"माझ्या नामूनं आजपतोर पैसं साठवलं आसतं, तर पाच परसाची हीर भरली असती. पर, त्याच्या हिरीला खालून भोक हाय. या जलमात काय, पुढल्या सात जलमी त्याच्या हिरीत पानी ठरनार नाय... :" हे बोल होते साळुबाईचे; कवी नामदेव ढसाळ यांच्या आईचे. ढसाळांचं जगणं किती मनस्वी होतं, याचा हा जिताजागता पुरावाच होता.
या उधळमाधळ जगण्यामुळं ढसाळांना पैशाची कायमच ददात असायची. त्यामुळे बेदरकारपणे परंपरेच्या भिंती तोडणारा नामदेव हयातभर दुस-याच्या खिशात हात घालत राहिला. खिसा गरम असला की संगतीच्या कार्यकर्त्यांची चंगळ असायची. दिवसदिवस टॅक्सीने फिरायचा. सकाळी भाड्याने घेतलेली टॅक्सी थेट रात्रीच सोडायचा. वाटेल त्या हॉटेलात वाटेल ते खाऊ घालायचा. पैसे नसले की नुसतं झोपून राहायचा...
एकदा मोतीराम कटारेला त्यानं दादरच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ कटिंग चहा पाजला. गाडीवाल्याच्या हातात शंभराची नोट टेकवून, रस्ता ओलांडून चालता झाला. कार्यकर्त्यांवर तो इतकं प्रेम करायचा की, ते क्रूर ठरायचं. कार्यकर्त्यांना तो कुठे नेईल, याचा पत्ता नसायचा. त्याचं वागणं, जगणं सारंच बेबंद असायचं. त्याच्या पहिल्यावहिल्या ‘गोलपिठा’ कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ भयानक होतं. गुप्तरोगाच्या दवाखान्याची पावती त्याने त्यासाठी वापरली होती. तो कवितासंग़्रह अनिरुद्ध पुनर्वसू म्हणजे नारायण आठवले यांना त्याने दोनशेत विकला. कशासाठी? झोपडीवर पावसाळ्यात प्लास्टिकचा कागद टाकायचा होता म्हणून. पैशासाठी नामदेवने ब-याच लांड्यालबाड्या केल्या. ज्या ‘मातोश्री’वर दगड फेकले तिथेच नंतर पैसेही मागितले. निवडणुकांत पँथरच्या वाट्याचे तिकीट विकण्याचा उद्योग पैशासाठीच केला. नामदेवनं टॅक्सीही चालवली. मात्र, टॅक्सीत कवितांची वही कायम बरोबर असायची. कुठं कविता वाचन असलं की टॅक्सी साइडला लावून टेचात कविता सादर करायचा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात असाच एकदा गेला. तिथं कोणी संधी देईना. शेवटी कशीबशी कविता सादर केली. वन्समोअरची दाद मिळाली. पण, या पठ्ठ्याने वन्समोअरची संधी घेतली नाही. माणसं न वाचताच हे कविता करताहेत, असं उपस्थित कवींना सुनावून आला... सत्तरीच्या दशकात राज्यात दलित अत्याचारांनी कळस गाठला होता. नामदेवनं भूमिगत राहून संघर्ष करण्याचं ठरवलं होतं; पण अत्याचाराचं क्षेत्र व्यापक असल्यामुळे दलित पँथर या लढाऊ संघटनेचा घाट घातला. आणीबाणीला पँथरचा पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये नामदेवचं वजन वाढलं. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नामदेवला मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. पार्लमेंटरी राजकारणापेक्षा आपल्याला रस्त्यावरचं राजकारण आवडतं, असं म्हणत अशा संधीला लाथाडण्याचं धाडस नामदेवासारखा फकीर करू शकत होता.
नामदेवची बंडखोरी सेंद्रिय होती. सत्यकथेविरोधात बंड म्हणून अनियतकालिकाची चळवळ चालू झाली. त्यात नामदेवही होता. अनियतकालिकवाले आत्यंतिक कलावादी आहेत. सामाजिक, राजकीय भूमिका वर्ज्य मानतात, म्हणून नामदेवनी आपल्याच मित्रांविरोधात बंड पुकारले. स्वत:च विद्रोहीचे अंक काढण्यास सुरुवात केली; पण नामदेवाच्या विद्रोहात निर्व्याजता होती. नामदेवची ‘माण्साने’ ही कविता म्हणजे, विद्रोहाचा कळस. ही कविता विद्रोहीच्या अंकात छापायला बाबूराव बागूलांनी विरोध केला होता. राजा ढालेंच्या आग्रहामुळे ती छापली गेली. पण, बागूलांबद्दलचा नामदेवचा आदर तसूभरही कमी झाला नाही. बागूलांना तो ‘घनघोर युद्धाचे सरसेनापती’ असे संबोधायचा!
