'गर्दीतील वेगळा चेहरा' : मोहन उर्फ निवांत पाटील

Submitted by अमेय२८०८०७ on 13 June, 2016 - 08:00

भारतातील- नव्हे आशियातील- अनेक विद्यार्थ्यांना स्वप्नवत असणाऱ्या मुंबईतील 'यु डी सी टी' मधून केमिकल इंजिनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनही. पुढचे संशोधन अमेरिकेतील 'मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत' आणि तिथेच पाच सहा वर्षे मानाच्या जागेवर अध्यापन. सुखवस्तू जीवनप्रणाली आणि परदेशात स्थायिक होण्याची संधी. असे असताना अचानक कुठला सांगावा आला आणि आमचे मित्र मोहन पाटील भारतात परत आले. नुसते भारतात नव्हे तर चक्क आपल्या मूळगावी कोल्हापूरजवळ कागल इथे. काही दिवस जवळच्या इंजिनियरींग कॉलेजात अध्यापन आणि औद्योगिक सल्लागार म्हणूनही काम केले पण खरी ओढ होती ती स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरु करण्याची.

मायबोलीकरांना 'निवांत पाटील' (कोपुधागा लघुरूप: निपा) या नावाने परिचित असणारे 'मोहन पाटील' यांच्याशी इथेच कोल्हापूर धाग्यावर ओळख झाली. पुढे वैयक्तिक भेटही झाली. त्यावेळी त्यांनी बाकी सर्व उद्योग स्थगित करून कागलबाहेर यळगुड रस्त्यावरील जमिनीवर शेड उभारली होती आणि पहिली म्हैस विकत घेऊन सुरुवात केली होती. गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हरियाणातील जिंद येथून आणखी बारा म्हशी खरेदी करून त्यांनी या व्यवसायात पूर्णवेळ वाहून घेतले आहे.

तांत्रिक ज्ञान परिपूर्ण असले तरी एकट्याने इतक्या जनावरांची संपूर्ण उस्तवार करताना आलेल्या व्यावहारिक अनुभवांचे मोल वेगळेच. प्रचंड शारीरिक मेहनत आणि धीराच्या या कामात मुंबई-अमेरिकेत संसार सुरु केलेल्या पत्नीचीही समर्थ साथ लाभली हा सुखद योग. हसतमुखाने वावरणाऱ्या आणि पती काय करतोय याची पूर्ण कल्पना असलेल्या कविता यांच्याशी बोलणे हाही समृद्ध अनुभव असतो. तशी पाटलांच्या कुटुंबाला शिक्षणाची विपुल परंपरा आहे. इंग्रजी प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आई, स्वतः उच्चशिक्षित पत्नी या दोन स्त्रियांच्या उत्तेजन आणि साथीमुळे बाकी आप्त-सुहृद शंका व्यक्त करत असतानाही निपांना हा उपक्रम हाती घेण्यास बळ मिळाले आहे, हे नक्की.

परिसरातील लोकांत शेणात हात घालणे कमी दर्जाचे अशी विचित्र समजूत असल्याने हा व्यवसाय सुरू केल्यापासून निपांना कष्टाळू कामगारांची चणचण भासत आली आहे. नाममात्र पगारावर हलकी मोलमजुरी करतील पण उत्तम मोबदला देऊनही गोठ्यात काम करायला लोकांचा नकार अशी स्थिती असल्यामुळे गेली दीड दोन वर्षे निपा आणि कविता स्वतःच सगळी कामे उरकत आहेत. स्वच्छता, चारा पाणी, दूध काढणे, विक्री, दुखणी खुपणी- म्हशींची बाळंतपणे यासाठी चोवीस तास अपुरे पडावेत इतके श्रम होऊनही आमच्यासारख्या उगीच उत्सुकांचे अगत्यशील आतिथ्य करण्यालाही त्यांना वेळ मिळतो हे नवलच.

