प्रतिभा ( भाग ५ वा)

Submitted by मिरिंडा on 17 June, 2016 - 03:30

प्रतिभा आश्चर्याने उत्तमच्या पाठमोऱ्या आणि घाईघाईने जाणाऱ्या आकृतीकडे पाहातच राहिली. तिच्या मनात आलं उत्तम इथे कसा आणि त्याने हा लखोटा का दिला ? हातातला लखोटा पर्समधे ठेवीत तिने खोलीच्या उघड्या दारातून आत डोकावून पाहिले.आत अंधार होता. बाजूच्याच भिंतीवरील लाइटचे बटण दाबल्यावर उजेड झाला. उजेडात तिने आतल्या खोलीतून येणारे रक्ताचे ओघळ पाहिले, आता त्यांचं दाराजवळ डबकं तयार झालं होतं. धडधडत्या छातीने ती आतल्या खोलीच्या उघड्या दरवाज्यातून आत डोकावली. आतले दृष्य पाहून सगळं घर आपल्या भोवती फिरतंय असं तिला वाटू लागलं. आयुष्यात तिने अगदी जवळून खून झालेला देह पाहिलेला नव्हता. राजेशचा पडलेला देह पाहून ती चक्रावली. तिच्या छातीत अचानक दाब निर्माण झाला .श्वास वरच्यावर राहिला. तिच्या तोंडून भीतीने किंचाळी फुटली आणि शुचिताने पाहू नये म्हणून ती बाहेर आली आणि तिला आपल्या पोटाशी धरले. ती काही क्षण तिथेच भिंतीशी बसली. मग तिच्या लक्षात आलं की त्याच्या पाठीत सुरा खुपसला होता. म्हणजे त्याला सुरा मारला जाईल इतकी कल्पनाच नसावी. कोणी केलं हे .....?उत्तम ?...... तो कशाला करील ? .......तिच्या नवऱ्याचे अनेक शत्रू होते. बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतल्याने त्याला सारखे धमकीचे फोन येत असत. तिला पाठीवरुन थंडगार घामाचा ओघळ उतरताना जाणवला. लवकरच तिच्या लक्षात आलं की पोलिसांना फोन करणं भाग आहे . तिने पोलिस स्टेशनला फोन केला. अडखळतच तिने पत्ता सांगितला. भिंतीला टेकून ती शुचीला कवेत घेऊन बसली होती. आज ती राजेशच्या तोंडावर पैसे फेकण्यासाठीच आली होती. आणि शुचीची भेट व्हावी म्हणून तिलाही तिने बरोबर आणलं होतं. ती आज शेवटचीच त्याला शुचीला दाखवणार होती. आज शेवटचं भांडण तिला राजेशबरोबर करायचं होतं. उघड्या पर्समधले पैसे निर्जिवपणे तिच्याकडे पाहत होते. ............