ताज हॉटेलच्या गल्लीतील ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हे नामदेवच्या आवडीचं ठिकाण. रात्री-अपरात्री नामदेवची गाडी तिथे धडकायची. कबाबवर सारे ताव मारायचे. ‘डल्ली’ला अभिजनवर्गात मान्यता मिळवून देण्यात नामदेवच कारणीभूत. वडील कत्तलखान्यात ढोरं उचलायचे.त्यामुळे तेच घरी यायचं. बाप वारल्यावर त्यांच्या दहाव्याला नामदेवनं बिर्याणीच ठेवली होती. तरुणपणात नामदेवला खाण्याचं वेड होतं; उतारवयात दुस-यांना खाऊ घालण्याचं लागलं.
त्याला कुत्र्याचं भारी वेड होतं. ‘गजल’ आणि ‘ठुमरी’ अशा दोन पॉमेरॅनियन जातीच्या कुत्र्या त्याच्याकडे होत्या. त्यांना झालेली पिले, तो आपल्या आवडत्या माणसांना भेट द्यायचा. कित्येकदा दौ-यात त्याच्या सोबत कुत्री असायची. महागड्या हॉटेलातलं जेवण मागवायचा, पहिल्यांदा कुत्र्यांना; मग कार्यकर्त्यांना. त्यानंतर स्वत: खायचा. त्याच्या अशा वागण्याने कोणी म्हणायचे, विषप्रयोग करू नये म्हणून नामदेव असं करतोय. कोणी म्हणे, घरातली पहिली भाकर कुत्र्याला, अशी त्याच्या आजीची शिकवण आहे.... नामदेव दोन जगांत एकाच वेळी वावरायचा. त्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप झाले. संशय घेतले गेले. त्याला गद्दार, पळपुट्या ठरवले; पण त्याचं वागणं बदललं नाही. अर्धा समाजवादी असूनही त्यानं आणीबाणीला पाठिंबा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करून सर्वांना उरावर घेतले.
हिजडे आणि वेश्यांचा देशातला पहिला मोर्चा काढण्याचा मान नामूकडेच जातो. सावकाराच्या पिळवणुकीला विरोध करण्यासाठी १९७१ मध्ये त्याने हा मोर्चा काढला. या मोर्च्यात लेखक, चित्रकार यांना सामील केले. पण नामदेव बेशिस्तीचा महामेरू होता. त्यामुळे कविता सोडता त्याचं एकही काम पूर्णत्वास गेलं नाही. अर्थात, त्याची त्याला तमा नव्हती.
पँथरचा तो संस्थापक होता. पँथर नावाची महागडी सिगारेट कुलाब्यात मिळत असे. हजारात दहा सिगारेटी मिळायच्या. पँथर नाव आहे, म्हणून त्या ओढायचा. सिगारेट संपल्याचं घरी कळायचं; तशीच गाडी कुलाब्याकडे वळवायचा. पेट्रोल, खर्च, काळवेळ असली गणितं कधी त्याच्या गावी नव्हती. त्याला कुठलंही व्यसन वर्ज्य नव्हतं. पण, मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजाराचं निदान झालं, तसं त्यानं दारूच्या एका थेंबालाही शिवलं नाही. किती वर्षे, २२ वर्षे! पण बरोबरच्यांना मात्र पाजायचा. शेवटी शेवटी तो म्हणायचा, दुस-यांना पाजून हल्ली मलाच चढते.