सांप्रत दुग्धव्यवसायातील भेसळ, राजकारण आणि इतर दोषांचे ज्ञान असल्याने आपल्यापरीने यात काही चांगले करावे हाच निपांचा ध्यास आहे. संशोधनातील चिकाटी अंगात ओतप्रोत असल्याने सध्या व्यवसायातील आकडेवारी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून नोंदवून ठेवत या अभ्यासावर पाचशे म्हशींचे गोकुळ उभे करण्याचा त्यांचा संकल्प आहे. अर्थात एकांड्या शिलेदाराला ही वाट किती चढणीची आहे याची कल्पना त्यांना आहे पण ज्ञान, नित्य भर पडत असलेला अनुभव आणि घरच्यांचे पाठबळ या पुंजीवर तरुन जाण्याचा विश्वासही आहे.

दुग्धव्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवायचा असेल तर केवळ दूध विक्रीवर भागत नाही. अधिक फायदा देणारी इतर दुग्धजन्य उत्पादने घ्यावी लागतात. हेही लवकरच साकार करण्याचे मोठे आव्हान निपांपुढे आहे. चर्चा-भेटीतून निपांचा ध्यास एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे दृश्यमान होत असतो. सचोटी ही केवळ बोलायची गोष्ट नसते तर ती अखंड हातीपायी वागवावी लागते याचा प्रत्यय देणारी तत्त्वे अंगी बाणवत व्यावसायिक यशाचे स्वप्न निपा उरी बाळगत आहेत.

अपत्ये अथर्व आणि प्रेरणा ही त्यांच्या वयोगटातील सर्वात समजूतदार मुले असावीत. अत्यंत तीक्ष्णबुद्धीच्या या मुलांना आईबाबांकडून अतिशय मोलाचे संस्कार मिळत आहेत, जे त्यांच्या जाणत्या आयुष्याचा अमूल्य ठेवा असतील. निपांचे मुलांच्या शिक्षणाविषयीचे विचार त्यांनी वेळोवेळी मायबोलीवर व्यक्त केले आहेतच.

हे सर्वजण मिळून अनेक अनोख्या गोष्टी करत आहेत त्याही सर्वस्व झोकून देऊन, ज्या माझ्यासारख्या पारंपरिक वाटेवरील पथिकांना अतिशय अचंब्यात टाकून जातात. याप्रकारच्या जीवनसरणीचा डोळसपणे स्वीकार करण्यासाठी- विशेषतः अधिक सोपे लौकिकार्थाने फायदेशीर पर्याय उपलब्ध असताना - असामान्य धैर्य लागते. अनेक छोट्यामोठ्या आवडींना वेळेअभावी सहज तिलांजली द्यावी लागते. काळ काम वेगाचे सूत्र जुळवताना अनावश्यक कृतींना फाटा द्यावा लागतो. निपाही सध्या हेच करत आहेत. असे काही पाहिले की निष्ठा, गुणवत्ता, व्रत हे केवळ अविचाराने वापरून बोथट झालेले शब्द नाहीत याची उमज येते.

आज माझी पत्नी- मुलगा, कुटुंबीय आणि या भागात असल्यामुळे आवर्जून भेटीस आलेली आणखी एक कोपुसदस्या इन्ना (सोनाली) यांच्या समवेत अशा धडाडीच्या माणसासोबत काही वेळ व्यतीत करता आला याचे अपार समाधान आहे. आमच्या मुलांनाही एका वेगळ्या विश्वाची ओळख झाली.

निपा आणि त्यांच्या घरातील सदस्यांना पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!

-- अमेय

IMG-20160613-WA0010.jpgIMG-20160613-WA0006.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ओळख करुन दिलीस अमेय!
कर्मयोगी व्यक्तींबद्दल आतापर्यंत वाचलय किंवा ऐकलंय! पण इथे हे धडधडीत उदाहरण समोर आहे. त्यान्च्या या प्रकल्पाला भेट दिलेली नसली तरी ग्रुपवर येणार्‍या मेसेजेस मधुन, त्यान्ची अगदी 'म्हशी आणण्यापासुन' केलेली सुरवात, वेगवेगळ्या प्रयोगातुन शिकवण अशा अनेक गोष्टीन्ची माहीती मिळत गेली.
निपान्चे आयुष्य खरोखर प्रेरणादायी आहे.
आपण स्वत:च स्वीकारलेल्या व्यवसायात येणार्या असंख्य अडचणींवर मात करत कसे टिकून रहावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अर्थात यात सौं.ची साथ पण नक्कीच वाखाणण्यासारखी !!

