चॉकलेट

Submitted by जव्हेरगंज on 14 June, 2016 - 12:29

पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्यानं, छ्या.

चकमक चकमक रात्र होती.
अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली.
जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर.
मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय?
तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला. साल्या माचीस मागितलं रे. जाऊंदे सोड.

तर तो टकलू माणूस. त्याने एक उंची सिगार काढली. पेटवली. आन बसला वढत. च्यायला.
तलप आली की काय काय करावं लागतं. सरळ उठून स्टेशनच्या बाहेर आलो. डबडं विकत घेतलं. अन बसलो फुकत पानपट्टीवरंच.
काळ्या काळ्या अंधारात पांढरा पांढरा धूर.
पॉश कारगाड्या, रिक्षा, टॅक्सी, गाढवं अन बरंच काही. आता एक कटींग भेटला तर काय धमाल कीक बसेल.

एकाएकी काळ्या केसाळ हातानं मानकुटंच पकडलं. खोकलोच.
"चलय चल, साल्या भुरट्या" म्हणून लांबड्या दांडक्यानं फटके मारले पिंडरीवर. मग वढतच घेऊन गेला मला स्टेशनात.
रेल्वे स्टेशनमध्येच एक पोलीस स्टेशन होतं. हे म्हंजे ठेसणातच येक ठेसण हुतं. च्यायला काय पण. म्हायीतच नव्हतं. दिसलंच नाही.

तर तो टकलूसुद्धा मागून येताना दिसला. हे एक नवीनच लचांड.

"विनिस्पेक्टर सायेब, मी काय ह्यांची ब्याग घेतली नाही, आस्सा उठून गेलतो, फुल मोकळा, बिडी फुकायला, इच्चारा"
खुर्चीवर बसलो तरी केसाळ हवालदारानं माझं गचुरं धरलंच हुतं. अट्टल चोर सापडल्याच्या आनंदात इनिस्पेक्टर साहेब तंबाखू मळून खात होते.

वर पंखा गरगर फिरत होता. हे एक बरंय.

"रिमांडवर घ्या ह्यला, सालटंच काढतू ह्येचं"
च्यायचा घोडा. आता बर्फाची लादी. वर पुन्हा येसूर.

साला ह्यो टकलू महागात पडला. साधं एक डबडं तर मागितलं होतं.
"आपल्याला माहीतेय ती ब्याग कुठाय, चला दाखवतो" कायतर खटपट करायलाच पायजे ना. दोन घोट पाणी पिलो.

चकमक चकमक रात्रीचं आम्ही फलाटावर आलो. केसाळ हातात मानगुट अडकलेलंच. हातात दावं गुंडाळलेलं. ह्यांच्याकडं बेड्यासुध्दा नाहीत. दळींद्रे साले.
नशीब गर्दी नव्हती. नाहीतर तुटून पडली असती.
निजामुद्दीम एक्स्प्रेस भुर्रकन निघून गेली. नॉन स्टॉप.

बाकडं दिसलं. तेच ते मगाचं. त्याच्यावर एकजण बसला होता बिड्या फुकत.
"तूर तूर चित्तूर्रर्रर.." मी उगाचच चिराकलो. तसा तो आम्हाला बघत उठला. आन थराथरा कापत निघून गेला. च्यायची. ही पक्याची सवय. तो असल्यावर मजा असते.
"ह्ये चित्तूर बित्तूर मजी?" काळा रेडा गुरकावला.
"आसंच आपला टायमपास, हॅ हॅ हॅ.." काळा रेडा क्षणभर येडाच झाला. त्याला अजून येडा केला असता पण त्यानं मला बदडला असता.

"येथे, येथे मी माझी सुटकेस ठेवली होती, हा उठून गेला आणि गायबच झाली" मंजुळ आवाजात टकलू बोलला.
"शेट, तुमी टेन्शन घीऊ नका, आमी हाय ना" इनिस्पेक्टचं बोलणंसुध्दा दम दिल्यासारखं.

तर शेवटी काळ्या रेड्यानं दांडकं दाबून धरलं. इनिस्पेक्टरनं डोळं बारीक केलं. मग मी पोपटासारखा धडाधड बोलत सुटलो.
"हितं, हितं पक्या बसला हुता, आपला पाटनर,
हितं ताराच्या कुपणाच्या ढोबळ्यात...
हितं आपुण पायानं ब्याग मागं सारली..
हितं मागच्या मागं पक्यानं उचलली...
ठरलंच हुतं तसं..
मग उठून आपून टपरीवर वाट बघत बसलो.."
एकदम डिट्टेलवार सगळं सांगितलं. येळंच तशी होती. ट्यूबंच तशी पेटली होती. करता काय?
इनिस्पेक्टरनं ब्याटरी काढली, आन
"हितं पक्या बसला हुता, तर
हितं ब्याग आसंल,
मग हितं सरकवली आसंल,
तिथं पडली आसंल.." करत ढोबळ्याच्या पलिकडं गेला. मग आम्हाला घीऊन वेटींग रुमच्या जवळ ब्याटरी मारत "हितं हुडका, तितं हुडका" करत झाडीतून वाट काढत रस्त्यावर आला. ब्याग कुठंच सापडली नाही.

