Orlando च्या निमित्ताने ७-१३

Submitted by वाट्टेल ते on 14 June, 2016 - 11:18

दोन दिवसांपूर्वी orlando मध्ये वाईट घटना घडली. त्या निमित्ताने मुंबईतले भीषण ७-१३ आठवले म्हणून त्या वेळी लिहिलेला blog इथे टाकत आहे, अर्थात संदर्भ सगळे जुने, त्या वेळचे आहेत. ही घटना सुद्धा त्याच मार्गाने जातआहे. इस्लामी दहशतवादाबरोबर Latino, LGBT, अमेरिकेतील शस्त्रास्त्रसंबंधीचे नियम (किंवा न-नियम), येणारी निवडणूक व ट्रम्प आणि हिलरीची वक्तव्ये, FBI चा हलगर्जीपणा, चालू असलेला रमजान अशा बऱ्याच बाजूंवर चर्चा झडत आहेत. Orlando लाच स्थाईक असल्याने जरा जवळून बघितलेल्या काही गोष्टी:
Social media वर धैर्य, We are orlando वगैरे घोषणा देत भरपूर फोटो सेशन चालू आहे.
इथल्या हिंदू टेम्पल मध्ये मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून पूजा आयोजित केली आहे, पूजेनंतर महाप्रसादसुद्धा आहे.
दिवसासुद्धा त्या क्लबच्या आसपास ५० मैलात फिरकणार नाहीत अशी मंडळी एकमेकांची “तुम्ही safe आहात ना” वगैरे विचारपूस करीत आहेत.
झाले ते नि:संशय वाईटच झाले पण त्यानंतर जो काही आचरटपणा चालू आहे त्याबद्दल असे तिरकस बोलले की बोलणाऱ्या लोकांच्या sensitivity बद्दल शंका घेतली जाते.
व असे तिरकस बोलणाऱ्या लोकांच्या मते लोक ही घटना सुद्धा एक प्रकारे celebrate ( शब्द योग्य नाही, कृपया योग्य शब्द सुचवा) करण्याच्या भरात असून sensitivity या शब्दाचा अर्थच इतरांना कळत नसावा असे त्या गटाचे मत आहे.
पुढील अनेक महिने वीकांताच्या जेवणावळींसोबत चघळायला अजून एक विषय आपसूक मिळाला.
आणि ७-१३ च्या वेळचा लेख:

१३ जुलै आणि २९ जुलै.
१३ जुलै २०११. मुंबईत तीन शक्तीशाली स्फ़ोट. आतिरेकी हल्ला. इतके ठार तितके जखमी.

काही प्रतिक्रिया:
लोकलमध्ये : सर्वसामान्य लोकांचे महागाईपासून लक्ष हटवण्यासाठी स्फोट.

एकाचा आगाऊ सल्ला : कारण नसल्यास घराबाहेर पडू नका.
सल्ल्याचे तीन तेरा : काय सांगता? आताच कबुतरखान्याला कबुतरांना शेंगदाणे घालायला चाललो होतो.

एक share broker : कोणत्या news channel चा share घ्यावा, कोणता जास्त वाढेल?

एक रिकामटेकडा : मरगळ निघून गेली. काही बातमी नव्हती. आता कशी news वाले पेपर सगळ्यांची सोय झाली काही दिवस.

नोकरदार मध्यमवयीन गॄहीणी लोकलमध्ये मैत्रिणीला : आज कंकूचा महाएपिसोड होता, लागली ना वाट?

अमेरिकेतल्या मुलीचे facebook वर post: माझी आई मुंबईत - डोंबीवलीला आहे. I hope she is safe...I am really worried....त्यावर एकंदर 280 likes (??????), १४२ comments, आई safe असल्याचे सांगणार्‍या. १४२ comments वर तब्बल ३८ वेळा thanks च्या comments. Facebook वर हे वाचणार्‍या तिर्‍हाईताच्या मनात : बघा बुवा काही सांगता येत नाही..डोंबीवलीवरून आजच या बाईला संध्याकाळच्या मरणाच्या गर्दीत झवेरी बाजारला जाऊन खरेदीचा मूड आला तर?

