युद्धपट

Submitted by आशुचँप on 30 May, 2016 - 18:12

युद्धपटांबद्दल आत्ता लिहावेसे वाटले आणि माबोवर याआधी काय काय लिखाण झाले आहे ते पाहले असता बरेच काही वाचनिय मिळाले. पण ते एकसलग नव्हते. या धाग्याचा उद्देश युद्धपटांची चर्चा, नविन काही आले असतील तर किंवा काही जुने क्लासिक्स, युद्धाचे डावपेच यावरही बोलता येईल.

मी गेल्या काहीवर्षात बरेच काही युद्धपट जमवले आहेत. त्यात डॉक्युमेंट्रीज आहेत, टीव्ही सिरीयल्स आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट, मध्ययुगीन कालातले काही, आणि अमेरिका-इराक. आयर्लंडमधली यादवी असे अनेक.

त्यानिमित्ताने युद्धपटांची आवड असलेले आपण एकत्र येऊ एखादा विकेंड सत्कारणी लाऊ शकतो.

बाकीच्यांनीही आपापले खजिने खुले करावेत.

पहिल्यांदा माहीतीपट

World at War - १९७३ मध्ये प्रसारित झालेल्या या माहीतीपटाचे तब्बल २६ भाग आहेत. यात हिटलर सत्तेवर येण्यापासून जपानवर अणूबॉब टाकून युद्धाची समाप्ती होईपर्यंत सर्व व्यापक घटनांचा समावेश आहे. यात त्या काळात झालेले ओरीजनल शूटींग आहेच, शिवाय तज्ञांची मते, त्यांचे विश्लेषणही सुंदर रित्या केले आहे. तेव्हाचा युरोप कसा होता याचे बरेच अधिकृत फुटेज बघायला मिळते यात. मस्ट वॉच.

Apocalypse Hitler - २०११ मध्ये प्रसारित झालेली फिल्म. हिटलरच्या जन्मापासून, त्याची लढाई, माइन काम्फ, सत्तेवर येणे आणि शेवटी त्याचा उदयास्त. यातही अनेक ओरीजनल फुटेज, हिटलरची भाषणे बघायला मिळतात. एक एक तासाचे असे दोन भाग आहेत.

WW1 apocalypse - पहिल्या महायुद्धावर हिस्टरी चॅनेलने बनवलेली अतिशय माहीतीपर सिरीज. टँक पासून, विमाने, विषारी धूर, खंदकातली लढाई याचे प्रभावी चित्रण. चार भागांची मालिका.

WW2 apocalypse - सहा भागांची मालिका, बऱ्यापैकी जमलीये पण पहिल्या महायुद्धाच्या मानाने तितकी माहीतीपर नाही.

Vietnam War - अमेरिका-विएतनाम युद्धावरची हिस्टरी चॅनेलची मालिका. दोन भागात. बरीच नविन माहीती कळाली या सिरीज मधून.

Battlefield - १९९४ मध्ये या माहीतीपटाची पहिली मालिका आली. त्यानंतर ठराविक कालानी २००२ पर्यंत असे सहा भाग रिलीज करण्यात आले. या मालिकेतही अनेक ओरीजनल क्लिपिंग्ज आहेत. पण क्वालीटी इतकी चांगली नाहीये. पण अनेक युद्धप्रसंग पाहता येतात.

हे झाले ओरीजनल माहीतीपट. आता काही नाट्यरुपांतर केलले माहीतपट वजा टीव्ही सिरीज.

band of brothers - युद्धपटांवरची सिरीज आणि त्यात बँड ऑफ ब्रदर्स नाही हे सर्वथा अशक्य. माझी सर्वात आवडती मालिका. कित्येक वेळा बघून झाली असेल.
सेव्हींग प्रायव्हेट रियान च्या उत्तुंग यशानंतर स्टीव्हन स्पीलबर्ग आणि टॉम हँक्स यांनी एचबीओ साठी केलेली ही निर्मिती कुठल्याही बिग बजेट चित्रपटाला मागे टाकेल. कलाकारांची निवड, फोटोग्राफी, व्हिजुअल इफेक्ट्स हे सगळेच इतके उच्च दर्जाचे आहे की कुठेही ती मालिका न वाटता १० भागांचा चित्रपट बघतो आहोत असेच वाटते. त्यात ज्यांच्यावर ती मालिका बेतलीये ते वृद्ध सैनिक त्यांच्या आठवणी सांगतात तो पार्टपण जमलाय.

