प्रेमाची अधुरी कहानी - रीना रॉय .....

Submitted by अजातशत्रू on 16 June, 2016 - 22:53

प्रेमाची अधुरी कहानी - रीना रॉय .....
मे १९७९. फिल्मीस्तान स्टुडीओत जे.ओमप्रकाश यांच्या 'आशा'चे चित्रीकरण चालू होते आणि रीना रॉयच्या 'शिशा हो या दिल हो...' वर काम चालू होते. जितेंद्र आणि रामेश्वरी समोर बसलेले आहेत आणि रीना त्यांच्या समोर गाते आहे असा सीन होता. 'काफी बस अर्मान नही कुछ मिलना आसां नही...' ह्या ओळीचे चित्रीकरण सुरु होते. कॅमेरा ट्रोल करावा लागत होता, भगवान दादा हातामध्ये अ‍ॅकॉर्डीयन (हातातली पेटी) वाजवतात आणि कॅमेरा त्यांच्या उजव्या बाजूने पुढे रीनारॉयच्या डाव्या बाजूने समोर यायचा. तिच्या हातात डफली दिलेली होती, रीनाच्या गौरवर्णीय कांतीवर काळ्याकुट्ट रंगाच्या जॉर्जेटच्या चनिया चोळीवरची सोनेरी नक्षीदार वेलबुट्टी अगदी खुलून दिसत होती. तिच्या विस्तीर्ण कपाळावर खड्याची टिकली शोभून दिसत होती. कानात मोठे गोल खड्यांचे झुबे आणि कपाळावरची केसांची जीवघेणी महिरप अन मागे सैल सोडलेले केस, गळ्यात तशीच काळी ओढणी अशा 'चाबूक' वेशभूषेत ती रेडी पोजिशनमध्ये उभी होती. तिच्यापुढे हार घातलेला माईक होता. या आधी गाण्याचा मुखडा चित्रीत झाला होता अन या ओळीवर गाडी अडली होती. थकलेले भगवानदादा त्या अ‍ॅकॉर्डीयनच्या वजनाने अजून दमून गेले होते, सगळे युनिट घामाघूम झाले होते अन शॉट ओके होत नव्हता. 'अ' या आद्याक्षरापासून सिनेमाचे नाव ठेवणारे दिग्दर्शक जे. ओमप्रकाश थोडेसे वैतागून गेले होते. ते चिडूनच बोलले - "अरी तुम तो ऐसे हिचकिचा रही हो जैसे असल जिंदगी में भी रोमान्स चल रहा है !"

हे वाक्य ते बोलून गेले खरे पण नकळत ते खरे बोलून गेले होते. जे. ओमप्रकाश यांच्या १९७७ मधल्या 'अपनापन'ने तिला चांगला हात दिला होता आणि तिची नवी इमेज बनवली होती शिवाय तिचे शत्रूबरोबरचे नाते खुलेआम होते. म्हणून जे.ओ.ने अशी कॉमेंट करताच रीनाला वाईट वाटले अन पुढच्याच टेकला शॉट ओके झाला. वास्तविकतः हातातल्या डफलीमुळे ती अनकम्फर्टेबल झाली होती आणि तिचे लक्ष विचलित होऊन शॉट चुकत होता. मात्र जे.ओ. च्या त्या कॉमेंटने लाजून चूर झालेल्या रीनाने अगदी सराईतपणे शॉट पूर्ण केला. काही महिन्यातच चित्रीकरण संपले. ४ मार्च १९८०ला सिनेमा रिलीज झाला आणि हा सिनेमा तिच्यासाठी माईलस्टोन ठरला ती फार आनंदात होती मात्र नियतीला तिचा हा आनंद फार काळ मंजूर नसावा कारण या काळानंतर तिच्या आयुष्यात पुढे तिची फरफटच होत गेली. याला ती स्वतः जितकी कारणीभूत होती तितकाच कारणीभूत होता शत्रुघ्न सिन्हा !

