म्हटले म्हणजे जीवन सुंदर असते कोठे

Submitted by -शाम on 31 May, 2016 - 02:40

सहज सरावे इतके सुखकर असते कोठे
म्हटले म्हणजे जीवन सुंदर असते कोठे

ती गणिते त्या व्याख्या कुठल्या कामी येती
जीवनभर ते पुस्तक नंतर असते कोठे

जगण्याचाही चॅनल डिजिटल झाला आहे
ती पूर्वीची प्रेमळ खरखर असते कोठे

पाउस पडला की मग तो मंदिरात येतो
नशिबामध्ये सगळ्यांच्या घर असते कोठे

धंदापाणी मित्रमंडळी नातीगोती
तूच एकटी निव्वळ मनभर असते कोठे

नाकीडोळी जरी तिच्या सारखे तरीही
आई इतके सुंदर कोणी असते कोठे

रोज जरी या दुनियेचा तिटकारा येतो
दुनियेवाचुन पण गत्यंतर असते कोठे

'शाम' कशाला गीता सांगत बसतो आता
कुणास पार्था इतके संगर असते कोठे

_______________________________ शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है शामराव ... किती दिवसांनी दिसता आहात.... पण अगदी वळवासारखे बरसलात.... हवाहवासा गारवाही आणलात आणि मृद्गंधही दरवळतो आहेच या रचनेतून .....

केवळ सुंदर रचना ...

फार फार आवडली

किती दिवसांनी दिसता आहात.... पण अगदी वळवासारखे बरसलात.... हवाहवासा गारवाही आणलात आणि मृद्गंधही दरवळतो आहेच या रचनेतून .....<<<< सहमत १००%

छानच!