इझी कंपनीच्या शूरवीरांनी दुसऱ्या महायुद्धात गाजवलेली कामगिरी, मेजर विंटर्स, सोबर्सच्या भुमिकेत फ्रेंड्समधला डेव्हीड श्विमर, त्यांचे ट्रेनिंग, पहिली लढाई, ते गोळ्यांचे सू...सू करत जाणारे आवाज, तोफांचा धडाका, अतिशय जीवंत चित्रण झाले आहे.

The Pacific - बँड ऑफ ब्रदर्स २००१ मध्ये रिलीज झाली, त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी अमेरिकेच्या पॅसिफिक युद्धावर आधारीत ही मालिका स्पीलबर्ग-हँक्स जोडीने आणली. मूळ स्वरूप जरी तसेच ठेवले असले तरी यात मुख्य भर मरीन्सचे आयुष्य दाखवणे होते. यातलेही यु्द्धाचे प्रसंग कमलीचे खरे वाटतात आणि ते जास्तीत जास्त अचूक असावेत यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे दाखवणारा एक भाग आहे. वादळी पावसात, अनोळखी जंगलात, दिवस दिवस चिखलात रुतून मार्गक्रमण करणाऱ्या मरीन्सनी किती सोसले असेल याची किमान कल्पना येण्यासाठी कलाकारांनाही तशा प्रकारचे वातावरण निर्माण करून त्यात ठेवण्यात आले. त्यामुळे या मालिकेला जो काही जिंवतपणा आलाय त्याला तोड नाही.

युजीन स्लेज, मेडल अॉफ अॉनर मिळालेला जॉन बॅसिलोन, रॉबर्ट लेकी या प्रमुख पात्रांभोवती ही मालिका फिरते. त्यात मग ग्वाडलकॅनाल, पेलेलू, ओकीनावा, आयवो जिमा युद्धे अनुषंगाने येतात.
त्यातला सर्वात जमलेला पार्ट म्हणजे शेवटचा. युद्ध संपल्यावर ही तरूण पिढी अक्षरश उध्वस्त होऊन गेलेली असते. वयाच्या २०-२२ मध्ये ज्या प्रकारचा नरसंहार, रक्तपात, पाहून निबर होऊन गेलेली मने आणि शिक्षण सोडून युद्धावर गेल्यामुळे कसलेही भविष्य नाही, पुढे काय करायचे याबाबत काहीही विचार नाही. असे एक दोन नव्हे तर हजारोंनी हे बेरोजागार तरूण म्हणजे युद्धाचे एक बळीच.
नंतर युजीनने लिहीलेले विथ द ओल्ड ब्रीड, आणि मूळचा वार्ताहर असलेल्या लेकीने हेल्मेट फॉर माय पिलो हे दोन्ही पुस्तकेही मिळवली. अजून ती वाचण्याचा योग आला नाहीये.

Generation War - जर्मन बँड ऑफ ब्रदर्स असे म्हणून ओळखली जाणारी ही मालिका २०१३ मध्ये प्रसारित झाली. असेही दुसऱ्या महायुद्धावरचे अनेक चित्रपट हे अमेरिकन हिरोंज भोवतीच घुटमळत राहतात. युरोपीय चित्रपटांमध्ये नाझींचे अत्याचार हा प्रमुख विषय असतो. पण याही पलिकडे इतिहासकारांनी लिहीले आहे की सगळेच जर्मन नाझी तत्वज्ञानाने भारले गेले नव्हते. जर्मन सैनिक हा अतिशय शूर, निर्भय, कणखर असा होता आणि आघाडीवर त्याने निधड्या छातीने शौर्य गाजवले आहे. नाझी पापकृत्यांबद्दल कित्येक सैनिकांना माहीतीही नव्हते. त्यामुळे जर्मन म्हणला की तो वांशिक अभिमानाने पछाडला गेला असणारा या गृहीतकाला ही मालिका छेद देते.
पाच मित्रांची ही कथा. त्यात दोन भाऊ आहेत, सैनिक, एक नर्स आहे, एक मॉडेल आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा घट्ट मित्र हा एक ज्यु आहे. हिटलरच्या वंशवादाशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. पण युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यांना असे वाटते आहे की युद्ध थोडक्या काळातच संपेल आणि आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन धमाल करू.

