'दिल अपना और प्रीत पराई …' - वास्तवी अन आभासीही !

Submitted by अजातशत्रू on 15 June, 2016 - 22:14

हातातील घडयाळाकडे बघत आपल्या खर्जातल्या आवाजात तो आता तिला म्हणेल, "करुणा ! अब बस भी करो ! वक्त का तकाजा करो ! घडी दौडती जा रही हैं और वक्त फिसलता जा रहा हैं l और कितना काम करेंगे ? हमे रुकना चाहिये … कुछ अपने लिये भी जीना चाहिये । "
मग ती ट्रॅजेडी क्वीन हातातले स्कालपेल बाजूला करत तिच्या अनुनासिक स्वरात म्हणेल, "नही, डॉक्टर सुशील हम ये काम निपटाकर ही रहेंगे ! जो हम चाहते हैं वैसा अक्सरही कभी होता हैं."
तो उत्तरेल - "क्या तुम्हे हमारी जजबातोंकी जरा भी कदर नही हैं ?" अन मग ती म्हणेल, " मेरे अपने जजबातही जब मेरे नही रहे है तो औरोंके जज्बोका मुझे कैसे इल्म होगा ?"......
नाईलाजाने तोआपल्या निळ्या डोळ्याच्या पाऱ्यात तिला साठवत उभा राहीन… अन ती अप्सरा त्याच्या सुरमई डोळ्यात उतरत जाईल…
काही वेळानंतर ती दोघे त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडतील, सुखाचे निवांत क्षण घालवतील …

तो म्हणजे डॉक्टर सुशील शर्मा आणि ती म्हणजे त्याच इस्पितळातली देखणी परिचारिका करुणा …
सुशील हा गरीब घरातून पुढे आलेला आहे. त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च केलेला आहे. तो त्याची बहिण आणि आजारी असणारया थकलेल्या आईला घेऊन त्याच इस्पितळात राहून काम करतो आहे. त्याच्या कामाच्या मोबदल्याच्या पैशातून त्याला आपल्या शिक्षणासाठी ज्या देवमाणसाची मदत झाली आहे त्याचे ऋण फेडायचे आहे. तिथेच आता करुणा कामाला आली आहे. दोघांचे एकमेकावर प्रेम आहे. पुढे सुशीलच्या आयुष्यात येते मत्सरी स्वभावाची हट्टी कुसुम. सुशीलने ज्यांच्याकडून शिक्षणासाठी पैसे घेतले होते त्यांचीच कुसुम ही लाडकी कन्या असल्याने तो तिला विरोध करू शकत नाही..
सुशीलच्या आयुष्यात कुसुम आल्यावर करुणा उन्मळून पडते. ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. कुसुमचे आपल्या आई आणि बहिणीसोबतचे वर्तन बघून सुशील हैराण होतो. त्याच्या कुटुंबीयासोबतचे प्रेमाचे क्षण आठवून तो कासावीस होऊ लागतो. सुशीलच्या आयुष्यात असलेले करुणाचे स्थान उद्ध्वस्त नसल्याने कुसुमचा तीळपापड होऊ लागतो अन तिला संपवण्याचा ती प्रयत्न करते. मात्र त्यात ती स्वतःचा जीव गमावून बसते. करुणा आणि सुशील पुन्हा एकत्र येतात आणि कथेचा सुखांत होतो.

श्वेतशाम चित्रपटाच्या सोनेरी काळातला हा सिनेमा होता, 'दिल अपना और प्रीत पराई' . ..१९६० मध्ये येऊन गेलेल्या या सिनेमाला आता ५६ वर्षे उलटून गेलीत..
यातला देखणा राजहंस काळाच्या पडद्याआड गेलाय आणि ट्रॅजेडी क्वीनचीही तिच्या वेदनांतून केंव्हाच मुक्ती झालीय....

