू हळू' तंबाखू बंद करायचा प्रयत्न करू लागलो म्हणजे कधी रेशनिंग करीत असे तर कधी नियम घालत असे उदा ज्या दिवशी मटण खाईन त्याच दिवशी विडा मळेल इत्यादी, पण ते सगळे फेल असते , शेवटी मी शेगाव ला गजानन महाराजांसमोर सोडली तंबाकू !! त्यात कॅच होता म्हणजे आपण देवाला बोललो की 'आजपासून मी विडा मळणार नाही' आता गार एरिया मध्ये राहतो तरी तंबाकू गरजेचा वाटत नाही अजिबात, जर एखाद्या मित्राने घोटला तर एक चिमूट खातो पण रोजचे 12 विडे वगैरे बंद झाले आहेत अन आठवड्यात एखाद विडा वगैरे सूरु आहे, तो सुद्धा कंपनी म्हणून होतो तो नसल्यास पाचनचक्र गडबडले आहे वगैरे काहीच वाटत नाही आधीपासूनच. अमुक गोष्ट आपण सोडू शकतो हि खात्री आल्यावरच त्यात पडावे, चार आण्याचं काळीज असल्यास असल्याचा नाद न केलेलाच बारा

३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?

मला तरी असे काही सांगता येणार नाही वरती लिहिले आहे त्यात काही सापडले तर पहा

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?

कल्पना नाही, वापरलेली नाही

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

कसं सांगू बुआ आधी तोटे काय झाले ते कळू दे Wink

व्यसन सोडण्यास शुभेच्छा!!

पुर्वी माबोवर अशाच स्वरूपाचा एक धागा होता, त्यामधे एकाने स्मोकिन्गचे जोरदार समर्थन केल्याचे आठवते.
अजुन त्याची लिन्क मिळाली नाही, जर कोणाला माहित असेल तर येथे द्या.

सि.जि. यांनी हा लेख कवितेसारखा दिसेल असा का लिहिला आहे ?

व्वा...व्यसन सोडण्याचा मनापासुन प्रयत्न... हाच ठाम पणा कायम ठेवा.
तुमचे अभिनंदन!
सर्व प्रतिसाद उत्तम!

शुभेच्छा. नक्की जमेल तुम्हाला.
नॉन स्मोकर मित्रांबरोबर जास्त काळ राहता आलं तर बघा.

सिगारेटचे ओढण्याची सुरुवात सेकंड ईयरला झाली. पहिली चक्क बिडी ओढली! नवरात्रीमधे मित्रांबरोबर रात्री भटकताना. मग हळु हळु तल्लफ आली की सिगारेट ओढणं सुरु झालं. गोल्ड फ्लेक! वर्षभर हा प्रकार सुरु होता. मग ईयर एंडींगच्या दिवशी एका मित्राबरोबर संध्याकाळी सामान आणायला गेलो. पानवाल्याकडे गोल्ड फ्लेक नव्हती, मित्राने विल्स घेतली. अर्धी अधिक संपवली आणि पोटात ढवळुन आलं , भडाभडा ओकलो. अचानक नॉशिया आला. त्यानंतर सिगारेट कधीच हातात धरली नाही. आता तर सिगारेटचा धूरदेखिल सहन होत नाही. नंतर नोकरी करताना पानमसाला खाण्याचे व्यसन लागले. पण ते गुटख्याकडे वळण्याआधिच सोडुन दिले. दारुदेखिल पित असे. पण शक्यतो बिअरच. पण नंतर ती देखिल सोडुन दिली. कारण घोड्याचा लगाम आपल्या हाती राहत नाहिये हे लक्षात हेऊ लागले. शनिवार आला की पिण्याची इच्छा व्हायचीच. मग काही अ‍ॅक्टीव्हीटिज मधे गुंतवुन घेतले. आता १० वर्षे झाली. कुठल्याहीप्रकारच्या दारुचा थेबही प्यालो नाही.

मन खंबीर ठेवा. मेडीटेशनचा फायदा नक्की होतो. स्वत:च स्वतःशी संवाद साधा. मनाचं ऐकु नका, मेंदूचं ऐका, विवेकाचं ऐका. शुभेच्छा तुम्हाला!

>पण तरीही माझ्यामते हा मनाचा खेळ आहे की अमुकतमुक तल्लफ वा ते व्यसन केल्याशिवाय प्रेशरच येत नाही किंवा कामच सुचत नाही, डोकेच चालत नाही, फ्रेशच वाटत नाही वगैरे वगैरे.
आपण आपलाच ब्रेनवॉश करून मनात ठाम बसवलेले भ्रम असतात ते.