पण युद्ध लांबतच जाते, आणि त्यात प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते ते पाहून काटा येतो अंगावर.

========================================================================

ही मी माझ्याकडे असलेल्या चित्रपटांची यादी दिली आहे. सर्व चित्रपटांची प्रिंट चांगल्या दर्जाची आहे. काही तर परकीय भाषेतले आहेत, त्यांच्या सबटायटल्ससकट.

अजूनही बरीच वाढवता येणार आहे. आणि जसा वेळ मिळत जाईल तसा तसा इथेच त्या चित्रपटांची थोडक्यात ओळख देत जाईन. किंवा बाकी कुणाला त्याबद्दल लिहावेसे वाटत असेल तर यु आर वेलकम.

पहिल्या महायुद्धावरील चित्रपट

1. Forbidden Ground (2013)
2. Glory (1989)
3. Joyex Noel (2005)-

हा खऱ्या घटनेवर आधारीत चित्रपट डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. पहिल्या महायुद्धात खंदकाची लढाई लढली गेली. महीनोन महिने दोन्ही सैन्ये समोरा समोर युद्धसज्ज अवस्थेत. मध्येच गोळीबार, मध्येच शेलींग, कधी मागे सरकायचे कधी पुढे पण युद्ध स्टेलमेट अवस्थेतच.
अशातच १९१४ सालचा नाताळ येतो आणि एका आघाडीवरचे प्रमुख तात्पुरता तह करायचे ठरवतात. त्याप्रमाणे दोन्ही बाजू एकत्र येतात, नाताळ साजरा करतात, खेळतात, गळ्यात गळे घालून नाचतात. आणि रात्री हमसाहमशी रडतात. उद्या याच लोकांना आपण गोळ्या घालून मारणार आहोत याची भावना झाल्यामुळे.
जोपर्यंत शत्रु अज्ञात आहे तोपर्यंत आपल्या प्रमुखांनी दिलेली आज्ञा पाळताना हात थरथरत नाही, पण मित्रत्वाची भावना निर्माण झाल्यावर वैर संपते म्हणतात, तसेच झाले.
पण जर सैनिकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली सत्ताधीशांना थोडीच चालणार. या सैनिकांच्या रक्तातूनच त्यांची भव्य दिव्य साम्राज्ये उभी राहीली आहेत. असा एखादा मैत्रीचा प्रसंगही ते साम्राज्य ढासळून पडायला कारणीभूत ठरेल या भितीने ख्रिसमस तह करणाऱ्या सैनिकांवर कडक कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर कधाही कुठेही अशा प्रकारचा तह झाला नाही. पुढे विषारी वायू वापरण्यात आल्यानंतर उरले सुरले मित्रत्वही संपले आणि उरला फक्त सगळे काही करपवून टाकणारा विखार.

या अद्भुत घ़टनेवर Joyex Noel अर्थात मेरी ख्रिसमस हा फ्रेंच चित्रपट आहे. त्याचा शेवट तर अगदी टचिंग आहे.

