'गर्दीतील वेगळा चेहरा' : मोहन उर्फ निवांत पाटील

Submitted by अमेय२८०८०७ on 13 June, 2016 - 08:00

भारतातील- नव्हे आशियातील- अनेक विद्यार्थ्यांना स्वप्नवत असणाऱ्या मुंबईतील 'यु डी सी टी' मधून केमिकल इंजिनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनही. पुढचे संशोधन अमेरिकेतील 'मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत' आणि तिथेच पाच सहा वर्षे मानाच्या जागेवर अध्यापन. सुखवस्तू जीवनप्रणाली आणि परदेशात स्थायिक होण्याची संधी. असे असताना अचानक कुठला सांगावा आला आणि आमचे मित्र मोहन पाटील भारतात परत आले. नुसते भारतात नव्हे तर चक्क आपल्या मूळगावी कोल्हापूरजवळ कागल इथे. काही दिवस जवळच्या इंजिनियरींग कॉलेजात अध्यापन आणि औद्योगिक सल्लागार म्हणूनही काम केले पण खरी ओढ होती ती स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरु करण्याची.

मायबोलीकरांना 'निवांत पाटील' (कोपुधागा लघुरूप: निपा) या नावाने परिचित असणारे 'मोहन पाटील' यांच्याशी इथेच कोल्हापूर धाग्यावर ओळख झाली. पुढे वैयक्तिक भेटही झाली. त्यावेळी त्यांनी बाकी सर्व उद्योग स्थगित करून कागलबाहेर यळगुड रस्त्यावरील जमिनीवर शेड उभारली होती आणि पहिली म्हैस विकत घेऊन सुरुवात केली होती. गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हरियाणातील जिंद येथून आणखी बारा म्हशी खरेदी करून त्यांनी या व्यवसायात पूर्णवेळ वाहून घेतले आहे.

तांत्रिक ज्ञान परिपूर्ण असले तरी एकट्याने इतक्या जनावरांची संपूर्ण उस्तवार करताना आलेल्या व्यावहारिक अनुभवांचे मोल वेगळेच. प्रचंड शारीरिक मेहनत आणि धीराच्या या कामात मुंबई-अमेरिकेत संसार सुरु केलेल्या पत्नीचीही समर्थ साथ लाभली हा सुखद योग. हसतमुखाने वावरणाऱ्या आणि पती काय करतोय याची पूर्ण कल्पना असलेल्या कविता यांच्याशी बोलणे हाही समृद्ध अनुभव असतो. तशी पाटलांच्या कुटुंबाला शिक्षणाची विपुल परंपरा आहे. इंग्रजी प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आई, स्वतः उच्चशिक्षित पत्नी या दोन स्त्रियांच्या उत्तेजन आणि साथीमुळे बाकी आप्त-सुहृद शंका व्यक्त करत असतानाही निपांना हा उपक्रम हाती घेण्यास बळ मिळाले आहे, हे नक्की.

परिसरातील लोकांत शेणात हात घालणे कमी दर्जाचे अशी विचित्र समजूत असल्याने हा व्यवसाय सुरू केल्यापासून निपांना कष्टाळू कामगारांची चणचण भासत आली आहे. नाममात्र पगारावर हलकी मोलमजुरी करतील पण उत्तम मोबदला देऊनही गोठ्यात काम करायला लोकांचा नकार अशी स्थिती असल्यामुळे गेली दीड दोन वर्षे निपा आणि कविता स्वतःच सगळी कामे उरकत आहेत. स्वच्छता, चारा पाणी, दूध काढणे, विक्री, दुखणी खुपणी- म्हशींची बाळंतपणे यासाठी चोवीस तास अपुरे पडावेत इतके श्रम होऊनही आमच्यासारख्या उगीच उत्सुकांचे अगत्यशील आतिथ्य करण्यालाही त्यांना वेळ मिळतो हे नवलच.