प्रेयसीला तिच्या ३१ मजली tower च्या lift च्या दाराशी सोडून आलेल्या प्रियकराचा साधारण २ मिनिटात SMS: hi जानू पोहोचलीस ना घरी...किती tension आलं होतं मला...तुला building च्या खाली सोडलं तरी काय..मध्ये काही झालं असतें म्हणजे?

मागच्या स्फ़ोटाच्या वेळेस कोणी कोणी कविता केल्या होत्या त्यावर नव्याने comment : पुन्हा स्फोट झाला. आता कवित्वालापण उधाण येईल.

channel वर भविष्यवे(ड)ध कार्यक्रमातले उद्गार : देशावर सगळ्या आपत्ती १३ किंवा २६ तारखेलाच येतात. India che spelling Innnndia केले तर हे संकट टळेल.
डिसिल्वा रोड दादर चौकातला वडापाववाला : वाईट झालं पण माझे वडापाव तुफ़ान खपले. मधून मधून झालं तर काय सही होईल, जास्त नाय, ८-१० माणसं मेली तर चालतील.

भारताच्या लोकसंख्येने कायम त्रस्त असणारा एक नागरीक : एवढ्याने काय होतय, अजून बरेच मरायला पाहिजेत, १२५ कोटी आहे लोकसंख्या.

एक मूर्ख : जास्त कोण मेले, आपले का बिहारी?

एका हिरवीणीची ट्विटरवर टिव टिव : Please pray for the city of Mumbai. We have reached our limits.

ऑपेरा हाऊस जवळच्या एका utility store चा मालक : ए, मेणबत्त्यांची जास्तीची order दे..तीन तीन ठिकाणी लोक गेले तर एकदम मागणी वाढेल. मागच्यावेळी ताजच्या इथे कमी पडल्या.

सबसे तेज बातम्या बघणारे एक गृहस्थ आपल्या बायकोला : spirit of mumbai spirit of mumbai spirit of mumbai...थांब ग..चुकवू नकोस माझा count. गेल्या १० मिनिटात ७१ वेळा.

इसकाळ च्या स्फ़ोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया : Stay safe mumbaikars.......... take care अविनाश मेहेंदळे न्यू जर्सी २०१६७८४५६६.
त्यावर यथायोग्य comment: धन्यवाद मित्रा. हो आता तू सांगितलस म्हणून, नाहीतर आम्ही कुठे काळजी घेतो स्वत:ची...वेळ कुणाला आहे?

एका news channel चे program head: Great Job! तुम्ही तुमचं काम चोख केलतं...लोकांचं remote वर बोट सुद्धा गेलं नाही.

दादर आयर्वेदिक औषधालयात औषधे घेणार्‍या गिर्‍हाईकाला दुकानदार : shop बंद करून काय फ़ायदा? आता इथेच स्फोट होणार नाही पुन्हा. हाच धंद्याचा time आहे, आणि लोकांना गरज लागली तर दुकान उपयोगी तरी पडेल. घरात बसून TV वर भंकस बघायला कोणाला वेळ आहे.

अखंड फ़िरत असलेला एक SMS: PLEASE DON'T use phones/SMS unless a must; leave networks free for emergency calls. Don't panic and PLEASE DON'T spread rumours or unconfirmed reports via word of mouth or sms. Please share this.
त्यावर एक हुशार: काय करू? fwd करतो सगळ्यांना, उद्या येऊन कोणी म्हणायला नको, मला कसं नाही सांगितलस.

एका कट्ट्यावर : कसाबला solid उचक्या लागत असतील. एकेकाळी दाऊदला लागायच्या तशा..असो लोकांना बुद्धीबळ फ़ारसा कळत नसल्याने त्यांना वाटते प्यादे पुढे असते म्हणून जास्त महत्त्वाचे. वजीराचा विचार फ़ारसा कुणी करत नाही.

मंत्रालय आवारातील एक : पृथ्वीबाबा वर्षावरचे आवरून दिल्लीला जायला निघाले वाटते. मंत्रालय आवारातील दुसरा : का ? आज कोणाला घेऊन गेलेले खाऊगल्लीत डोसा खायला?