4. The Trench (1999)
5. War Horse (2011)
6. All Quite on the Western Front

दुसऱ्या महायुद्धावरील चित्रपट

1. A Bridge too Far (1977)
2. Apocalypse Now (1979)
3. Back to 1942 (2012)
4. Das Boot (1985)
5. Defiance (2008)
6. Emperor (2012)
7. Flags of our fathers (2006)
8. Full Metal Jacket (1987)
9. Into The white (2012)
10. Inglorious Basterds (2009)
11. Katyn (2007)
12. Letter from Iwo Jima (2006)
13. Life is beautiful (1997)
14. Pearl Harbour (2001)
15. Platoon (1986)
16. Saints and Soldiers Airborne Creed (2012)
17. Stalingrad (1993 German)
18. Stalingrad (2013)
19. The Bridge on the river Kwai (1957)

या चित्रपटाबद्दल काय बोलावे. तब्बल सात अॅकडमी अॅवार्ड मिळालेला हा चित्रपट युद्धपटांमधले एक मानाचे पान आहे. जपानी कर्नल सायटो व ब्रिटिश कर्नल निकोल्सन यांच्यातील संघर्षाची ही कथा! बर्माच्या घनदाट जंगलात युद्धकैदी म्हणून आलेली ब्रिटीश तुकडी आणि त्यांना राबवून घेणारा खलनायक सायटो. ज्या पुलासाठी परफेक्शन आणण्यासाठी जीवाचे रान केले तोच पूल जेव्हा निकोल्सन उडवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय वाटते हे सांगता येत नाही.

20. The Great Escape (1963)
21. The Pianist (2002)
22. The Monuments men (2014)
23. The guns of navaron
24. Valkyrie (2008)
25. Where Eagles dare
26. Windtalkers (2002)
27. Enemy at the gates (2001)
28. Saving Private Ryan (1998)
29. Scihndler’s List (1993)
30. The Downfall (2004 German)
31. The thin red line (1998)
32. White Tiger (2012)
33. Fury (2014)
34. Saints and Soldiers, Void (2013)
35. The Boy in Stripped Pajamas
36. We Were Soldiers (2002)
37. Tae Guk Gi - Brotherhood of War (2005)
38. Warsaw 44 (2014)
39. 71 (2014)
40. Kajaki (2014)

इतर युद्धांवरील चित्रपट

1. Black Hawk Down
2. Green Zone
3. Lone Survivor
4. The Dirty Dozen
5. The Front line
6. The Hurt Locker
7. Behind Enemy Lines
8. Hotel Rwanda

मध्ययुगीन कालातील युद्धावरील चित्रपट

1. 300 (2006)
2. 300 Rise of an empire (2014)
3. Gladiator
4. Troy (2004)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हे .
नवर्याला आवड आहे , युद्धपटांची , त्याला सान्गेन ही लिस्ट .
मला स्वताला valkyrie आणि 'द लास्ट समुराई हे आवडतात . बाकी फार हाणामार्या , अंगावर येणारे चित्रपट बघवत नाही

@सोन्याबापू
ते ब्रिदवाक्य जवळपास सर्वच सैन्यदलांचे असेल. आपले शस्त्र सैनिक शत्रुपक्षांच्या हाती लावू नये. याची काळजी प्रत्येक देश घेत असतो.
त्या तुकडीला हुरुप देण्याचे काम त्यांचा कॅप्टन एवरसमॅन करतो सार्जन्टचे ऑपरेशनचा सीन उत्तम आहे. १७-१८ वर्षांची पोर असतात त्यांच्यावर ऑपरेशन ते ही गुंगीचे अथवा बधीर करण्याचे औषध न देता होत आहे या कल्पनेतुनच अंगावर काटा येतो.

एक-दोन महिन्यापूर्वी आलेला "Eye in the sky" मध्ये नव्या जमान्यातले युद्ध, जे कधी कधी प्रत्यक्ष युद्धभूमीवर नं जाताच लढले जाते आणि कधीकधी त्यातून निर्माण झालेले नैतिक प्रश्न ह्याचे मस्त चित्रण आहे.
आफ्रिकेतल्या एका छोट्याशा शहरात अतिरेकी आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत आहेत आणि हजारो किलोमीटर अंतरावरच्या एका अमेरिकी लष्करी तळावर अमेरिकन, ब्रिटीश आणि मित्र राष्ट्रांचे राजनैतिक अधिकारी ह्या अतिरेक्यांवर हवाई नजर ठेऊन आहेत आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यास सज्ज आहेत. अतिरेकी तळाच्या बाजूलाच असलेल्या एका ब्रेड विकणाऱ्या लहान मुलीच्या तिथे असण्याने नैतिक गोंधळ निर्माण होतो. छान उत्कंठावर्धक पद्धतीने मांडणी केलीय.