बिहारमधील पाटण्यात जन्मलेल्या शत्रुघ्नला राम,लक्ष्मण, भरत अशी तीन मोठी भावंडे होती, वडिलांची इच्छा नसतानाही तो पुण्याला आला होता. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. आदमासे १९६५ चा काळ असेल, या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले.तो तिथे जाऊन त्यांना भेटला.(तिथल्या त्याच्या फजितीवर नन्तर कधी तरी लिहीन) तो तिथून रेल्वे स्टेशनवर परतीसाठी आला आणि तिथे त्याचे लक्ष पूनमकडे गेले. तिच्यावर त्याने लक्ष ठेवले आणि ती ज्या डब्यात बसली होती तिथे गेला. ती रडत होती, तिची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने तिच्या हातात चित्रपटाचे मासिक ठेवले ज्यावर सुंदर मुलीनी रडू नये असा मेसेज त्याने पेनने लिहिला होता, तिने ते मासिक फेकून दिल्यावर शत्रुघ्नने काय तो अर्थ घेतला. तिथून पाय काढता घेण्याआधी तिची बित्तंबातमी मात्र त्याने हातोहात काढली. नंतरच्या काळात दोघे एकेमकाला भेटत राहिले आणि संपर्कात राहिले.पुढे शत्रू त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला करिअरसाठी निघून गेला. काही अवधीनंतर १९६८ मध्ये पूनम मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेली. यादरम्यान पूनमची शत्रूशी वाढलेली जवळीक तिच्या आईच्या ध्यानात आली होती. एकदा शत्रू तिच्या घरी गेल्यावर तिच्या वडिलांनी त्याची चांगली पिसे काढली होती. "माझ्या गोऱ्यापान देखण्या मुलीसमोर तू शोभून दिसत नाहीस तुझी आणि तिची जोडी श्वेतशाम (black & white) टीव्ही सारखी आहे, तू बिहारी कोळशासारखा आहेस" अशी त्याची खरडपट्टी त्यांनी केली. मात्र शत्रूच्या डोक्यातून ती जात नव्हती, त्याने १९७३ मध्ये तिला पहिला सिनेमा मिळवून दिला - 'सबक' हे त्याचे नाव. या सिनेमात तिचा नायक तोच होता. सिनेमा चालला नाही मात्र पूनम आणि शत्रुघ्न यांचे संबंध अधिक दृढ झाले आणि तिच्या पालकांचा रोष काही अंशी कमी झाला. शत्रूची लार्ज रोल सुरुवात देवआनंदच्या प्रेमपुजारीने (रिलीज - १९७०) झाली होती पण या सिनेमाच्या आधी पोलीस इन्स्पेक्टरची त्याची छोटीशी भूमिका असलेला 'साजन' (१९६९) येऊन गेला.

रीनाची कहानी मात्र काटेरी वाटेची आहे. ७० आणि ८० चा काळ हा बॉलिवूडचा आणि सिंगल थियेटरचा सुवर्णकाळ होता. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूड अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या चढत्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. या लुप्त झालेल्या अभिनेत्रीतपैकी एक असणाऱ्या रीनाने देखील एक काळ गाजवला होता. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी रीना जवळजवळ दोन दशके बॉलीवूडमध्ये सक्रीय होती.तिचे विशेष म्हणजे तिला पुरुष चाहत्यांइतकेच महिला चाहत्यांचे तुफान प्रेम लाभले होते.

रीना रॉयचे खरे नाव रुपा सिंह होते. तिचे कुटुंब मुळचे चेन्नईचे.ती तिच्या आईवडिलांची तिसरी मुलगी होती. ७ जानेवारी १९५७ ला मुंबईत रीना जन्मली होती. रीनाचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीनाच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. कुटुंब चालविण्याची जबाबदारी देखण्या रिनाने आपल्या खांद्यावर घेतली. तिने स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि तिचे टीनएजमधले उफाळणारे मादक सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले.

रीनाच्या करिअरची सुरुवात मात्र फारच वाईट झाली. बी.आर. इशारांनी तिला एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा 'नई दुनिया नए लोग' (१९७१) हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीनाचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसरया दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीनाचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते ! मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आली आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा काही रिलीज झाला नाही. शुटींगच्या त्या दिवशी मात्र रीना अगदी हमसून हमसून रडली. आत पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय तिने मनोमनी केला अन तो थेट वरती सुरुवातीला दिलेल्या 'आशा'तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांच्या १९७३ मध्ये आलेल्या 'जरुरत' या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा ! इथे तिने एकाच शॉटमध्ये सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. 'जरुरत' हा रीनाचा पडद्यावर आलेला पहिला सिनेमा ठरला होता.