अर्ध्या तासांनी पोलीस आले. एक महिला कॉन्स्टेबल बरोबर होती. इन्स्पे. वाघमारे आणि बरोबरीचे तीन पो. कॉन्स्टेबल्स यांनी त्या दोनही खोल्या भरून गेल्या. प्रतिभा रडत नव्हती की भेकत नव्हती. कोरड्या डोळ्यांनी ती सगळा सीन पाहत होती. तिच्या मनात आलं का रडायचं , कशाला रडायचं. ज्या माणसाकडून आजपर्यंत उपेक्षेशिवाय काही मिळालं नाही त्याच्यासाठी का रडायचं ? अचानक तिच्या मनाने तिच्या आयुष्याचा चित्रपट उभा केला. तिला तरूण राजेश आवडला होता. ती स्वत: वेगळ्या जातीची असल्याने राजेशच्या घरून लग्नाला विरोध होता. पण राजेशने सगळं सांभाळलं. वेगळी , चाळितली का होईना , पण जागा घेतली. नव्याची नवी वर्ष लवकरच सरली. अचानक तिच्या लक्षात आलं राजेशला कोणतेही काम करण्यात काहीही रस नव्हता. मोठ्या मुष्किलीने तो कामावर जायचा. हळू हळू एका रजनी नावाच्या मुलीशी त्याची ओळख झाली. आणि त्यांचं आयुष्य डागाळू लागलं. मग रोज त्याचं उशिरा घरी येणं सुरू झालं. मध्येच शुचीचा जन्म झाला. त्यानंतर सहा सात महिने तो ठीक वागला. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न चालू झाले. आता तर तो अवेळी घरी येत असे . कारण नसताना तिला शिव्या देत असे . तिच्या माहेरच्यांना नावं ठेवीत असे. नाहितर बाप्पांशी (म्हणजे तिचे वडील) किती छान वागत असे. पण झालं सगळंच पालटलं. नजर लागल्या सारखं . ....... एक दिवस त्याने तिला माझे चाळे जर तुला पसंत नसतील तर तुझी तू सोय बघ म्हणून सांगितल्याने तिने नवीन जागा घेतली होती. तीही माहिमला. मग काय तो काहिही करीत नसल्याने अधून मधून माहिमच्या घरी यायचा तोही पिऊनच. तिच्या कडून पैसे उकळायचा. शेवटी तिला वकिलाचा सल्ला घेऊन घटस्फोटाचा मार्ग स्वीकारावा लागला. तेही काही सहज झालं नाही. एकत्र राहण्याच्या सल्ल्याला तिने विरोध केला. त्यावरचे अपिल ती जिंकली. आणि त्याच्या बरोबर राहणं टळलं . कोर्टात त्याने ती चारित्र्यहीन म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि मुलीचा ताबा मिळावा असे म्हंटले, पण त्यात तो यशस्वी न होता घटस्फोट मिळाला. फक्त त्याने मागितलेला मेंटेनन्स चा खर्च मात्र तिच्या माथी आला. आज त्याचाच तटका तोडण्यासाठी ती पैसे घेऊन आली होती. पण समोर काही भलतच वाढून ठेवलेलं होतं. तशी तिच्या मनाने तिला तिची सुटका झाल्याचं सांगितलं, कोणी का करेना पण त्यच्या पापांची शिक्षा त्याला मिळाली होती. त्यामुळे रडण्याचा प्रश्नच नव्हता. ................त्यांच्या समोरच्या गंभीर वातावरणाचा भंग करीत आल्यापासून शुचीने पहिल्यांदा विचारले, " ममी , घरी कधी जायचं " तिला आणखीन जवळ घेत ती म्हणाली, " जाऊ लवकरच हं . " पोलिसांचे सोपस्कार पुरे व्हायला तास दीड तास लागला. मग इन्स्पे.वाघमारे म्हणाले, " मिसेस राजवाडे तुम्हाला स्टेशनला यावं लागेल. तुमची जबानी घेणं मला आवश्यक आहे. मी समजू शकतो की अशा प्रसंगी तुमची मनस्थिती फारशी चांगली नाही पण माझा नाइलाज आहे. तुमच्या मुलीला या मॅडम सांभाळतील. " असे म्हणून ते मग सगळे निघाले. बॉडी सरकारी हॉस्पिटलात हालवण्याची व्यवस्था केली. जाता जाता ते आपल्या सहकाऱ्याशी मात्र कुजबुजले, " या बाईच्या डोळ्यात पाण्याचं टिपूस सुद्धा नाही , का ते कळत नाही. " सहकाऱ्याने त्याला अनुमोदन दिले. मग सगळेच जण पोलिस व्हॅनमध्ये बसून निघाले.