एक चित्रपटनिर्माता site co-ordinator ला : चल लवकर जुळव shooting च्या dates. त्या XXX ने घटनास्थळी जाऊन थोडसं shoot केलंपण. पिक्चर आपलाच release झाला पाहिजे आधी.

Times of India तली news : President Obama condemned the attack in a statement and said the U.S. is monitoring the situation.
प्रतिक्रिया : तुम्ही आधी तुमच्या कमरेचं सांभाळा..ज्यात त्यात नाक खुपसायची गरजच काय? चीनकडून उसने घेतलेले डॉलर्स पाकडयांकडे पोचवत रहा.

एका पेपरमधली प्रमुख बातमी : अशी हादरली मुंबापुरी! exclusive photos of mumbai blasts. त्याशेजारच्या links आणि "exclusive photographs": Previous Mumbai Blasts, Rakhi Sawant का नया तमाशा, अ‍ॅशचे pregnancy photos.

दूरदर्शन वरील बातम्या : स्फोट झालेल्या तीनही ठिकाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे , भाजपचे आ . विनोद तावडे , आमदार देवेंद्र फडणवीस, गटनेते पारकर, शिवसेना महिला आघाडी नेत्या नीलम गोर्‍हे यांनी सदिच्छा भेट दिली. सामान्य नागरीक : कशाला? कबुरतांना खाऊ घालायला, का प्रसाद चेंबर्सच्या आजूबाजूला हिरे पडलेत का ते बघायला.

एक चमचा ज्याला कार्यकर्ता असे म्हणतात : ए..आपल्या साहेबांचा तीव्र निषेधावाला byte घ्यायला कोण newsवाला कसा नाय आला? त्या XXX ला फोन लाव.

पेपर मध्ये जागा भरून काढायला टाकलेल्या ठराविक बातम्या व प्रतिक्रिया:

१. संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी , असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले - वा! प्रवक्ते महेश "तपासे"..खो खो खो खो...नाव perfect आहे.

२. गृह मंत्रालयात गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह गृहसचिव राजकुमार सिंग आणि इंटेलिजन्स ब्युरो, अंतर्गत सुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक - याला म्हणतात बैल गेला आणि झोपा केला.

३. मुंबईसह, शेजारच्या गुजरातमध्ये, नवी दिल्ली, तसेच प्रमुख शहरांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे - आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी नाहीतर काय?

एका नवयुवकाचा त्याच्या friends ना SMS :मेरेको बहोत 10sion आ रहा है. मै McD मे और CCD मे जा रहा हू. आ जाओ.

एकाची विनोद्बुद्धी : कधी कधी कलकत्याला पण टार्गेट करा की. तिथल्या media पण chance नको का?

वर्तमानपत्रातल्या फ़ुटकळ e-प्रतिक्रिया :

१. आज कसाबचा वाढदिवस आहे. मग आपल्या CID वाल्यांना कळलं कसं नाही आज काहीतरी घातपात होणारे ते? फ़ुकटचा पगार घेतात.

२. आज कसाबचा वाढदिवस आहे त्याची भेट म्हणून काही फटाके लावण्यात आले बाकी काही नाही

३. कसाबचा वाढदिवस १३ जुलै नाही १३ सप्टेंबर आहे. पण १३ चा काहीतरी लोचा आहेच.

४. राजसाहेबांना निवडून द्या मग बघा. जय मनसे.

५. मंत्रालय आणि संसदेवर का नाही स्फोट केला?

हॉस्पीटलमध्ये एक नर्स दुसरीला : खाऊन घेऊया. डबा आणलाय मी. आज घरी जायला मिळणार नाही बहुतेक.

हॉस्पीटलमध्ये तिसरी नर्स जखमीच्या नातेवाईकाला : काका, तुम्ही माझा डबा खाऊन घ्या. मी खाल्लय. नंतर काही मिळणार पण नाही. तुमच्या पेशंटचे १/२ तासात operation होईल. काळजी करू नका.

कुठेतरी कुणीतरी - ये सही हो गया. अब अगला कहापे?