या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना 'जरुरत गर्ल' या नावाने प्रसिद्ध झाली होती. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १४व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुलीही दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती ! जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणीविसरायच्या असाव्यात....

रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर तिला 'लुक' आणि 'गेटअप'ची जाण रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हन सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता. तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित 'तलाश' तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा....

रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. 'मिलाप', 'जंगल में मंगल' आणि 'उम्रकैद' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या 'नागिन' या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला 'जानी दुश्मन', 'मुकाबला', 'बदले की आग' आणि 'राजतिलक' या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.

त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या 'अपनापन' या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला 'आशा' व 'अर्पण' मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या 'आशा'साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! जशी आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे.

बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा 'जख्मी' हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या 'कालीचरण'ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे 'प्यासा-सावन', 'बदलते रिश्ते', हिट झाले होते. 'अपनापन', 'आशा' आणि 'अर्पण'मध्येही तिचा नायक जितेंद्र होता. मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्रचा अविवाहित हेमासोबत रोमान्स एकीकडे रंगात आला होता, तर दुसरीकडे अमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती.

१९८० मध्ये 'आशा' सुपरहिट झाल्याने रीनाचा आनंद गगनात मावत नव्हता. 'आशा'च्या भव्य यशानंतर जुलै १९८० मध्ये ती 'यारीदुष्मनी' या पुढच्या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी लंडनला रवाना झाली. अन ९ जुलै १९८० ला तिच्यावर आभाळ कोसळले. त्या दिवशी शत्रुघ्नने पूनम चंदारमाणी हिच्याशी घाईघाईत विवाह उरकला होता ! रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. मुंबईहून पत्रकारांच्या ट्रंक कॉलनी लंडनमधील रीनाला हैराण केले, पण तिने कोणालाही काहीही उत्तर दिले नाही. तिथून आल्यावर मात्र तिने शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केली. मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? तो खुल्लमखुल्ला हे करू शकत नव्हता का ?" यानंतर ती बरेच वर्ष शत्रुघ्नवर नाराज होती. बॉलीवूडमध्ये याच काळात बरंच काही घडत होतं. धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मांतर करून हेमाशी लग्न केले. मात्र पुढे जाऊन त्याच्या पत्नीने त्याच्याशी घटस्फोट घेतला.

शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. शत्रूने बचावात लिहिलं आहे की, 'आपले पूनमबरोबर १९६८ पासूनच जुने अन नियमित संबंध होते'. मात्र हा खुलासा न पटण्याजोगा आहे. कारण 'शत्रुघ्नसिन्हा अ रोल ऑफ लाईफ टाईम'मध्ये त्यांने हे स्पष्ट केले आहे की जेंव्हा पूनमच्या वडिलांनी शत्रूच्या रंगावरून हुर्यो उडवली तेंव्हा ते साफ नाराज झाला होत आणि त्यांनतर त्याचे पूनमबरोबरचे संबंध पूर्वीसारखे कधी सुरळीत राहिले नाहीत. 'सबक' सिनेमामुळे पुनामशी जी जवळीक निर्माण झाली ती तात्कालिक राहिली आणि तिच्या वडिलांना आपणच तिचे तारणहार आहोत याची यशस्वी जाणीव शत्रूला करून देता आली. पण याउपर ते दोघे कधी अधिक खोलात जाऊन जवळ आले नाहीत.

सत्य वेगळेच होते. शत्रूच्या परिवाराकडून रीनाच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते आणि १९७९च्या मध्यावधीत शत्रूचे वडील भुवनेश्वरी प्रसाद सिन्हा गंभीर आजारी पडले आणि अगदी सिनेमात दाखवतात तशी विवाहाची अट त्यांनी शत्रूला घातली ! त्यांनी शत्रूकडून रीनाशी विवाह न करता घरच्यांची संमती असणारया मुलीशी विवाह करण्याचा शब्द घेतला आणि त्यानंतर काही दिवसात त्यांचे निधन झाले. याचा दबाव शत्रुघ्नवर येत राहिला, म्हणून त्याने रीना लंडनला गेल्यावर अचुक संधी साधून वडिलांच्या मृत्यूस वर्ष पूर्ण होण्याआधी पूनमशी तडकाफडकी लग्न लावले. मात्र यासाठी तो रीनाला कधीच कन्व्हिन्स करू शकला नाही....