************** *************** ************ *********** ************************* **************** ************** ************ ******

खरंतर गल्ली मला आता नवीन नव्हती. पण बाहेर यायला फार वेळ लागल्यासारखे वाटले. मला इतका जबरदस्त धक्का बसला होता गल्ली संपली तरीही मी चालतच राहिलो. दहा बारा मिनिटं चालल्यावर माझ्या लक्षात आलं की रिक्षा करायला हवी. मग मी थोडा भानावर येऊन रिक्षा बघू लागलो. समोरून रिकाम्या येणाऱ्या दोन्ही रिक्षा थांबल्या नाहीत. कदाचित माझा एकूण चेहरामोहरा पाहून असेल. माझे कपडे ओले होते. कपाळावरचे केस विस्कटून चिकटले होते. खिशातला रुमाल भिजल्याने त्याचा तोंड पुसायला उपयोग नव्हता. मी चेहऱ्यावरचे पाणी हातानेच झटकीत होतो. चार महिन्यांचा पाऊस आजच पडू पाहत होता. मी डोक्यावर हात धरून रिक्षा शोधत होतो. नशीब माझ्या हातात लखोटा नव्हता. तो प्रतिभाने घेतला हे बरं झालं होतं. तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याची मला त्यावेळी तरी गरज वाटली नाही. खांद्यावरच्या सॅकचं मला ओझं वाटत होतं. अजूनही इथून दूर पळावसं वाटत होतं. माझ्या डोळ्यासमोर सारखी पावसात उभी असलेली प्रतिभा आणि तिची मुलगी येत होती. मनाने आता मिठाची गुळणी धरली होती. एरवी डोक फिरवणारं मन आता बधीर झालं होतं की काय कोण जाणे. तेवढ्यात एक रिक्षा माझ्या जवळ येऊन उभी राहिली. मी त्याला स्टेशन म्हणून सांगितल्यावर तो माझ्याकडे बघत राहिला. मी चिडून म्हणालो " अब चलेगा भी , या ऐसाही बैठा रहेगा ? " तो चुपचाप निघाला. सध्या मला काहीही पाहायचे नव्हते की ऐकायचे नव्हते. पावसाचा आणि वाहतुकीचा आवाज यात मला मोबाइलचं फुरफुरणं जाणवलं. पण मी लक्ष दिले नाही. रिताचाच असणार असं मला वाटलं. स्टेशन फारच लवकर आल्याने मला आश्चर्य वाटलं कदाचित म्हणूनच रिक्षावाला माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होता. ......मी तडक समोर दिसेल त्या गाडीत घुसलो. नशीब ती चर्चगेट कडे जाणारी होती. आठ सव्वा आठला मी घरी पोहोचलो. माझा चेहरा बोलका झाला होता की काय कोण जाणे . शिरल्या शिरल्या माझ्या हातातली बॅग घेत रिताने विचारले, " काही झालंय का ? " ...... मला जरा रागच आला. मी मानेनेच नाही म्हंटलं. मी बूट जागेवर ठेवून फ्रेश होण्यासाठी आत वळलो. तोंडावर पाणी मारता मारता माझं मन जागं झालं. " कर तिचा पाठलाग , नसते उपद्व्याप करायला सांगितल कोणी ? " मी उत्तर दिलं नाही. माझ्या डोळ्यासमोर प्रतिभाच्या नवऱ्याचा रक्ताच्या थारोळयात पडलेला देह आला. मन थांबायला तयार नव्हतं. त्याला आसुरी आनंद होत होता. शेवटी बाहेर येऊन मी मुलांशी खेळण्यात वेळ घालवू लागलो. मग जेवायला बसलो. आपण यात अडकणार की काय ? अचानक आलेल्या भीतीदायक विचाराने माझा घास तोंडात फिरू लागला. रिताच्या ते लक्षात आलेलं दिसलं. तिने पुन्हा विचारलं " जेवणात लक्ष नाही आहे तुमचं, काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा ना. म्हणजे मार्ग निघेल. " तिचा मला राग येऊन मी तिच्यावर खेकसलो. " मघाशी सांगितलं ना तुला , काही नाही म्हणून . अजून किती वेळा सांगायचं . पुन्हा पुन्हा विचारलं तर माझं उत्तर बदलेल असं वाटतं का तुला ? " ती नाराज झाली. या क्षणी मला खरंतर एखाद दोन पेगची गरज होती. मी बाहेर उभं राहून सिगारेट शिलगावली. एक दोन झुरके घेतले तोच मोबाइल फुरफुरला. पाहिलं तर नारायणचा फोन होता.
