फ्रूट केक

Submitted by विद्या भुतकर on 19 June, 2016 - 18:35

काही काही पदार्थ आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर पुरतात. आणि त्याची स्वत:ची एक वेगळी अशी गोष्ट असतेच तीही त्याच्यासोबत फिरत राहते. असाच आजचा हा केक. सध्या आई इकडे असल्याने सलग दोन वेळा झाला. पहिल्या वेळी इतका लवकर संपला की त्यावर लिहायला डोक्यातही आले नाही. शेजारच्या काकूंना दिल्यावर त्यांनीही त्याची रेसिपी मागितली आणि मग म्हणले लिहूनच टाकावी. Happy त्यासाठी मग आईच्या मापातल्या वाट्यातून प्रत्येक साहित्य केकच्या मापांमध्ये घेतल. नाहीतर अंदाज पंचे धागोदरशेच होतं नेहमी. रेसिपीच्या आधी गोष्ट त्या केकची गोष्ट.

आम्ही लहान असताना माझ्या भावाला आमच्या तिथल्या एका काकूंच्या घरी खाल्लेला केक आवडला. लाडका नातू, मग काय, आमचे आजोबा लगेच आईला म्हणाले, "सातारला सर्कस आलीय तर या मुलांना घेऊन जा आणि येताना ते केकसाठी लागणारा ओव्हन घेऊन ये". तर असे आजोबांनी दिलेला शब्द लगेच ऐकून आम्ही सर्कसला गेलो. येताना आईने एका दुकानातून (त्या काकूंच्या सांगण्यावरून) तो अलुमिनियम चा ओव्हन आणला. शिकत शिकत आईने मग त्या केकच्या कृतीत एकदम परफेक्शन आणलं. त्या ओव्हनच्या भांड्यात केक करणे किंवा त्यावर तापमान बरोबर लावणे, मधेच लाईट गेली तर कधी तो न फुगणे असे अनेक प्रकार झाले आहेत. आमचे सर्व वाढदिवस या केकवर झाले. आणि जमले तर अजूनही होतात. आईने केलेला केक बरेच वेळा आम्ही कॉलेजला किंवा ऑफिसला घेऊन गेलोय आणि फस्त केला आहे.

मला बाहेरचे केक फार कमी आवडतात.आणि ते तर या घरच्या केकसमोर अगदीच गोड आणि नकोसे वाटतात. विशेषत: आजकाल जे ढीगभर क्रीम थापलेल्या गोड केकने तर माझा घसाच बसतो. असो. आता हा साधा सुंदर केक बघूनच खावासा वाटतो. मुलानाही आवडला तो. अजून तरी मी काही हा केक बनवायला शिकले नव्हते. पण यावेळी म्हणले निदान रेसिपी लिहून ठेवावी आणि बाकीच्यांना ही सांगावी. आई घरी केला की ताजे लोणी काढून त्यात घालते. पण इथे ते काही जमत नाही. त्यामुळे इथले बटर घेतले होते. पण यावेळी बाकी सर्व मापाने केले आहे.

साहित्य:
५ अंडी
१ कप बटर (२ स्टिक्स बटर )
१. ५ कप साखर
३ कप मैदा
१.५ टेबल स्पून बेकिंग पावडर
१ टी स्पून व्हनीला इसेन्स ( माझ्याकडेचे फिके आहे त्यामुळे १.५ स्पून घातले होते. )
३/४ कप दुध
भांड्याला लावायला मैदा, थोडेसे तूप
वरून टाकायला टूटी फ्रुटी

कृती: मी हे सर्व माझ्याकडच्या Stand मिक्सर मध्ये बनवले आहे. आई घरी अंडी फेटून घेते बाकी सर्व ताटात हाताने एकसारखे मिक्स करते. hand मिक्सरनेही सर्व मिश्रण एकत्र करता येईल.

आधी अंडी भांड्यात घालून फेटून घेतली. मग त्यात बटर घालून अजून थोडा वेळ मिक्स केले. बटर मिक्स झाल्यावर साखर त्यात घातली. व्हनिला इसेन्स आणि दुध घालून मिक्स करते राहिले.

बाजूला मैद्यामध्ये बेकिंग पावडर घालून ते एकत्र चाळून घेतले होते.

मिक्सरमधले मिश्रण एकसारखे झाल्यावर बाजूला मैदा हळूहळू करत घालून फिरवत राहिले. सर्व Stand मिक्सरमध्ये सर्व एकसारखे खाल्यावर भांड्यामध्ये तूप लावून थोडा मैदा पसरून यात सर्व मिश्रण घातले. भांडे थोडे आपटून सर्व सपाट करून घेतले. त्यावर टूटी फ्रुटी पसरली.