शत्रूशी नाते तुटल्यानंतर तिने स्वतःची इमेज बदलण्यासाठी तिचा भूमिकांचा चॉईस बदलून बघितला. 'रॉकी', 'हथकडी','धरम कांटा', 'करिष्मा', 'लेडीज टेलर', 'बेजुबान', 'लक्ष्मी' आणि 'सनम तेरी कसम' असे सगळे भिन्न आशय विषयाचे चित्रपट तिने केले पण त्याने तिचे मन रमले नाही. शत्रूच्या अचानक आयुष्यातून निघून जाण्याने तिला जोडीदाराची निकड तीव्रतेने भासू लागली अन त्यातूनच तिच्या हातून फार मोठी चूक घडली ...

शत्रुघ्न सिन्हाबरोबर नाते तुटल्यानंतर रीना सिंगल राहु शकली नाही. तिला काय करावे हेदेखील सुचले नाही, तिची भावंडे बरखा आणि अंजू ह्या बहिणी, राजा हा भाऊ हे सगळे आता मोठे आणि समजदार झाले होते. कुटुंबाची तिच्यावरची जबाबदारी आता संपली होती. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंडच्या शुटींग दरम्यान ओळख झाली होती. अगदी थोड्याशा माहितीवर अन किरकोळ भेटीगाठीच्या जोरावर, बारकाईने विचार न करता रिनाने मोहसीनशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला. मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानलाही त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले. परतीच्या काळात पुन्हा जे.ओमप्रकाशनीच तिला हात दिला आणि त्यांच्या 'आदमी खिलौना है'ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले.१९९२ ते १९९७ या पाच वर्षात मोहसीनला तेरा चित्रपट मिळाले मात्र एकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. तिथे दोघांचे खटके उडू लागले. अखेर तिने त्याच्याशी तलाक घेतला. मात्र याची जबर किंमत तिला मोजावी लागली.

तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची 'सनम'ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना मुंबईत तिच्या आईकडे परत आली आणि बॉलीवूडमध्ये दुसऱ्या रिएन्ट्रीसाठी ती पुन्हा प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या 'गैर' आणि २००० साली अभिषेक बच्चनच्या 'रीफ्युजी'त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिला मुलीची फार आठवण येऊ लागली. तिचा जीव व्याकुळ होऊ लागला. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता. रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला....

यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला. रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले. तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या 'आई'ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.

शत्रूचा संसार मात्र सुखाचा झाला, राजकारण आणि सिनेमा दोन्हीही त्याच्यासाठी लाभदायक ठरले. त्याला लव, कुश ही मुले आणि सोनाक्षी ही मुलगी झाली. मात्र नियतीने त्याच्यावर एक प्रकारे सूड उगवला, ज्या रीनाला त्यांनी रातोरात टाळले हुबेहुब तिच्यासारखी दिसणारी मुलगी ईश्वराने सोनाक्षीच्या रूपाने शत्रू आणि पूनमला दिली. दोघांनीही रीनाशी विश्वासघात केला आणि तिच्यासारखी दिसणारी मुलगी आयुष्यभर बघायची पाळी त्यांच्यावर आली. रिनाने जुलै २०१४ मध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. रीना आपल्या मुलीला 'सनम' म्हणते तर मोहसीन तिला 'जन्नत' म्हणतो. तिचे नाव सनम रीना रॉय असे असू देण्यास त्याने आडकाठी केलेली नाही. रीनाच्या मुलीची बॉलीवूडमध्ये येण्याची इच्छा नाही अन रीनाची देखील तशी इच्छा नाही. कदाचित सनमरॉयला आपल्या फिल्मी करिअरपेक्षा आपल्या आईची बॉलीवूडमुळे झालेली फरफट जास्त क्लेशदायक वाटत असावी. शेवटी ती सुद्धा अशा आईची मुलगी आहे जी एक प्रेमळ आणि जबाबदार मुलगी, एक उदात्त बहिण, त्यागी जीवन जगलेली प्रेमिका, स्वतःला शिक्षा करणारी गृहिणी अन सरते शेवटी मुलीच्या मायेत वेडीपिशी झालेली आई आहे.