एका रोल मॉडेलला समर्थपणे शब्दबद्ध केलंयस अमेय.

निपा आणि कविताला भेटताना मन आपोआप आदरानं झुकलेलं असतं. दोघंही उत्साहाची कारंजी आहेत. दिलखुलास हसत आणि प्रसन्न मुद्रेनं कामं आणि अडचणींचे डोंगर उपसत असतात. अचंबित व्हायला होतं. त्यांच्याकडं नुसतं बघूनच हुरूप येतो, विश्वास वाटतो.
मळलेली वाट नाकारून काट्याकुट्यात घुसून हिंमतीनं स्वतःची पायवाट शोधून, त्याचा राजमार्ग करण्याची धमक असलेली ही डोळ्यासमोरची जिवंत उदाहरणं आहेत.
निपा, कविता, तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा.

पाटलांकडचे सर्व दुग्धजन्य पदार्थ अत्युत्कृष्ट असतात. त्यात इतर जिन्नसांसोबत प्रचंड आपुलकी हा इंग्रिडिअंट प्रामुख्याने असतो, जो बाजारात कुठेच मिळत नाही. शक्य त्या सर्वांनी नक्की लाभ घ्या Happy

निपांच कौतुकच वाटतय आणि स्वतःचा अभिमान की असा माणुस आपल्याशी आपल्यायेवढा होउन बोलतो, थट्टामस्करी करतो आणि करुनही घेतो. त्यांच्या जोडीला त्यांच्या पत्नीने(सौ. कविता पाटील)सुद्धा त्यांना तेवढीच साथ दिली आहे जी अजुनच महत्त्वाची आहे त्यामुळे त्यांच किंचित जास्तच कौतुक वाटतय. अगदी खर सांगायच तर मला असा निर्णय घेण खूप अवघड गेल असत.. नाईलाजच झाला असता की आता काही पर्याय नाहीये समोर तरच मी हा निर्णय घेतला असता...

दोघांनाही मनापासुन ___/\___

मला माहित नव्हते कि आपल्या गावाजवळ कोणी मायबोलीकर राहत असेल... आणि नृसिंहवाडीला जाताना या रस्त्यावरूनच जातो तेव्हा नक्की भेटेन ग्रेट पाटील ...

निवांत पाटील आणी त्यांना संपूर्ण पणे साथ देणारे त्यांचे कुटुंब , खूप आदर आणीकौतुक वाटले त्यांच्याबद्दल वाचून . असा निर्णय घेऊन तो खरोखरच वास्तवात आणणे हे काही सोपे काम नाही!!
इथे परिचय करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!

मस्त ओळख.. Happy
जितक्या सहजतेने तुम्ही लिहल आहे,,तितका सहज हा प्रवास नक्कीच नसणार. निपांकडुन अजुन वाचायला आवडेन.

धन्यवाद ओळख करुन दिल्याबद्दल.

निवांत पाटील तुम्हाला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा. कागलला कधी येणे झाले तर नक्की भेटु.

अमेरीकेतुन परत आल्यावर या व्यवसायातली गणिते लाभदायक आहेत का?