मी तो घ्यावा की नाही या विचारात होतो. पण घेतला. त्याचा काळजीत असलेला आवाज आला " अरे उत्तम
किधर है तुम , मै छे बजेसे ट्राइ कर रहा है. तुमने वो लेटर डिलिव्हर किया क्या ? " म्हणजे मध्ये फुरफुरणारा फोन त्याचा होता तर. त्या आधीही त्याने फोन केला असणार. त्याने खरच बरेच कॉल्स केलेले दिसले. ......मी घाबरलो. याच्याकडे पोलिस तर नाही पोहोचले. माझ्या मनात शंका. मी " हां " म्हंटले. त्यावर तो म्हणाला, " वो लेटर देनेका नही था. प्रतिबाका फोन आया था , वो एक दो दिनमे ऑफिस आनेवाली है . जाने दो . " त्याने फोन बंद केला. खरा धक्का तर मला अजून ऑफिसला गेल्यावर बसणार होता. पाऊस इतका जोरात पडत होता की आता फक्त रात्रच राहणार आहे दिवस उजाडणारच नाही अशी त्याची कल्पना असावी. आता मला थोडी थंडी वाजू लागली. मी घरात आलो अंगावर पांघरूण घेऊन पडलो. थोड्याच वेळात रिता आली. ती माझ्याशी फारसं काही बोलली नाही. आता नशा आणणारं आणि विसरायला लावणारं एकच पेय्य होतं. ते म्हणजे " प्र ण य " ........
पण मी तिला नाराज केलेलं होतं. ती प्रतिसाद देणार नाही अशी खात्री होती. अचानक मी तिच्याकडे वळलो. (म्हणजे मला वळायचंच होतं ) मी काहीच हालचाल केली नाही . तीच मग मला जवळ घेऊन म्हणाली, " खरच, मी विचारायलाच नको होतं. " आता ती इतकी जवळ होती, की तिचे श्वास आणि स्पर्श मला चांगलेच जाणवत होते. तिच्या श्वासाचा गंध आणि शरिराचा गंध मादक पणा वाढवीत होता. तिच्या कडूनही आता चांगलेच प्रतिसाद येऊ लागले. मी सुद्धा मग न राहवून म्हणत तिला जवळ ओढली. जवळ जवळ अर्धा पाऊण तास आमचे प्रणयाराधन चालू होतं. ओलसर पावसाळी रात्र आम्हाला दोघांना बेभान करीत नाचत होती. समाधान तिच्या अंगाला स्पर्श करीत होत. तिने डोळे मिटले. ती भानावर आल्यावर मी तिला झाल्या प्रकारातलं सांगण्यासारखं जे जे होतं ते सांगितलं.(अर्थातच प्रतिभाच्या पाठलागाचा भाग सोडून) तिला या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर वाटल्या की ती उठून बसली आणि म्हणाली, " छे बाई, मला नाही आता झोप लागणार . आता आपल्या घरी पोलिस येतील का हो ? " तिने घाबरत विचारले. मी म्हंटले, " यायला हवेत का ? " त्यावर ती म्हणाली, " तसं नाही हो , पण काळजी वाटते. " तिने परत मला जवळ घेत म्हंटले, " काळजी घ्या हो. " अशा रितिने माझ्या बद्दल काळजी वाहू वातावरण तिच्या मनात मी तयार करण्यात यशस्वी झालो. आता मला थोडं बरं वाटत होतं. पण पावसासारखं उद्या दिवस उजाडणार नाही अशी खात्री मात्र वाटली नाही. ....... एकूण मी पुरुषी कावा यशस्वी रित्या खेळलो. आता तिच्या मनात माझ्याबद्दल मी निरपराध असल्याची भावना निर्माण झाली असावी. तसा मी नैतिक दृष्ट्या अपराधी होतो.