रीना रॉयच्या आयुष्यात डोकावताना भारतीय स्त्रीची अनेक रूपे दिसून येतात. स्वतःच्या आयुष्याचा, करीअरचा विचार न करता सेंटीमेंटल होणारी आणि सर्व नाती निभावून नेतानां आपल्या आयुष्याचा डाव लावणारी रीना रॉय मला जास्त भावते ते तिच्यातल्या या भारतीय नारीच्या सर्वसमावेशकतेमुळेच ! इतके होऊन देखील तिने आजतागायत शत्रुघ्न वा पूनम वा आता सोनाक्षीबद्दल देखील वाह्यात वा अर्थहीन शेरेबाजी कधी केली नाही.

'शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है' हे गीत गाणाऱ्या रीनाच्या आयुष्यात नेहमीच 'लब तक आते आते, हाथों से सागर छूट जाता है' या ओळी खऱ्या ठरत गेल्या. 'काफ़ी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं l दुनिया की मजबूरी है, फिर तकदीर ज़रूरी है l ' या पंक्ती तिला सतत अनुभवास आल्या.

बैठे थे किनारे पे, मौजों के इशारे पे
हम खेले तूफ़ानों से, इस दिल के अरमानों से
हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देता
माज़ी छोड़ जाता है, साहील छूट जाता है
दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है
थोड़े फूल है, काँटे है, जो तकदीर ने बाटे है
अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लूट जाता है, कोई लूट जाता है...
शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है...
'आशा'मधले हे गाणे जणू तिच्या आयुष्याचे गाणे बनून गेले आहे, रीनाच्या या संघर्षमय जीवनास सलाम....बॉलीवूडमधल्या वरवर सुखी तृप्त दिसणाऱ्या मुखवट्याआडचे रीनाचे दुःख जरी देखणे - झगझगीत वाटत असले तरी वास्तवात हे दुःख काळोख्या रात्री कोनाड्यात जाऊन एकट्याने रडणारे आहे, त्याला ना हुंदके ना अश्रू ! इतके ते कमनशिबी आहे, ते कुणापुढे मोकळेही होऊ शकत नाही ! आयुष्यभर इतरांसाठी जगलेल्या प्रेमळ, मायाळू स्त्रीच्या वाटेला आलेला दुःख आणि वेदनेचा हा कोंडमारा नक्कीच असह्य असा आहे...

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/02/blog-post_95.html
rina1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सविस्तर लेख. खूप माहिती कळली .थोडक्यात रीना रॉय पण वयाचा १४ व्या वर्षीच चित्रपटात झळकली तर. १४ व्या वर्षी करियर सुरु आणि २६ व्या वर्षी खतम ?
<<धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले>> अस नाहीये न Happy

धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. >> हे तुमचे या लेखातील वाक्य

आणि हे 'दिल अपना....' या लेखातील वाक्य -

विवाहित असणारया धरमने मीनाचा वापर निव्वळ एका शिडीसारखा केला होता. हेमामालिनीशी त्याचे सुत जुळले तेंव्हा त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुले मोठी झाली होती. त्या मुलांचा (सनी आणि बॉबी ) विरोध होऊ नये आणि आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागूनये म्हणून धर्मेंद्रने नामी शक्कल लढवली होती. त्याने आधीच्या पत्नीस व मुलांना नाराज करायचे नाही म्हणून तिला घटस्फोट दिला नाही,मात्र हेमाशी विवाह करण्यात अडथळा येऊ नये म्हणून १९७९ मध्ये त्याने स्वतः इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लामी बहुपत्नीत्वाचा आधार घेत पहिल्या पत्नीशी काडीमोड न घेता १९८० मध्ये त्याने हेमाशी विवाह केला !