इंडस्ट्रीत राजकुमारची ओळख कायम डायलॉगकिंग अशीच राहिली होती. मात्र या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मीनाकुमारीला समोर बघून तो बऱ्याचवेळा संवाद विसरून जायचा हे देखील एक सत्य आहे ! राजकुमार एक सनकी माणूस होता पण त्याला मीनाबद्दल एक विलक्षण आस्था होती. काही चित्रपट समीक्षकांच्या मते तो देखील मीनाच्या प्रेमात पडला होता. त्याची मीनाबरोबरची वाढलेली जवळीक बघून कमाल अमरोहींनी त्याचे आणि मीनाचे गहिऱ्या प्रेमाची जवळीक दाखविणारे सीन्सच पाकिजामधून खुबीने टाळले होते. त्या दोघात एक मर्यादारेखा त्यांनी आखून ठेवली होती. तरीही पाकिजात या दोघांच्या एका युगलगीताचा प्रसंग आला तेंव्हा कमाल अमरोहींनी या दोघांवर केमेरा फोकस न करता निसर्ग, पाण्याच्या लाटा, आकाश, चंद्र- चांदण्या यावर जाणीवपूर्वक जास्त फोकस केला. हे गाणं होतं, 'चलो दिलदार चलो चांद के पास चलो …'

राजकुमार प्रेमाच्य भावोत्कट दृश्यात अगदी केविलवाणा अभिनय करायचा. विशेष म्हणजे त्याच्या दिग्दर्शकाना अशा दृश्यास तो मज्जाव करायचा कारण यामुळे त्याच्या इमेजला जबरी तडा जायचा. या सणकी माणसाच्या का नादी लागावे म्हणून त्याचे दिग्दर्शकदेखील अशी दृश्ये टाळत. मात्र १९६५ मध्ये आलेल्या 'काजल' मध्ये राजकुमारने कमाल केली. मीनाबरोबर त्याच्या समोर या सिनेमात धर्मेंद्र होता ! धर्मेंद्रवर मीना जीव ओवाळते हे राजकुमारच्या पक्कं डोक्यात होतं. त्यामुळे त्याने या सिनेमाचे संगीतकार असणाऱ्या रवींना गाठले, रवी हे राजकुमारचे जवळचे मित्र होते. राजकुमारने त्यांच्याथ्रू दिग्दर्शक राम माहेश्वरीकडे एका युगलगीतासाठी गळ घातली. गुलशन नंदा यांच्या कथेत त्या प्रमाणे गाण्याची सिच्युएशन बनवली गेली. गाणे तयार झाले, "छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं हैं जाम है ये, कुदरत ने जो हमको बख्‍शा है, वो सब से हसीं इनाम है ये... " या गाण्यात राजकुमारने जीव ओतला, अभिनयाचा पुरेपूर प्रयत्न करून धरमपाजीच्या डोळ्यापुढे काजवे चमकावले ! हे गाणे मीनाकुमारी आणि राजकुमार यांच्यावर चित्रित करण्यास राम माहेश्वरी अखेरपर्यंत राजी नव्हते पण राजकुमारने त्यांना अक्षरशः दरडावले, एरव्ही विशिष्ट डायलॉगसाठी - प्रसंगासाठी प्रचंड आग्रह धरणाऱ्या राजकुमारच्या या गाण्यामागील आग्रहामागे त्याचे मीनावर न व्यक्त झालेलं प्रेमच असावं !

राजकुमारसाठी १९६० ची आणखी एक नोंद राजकुमारसाठीच घेता येईल मात्र वेगळ्या घटनेसाठी. जेनिफर या एंग्लोइंडियन एअरहोस्टेसशी राजकुमार १९६० मध्ये विवाहबद्ध झाला होता, तिच्याशी हिंदू पद्धतीने विवाह करून तिचे नाव त्याने गायत्री असे ठेवले. पुढे तिच्या पासून राजकुमारला पुरू, पाणिनी ही मुले आणि वास्तविका ही मुलगी झाली.

