पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by UMAK on 4 June, 2016 - 11:43

(इथे कोणतीही पाककृती दिलेली नाही. स्वयंपाक करताना आपले काहीना काही चुकते आणि त्यातून आपण शिकत जातो. अशाच माझ्या चुकांविषयी हा लेख आहे. दुसऱ्यांकडून त्या कधीही होऊ नयेत म्हणून लिहिलेला! खास नवशिक्यांसाठी! जाणकारांना मात्र बाराखडी वाटेल यात शंका नाही.)

लहानपणापसून आईच्या मागे मागे करीत स्वयंपाक घरात लुडबुड करणे हा माझा आवडता छंद होता. त्यामुळे मोठी होता होता मी जरा लौकरच स्वत:ला स्वयंपाकात कुशल (गैर)समजू लागले. तर अशी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मी फजितीला कशी सामोरी गेले त्याचीच ही थोडक्यात हकीकत.

तेव्हा मी २० वर्षांची असेन. एकदा ‘आली लहर’ ह्या धर्तीवर मी पातळ पोह्यांचा चिवडा करायचा ठरवला. दिवाळीचा फराळ करताना मी नेमकी काही ना काही कारणाने (अगदी जाणून बुजून) तो करणे टाळायची. त्यामुळे चिवडा बनवताना कधीच बघितला नव्हता. आत्मविश्वासाला तर हा मोठ्ठा पूर आलेला! आईला सांगितले की मला माहित आहे, मी बनवेन, तू मस्त आराम कर. पाककृतींची पुस्तके पण आईकडे फारशी नव्हती आणि जरी असती तरी त्यादिवशी ती पुरात वाहून गेली असती हे नक्की.

महत्वाची सर्व तयारी केली. पोहे चाळून घेतले. डाळे, शेंगदाणे भाजून घेतले. भरपूर तेलात फोडणी केली. त्यात डाळे, शेंगदाणे घातले. पोहे घातले.
आणि लगेचच आssईss
माझी हाक (की किंचाळी?) ऐकून आई बिचारी धावत आली. तिला वाटले मलाच भाजले की काय? मी ठीक होते. पण पोहे मात्र अगदी रुसले होते. ‘रुसुबाई रुसू आणि तेलात बसू’ झाले होते. पूर्णत: आक्रसले होते.
आईने फक्त एकच प्रश्न विचारला, “पोहे भाजून नाही ना घेतलेस?”

तर अशी ही माझी (अजूनही लक्षात राहिलेली) पहिली फजिती.

तात्पर्य : पोहे आधी मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यावेत. अशाने चिवडा अगदी हलका, खुसखुशीत होतो.

लग्न झाल्यावर नवी नवरी म्हणून कौतुकाचे चार दिवस सरल्यावर रोजचीच परीक्षा असे. कारण माझ्या सासूबाई एकदम सुगरण असल्यामुळे पसंतीची पावती मिळणे अतिशय अवघड काम होते. पण मी नापास होत नव्हते हेही नसे थोडके म्हणायचे.

एकदा भाकरी करायचा बेत ठरला. ‘मेरे मनमें लड्डू फुटें।’ कारण मला भाकरी मस्त करता यायची. अगदी पातळ, गोलाकार आणि तीही थापून बर्र का लाटून नव्हे काही. मी, मी करत नाचून झाले. सासूबाईनी पण मनात भांगडा केला असावा. कारण त्यांना फारशी जमत नसे. (हे खरे कारण माझ्या मनात फुटलेल्या लाडवाचे).

लागले तयारीला. परात घेतली. पातेल्यात पाणी घेतले. अगदी एका मनाने पीठ कालवले. भाकरी थापली. तवा तापला तशी भाकरी उचलायला गेले तर तिची चक्क फाळणी झाली. त्या तुकड्यांना असहाय्यपणे गोळा केले आणि परत नव्या जोमाने आणि काळजीपूर्वक भाकरी थापली. उचलायला गेले तर पुन्हा फाळणी. आता मात्र मी रडकुंडीला आले. मनात लाडवांचा कधीचाच चुरा झाला होता. पूर्ण शरणागती पत्करली. अखेरीस सासूबाईनी कुशलतेने सर्व निस्तरले.

आईला माझी फटफजिती सांगितली आणि तिने फक्त इतकेच विचारले, “पाणी गरम घेतले होतेस?”

तर अशी ही माझी (अजूनही लक्षात राहिलेली) दुसरी फजिती.

तात्पर्य : भाकरी करताना पीठ ताजे असेल तर काळजी नाही पण जुने झाले असेल तर ते गरम पाण्याने कालवावे. भाकरीची मोडायची काय बिशाद!

‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ह्या धर्तीवर इतरांना फायदा व्हावा हा प्रांजळ हेतू!

तुमच्याकडूनही जर काही चुका झाल्या असतील तर जरूर सांगा म्हणजे मी पण शिकेन.

– उमक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी साधा भात करताना सुध्दा तांदूळ जुना असेल तर पाणी अंदाजापेक्षा थोडे जास्त लागते आणि तांदूळ नवीन असेल तर अंदाजापेक्षा कमी....या दोन्हीचा अंदाज न आल्याने अनुक्रमे जवळ जवळ "कच्चा भात" व "खिमट टाइप भात" करुन झालेला आहे...