तुम्हीच लिहिलेल्या दोन लेखात विसंगती आढळतेय.

खुप सुरेख लिहिलेय. रिना रॉय माझीही खुप आवडती होती. एकाच गालावर खळी पाडत खुप गोड हसायची ती. तिच्या लग्नाबद्दल आधीही वाचलेले. खुप वाईट झाले तिचे. पण मनाचा मोठेपणा हा की कधी कोणाला दोष दिला नाही.

धर्मेन्द्रने लग्न न मोडता मुसल्मान धर्म स्विकारुन लग्न केले असे तुम्ही कालच्या लेखात म्हटलेत. यात घटास्फोट घेतला लिहिलेत. नक्की खरे काय?

खूपच छान लिहीलेय. रीनाची कहाणी ऐकुन वाईट वाटतेच. पण हे तितकेच खरे आहे की नियतीने सोनाक्षीला घडवुन शत्रुवर सूड उगवला. जगातले हे एकमेव उदाहरण असावे की ज्यात आपली मुलगी ही आपल्या पत्नीसारखी न दिसता प्रेयसी सारखी दिसावी. सोनाक्षीला प्रथम पाहुन रीनाच आठवली होती.

सोनाक्षी आणि रीना मधल्या साधर्म्याबद्दल तर खूपच मोदक. आधी मला वाटायचे की मलाच असे वाटतय>>
अगदी अगदी.

सोनाक्षीच्या बॉलीवुड मधल्या एंट्रीलाच सगळे ती सेम रीना सारखी आहे अस म्हणत होते.रीना,पुनम आनि शत्रुघ्न ला कस वाटत असेन ना..
हा लेख ही चांगला.

शत्रुच्या बायकोला पाहिलं नव्हत आधी... सोनाक्षी आल्यावर आवर्जुन फोटो पाहिला तर भ्रमाचा भोपळा फटकन फुटला.. तरी मला अस वाटत होत कि रीनापासुनच झालेली मुलगी आहे कि काय..
तर ती पुनमचीच पोरगी आहे तर..
असो.. कसल्या सारख्या दिसतात पण रीना आणि सोनाक्षी.. डीट्टो एकदम..
रीनाची खरी पोरगीपन तिच्याशी एवढ रिझेंब्लन्स नसेल दाखवत.
रीनाबद्दल वाचुन वाईट वाटल..

सोनाक्षी आणि रीना मधल्या साधर्म्याबद्दल तर खूपच मोदक. आधी मला वाटायचे की मलाच असे वाटतय>> +१

शत्रूच्या परिवाराकडून रीनाच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. >> अशावेळी तिचं स्वतःचं कर्तुत्व फोल ठरतं. Angry तिने तिच्या परिवाराला कसं सांभाळलं, कुठुन कुठे आली हे काहीच महत्त्वाचे ठरत नाही. Angry

पण या लेखामुळे रीना बद्दल माहिती मिळाली. आदर वाढला आणि लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल वाईटही वाटलं.

रीना आवडती अभिनेत्री होती. तिच्याबद्दल खरेच एवढे माहीत नव्हते.

आणि तसेही आपल्याकडच्या अभिनेत्रींना जरा वय झाले कि प्रमुख भुमिका मिळतच नाहीत. नूतनचा अपवाद ( मै तुलसी... )

जख्मी चे शूंटीग बघायला मी गेलो होतो. त्यातल्या एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मी तिच्या बाजूलाच उभा होतो.

@ विठ्ठल - तुमचा मुद्दा रास्त आहे ....'दिल अपना....' हा लेख लिहिल्यानंतर काही वर्षांनी धर्मेंद्रच्या पत्नीनेच नंतर त्याला घटस्फोट दिला आहे....लेखन काळातील फरकामुळे हा दोष आहे ...तरीही मी बारकाईनिशी त्याची दुरुस्ती करेन ....चूक ध्यानी आणून दिल्याबद्दल धन्यवाद ..

छान आहे लेख. Happy सनम तेरी कसम हा चित्रपट जबरी गाजला होता.

शीश हो या दिल हो. क्या गाना है. Happy

मला अस वाटत होत कि रीनापासुनच झालेली मुलगी आहे कि काय>> मला तर अजुनही तसेच वाटते.