राजची कहाणी अशी होती तर मीनाची दास्तान अतिशय दर्दभरी होती. १९५२ मध्ये ३४ वर्षाच्या कमाल अमरोही बरोबर मीनाचा निकाह झाला तेंव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. १९५८ पासून तिचे त्यांच्याशी किरकोळ मतभेद होऊ लागल्यापासून तिने दारूचा आसरा घेतला होता. 'दिल अपना और…'च्या वेळेस ती नित्यनेमाने पर्स मध्ये दारूच्या बाटल्या आणण्याइतपत निर्ढावली होती. राजकुमारला याचे वाईट वाटायचे मात्र याच काळात त्याच्या आयुष्यात जेनिफर (गायत्री) आली अन त्याचे प्रेम केवळ आस्था बनून राहिले. तर ज्या धर्मेंद्रवर मीनाचा जीव जडला होता त्याने आपला जम बसवण्यासाठी तिचा केवळ वापर केला. विशेष बाब म्हणजे १९६० मधेच धर्मेंद्रचा पहिला सिनेमा 'दिल भी तेरा हम भी तेरे' येऊन गेला. जणू काही हे शीर्षक मीनाकुमारीसाठीच त्याने ठेवले असावे असं वाटावे इतकी त्या दोहोत पुढे जवळीक वाढत गेली. मात्र मीनाची इथेही फसगत झाली. धर्मेंद्रने तिला सहारा दिला होता पण तो पुढे तकलादू निघाला अन पुढच्या आयुष्यात ती पुरती कोलमडून गेली होती.

राजकुमारची लाईफस्टोरी सरळ होती तसं धर्मेंद्रचं आयुष्य साधं सरळ नव्हतं ! १९५४ मध्ये धर्मेंद्रने प्रकाश कौर हिच्याशी विवाह केला होता तेंव्हा त्याचेही वय १९ वर्षे होते हाही एक योगायोगच ! विवाहित असणारया धरमने मीनाचा वापर निव्वळ एका शिडीसारखा केला होता. हेमामालिनीशी त्याचे सुत जुळले तेंव्हा त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुले मोठी झाली होती. त्या मुलांचा (सनी आणि बॉबी ) विरोध होऊ नये आणि आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागूनये म्हणून धर्मेंद्रने नामी शक्कल लढवली होती. त्याने आधीच्या पत्नीस व मुलांना नाराज करायचे नाही म्हणून तिला घटस्फोट दिला नाही,मात्र हेमाशी विवाह करण्यात अडथळा येऊ नये म्हणून १९७९ मध्ये त्याने स्वतः इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लामी बहुपत्नीत्वाचा आधार घेत पहिल्या पत्नीशी काडीमोड न घेता १९८० मध्ये त्याने हेमाशी विवाह केला !

'दिल अपना और...' या सिनेमाच्या दरम्यानच मीनाकुमारीचे कमाल अमरोही सोबत जमेनासे झाले होते. त्यांच्यात गैरसमज आणि वादविवाद वाढू लागले होते. वेगळे होण्याच्या निर्णयाप्रत ते दोघे आले होते. याच वर्षी मीनाचा दिलीपसाब बरोबरचा 'कोहिनूर' आला होता अन त्याने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. 'दिल अपना और .. ' नंतर मीनाकुमारी राजकुमार या जोडीचे 'दिल एक मंदिर' आणि 'काजल' येऊन गेले. १९७२ मध्ये आलेल्या या जोडीच्या 'पाकीजा'ने हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले. खरे तर १९५६ पासून कमाल अमरोहीच्या डोक्यात पाकिजा घोळत होता. सिनेमा फ्लोअरवर गेला तेंव्हा त्याच्या डोक्यात नायक म्हणून राजकुमार फिक्स नव्हता. मीनाच्या आग्रहावरून धर्मेंद्रला घ्यावे असेही त्याला वाटत होते मात्र त्या दोघात अफेअर चालत असल्याच्या बातम्याने कमाल पुरता चिडून होता. म्हणून त्याने धरमला न घेता त्या मानाने कमी उपद्रवी राजकुमारला घेतले होते.

१९६०च्या 'दिल अपना…' मध्ये लता मंगेशकरांनी गायलेले एक प्रसिद्ध गाणे होतं. ते गाणं सिनेमातील पात्रांना जसं लागू पडलं तसंच अभिनय करणारया अभिनेत्या - अभिनेत्रीस देखील लागू पडते.

अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

ये रोशनी के साथ क्यों, धुआँ उठा चिराग से
ये ख्वाब देखती हूँ मैं के जग पडी हूँ ख्वाब से

मुबारके तुम्हे के तुम किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो के सब से दूर हो गए

किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आयेगी, तुम हमको याद आओगे….