शेवटच्या सीनमध्ये लष्करी अधिकारी राजनैतिक अधिकार्‍याला म्हणतात "Don't tell a soldier cost of the war!"

>>band of brothers - युद्धपटांवरची सिरीज आणि त्यात बँड ऑफ ब्रदर्स नाही हे सर्वथा अशक्य. माझी सर्वात आवडती मालिका. कित्येक वेळा बघून झाली असेल.<<

सहमत. केवळ अफाट अशीच सिरिज आहे ही.
बाकी पण कित्येक चित्रपट पाहिलेत आणि या धाग्यामुळे नवीन रत्नं पण मिळालीत.

ब्रेव्ह हार्ट
लुई झेम्पेरिनी वरचा 'अनब्रोकन'
'एस्केप टू व्हिक्टरी' - यात जर्मन सैनिक विरुद्ध युद्धकैदी यांच्यात फूटबॉल सामना होतो अशी स्टोरी आहे. मायकल केन बरोबर बॉबी मूर आणि पेले हे फुटबॉलपटूही आहेत.
'द ग्रेट एस्केप' - युद्धकैद्यांवरचा आणि एक. हा गाजला होता. स्टीव्ह मॅक्क्वीन आहे.

येस सोन्याबापू few good men
सर्वात आवडता चित्रपट
पण त्यात युध्द दाखवले नाही म्हणून मी त्याचा उल्लेख केला नव्हता

Tom Cruise आणि jack nicholson यांची कोर्ट आर्गुमेंट जबरदस्त होती एक दमदार कोर्ट ड्रामा म्हणून पण उल्लेख होऊ शकतो

बाप्पू - फ्यु गुड मेनची तर ओरीजनल डीव्डी आहे माझ्याकडे. भन्नाट आहे, पण डायरेक्ट युद्ध न नसल्यामुळे या कॅटेगरीत धरला नाही मी.

इथे बरेच लोकांनी मस्त मस्त सजेशन्स दिलेत. आता एक एक शोधून अॅड करतो. माझे आता बरेच विकांत मस्त जाणार आहे. धन्य सर्वांना

मस्त लेख ! बरेचसे युध्दपट बघुन झाले आहेत. दुसर्‍या महायुध्दाचे सगळेच चित्रपट हे जेत्यांच्या बाजूनी लिहलयाने जर्मन सैन्याला अगदी बिनडोक किंवा अती क्रूर दाखवतात असे जाणवले आहे.

होय ते आलेच ओघाने.... म्हणूनच मी मध्ये लिहीले होते की आर्देन्समधुन मारलेली जर्मन सैन्याची मुसंडी आणि डंकर्कला केलेली ब्रिटीशांची कोंडी हा लढाईच्या डावपेचांमधला एक अप्रतिम नमुना आहे. पण त्याबद्दल कुठेही काहीही चित्रपट बनवलेला ऐकीवात नाही.

तिच गत क्रीट बेटाची. ज्या युद्धात खुद्द चर्चीलने जर्मन युवकांचे कौतुक केले आहे. प्रचंड निर्धाराने त्यांनी ते बेट काबीज केले. त्याबद्दलही नाही.

डेझर्ट फॉक्स रोमेल बद्दल नाही.

अगदीच नाही म्हणायला स्टॅलीनग्राड हा जर्मन सैन्याच्या बाजूने काढलेला एक चित्रपट. पण त्यातही जर्मन अधिकारी अतिक्रूर दाखवले आहेतच.

ज्युवरंच्या अत्याचाराचा जो काळा डाग या पराक्रमावर बसलाय तो कधीच धुतला जाण्यासारखा नसल्यामुळे असेलही कदाचित

आशुचँप, हटके विषयाबद्दल १०० गुण Happy
गन्स ऑफ नॅवरोन, व्हेअर इगल्स डेअर हे पुर्वीच कॉलेजच्या वयात चित्रपटगृहात पाहिलेले आहेत.
चर्चेत आलेली नावे हेडरमधे अ‍ॅड केली आहेत का ? नसतील तर कराच प्लिज.

