चिंता!!

Submitted by झुलेलाल on 17 June, 2016 - 01:44

लोकांची डोकी बाकी भारी चालतात!
पाऊस लांबल्यानं सारे चिंताग्रस्त आहेत, हे खरंच. आणखी काही दिवस पाऊस पडलाच नाही, समजा उभा हंगामच कोरडा गेला, तर काय होणार या नुसत्या विचारानेही चक्कर येऊ शकते. शरीर शुष्क होऊ शकते, घामही थांबू शकतो...
हे खरंय.
मग आपापल्या परीने, पाऊस यावा म्हणून काय करता येईल याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू होतो.
काल ट्रेनमधे एक टोळकं गंभीरपणाने याचीच चर्चा करत होतं.
एकजण आणखी गंभीरपणाने म्हणाला, 'मला वाटतं, गावोगावी मंडप उभारावेत. सुंदर वातावरण तयार करावेत. मंचावर मंद समया तेवत ठेवाव्यात. मंडपात सर्वत्र नैसर्गिक फुलांचा सुगंध पसरेल अशा रीतीने सोनचाफा, मोगऱ्याच्या माळा लावाव्यात.
लाऊड स्पीकर अतिशय संवेदनशील असावेत!
...आणि मुहूर्त पाहून मैफल सुरु करावी.
या मैफिलीत फक्त 'मेघमल्हार'चे आलाप आळवले जावेत.
त्या सुरांनी वातावरण भारून जावं, आणि भारावलेल्या ढगांनी आभाळात गर्दी करावी. सूर कानात साठवत असतानाच मैफल संपावी आणि तृप्त ढगांनी बरसण्यास सुरुवात करावी! '...
त्याचं बोलणं संपलं.
बाकीचे सारेजण कान लावून ते ऐकत होते.
अचानक सगळे भानावर आले. 'त्या' वातावरणाचा पडदा अलगद बाजूला झाला. असं शक्य असतं का, यावर चर्चा सुरू झाली.
'कृत्रिम पावसाचे शास्त्रीय प्रयोगही अपयशी ठरलेत, तर मेघमल्हार काय करणार?' असा सूर उमटला.
'एवढ्या ताकदीचे गायक आहेत का आपल्याकडे?... दुसऱ्या एकाने गंभीर होत विचारले.
तिसरा मात्र, हसत होता. त्याची नजर खट्याळ झाली होती.
'ए, भाऊ, कुठल्या जमान्यात आहेस रे?.... उद्या मुलं होण्यासाठी निपुत्रिकांचे मेळावे घेऊन त्यांच्याकरवी पुत्रकामेष्टी यद्न्य करावेत म्हणशील... आणि चांगलं मूल जन्माला यावं, मुलगाच हवा, म्हणून 'गर्भसंस्कारा'ची शिबिरं भरवा म्हणशील... काय चाललंय काय?'... तो काहीसा रागातच बोलत होता.
मग सगळ्यांचेच चेहरे उतरले.
आणि, 'पाऊस पडलाच नाही तर...' या चिंतेची छटा त्या चेहऱ्यांवर पुन्हा अवतरली!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना Sad