ऋन्मेऽऽष ,
तुमचे म्हणणे objectively कितिही खरे असेल तरी ज्याला व्यसन आहे त्याच्या मेंदूला हे समजत नाही. आपण ज्याला स्वतःची जाणीव म्हणतो, निर्णय घेतो ते फक्त मेंदू मधे असलेले इलेक्ट्रिक सिग्नल असतात. व्यसनांमुळे या सिग्नलमधे बदल होतो आणि हेच योग्य आहे असे मेंदू म्हणतो.
याचे एक अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे तर तुमचे कधी पूर्ण भूल देऊन ऑपरेशन झाले असेल तर समजेल. भूल देण्याचे औषध मेंदू पर्यत पोहोचले तर काही सेकंदात तुमचा मेंदू झोपी जातो आणि तो आपल्या मनाचा खेळ आहे, भ्रम आहे वगैरे विचार करायला वावच रहात नाही. हे टोकाचे उदाहरण असले तरी मेंदूवर होणारा कमी अधिक परिणाम (ज्यावर सगळ्यांचाच कंट्रोल राहतो असे नाही) नाकारता येणार नाही. एलएसडी सारख्या पदार्थांमुळे तर जे प्रत्यक्षात नाही ते ही मेंदू तुम्हाला दाखवतो. त्यामुळे ज्याला व्यसन लागले आहे त्यांच्यासाठी ते खरेच असते.
आपल्याला दिसणारे (काहीही न घेता) बरेचसे जग हे मनाचा खेळच असतो, आपले डोळे हे एका वेळेस अगदी थोडेच पाहू शकतात. पण सतत आपला मेंदू काही वेळ अगोदर पाहिलेल्या प्रतिमांचे सुलभीकरण करून आपल्याला दिसते आहे असा सतत भास उभा करतात जो आपल्याला खरा वाटतो (आणि सहसा असतोही). पण मेंदूच्या आकलनाला जो वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेगात जर आपल्या आजुबाजुला काही झाले तर ते आपल्याला कधीच समजत नाही.

मी सिगरेट सोडून ६ वर्षे झाली आहेत. २० सिगरेट सहज व्हायच्या. आधी खूप प्रयत्न केले पण १०-१५ दिवसात परत सुरू व्हायची. पण सोडली तेंव्हा अतिशय निग्रहाने व तयारीने सोडली.

१. सर्वप्रथम मला सिगरेट का सोडायची आहे ते लिहून काढले व तो कागद पाकीटात ठेवला. ही पायरी खूप महत्वाची आहे. तुमच्या विचारांना व आंतरमनाला त्यामुळे दिशा मिळते. सिगरेटच ओढून मिळणार्‍या आनंदापेक्षा तोटे जास्त आहेत हे तुम्हाला मनोमनी पटले पाहिजे. तसे नसेल तर सिगरेट सुटणार नाही.

२. सिगरेटची तल्लफ येणारच पण तसे झाल्यास तयारी आधीच करून ठेवा. लवंग, वेल्दोडा, बडीशेप टिकटॅक सारख्या गोळ्या यापैकी दोन तीन तरी गोष्टी हाताजवळ असतील याची काळजी घ्या.
३. सिगरेट ज्या गोष्टींबरोबर जास्ती होतात त्या टाळा. जसे की दारू, चहा, मित्रांबरोबर भटकणे. त्या ऐवजी तुम्ही काय करणार त्याची आधीच तयारी करून ठेवा
४. पहिला दिवस, तीसरा दिवस, ७ वा , आठवा , पंधरावा व तिसावा (व त्यांच्या आसपासचे) दिवस महत्वाचे असतात. त्यावेळेस मात्र इतर काही उपायापेक्षा मनाचा पक्का निग्रहच कामाचा येतो.
५. फार लांबचा विचार करू नका. फक्त तो क्षण यशस्वी पणे सिगरेट न ओढता पार पाडा मग तुम्ही जिंकलात.
सिगरेट वरच्या युद्धात विजय मिळवण्यासाठी अशा छोट्या लढाया खेळाव्या लागतील याची तयारी ठेवा.
६. एकदा १ महीना तुम्ही पार पाडला की तुम्ही ९९ टक्के यशस्वी झालात असे समजा. मग लढाईचे फार कमी क्षण येतील.
७. जमल्यास तुफान व्यायाम करा.

तुम्हाला शुभेच्छा.

पहिला दिवस, तीसरा दिवस, ७ वा , आठवा , पंधरावा व तिसावा (व त्यांच्या आसपासचे) दिवस महत्वाचे असतात.
???

हे असे का?

अजय, सिगारेट हा ईतका भारी अमली पदार्थ असतो का जे तो मेंदूवर कायमचा ताबा मिळवावा? ते सोपे नाही हे नक्कीच पण ठरवले की शक्य होतेच. सिगारेट यशस्वीपणे सोडणारे बरेच जण असतात. इथे लोकं आपापले अनुभव सांगून फक्त ती प्रोसेस कशी असावी हे मांडत आहेत ईतकेच.
बाकी सगळा खेळ मेंदूचा आहे म्हणूनच तर आपणच आपला ब्रेनवॉश करायचा असतो .. किंवा यात जे मदत करतील अश्यांच्या संगतीत राहावे.