पुलासाठी परफेक्शन आणण्यासाठी जीवाचे रान केले तोच पूल जेव्हा निकोल्सन उडवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय वाटते हे सांगता येत नाही.
>>>

र्ब्रिज ऑन रिव्हर क्वऑय मध्ये निकोल्सन स्वतः बाण्धलेला पूल उडवायचा निर्णय घेतो? मला तसे वाटत नाही. त्याचे मत असते युद्धे येतील आणि जातील पण ब्रिटीशांनी बांधलेले पूल लोक वापरतील आणि ब्रिटीशांचे नाव घेतील . हे खरे ब्रिटीश स्पिरिट आहे त्यामुळे तो ग्रुपमधल्या बंडखोर सहकार्‍यांशी पूल उडवण्याबद्दल मतभेद दर्शवतो. मग तो बंडखोर गट पळून जाऊन सिलोन मध्ये असलेल्या ब्रिटीश कँपमधून मदत मिळवून पूल उध्वस्त करण्यासाठी लपून छपून येतात व डायनामाईट्स लावतात . पुढे नक्की काय होते ते पडद्यावर पाहणे इष्ट.

बेनहर हा चित्रपट मी लहान असताना पाहिलंय.
युध्द चित्रपट म्हणता येईल का ते आता आठवत नाहीये, पण शर्यत जबरीच

>>होय ते आलेच ओघाने.... म्हणूनच मी मध्ये लिहीले होते की आर्देन्समधुन मारलेली जर्मन सैन्याची मुसंडी आणि डंकर्कला केलेली ब्रिटीशांची कोंडी हा लढाईच्या डावपेचांमधला एक अप्रतिम नमुना आहे. पण त्याबद्दल कुठेही काहीही चित्रपट बनवलेला ऐकीवात नाही. <<
आशुचँप, ख्रिस्थोफर नोलानचा पुढचा चित्रपट 'डंकर्क' आहे. Happy मस्ट वॉच मधे आधीच नोंदवून ठेवलाय.

http://www.imdb.com/title/tt5013056/

हो पण मला दा़ट शक्यता वाटते ती चर्चील प्रभृतींनी कसे आठ दिवसात साडेतीन लाख सैन्य डंकर्कमधून बाहेर काढले यावरच बेस्ड असेल. ऑपरेशन डायनॅमो हा ही एक अद्भुत प्रकार होता. डंकर्कला जर साडेतीन लाख दोस्त सैन्य हिटलरच्या पंजात गेले असते तर महायुद्धाला वेगळेच वळण लागले असते.

तर यात मॅनस्टीनचा व्यूह कितपत येईल मला शंकाच आहे

क्या बात है! माझा अत्यंत आवडता विषय.

बँड ऑफ ब्रदर्स कधीपासून विशलिस्टवर आहे. एक ना एक दिवस इथले न पाहिलेले समस्त सिनेमे/फिल्म्स मिळवून पाहणारच!

'ब्रिज ऑफ स्पाईज' - यात प्रत्यक्ष युद्ध नाही. पण युद्धाच्या पार्श्वभूमीविना या सिनेमाची कल्पनाच करू शकत नाही. या सिनेमात सर्व पात्रं जे आणि जसं वागतात त्यामागे युद्धाची भयकंपित करणारी काळी छाया / डोक्यावरची टांगती तलवारच कारणीभूत असते.

`नो मॅन्स लँड' म्हणजे `लगान'ला मागे टाकून ऑस्कर मिळवलेला ना?

आई शप्पथ! डंकर्क!!
जुलै-२०१७ मधे अमेरिकेत रिलीज होणार. लगेच आपल्याइथे येईल का? नाहीतर २०१८ पर्यंट वाट पहावी लागणार.

विजेता हा हिंदी सिनेमा या यादीत घेता येईल ...

..
..