मीनाकुमारी, राजकुमार आणि धर्मेंद्र या तिघांच्या या आगळ्या वेगळ्या प्रेम त्रिकोणाची दग्ध वेदनांची गाथाच जणू या गाण्यात व्यक्त झाली आहे असे वाटते. शिवाय सिनेमाचे शीर्षक देखील यांच्या व्यक्तिगत आयुष्याला अगदी फिट बसणारे असे होते…
दिल अपना और प्रीत पराई मधल्या 'करुणा'प्रमाणे मीनाकुमारीचं आयुष्य झुलत राहिलं...वक्त आंखोके सामने फिसलता चला गया और वो बेबस होकर देखती रह गयी....म्हणूनच एक सिनेमा म्हणून करुणाच्या रूपातल्या मीनासाठी तो आभासी होता मात्र अभिनेत्री मीनाकुमारीसाठी मात्र तो वास्तववादी ठरला....अनेक वळणं घेत तिचं आयुष्य नुसतं झुलत राहिलं, चित्रपटातल्या करुणाला खडतर प्रतिक्षेनंतर तिचं इप्सित मिळालं मात्र वास्तवातल्या मीनाकुमारीला मात्र हाती काहीच लागलं नाही.

'दिल अपना..' मधला हा फोटो खूप बोलका आहे. जणू ते दोघेही आपल्या हातून हळूहळू निसटत जाणाऱ्या 'काळा'कडे निमूटपणे पाहत आहेत, दोघांचे चेहरे खिन्न आहेत, काळ आपल्या डोळ्यादेखत निघून जातोय अन आपण काहीच करू शकत नाहीये ! करुणा आणि डॉक्टर सुशीलच्या रूपाने चित्रपटातल्या पात्रांची तगमग दाखवणारी ही तसबिर एकीकडे आभासी आहे. त्याचबरोबर रिअल लाईफ मधल्या या दोघांच्या रूपाने दुसरीकडे वास्तववादीही वाटते.

या फोटोकडे पाहिले तरी गतकाळाच्या अनेक स्मृती आपल्या नकळत आपल्याभोवती फेर धरून नाचू लागतात....स्मृतींच्या त्या वनात परत परत जायला मला आवडते कारण त्या काळाच्या मानाने सध्याचे जग अधिकाधिक कृत्रिम अन स्वार्थी होत चालले आहे..

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/02/blog-post_29.html

picture361.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच लिहिलंय -
मीनाकुमारीबद्दल दारूच्या आहारी गेली होती एवढीच माहिती होती - ही बाकि कहाणी दर्दभरीच आहे..

मस्त वर्णन केले आहे... चित्रपट मस्त आहे... पण पडद्यामागची कथा अशी असेल त्याचा विचार केला नाही ..

मस्त!

त्या मानाने कमी निरुपद्रवी राजकुमारला घेतले होते.>>>> इथे 'कमी उपद्रवी' हवे.

बापरे! बर्‍याच अयशस्वी कथा उलगडल्या गेल्यात. तुम्हाला अजून माहीत असतील तर जरुर लिहा. आम्ही ते गॉसिप म्हणून नाही तर महान नायक- नायिकांच्या गाथा म्हणून वाचु. धर्मेंद्रने मीनाकुमारीला फसवले हे वाचले होते पण राजकुमार विषयी काहीच माहीत नव्हते. पण या लोकांचे प्रेम निदान खरे तरी वाटते, आता तर काय सगळा आनंद आहे. प्रेमाकरता एक दुसर्‍याचा जीव पण घेतात. ( प्रत्युष्या बॅनर्जी आणी झिया खान ही ताजी उदाहरणे आहेत)

अप्रतिम लेख.
चित्रपट आणि त्यातील अभिनेत्यांचे आयुष्य व घडामोडी यांची उत्तम सांगड एकाच लेखात वाचायला मिळाली.

पुलेशु!

@ अश्विनी के, @ शोभा ....धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल ....मी दुरुस्ती केली आहे ....प्रतिसादासाठी आभारी आहे ..