मी ही साधारण अकरावीत असताना पहिली सिगारेट ओढली असेन पण आता त्याचे व्यसन बनले आहे यात काही शंका नाही.मी गेली17 वर्षे सिगारेट ओढतोय. हे व्यसन सोडायला हवे असे वाटते. पण आजतागत हे मला शक्य झालेले नाही. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एव्हडीच की मी दिवसातून मोजून दोनच सिगारेट ओढतो. रविवारी मात्र एखादी जास्त होत असेल. हा लेख वाचून आपण ही सिगारेट सोडावी अशी इच्छा झाली आहे. नक्की प्रयत्न करीन

@जय ,तुम्हीही माझ्या प्रमाणेच अकरावीत ओढायला सुरवात केलीत ,याच वयात व्यसन लागते.तुम्हालाही व्य्सन सोडायचे आहे हे वाचून आनंद झाला .बेस्ट लक,
( दिवसाला दोन सिगरेट हे देखील व्यसनच आहे हे लक्षात ठेवा)

जे कोणी तंबाखू/दारु/ड्रग्ज इ. कुठल्याही व्यसनातून मुक्त होऊ पहात आहेत त्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या प्रयत्नांना अनेकानेक शुभेच्छा.

जे या व्यसनातून मुक्त झालेले आहेत त्यांचेही हार्दिक अभिनंदन व पुढे 'स्लिप' होऊ नये म्हणून दक्षता बाळगणे.

डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे - यांचे मुक्तिपत्रे हे पुस्तक अतिशय प्रॅक्टिकल व सर्वांनाच (व्यसने न करणार्‍यांनाही) वाचनीय....

muktipatre-dr-anand-nadkarni-akshar-prakashan-buy-online.jpg

एक अतिशय स्तुत्य धागा ......

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद,अजय गल्लेवाले यांच्या उपयुक्त लिंक साठी धन्यवाद.

गेली दहा वर्षे दिवसाला १०-१५ सिगरेट फुकतोय. जवळपास रोज ठरवतो कि आजपासून बंद आणि तरी नियमाने एक पाकीट घेऊन घरी येतोच आहे. सगळ्या गोष्टी सिगारेटशी लिंक झालेल्या आहेत. काही बघतोय, वाचतोय, करतोय ह्या सगळ्यांना सिगरेटचा आधार लागतो. त्याशिवाय काही करतोय असे वाटतच नाही. आता अगदी टाईप करतानाही हातात सिगरेट आहेच.
Worst thing is, I am now lying about it to everyone. Telling concerned people around me that I have quit smoking or have cut it down. Which I do. But regress again to the same old habit. Reading this thread is very helpful though. I will definitely give it an honest try.

@@संदीपसमीप,
तुम्ही खरेच प्रामाणिकपणे प्रयत्न करताय असे वाटतेय. तसेच सिगरेटचे दुष्परिणाम तुम्हाला व्यवस्थित माहित आहेत असे वाटतेय म्हणून लिहितोय.

आपण सिगरेट बंद करू शकू हा आत्मविश्वास गमवला की असे होऊ शकते. बर्‍याच वेळेस सिगरेट बंद करायची असा निश्चय मनापासून करायचा पण व्यसनापुढे परत हात टेकायचे. असे वारंवार होत रहाणे हेच आत्मविश्वास गमावण्याचे कारण असते. उदा. सिगरेट सोडायची हा विचार करताना सुध्दा मनात आतमधे कुढेतरी ("हे कसे शक्य आहे?") अशा प्रकारची नकार घंटा वाजत असेल तर तो निश्चय उपयोगाचा नाही.

म्हणून अगदी प्राणपणाने जपता येईल असा अगदी छोटा किंवा क्षुल्लक नियम करायचा व तो जपायचा व अशारितीने आपला आत्मविश्वास वाढवत न्यायचा ही युक्ति उपयोगी पडू शकेल .

उदाहरणार्थ मी काही झाले तरी एकावेळेस अर्धेच पाकीट घेईन असा नियम केला तर तो पचायची ताकद मिळू शकते. जरा विचित्र वाटेल, पण सिगरेट सोडायला लागणार नाहीय्ये या आशेपोटी असा नियम पाळण्याची ताकद मिळणे शक्य होऊ शकते व रोजच्या १०-१५ सिगरेट वरून तुम्ही ८-१० पर्यंत उतरू शकाल. तेही चांगल्यारितीने जमले की एका वेळेस फक्त दोनच विकत घ्यायच्या असा नवीन नियम करता येईल.

हा सल्ला ज्यांनी सिगरेट सोडायचा खूप वेळेस प्रामाणिक प्रयत्न केला आहे पण अपयश आलेले आहे त्यांच्यासाठी आहे. साधारणतः अशा लोकांना सिगरेट सोडण्याचा मनात आलेला विचार सुध्दा अस्वस्थ करतो. या अस्वस्थतेचे कारण असते, "हे मला कसे जमणार?" हा स्वतः बद्दलचा दृढविश्वास.

काहीही होवो. तुमचे व्यसन सुटो ही मनापासून शुभेच्छा.

संदीपसमीप, तुमची सिगारेट सुटेल, नक्की सुटेल यावर तुमचाच विश्वास हवा. मला खात्री आहे की याच धाग्यावर तुम्ही लवकरच 'माझी सिगारेट सुटली' अशी पोस्ट टाकाल. Happy शुभेच्छा

Pages