प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.
निवांत पाटील आणी त्यांना संपूर्ण पणे साथ देणारे त्यांचे कुटुंब सर्वांना मनापासुन ___/\___

अमेय, खूप छान ओळख करून दिलीस. धन्यवाद!
इथली लोकं परदेशात पळत असतात. आणि निपा चक्क तिकडून इकडे ,तेही खेडे गावात जाऊन राहिलेत. आणि आपल्या नावाला जागत आहेत. सुखात, असलेलं जीवन, असं कष्टात घालून जगणं अवघड आहे. पण ती त्यांची आवड आहे. पण आश्चर्य वाटत ते त्यांच्या पत्नीच. फ़क्त नवर्‍याच्या इच्छेसाठी, असं खेडे गावी राहून, म्हशी सांभाळणं आणि त्यांची सगळी कामे करण हे खरच एक आव्हान आहे. जे ते दोघेही समर्थपणे एकमेकांच्या साथीत पेलतायत. त्यांची मुलंही इथे कंटाळली नाहीत आणि ती ही हौसेने ह्या सगळ्यात भाग घेतायत. म्हणजेच मुलांवर संस्कारही उत्तम होत आहेत. खरच या पाटील कुटुंंबाला माझे दंडवत. आणि खूप खूप शुभेच्छा!
DSCN3003.jpg

निपा --^--! तुमच्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! खूप छान ओळख आणि माहिती दिलीत अमेय.

चांगली ओळख करुन दिली अमेय,
निवांत पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा !

ओळख आवडली. इथे ती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
खुद्द पाटलांनी सुद्धा स्वतःच्या कामाविषयी, अनुभवांविषयी, बेतांविषयी इथे लिहावे अशी विनंती>> +१

अमेयदा -------------/\------------
लय लाजवलात राव. Blush
धन्यवाद.
प्रतिसादकर्त्यांचे पण धन्यवाद... खुप खुप शुभेच्छांसाठी...

वेळ मिळाल्यानंतर नक्कि एक एक पाउल कसे टाकले.... काय चुका झाल्या.... त्यांची भरपाई कशी करावी लागली ते शिस्तवार पध्दतीने लिहेन.

सध्या धंदा म्हणुन या प्रकल्पाकडे मी पहात नाहिय. एक R&D म्हणुनच काम चालु आहे. कारण हा सेक्टर (दुध उत्पादन) अनऑर्गनाइझ्ड आहे. मोठ्या प्रमाणात स्केल अप करण्यासाठी जो डाटा लागतो तो उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे. इन्फॅक्ट हा पायलट प्लँट पण नाहीय. तो अजुन यायचा आहे.

घरच्या पाठींब्याशिवाय यातले काही एक शक्य झाले नसते. माझ्या मुलाला जेंव्हा , वडील काय करतात असे विचारले जाते तेंव्हा तो सांगतो, ते पशुपालन करतात. समाजाचे पिअर प्रेशर संभाळणे खुप अवघड असते, ते घरच्यांनी खुप चांगल्या पद्धतीने संभाळले आहे.

काही लोकांना वाटते कि मी पुर्णपणे सटकलो गेलेलो आहे. माझ्या बाबतीत देव देते आणि कर्म नेते असा प्रकार झालेला आहे. चांगली नोकरी होती ते करायचे सोडुन हे धंदे करयला कोणी सांगितले होते? इत्यादी इत्यादी... काही लोकांना वाट्ते कि एवढा शिकला सवरलेला माणुस सगळे सोडुन हे करतोय म्हण्जे काहीतरी वेगळे आहे.

माझ्या या वाटचालीत बर्‍याच लोकांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे, अगदी ओळख नसलेल्या लोकांचे देखिल. मला हाताने धार काढता येत नव्हती तेंव्हा अक्षरशः रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांनी धारा काढुन दिले होते.

बरेच काही लिहण्यासारखे आहे. आणि निवांतपणे ते लिहिनच.

सर्वांना खुप खुप धन्यवाद.

अमेयने छान ओळख करुन दिलीच आहे. आता निपाही लिहीतात तेव्हा खुप मोठा माहितीचा खजीना होणार आहेच.

__/\__

निपा आणि कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

निपा यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात होतो. मूळ लेख आणि त्यांची प्रतिक्रिया दोन्हीही आवडले.
पुढील वाटचालीकरता खूप सार्‍या शुभेच्छा !

Pages