सांप्रत दुग्धव्यवसायातील भेसळ, राजकारण आणि इतर दोषांचे ज्ञान असल्याने आपल्यापरीने यात काही चांगले करावे हाच निपांचा ध्यास आहे. संशोधनातील चिकाटी अंगात ओतप्रोत असल्याने सध्या व्यवसायातील आकडेवारी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून नोंदवून ठेवत या अभ्यासावर पाचशे म्हशींचे गोकुळ उभे करण्याचा त्यांचा संकल्प आहे. अर्थात एकांड्या शिलेदाराला ही वाट किती चढणीची आहे याची कल्पना त्यांना आहे पण ज्ञान, नित्य भर पडत असलेला अनुभव आणि घरच्यांचे पाठबळ या पुंजीवर तरुन जाण्याचा विश्वासही आहे.

दुग्धव्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवायचा असेल तर केवळ दूध विक्रीवर भागत नाही. अधिक फायदा देणारी इतर दुग्धजन्य उत्पादने घ्यावी लागतात. हेही लवकरच साकार करण्याचे मोठे आव्हान निपांपुढे आहे. चर्चा-भेटीतून निपांचा ध्यास एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे दृश्यमान होत असतो. सचोटी ही केवळ बोलायची गोष्ट नसते तर ती अखंड हातीपायी वागवावी लागते याचा प्रत्यय देणारी तत्त्वे अंगी बाणवत व्यावसायिक यशाचे स्वप्न निपा उरी बाळगत आहेत.

अपत्ये अथर्व आणि प्रेरणा ही त्यांच्या वयोगटातील सर्वात समजूतदार मुले असावीत. अत्यंत तीक्ष्णबुद्धीच्या या मुलांना आईबाबांकडून अतिशय मोलाचे संस्कार मिळत आहेत, जे त्यांच्या जाणत्या आयुष्याचा अमूल्य ठेवा असतील. निपांचे मुलांच्या शिक्षणाविषयीचे विचार त्यांनी वेळोवेळी मायबोलीवर व्यक्त केले आहेतच.

हे सर्वजण मिळून अनेक अनोख्या गोष्टी करत आहेत त्याही सर्वस्व झोकून देऊन, ज्या माझ्यासारख्या पारंपरिक वाटेवरील पथिकांना अतिशय अचंब्यात टाकून जातात. याप्रकारच्या जीवनसरणीचा डोळसपणे स्वीकार करण्यासाठी- विशेषतः अधिक सोपे लौकिकार्थाने फायदेशीर पर्याय उपलब्ध असताना - असामान्य धैर्य लागते. अनेक छोट्यामोठ्या आवडींना वेळेअभावी सहज तिलांजली द्यावी लागते. काळ काम वेगाचे सूत्र जुळवताना अनावश्यक कृतींना फाटा द्यावा लागतो. निपाही सध्या हेच करत आहेत. असे काही पाहिले की निष्ठा, गुणवत्ता, व्रत हे केवळ अविचाराने वापरून बोथट झालेले शब्द नाहीत याची उमज येते.

आज माझी पत्नी- मुलगा, कुटुंबीय आणि या भागात असल्यामुळे आवर्जून भेटीस आलेली आणखी एक कोपुसदस्या इन्ना (सोनाली) यांच्या समवेत अशा धडाडीच्या माणसासोबत काही वेळ व्यतीत करता आला याचे अपार समाधान आहे. आमच्या मुलांनाही एका वेगळ्या विश्वाची ओळख झाली.

निपा आणि त्यांच्या घरातील सदस्यांना पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!

-- अमेय

IMG-20160613-WA0010.jpgIMG-20160613-WA0006.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ओळख. निपा आणि कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

निपा, तुमचे अनुभव तुमच्या शब्दांत वाचायला आवडतील.

अमेय, खूप खूप धन्यवाद. निपांची अशी ओळख वाचून खूप छान वाटल.
निपा __/\__, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप सार्‍या शुभेच्छा. तुमचे अनुभव नक्की लिहा. मला भविष्यात नक्की उपयोगी पडतील.

माझ्या एका मैत्रिणीचा नवरा ( मेकॅनिकल इंजिनिर) दुबईतील नोकरी सोडून त्यांच्या गावी पशुपालन व्यवसाय आणि लोकांना ट्रेनिंग द्यायच काम करत आहे.

Pages