मार्को - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 15 June, 2016 - 03:37

मी माझ्या घरात बसलो होतो. ती व्यक्ति माझ्यासमोर होती....
साधारण तीस वय. भारदस्त बांधा. सहा फूट उंच. लांब नाक. तरतरित डोळे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे हात आणि पाय चांगलेच लांब असून त्याचे तळवे अत्यंत पसरट होते.
कोपऱ्यात असलेले खास बनवलेले बूट त्याची साक्ष देत होते.
तर पुतळा प्रकरणानंतर झालेल्या गोष्टी म्हणजे मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझा पुतळा घराबाहेर दिमाखात उभा होता.
"तर आपल्याला आपले घर परत हवे आहे."
"हो."
"आणि त्यासाठी आपण मी मोजलेली किंमत परत करायला तयार आहात."
"हो."
"तर हे घर मी विकत घेतले आहे हे आपणांस मान्य आहे."
"हो."
"घर विकत घेऊन मी या घराचा मालक झालो आहे हे आपणांस मान्य असेलच."
"हो."
"तर मला या घराचा मालक म्हणून हे घर विकायची इच्छा नाहीये..."
या व्यक्तीला आता शिव्या द्याव्यात कि मला मूर्ख बनवून माझ्या तोंडून हवी ती वाक्ये वदवून घेतल्याबद्दल दाद द्यावी हेच समजेना....
मात्र माझ्या डोक्यात तेव्हाच प्रकाश पडला...
दुसऱ्या दिवशी मी शेरिफला घेऊन माझ्या घरी पोहोचलो. ही व्यक्ति तेव्हा आपल्या गनची साफसफाई करत होती.
'बार्का सी - ३३' मी पुटपुटलो.
"हो." त्याने मानही वर केली नाही.
"हॅलो मी. मी शेरिफ रुबिया. या व्यक्तीच्या विनंतीखातर मी येथे आलो आहे."
"या शेरिफ, आपलं केव्हाही स्वागत आहे."
आता बोलण्याची पाळी माझी होती.
"आपण हे घर विकत घेतले आहे, बरोबर?"
"हो."
"आपण या घराचे मालक आहात, बरोबर?"
"हो."
"आपल्याशिवाय या घरावर कोणाचा हक्क नाही, बरोबर?"
"हो."
"आपण हे घर कोणाला विक्री करणार नाही, बरोबर?"
"हो."
"आपण घराचे मालक म्हणून या संमतीपत्रावर सही करू शकाल, कि या घराचे सर्व हक्क आपल्या आधीन आहेत?"
"हो."
त्याने संमतीपत्रावर सही केली.
आणि शेरिफ म्हणाला...
"सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येत आहे...."

क्रमशः

भाग १ http://www.maayboli.com/node/59015

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.