ओव्हन ४०० F ला प्रिहिट करून घेतला होता. मिश्रण घातलेली भांडी त्यात ठेवून ३५ मिनिटे ३६० F तापमानाला ते ठेवून दिले. केक हळूहळू फुलत आला. मग ३५ मिनिटा नंतर ओव्हन बंद करून अजून १० मिनिट ठेवले त्यामुळे वरचे आवरण कुरकरीत होते थोडे. मध्ये सुरी घालून आतून काही चिकटत नाही ना हे पाहिले.

बाहेर काढलेला केक ताटात पालथा घालून काढून ठेवला. Happy आता फक्त खायचे बाकी आहे.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

IMG_6908.JPGIMG_6912.JPGIMG_6913.JPGIMG_6915.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय!

हि तर आमच्याच स्पाँज केकचे रेसीपी. टूटीफ्रूटी नाही टाकत.

आम्ही एकदम सेम प्रमाण पण आई अंड्यातील पिवळा बलक आणि साखर खूप फेटते वॅनिला ईसेन्स घालून. मग बटर घालून फेटते.
मग चाळलेला मैदा हळू हळू घालते. आणि शेवटी अंड्याचे पांढरे पीक्स येइतोवर फेटून अलगद हाताने मिक्स करते.

कायम हिच रेसीपीन पाउंड केक केल्याने डोक्यात बसलय ते प्रमान. लेमन पाउंड केक मध्ये फक्त लेमन साल किसते. आणि ज्युस टाकते.

काही कळली नाही रेसेपी. अशा रेसीपीं कधीही स्टेप बाय स्टेप फोटोसहीत लिहावी.

तरीसुद्धा धन्यवाद.

तुझे फेबुपान मस्तच आहे. एकदम वाचनीय लिहितेस.

मस्त दिसतो आहे केक!
३ कप मैदा आणि ५ अंडी म्हणजे भरपूर केक होत असेल. बरेच दिवस टिकतो का? की फ्रिजमध्ये ठेवावा लागतो?

वॉव. मस्त दिसतोय केक. माझी आईही असाच केक करायची. तो अल्युमिनियमचा ओव्हन तर अजूनही आहे तिच्याकडे Happy ते ताटात कालवलेलं मिश्रण, हळूहळू मैदा मिक्स करणं, मग केक ओव्हनमध्ये ठेवला की सतत बाजूने घिरट्या मारणं, तो फुगतोय की नाही यावर चर्चा, त्याचा खमंग वास, वीणकामाची सुई घेऊन केक झालाय की नाही हे टोचून बघणं- बेस्टम बेस्ट प्रकार! माझ्या आईचं प्रमाण ३ अंड्यांच्या केकचं होतं. त्यावेळी आमच्या वाड्यात अंडंही न खाणारी कुटुंब होती बरीच, त्यामुळे केक झाला- आणि तो झालेला कळायचाच वासावरून, की समस्त बच्चाकंपनी खायला हजर! Proud

मी हा केक अनेकदा करते. तीच चव आणि त्या आठवणी अगदी न चुकता येतात! Happy

थँक्स फॉर शेअरिंग धिस!

मस्त रेसीपी. ह्यात टुटी फ्रूटी इसेन्स पण टाकता येइल. मला नुसताच आवडतो. ह्यात अर्ध्या भागात हर्शीज चे डार्क चॉकोलेट पाव डर टाकायची व अर्धे तसेच ठेवायचे. मग मिक्स केले कि चॉकोलेट मार्बल केक!!!

मी आता टाइमपास म्हणून बेकिंग परत चालू करणार आहे. हॅलोजन अवन आहे मजकडे.

हर्ट, सॉरी मला रेसिपी लिहायची अजून थोडी सवय करायला हवी. त्यात आईकडून माप घ्यायची पहिलीच वेळ. धन्यवाद पेज विसिट साठी. Happy

ते ताटात कालवलेलं मिश्रण, हळूहळू मैदा मिक्स करणं, मग केक ओव्हनमध्ये ठेवला की सतत बाजूने घिरट्या मारणं, तो फुगतोय की नाही यावर चर्चा, त्याचा खमंग वास, वीणकामाची सुई घेऊन केक झालाय की नाही हे टोचून बघणं- बेस्टम बेस्ट प्रकार! >> पूनम, हो ग असेच सर्व करते आई आणि आम्ही पण.

मन्जूडी, रश्मी,
बराच होतो केक पण शिल्लक रहात नाही. Happy दोन दिवसाच्या आत सम्पुन जातो. तरीही, हवा असेल तर प्रिज्मधे एक आठवडा नक्की राहतो. मी तर ३ दिवस बाहेरही ठेवला आहे.

अमा, मॄनाल, नक्की करुन बघा. Happy

विद्या.