सकाळ झाली. का झाली ? सूर्याला काय झालं , आणखी पंधराएक दिवस नाही उगवला तर ? या भावनेत मी उठलो. आणि दात घासता घासता माझ्या मनात विचार आला, " पो ली स ये ऊ न गे ले अ स ती ल " एवढ्या वाक्याने मी विचलित झालो. रिता माझे बूट रोज साफ करून देत असे. अचानक एक बूट घेऊन ती माझ्याकडे आली, आणी म्हणाली, " काळ्या बुटांना लाल रंग लावायचा प्रयत्न करत होतात की काय ? "तिने माझ्या पुढे बूट धरला. खरंच बुटाच्या एका कडेला लालसर काळसर रंगाची लाइनच चिकटलेली दिसली. मी तिच्या हातातून तो घेतला आणि घाईघाईने धुतला. म्हणजे त्याच्या रक्ताच्या थारोळ्यातलं रक्त माझ्या बुटांना लागलं होतं. इतक्या पावसात ते तसच कसं राहिलं कोण जाणे, आणि मी तरी घरी आल्यावर बूट धुवायचे कसे विसरलो मला कळेना. ....मग रेंगाळत मी निघालो. माझ्या अपेक्षे प्रमाणे प्रतिभा आलेली नव्हती. आल्या आल्या नारायणने बोलावले. आत गेल्यावर तो म्हणाला, " तुम निकलनेके तुरंत बाद प्रतिबाका फोन आया था, तुमको यही कहनेके लिये मैने फोन किया था, लेकीन तुमने तो फोन उटायाही नही . देको वो लेटर पर लिखा हुवा आड्रेस नया था. जो प्रतिबाने कंपनि को इंफोर्म किया नही था. "
आता मी याला काय सांगणार , मी जुन्या पत्त्यावरच जाऊन लेटर देऊन आलो होतो आणि तेही प्रतिभाच्या हातात. म्हणून पत्त्याचा प्रश्नच नव्हता. आता पत्ता हा कंपनिच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता. अर्थात माझ्याजवळ लेटर दिल्याची पावती नव्हती. प्रतिभा जर लेटर मिळालंच नाही असं म्हणाली तर ? मला थोडा घाम फुटला. म्हणजे माझ्याजवळ लेटर देण्यासाठी गेलो असल्याचा काहीही पुरावा नव्हता. पोलिसांच्या दृष्टीने हे महत्वाचं होतं. पोलिस माझ्या पर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ लागण्याची शक्यता होती. मी काहीच बोलत नाही असं पाहून नारायण म्हणाला, " कुच प्रोब्लेम है क्या " ....... मग मी बाहेर जाण्यासाठी वळणार एवढ्यात त्याच्या केबिनच्या दारावर टकटक झाली. नारायण ती ऐकून म्हणाला, " येस , कम इन " आत शिरलेल्या पोलिस इन्स्पेकटरना पाहून माझ्या छातीत कळ आली. तोंडाला कोरड पडली. नारायणने
त्यांनी बसण्याची खूण करता करता मला जाण्याची खूणही केली. मी खालच्या मानेने केबिनच्या बाहेर आलो. मला आश्चर्य हे वाटलं की पोलीस एवढ्या लवकर इथे कसे पोहोचले. याचाच अर्थ मी गल्लीतून बाहेर पडल्यानंतर ते अर्ध्या पाऊण तासात आले असले पाहिजेत. आता प्रतिभाने माझं नाव सांगितलं होतं की नारायणचं ? आतली प्रश्नोत्तरं काय चालू होती कळायला मार्ग नव्हता. बरं झालं प्रतिभा नव्हती ते. ती हायपर झाली असती तर तिने पोलिसांना सगळं , म्हणजे आपण केलेला पाठलाग वगैरे , सांगितलं असतं. आपल्याला ते भारी पडलं असतं. अजून तरी आपल्याला आत बोलावलं नव्हतं. आतमध्ये इन्स्पेक्टर साहेब अर्धा पाऊण तास होते. अधून मधून नारायणचा चिडका स्वर येत होता. .......

(क्र म शः ..... भाग ६ वा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

मस्त