अंडरवर्ल्डचे नामचीन अरुण गवळी आणि हाजी मस्तानशी त्याचा दोस्ताना होता. नामदेवनं कामाठीपु-यात एकदा दाऊद इब्राहिमला चोपला होता, म्हणे. एका पत्रकार मित्राला, त्यानं असंच एकदा गाडीत कोंबलं आणि दगडी चाळीत नेलं. तिथल्या बंदुका त्याच्या हातात दिल्या. नामदेव आणि भाई संगारेला अरुण गवळी दरवर्षी नेमाने कपडे घ्यायचा म्हणे. बंडखोरी करणारी माणसं नामदेवला परमप्रिय होती. ज्या मुली आंतरजातीय विवाह करायच्या, त्यांना तो फारच सन्मान द्यायचा. कार्यकर्त्यांना टोपण नावानं हाका मारायची त्याची सवय होती. अपना शागीर्द, गाववाला क्रांतिकारक, कोलाज अशी त्याने अनेकांना नावे बहाल केली होती... रा. सु. गवई आणि दादासाहेब रुपवते अशा बड्या नेत्यांकडे सत्तरीच्या दशकात मोटारी होत्या. दलित पँथरच्या चळवळीत स्वत:च्या गाडीत फिरणारा नामदेव पहिला नेता ठरला. टोयाटोपासून इनोव्हापर्यंतच्या सगळ्या गाड्या त्यानं फिरवल्या. मनमौजी कपडे आणि दिमतीला उंची सिगार, असा त्याचा रुबाबदार वावर असायचा. कशाचीही पर्वा न करणारा बेडर, असा त्याचा पिंड होता. अंगावरचे रंगीबेरंगी कपडे हे त्या स्वभावाचे निदर्शक होते. वेळापत्रक, नियोजन, संघटनात्मक शिस्त, भविष्याची तरतूद या गोष्टी नामदेवच्या वळचणीला नव्हत्या. तो कोणाला वेळेवर भेटायचा नाही. आपल्या सोयीप्रमाणे तो इतरांकडे धडकायचा. खिशातले पैसे संपले, तरी उद्याची चिंता नसायची. पैसे कुठं जातात; उद्याचे उद्या बघू, असं तो म्हणायचा.
ग्रंथाच्या पानाच्या संख्येवर लेखकाचं थोरपणं नसतं, असं त्याचं मत होतं. म्हणून अनेकांना इंटलेक्चुअल म्हणून त्यानं नाकारलं. आपली कविता मात्र कोणत्याही कसोट्यांवर घासून बघा, असं त्याचं आव्हान होतं. कवीपणाचा प्रचंड अभिमान बाळगणारा नामदेव ‘आपून आजून खरी कविता लिहिलेली नाही’ असं सांगायचा. आपल्याला अशी कविता लिहायची आहे, त्या कवितेनं वाचणा-याचा अख्खा दिवस खायला पाहिजे, असं म्हणायचा.
१९७० ते ७५ ही पाच वर्षेच नामदेवची खरी. इतर वर्षे त्याने केवळ संधिसाधूपणा केला, असाही त्याच्यावर आरोप झाला; पण नामदेव त्याच्या मस्तीत वागला, जगला. अनेकांची आयमाय काढली. शंकराचार्यांना जोड्यानं मारलं, मंत्रालयावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या, भातात दारू ओरपून खाल्ली, कामाठीपु-यात शिंदळकी केली, मित्रांवर खोटेनाटे आरोप केले, घरातल्यांची-बायको-मुलाची, इव्हन स्वत:च्या शरीराची थोडीशीही तमा बाळगली नाही. पण, कवितेतली नामदेवची उडी मात्र चुकली नाही.
कवितेत नामदेव मांजरासारखा राहिला. उलटं फेका, सुलटं फेका; तो पायावरच पडणार. भीमशक्ती-शिवशक्तीच्या वळचणीला नेली; पण जाती अन् शोषणाला बगल नाही दिली. कवीपणाबरोबर येणा-या जगाच्या जबाबदारीचं भान ठेवलं. जातीचा प्रश्न पृष्ठभागावर आणला. संघर्ष आणि सर्जनशीलतेचा संबंध प्रस्थापित केला. कविता त्याचं राजकीय हत्यार होतं. म्हणून तो म्हणायचा, माझी एक कविता म्हणजे एक मोर्चा आहे...
