जून महिना आणि आठवणी बालभारती च्या...

Submitted by अतुल. on 14 June, 2016 - 23:49

जून महिना सुरु झाला कि नवीन इयत्ता नवीन कपडे नवीन वह्या नवीन पुस्तके. सारे काही नवीन नवीन. पण त्या नाविन्याला "उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाली" ह्याची कडवी किनार पण असायची. नवीन पुस्तकांमध्ये सर्वात आवडीचे पुस्तक असायचे ते मराठीचे. हातात पडल्यापडल्या ते अथपासून इतिपर्यंत भराभरा वाचून काढायचो. गोष्टीचे पुस्तक वाचल्यासारखे. नवीन पुस्तकांच्या नाविन्याचा गंध हवेत विरून जाण्यापूर्वी हे मराठीचे पुस्तक वाचून झालेले असायचे. त्यातले काही धडे, काही धड्यातील काही वाक्ये, काही कविता पुढे आयुष्यभर लक्षात राहिल्या.
.
एक भिकारी "माझ्याकडे काहीच नाही" म्हणत भिक मागायला जातो आणि एक भला माणूस पैशाच्या बदल्यात त्याचे एकेक अवयव मागतो. पण कितीही पैसे मिळाले तरी अवयव द्यायचे धाडस भिकाऱ्याला होत नाही. मग त्याला आपण खरे किती श्रीमंत आहोत याची जाणीव होते, अशी कथा असलेला "मी श्रीमंत आहे" हा धडा. "दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपावे लागते" असा मतितार्थ असलेली छोट्या "शांती"ची कहाणी. "डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही" इतका अंधार ज्याच्या घरी आहे त्या आदिवासी "चणीया" मुलाचीची गोष्ट, पुस्तक उघडल्या उघडल्या दिसणारी "उठ मुला उठ मुला बघ हा अरुणोदय झाला" हि कविता. "स्वत:ची कांबळ" झोपी गेलेल्या अनाथ मुलांच्या अंगावर घालणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची ओळख करून देणारा "मायेची पाखर" हा धडा. असे कितीतरी पाठ कायमचे स्मरणात राहिले आहेत.
.
वा. ग. पूर्णपात्रे यांची "सोनाली" हि सिंहीण डोळ्यात पाणी आणून जायची. संपूर्ण ब्रिटीश खाडी पार करून जाणारा "मिहीरसेनचा विक्रम" वाचून मन थक्क व्हायचे. तर अजून एका एका धड्यात दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांच्या बाजूने लढत असताना जंगलात एका कड्याच्या आडोशाला लपून बसल्यावर थोड्या वेळात नाझी सैनिक येऊन हातात बंदूक घेऊन त्या कड्यावरच आजूबाजूला टेहळणी करत कसा उभा राहतो ते वाचताना अंगावर शहारे येत. भावंडांच्या वाटणीची चपाती हळूच बाजूला काढून त्या दिवशी "चपाती चोरल्या"बद्दल आईचा मार खाणाऱ्या आणि दुसऱ्या दिवशी पाडव्याला घरातल्या सर्वांसाठी त्याच चपातीचे गोड लाडू बनवून अठरा विश्वे दारिद्र्यातही "पाडवा गोड करणाऱ्या" बहिणीची गोष्ट वाचून मन भरून येई.
.
बालभारती ची पुस्तके अशी कायमची मनावर कोरली आहेत. ती पुन्हा कधी वाचायला मिळतील असे कधी वाटले नव्हते. पण परवा सहज गुगल वर शोधत गेलो आणि बालभारतीच्या वेबसाईट वर ती पुस्तके जशीच्या तशी स्कॅन केलेली पाहायला मिळाली. डोळ्यावर क्षणभर विश्वास बसला नाही. तीच प्रिंट, तीच चित्रे, तीच अक्षरे. व्वा! ऐन जून महिन्यात पुन्हा एकदा शाळेला जातोय असे वाटले. ती पाने पुन्हा एकदा पालटताना मन गहिवरून गेले. Happy
.
ती पुस्तकांची लिंक इथे देत आहे:
.
http://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रम्य आठवणी Happy ह्यातले बहुतेक धडे त्यांच्यासोबत दिलेल्या चित्रांसकट आठवतायत.
उठ मुला, उठ मुला लेकही म्हणायचा, त्याचं रेकॉर्ड करून ठेवलंय.

फेलिसीटाचा धडा होता का तुम्हाला? Happy आणि चिमुकला पाहुणा ही कविता?
मी ती शोधतेय, मिळत नाही. आनंदवनात रोपटं लावतात त्यावर आहे पहा.

लिंक बद्दल धन्यवाद. आमच्या लहानपणीची पुस्तके मिळतात का बघतो, कारण त्यातिल तेव्हांच्या काही गोष्टी मनावर कोरल्या गेल्या आहेत.
नविन पुस्तकांचा वास काय भारी असायचा, नै?

५वी का ६वीचे पुस्तक उघडले, अन पहिलीच गोष्ट शिल्पकार करमरकर यांची..... पूर्ण वाचली !
मनात काय काय भावना आल्या ते शब्दात नाही मांडता येणार. तेव्हडा शब्दप्रभु मी नाही.
त्या भावना मनी तशाच राहुदेत, काही काहि अनुभुति दुसर्याला देता येत नाहीत ! त्या ज्याच्या त्यानेच मिळवायच्या असतात

@सई.: नाही. फेलिसीटाचा धडा नव्हता आम्हाला. आणि चिमुकला पाहुणा पण नव्हती. बहुदा तुमची बॅच आमच्या नंतर ची असावी ? (इंजिनदादा इंजिनदादा काय करता ... हि कविता तुम्हाला असेल कदाचित)

@limbutimbu: हो तो वास दर जून महिन्यात अजूनही जाणवतो Happy

छान आहे साईट, पण यापैकी बरेच धडे आम्हाला नव्हते.