"एक सांग, तुला शिक्षेतून सूट देतो, फकस्त पक्या कुठाय तेवढं सांगायचं, पायजेल तर तुला खबऱ्या बनवतो " टेन्शनच आलं. काळ्या रेड्यानं पुन्हा दांडकं दाबून धरलं.
मग गुमान हात दाखवत म्हणालो,
"गणपतीच्या पडक्या देवळाम्हागं असणार बघा, तिथंच भेटायचं बोलला हुता " सरकारी नौकरी. खबऱ्याची. हे निराळंच.

भटकत भटकत आम्ही पडक्या देवळापाशी आलो. चमचम चांदण्या होत्या आभाळात. झुडपं होती जमीनीवर. बाकी झोपडपट्ट्या.
इनिस्पेक्टर उगाच हॉलिवूडच्या पिच्चरसारखं "तुमी तिकडून जावा, मी हिकडून येतो, शेट तुमी हितंच थांबा" म्हणून सूचना देत बोळकांडात शिरला.
काळा रेडा न मी हिकडच्या बोळीत शिरलो.
"तूर तूर चित्तूर्रर्रर.." अजिबात गरज नव्हती तरी चिराकलो. पक्या अंधारात धूम पळाला. हातात ब्यागेसारखं कायतर होतं त्याच्या. च्यायला. इंप्रोवायजेशन.
ब्याटरी घेऊन इनिस्पेक्टर त्याच्या मागे.
"हि चित्तूरची काय भानगड?" कपाळावर प्रश्न घेऊन काळा रेडा आजून त्याच्या मागे.

च्यायला, मला एकटंच सोडून दोघे पळालेसुद्धा. बरोबर हाय म्हणा, ब्याग मिळाल्यावर आमचं काय काम? घंट्याचा खबरी. आता हे खरंच लय झालं.

तलप नडती माणसाला. अर्धवट चोरी करून तलप भागवल्यावर आसला इस्कुट होणारंच.

चकमक चकमक रात्र होती.
पडक्या देवळात मी उभा होतो. अंधार होता. बोळी होती. अजून एक होती.
वाट काढत मी रस्त्यावर आलो. टकलूला चुकवलं. स्टेशनवर निवांत चालत गेलो. एक बिडी पेटवली. वेटींग रुमच्याजवळ झुडपात शिरलो. पालापाचोळा उकरला. खड्ड्यातली ब्याग बाहेर काढली. मग काय, घेतली खांद्यावर. निघालो पाण्याच्या टाकीकडं.
पक्या तिथंच येऊन माझी वाट बघत बसणार.
मागं एकदा चित्तूरलाबी असंच झालतं. सुरुवात जरी वेगळी असली तरी एंडीग मात्र सेम होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

अत्यंत आभारी आहे मंडळी!!
चॉकलेट?
पोलीसांच्या हातावर ठेवलं ते .. Wink

बादवे, नक्की समजली ना?
test question: झुडपात ब्याग कोणी लपवली? कशी?
माफ करा, पण मला खात्री करायचीय म्हणून विचारतोय Happy

नाही समजलीये... विस्कटून सांगा राव. मला पण बॅगेचाच प्रश्न पडला होता.... आणि तूर तूर चित्तूर्रर्रर आणि चित्तूर यांचा काही संबंध आहे का?

मस्त कथा. पण नीट कळली नाही.

झुडपात ब्याग कोणी लपवली? कशी?
>> नंतर बाकावरून तो एकाला हाकलतो त्याने लपविली का. तो पक्याच असतो का अजून एक तिसरा पार्टनर?

माझ्या मते पक्या नामक इसम कोणी नाहीच्चे. सगळं कथानायकाचंच काम आहे.. फक्त पक्याच्या नावाने दिशाभूल करतोय तो !

नंतर बाकावरून तो एकाला हाकलतो >>> तो पक्याच असतो.

सगळं कथानायकाचंच काम आहे.. फक्त पक्याच्या नावाने दिशाभूल करतोय तो !>>> हे पण बरोबर Happy

एकंदरीत पोहोचली असं दिसंतय ! ब्याग नायकानेच लपवली होती.
@ माधव, तो संबंध कथेत आलेलाच आहे .

आभारी आहे!!

सैराटमधले बारीक सारीक तपशील लक्षात येणार्या चाणाक्ष मायबोलीकरांचा "सांगा कोण?" अशा प्रकारचं कायतरी विचारून येडं समजणार्या जव्हेरगंज यांचा निषेध! Wink
छान आहे कथा!

पडक्या देवळात मी उभा होतो. अंधार होता. बोळी होती. अजून एक होती.>> हे अजून एक होती म्हणजे कोण??

मला हेच कळलं नाही.. बाकी कथा मस्त. Happy

Pages