अशोक आडसूळांनी रंगवलेल्या नामदेव ढसाळांच्या या आठवणी भावूक करणारयाही आहेत अन विचारप्रवणही आहेत, या आठवणी मयुरपंखी पिसारयासारख्या आहेत अन गटारात वाहत गेलेल्या फाटक्या लक्तरांसारख्याही आहेत ! यांची अंगयष्टी साखळदंडाची आहे अन भाषा चाबकाची आहे ! या आठवणी उकळत्या पारयासारख्या दाहकही आहेत अन थिजलेल्या रक्तासारख्याही आहेत ! या आठवणी उद्रेकाचा जाळ आपल्या मेंदूत शिलगावून जातात अन तडफडणारया जीवावर फुंकरही घालून जातात ! अशा बहुपेडी आठवणी ज्यांच्या होत्या त्या धसाळांचं जगणं कसं असेल ? ढसाळांचे जिणे एकाच वेळी मखमली किनखापी लफ्फेदार कशिदाकाम केलेल्या भरजरी वस्त्रासारखेही आहे आणि टराटरा आवाज करत चिंध्या उडालेल्या जीर्ण चिवट चिरगुटासारखंही आहे...आपल्या बापाच्या भूतकाळात उतरून तिथला कानाकोपरा खाजवणारे ढसाळ, फुटपाथवर टाकून गेलेल्या आईच्या लुगड्यातील अंधार शोधात फिरणारे ढसाळ आणि सूर्याच्या रथाचे सात घोडे मारणारे ढसाळ असं बहुआयामी अभिजात उत्तुंग प्रतिभेचं देणं लाभलेले ढसाळ आपल्या डोळ्यापुढून जाता जात नाहीत याला कारण त्यांच्या वाटयाला आलेले आयुष्य नसून त्यांनी त्यांच्या टोकदार आयुष्याची चित्तवेधक आणि लक्ष्यभेदी कवितेतून केलेली मांडणी !
- समीर गायकवाड.

जबरा लेख आहे !
जबरा लेख आहे !
कवितेत नामदेव मांजरासारखा
कवितेत नामदेव मांजरासारखा राहिला. उलटं फेका, सुलटं फेका; तो पायावरच पडणार.
हे जबरदस्त वाक्य आहे >>>rar , नक्कीच जबरदस्त वाक्य आहे पण ते वाचताना मला प्रज्ञा दया पवारयांच्या २००८ साली गाजलेल्या कवितेतल्या या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली
'कुठूनही फेका मला
बुरुजांवरून कड्यावरून शतकांवरून इतिहासावरून
मांजरीसारखी मी कायम उभीच
माझ्या पायांवर अल्लाद '…
उदा. कवितेत नामदेव
उदा. कवितेत नामदेव मांजरासारखा राहिला. उलटं फेका, सुलटं फेका; तो पायावरच पडणार.>>
मला वाटत रारने मांजराबद्दलचं हे सत्य पहिल्यांदाच वाचल. मी अनेक पुस्तकांमधून हे वाक्य आलटूनपालटून वाचल आहे. माझा रुममेट मला हे वाक्य खूपदा ऐकवायचा - I am like cat, I always land up on my feet!
समीर, नुसते लेख वर लेख न लिहिता इथे ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावर सुद्धा उत्तरे लिहा.
हर्ट, रार लहानपणापासून
हर्ट, रार लहानपणापासून माणसांच्या संगतीत राहिली नसेल, इतकी मांजरांच्या संगतीत राहिलीये. त्यामुळे ' रारने मांजराबद्दलचं हे सत्य पहिल्यांदाच वाचल" वगैरे स्टेटमेंट उगाच माहित नसलेल्या व्यक्तीबद्दल आणि त्या व्यक्तीच्या ज्ञानाबद्दल, वाचनाबद्दल करण्यात काय अर्थ आहे ?
ह्या लेखातून 'मांजराबद्दलचं सत्य समोर आलं' ह्याबद्दल 'जबरदस्त वाक्य आहे' असा अभिप्राय रारने नोंदवलेला नसून 'माहित असलेल्या सत्याच्या ह्या लेखात, ह्या कविच्या कवितेच्या बाबतीत किती समर्पक उपयोग केलाय ह्यासाठी 'जबरदस्त' हा शब्दप्रयोग केलेला आहे. वाक्य पूर्ण वाचलंत तर समजेल की मत मांजराबद्दल नसून ढसाळांच्या कवितेबद्दल आहे. परत एकदा तुमच्या रेफरन्ससाठी इथे लिहिते -
<<हे जबरदस्त वाक्य आहे सर्वार्थानं. ह्यात त्यांच्या कवितेबद्दल भक्कम मत मांडलं आहे, अतिशय कमी आणि मोजक्या शब्दांत. अप्रतिम.>>
भूईकमळ, येस. मलाहे ह्याच ओळी आठवल्या. मला फक्त खात्री नव्हती की या ओळी प्रज्ञा दया पवारांच्या आहेत की कविता महाजन ह्यांच्या. धन्यवाद.