माझे एक निरिक्षण आहे.. त्या काळात एका ठराविक साच्यातलेच धडे आम्हाला अभ्यासाला होते. महाराष्ट्रातील बोलीभाषा, दलित साहित्य, अनुवादीत साहित्य... यांची ओळखसुद्धा करुन दिली नव्हती.

कित्ती छान साइट. मी माझ्या पहिली इयत्तेचं पुस्तक पाहुन आले. फुलपाखरु, केळीच्या बागा मामच्या, चिव चिव चिव रे, सातवीतली चंदन कविता ह्या माझ्या आवडत्या कविता. अजुनही पाठ आहेत.

दिनेश, फक्त सेरिज १ मधिल पुस्तके बघु नका, ती आम्हाला होति ७० च्या दशकातील.
त्यानंतरच्या सेरिजही बघा. त्यात तुम्हाला असलेली पुस्तके मिळतील. Happy

अतुलपाटील, बॅचेस वेगवेगळ्या असतील तरी बरीच वर्शं अभ्यासक्रम बदलायचे नाहीत, त्यामुळे बहुतेकांना बहुतेक धडे / कविता माहिती असतात Happy

>>बरीच वर्शं अभ्यासक्रम बदलायचे नाहीत

हो हे खरे असले तरी आमच्या नंतरच्या बॅचला पुस्तके बदलली होती इतके आठवते. तो पर्यंत मात्र अनेक वर्षे तीच होती.

हो लिंबू बघतो मी.

आमच्या पुस्तकांना नंतर कुमारभारती पण म्हणत.

मग बरीच वर्षे (खोट्या) ब्रम्हकमळाचा फोटो असायचा मागच्या पानावर.

मी बारावीपर्यंत मराठी घेतले होते. पण वर म्हणालो तसेच, कि एका ठराविक पठडीतलेच धडे असायचे.

त्याचा एक परिणाम असा झाला, कि त्या पुस्तकातली भाषाच हि चांगली भाषा आणि आमच्याच गावी बोलल्या जाणार्‍या ( मालवणी, कोल्हापुरी ) भाषा या कमी प्रतीच्या असा ग्रह होऊन बसला होता माझा. वर्‍हाडी वगैरे तर भाषांची ओळखही झाली नव्हती. त्या काळात लम्पन असता तर.....

खंड्या व बहुतेक शंकर पाटीलांचा होता वाटत हा धडा "वळिव" हे दोन्ही धडे मला खुप आवडायचे त्यावेळी. ..बाकी आता काही जास्त आठवत नाही. .धन्यवाद लिंक दिल्याबद्दल .जुन्या आठवणी जाग्या झाल्या....

खरंच, वळीव कसा विसरेल? शिवाय आनंद यादवांचा "पाटी आणि पोळी" पण खूप भिनला होता. त्याचा पहिलाच परिच्छेद कितीतरी वेळा वाचून काढल्याचे आठवते. व्यंकटेश माडगुळकरांचे पण काही धडे होते. माडगूळकरांनी लिहिलेले नाही तर ते आपल्याही बोलत आहेत असा भास होई.

लिंकबद्दल अनेक धन्यवाद Happy
काही पुस्तके उतरवून घेतली. आम्हाला दुसर्‍या सिरीजमधली पुस्तके होती. आठवीपर्यंत आम्हाला जुना अभ्यासक्रम होता. नववी-दहावीत नवीन अभ्यासक्रमाची आमची पहिली बॅच. कुमार भारतीची पुस्तके कुठे दिसत नाहीत, तीही वाचण्यासाठी उपलब्ध असती तर बरे झाले असते.

सहावीच्या बालभारतीतील 'टिळक आणि आगरकर' ह्या नाटकातल्या उतार्‍याचे मी असेच गंमत म्हणून रेकॉर्डिंग केले होते. आईकडे ते नाट्यवाचन अजूनही आहे बहुतेक Happy त्याच पुस्तकातला 'बहिणीची माया' हा धडा अगदी विस्मरणात गेला होता. वाचून इतके मस्त वाटले.
बाकी वाचते आहे...

आमची सिरीज दुसरी

बाकीचे काही जास्त आठवत नाही. पण पहिलीचे पुस्तक मात्र आठवते. त्यातल्या कविता धडे ओळखीचे आहे.
खास करून मनीमाऊ आणि खारूताई यांच्यावरच्या कविता. तिथूनच मांजरीला मनिमाऊ आणि खार ला खारूताई हे नाव मिळाले जे आयुष्यभर कायमच तोंडी राहिले. अजुन ही हे प्राणी दिसल्यावर मनीमाऊ आणि खारूताई असेच संबोधले जाते.

पहिलीला जे गॅदरिंग होते त्यात या कवितेवर उभारलेले नाट्य असायचे. "मी कोण" या कवितेवर मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हा नाट्य रचलेले. तोच आमचा पहिला स्टेजप्रवेश. त्याचबरोबर "घड्याळकाका" "माझा घोडा" "चिमणीचा घरटा" या कवितेंवर पण नाटक बसवलेले.