********

साधारण १५ दिवसांनी "weekend" ला आलेल्या गटारी अमावस्येच्या पूर्वेसंध्येला व श्रावणाच्या तोंडावरच्या अतिप्रमुख बातम्या :

१. गटारी अमावस्येच्या मूहूर्तावर मुंबईच्या जवळपासच्या farm houses ना तुडुंब गर्दी.
२. भारत इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभूत.
३. आरक्षण चित्रपटाला विरोध.
४. पाकिस्तानच्या पहिल्या महिला विदेशमंत्री हिना रब्बानी खार यांचे सौंदर्य व style ची भारतात सर्वत्र चर्चा.
५. अण्णांचे १६ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण.
६. कर्नाटकात बंड. येडीयुरप्पाच हवेत मुख्यमंत्री.
७. गणेशमूर्तींची उंची कमी करणार नाही - अखिल सार्वजनिक गणेश महामंडळ समितीचा निर्णय.
८. मुंबई बंद वरून भावाभावांचे राजकारण.
९. TV serials मध्ये श्रावणातील सणांची रेलचेल.
१०. पावसाने केला कहर. लोकल विस्कळित. नागरिकांचे हाल. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असं काही झालं की सोशल मिडीयावर ऊत येतो लोकांना अतिशय. काल फेसबुकवर इथल्या मुस्लिम समाजाचा पार्कमध्ये इफ्तार सोडून जेवण वाटणं आणि ऑरलँडो घटनेत बळी पडलेल्यांकरता प्रार्थना करतानाचा विडीओ वायरल झाला होता.
(प्रतिक्रियांमध्ये त्यावेळी जर मोदी सरकार असतं तर मायबोलीवरच्या प्रतिक्रिया ही एक वेगळीच कॅटेगरी तयार झाली असती.)

जवळच्या व्यक्तीच्या निधनाची दु:खद बातमी आणि ७० likes. likes देण्याच्या आधी लोक पोस्ट वाचतही नाही का?

एखादी दु:खद बातमी जिथे जिवीत हानी (स्फोट, अपघात, नैसर्गिक आपत्ती) झालेली असते त्याला like मिळणे हे माझ्या डोक्यात जाते.

मित्रपरिवारात फेसबुकवर् एखाद्या वाईट, दु:खद घटनेला लाईक केलेलं बघून चीड येते असं जेव्हा म्हटलं तेव्हा काहींनी ते लाईक करणं म्हणजे ती पोस्ट अ‍ॅक्नॉलेज करणं आहे असं समजावलेलं. पण मला ते अजिबात पटलेलं नाही आणि मी माझ्यापुरतं लाईक करत नाही.

लाईक करणं म्हणजे आवडण नाही. निधनाची बातमी लाईक केली म्हणजे त्या बातमीत जे इमोशन आहे त्याला पाठींबा दर्शवला इतकंच.
जसं लोल (lol) म्हणजे लाफिंग औट लाउड हा जुना अर्थ झाला. हल्ली तो शब्दाही 'हो खरय', 'मलाही असंच वाटतं' अशा अर्थी वापरतात.

>>निधनाची बातमी लाईक केली म्हणजे त्या बातमीत जे इमोशन आहे त्याला पाठींबा दर्शवला इतकंच.<<

बरोबर. झकरबर्गने आता काहि नविन इमोटिकॉन्स देउन थोडि क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अमेरिकेत अशा घटना घडल्यावर सेकंड अमेंड्मेंट, गन कंट्रोल्स वरच्या चर्चेलाहि ऊत येतो...

लाईकचा अर्थ जो आहे तो लाईकच असतो.. त्यामुळे बरोबर वाटत नाही.
सरळ 'सपोर्ट' असे अजुन एक बटन फेसबुकने घालावे.

<< गन कंट्रोल्स वरच्या चर्चेलाहि ऊत येतो...>> ओबामाने प्रयत्नांची पराकाष्टा केली 'गन कंट्रोल्स' आणण्याची पण बलाढ्य 'आर्मस मॅन्युफॅक्चरर्स लॉबी'ने ते प्रयत्न सफल होवूं दिले नाहीत. अमेरिकेत वारंवार घडणार्‍या या घटनाना ही लॉबी देखील जबाबदार आहे, हेंही नाकारतां येणार नाहीं.