तुला ते फार जबरदस्त वगैरे
तुला ते फार जबरदस्त वगैरे वाटले म्हणजे कन्टेक्स्टमधे जरी म्हंटले तरी ते फार साधे वाक्य आहे म्हणून मी तसे म्हंटले. तुला कमी लेखण्याचा उद्देश नव्हताच. तू ग्रेट आहेस हे सर्वांनाच इथे माहिती आहे.
मी लिहिलेले वाक्य तू असे वाच : मला वाटत रारने मांजराबद्दलचं हे सत्य कदाचित पहिल्यांदाच वाचल.
हर्ट, साधा सिंपल मुद्दा आहे.
हर्ट, साधा सिंपल मुद्दा आहे. मुळात मी ढसाळांच्या कवितेबद्दल, आणि या लेखाबद्दल 'मला काय वाटतं, काय आवडलं' यावर प्रतीक्रीया दिली होती. (भले ते साधं वाक्य असलं तरी ते आवडावं / नाही आवडावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. आणी साधं आवडूच नये की काय एकाद्याला ?)
तुला या लेखातलं काही आवडलं असेल, नावडलं असेल तर तू त्यावर तुझी प्रतिक्रीया लिही. तुला जर लेखातलं ते वाक्य साधं वाटालं असेल तर ते तू 'लेखावरच्या तुझ्या प्रतिक्रीयेमधे जरुर लिही. तसं न करता माझ्या प्रतिक्रीयेतलं काहीतरी वाक्य घेऊन, त्यावर मला काय समजलं असावं/ नसावं ह्यावर तू प्रति-प्रतिक्रीया देण्याचा संबंधच नव्हता इथे.
इथे आपण ढसाळ, त्यांच्या कविता , आडसुळ यांची मतं, की लेखकाची मतं ह्यांच्याबद्दल बोलतोय. इथे रार बद्दल बोलायची काही गरजच नव्हती.
आणी माझा लेख वाचून झालय. त्यात मला काय आवडलं, काय प्रश्न आहेत त्यावर मुद्दे मांडून झालेत. मुळात जिथे रार-बद्दल पर्सनली बोलायची गरजच नव्हती तिथे तू पहिल्यांदा <मला वाटत रारने मांजराबद्दलचं हे सत्य पहिल्यांदाच वाचल.> अशी कमेंट करणार आणि मग मी त्यावर उत्तर लिहिल्यावर <मी लिहिलेले वाक्य तू असे वाच : मला वाटत रारने मांजराबद्दलचं हे सत्य कदाचित पहिल्यांदाच वाचल.> असं परत येऊन मलाच सांगणार.
मूळ लेखाचा / चर्चेचा विषय बाजूला ठेवून ह्या असल्या पोस्टस, संवादाची काही गरज होती का/ आहे का ?
आणि उघडपणे सांगते - उद्या आयुष्यात खरंच माझ्याहातून काही उत्तम काम घडलं किंवा कोणी माझ्यावर लेख लिहिला - तर 'रार तू ग्रेट आहेत' ही तुझी प्रतिक्रीया वाचायला मला नक्की आवडेल.
अॅडमीन , मायबोलीवरच्या ' मूळ लेखावर प्रतिक्रीया न देता, केवळ कोणाच्यातरी प्रतीक्रीयेवर त्यातले काही शब्द घेऊन प्रतिक्रीया देण्याचं वाढलेलं प्रमाण प्रचंड अनॉइंग आहे.
रार तू उगाच माझी पोस्ट खूप
रार तू उगाच माझी पोस्ट खूप ताणते आहे. मी असे काहीच म्हंटले नाही की जेणेकरुन तुला इतके चिडायला व्हावे. इतके लांबलचक पोस्ट आणि प्रत्येक शब्दाशब्दावर शब्दच्छल करणे हे प्रकार प्रचंड वाढले आहे. अर्थाचा अनर्थ करायचा आणि स्पष्टीकरण दिले तरीही त्याचा अजून उलटसुलट अर्थ काढायचा.. किस पाडायचा. आणि उठसुठ अॅडमिनकडे धाव घ्यायची आपले चालते म्हणून . सॅड!!!!!
हा एक लेख सापडला.
हा एक लेख सापडला.
लेख वाचला.
लेख वाचला.
प्रतिसाद वाचताना रार यांचे म्हणणे पटले.
उत्कट लेख आहे. वेगळ्याच
उत्कट लेख आहे. वेगळ्याच व्यक्तीमत्वाची ओळख करुन देते . कमालीचे मनस्वी.
रार +१
Pages