पण आशूरावांच्या युध्दपट पात्रतेत हा येतो की नाही माहीत नाही

मी मुद्दामच हिंदी चित्रपट टाळले. खरे सांगायचे झाले तर बॉर्डर आणि काही प्रमाणात हकीकत हे सोडले तर आपल्याकडे युद्धपट असे काही नाहीच निघाले. एलओसी कारगिल म्हणजे नुसतीच कलाकारांची जंत्री, प्रत्येकाची लव्ह स्टोरी, अतिशय फिल्मी डायलॉग.

आणि त्यातही रियलिस्टीक किंवा सत्याच्या जवळ जाणारा चित्रपट आपल्याला वर्ज्य आहे. आपले युद्धपट म्हणजे फक्त देशप्रेमाचे उमाळे आणणारे याच गटात मोडतात.
मी फिल्म फेस्टीव्हलला एक रशियन चित्रपट पाहीला होता. त्यात महायुद्धानंतर जर्मनीने शेतात पेरलेले भुसुरुंग शोधून काढणाऱ्या पथकांची कहाणी घेतली होती. लहान मुले आणि बायका यांना या कामासाठी स्टॅलीनने राबवले होते. त्यात कित्येक जायबंदी होतात, मरतात.
आणि याचा राग येऊन एकजण स्टॅलीनचा फोटो टराटरा फाडते. जो प्रमुख असतो तो संमजस असतो आणि कुणाला न कळता तो पुन्हा तो फोटो आहे तसा चिकवटतो.

हे असे आपल्याकडे दाखवले गेले तर चालणार आहे का...किंवा स्टॅलिनग्राडमध्ये युद्धाच्या भितीने एका सैनिकाला कपड्यांतच शौचाला होते. असे भारतीय जवान दाखवून चालणार आहेत.

परत त्यात गाणी पाहीजेच, मसाला पाहिजे, रोमान्स पाहिजे, देखणे चेहरे पाहिजेत. या सगळ्याची भट्टी जमवून पुन्हा त्याला दर्जेदार युद्धपट बनवणे हे अशक्यप्राय वाटते.

विजेता हा मात्र चांगला चित्रपट होता. मला आ़वडलेला, पण तो नाहीच येत युद्धपटात.
तसा मग यहाँ पण एक चांगला होता. पण त्यातही युद्ध असे नव्हतेच.

मुळातच जागतिक युद्धाच्या कॅन्व्हास वर आपले भारत पाक, किंवा भारत चीन युद्ध चांगली कथानके द्यायला मर्यादा आणतात.
लक्ष्य मध्ये कारगिल युद्ध अगदीच तोंडी लावण्यापुरते होते. टँगो चार्ली जरा वेगळा पण नंतर अगदीच असह्य केला.

खरे तर वॉलॉंग एका युद्धकैद्याची बखर - यावर एक मस्त चित्रपट बनू शकतो. आणि माझी इच्छा आहे मराठीमध्येच बनावा.

आशुचॅम्प, आपल्या जुन्या संबंधांना स्मरून (आणि तुम्ही कदाचित विस्मरून!) मी तुमच्याकडच्या डीव्हीडीच्या कॉपी मागणार आहे. नाही दिल्या, तर गाठ आहे माझ्याशी!

हिंदुस्तान कि कसम हा एक मल्टिस्टारर होता '७१ च्या युद्धावर आधारीत. बहुतेक केतन आनंदचा, कारण प्रिया राजवंश आहे त्यात.

हाॅलिवुडचे काहि चांगले (वरच्या लिस्टमध्ये नसलेले)
१. दि लाॅंगेस्ट डे
२. पॅटन
३. झिरो डार्क थर्टि
४. बाॅर्न आॅन फोर्थ आॅफ जुलै
५. के-१९ दि विडोमेकर

आशुभाऊ आपल्याला प्रहार आवडतो बुआ नाना चा , खास करुन पहिला हाफ आवडतो! 'वेलकम जोकर्स' आहाहा काय ट्रेनिंग दाखवलंय त्यात लीडरशिप बूट कॅम्प , बेळगावचे!!

हेरपट जर युद्धपटात गणले जात असतील तर मी खालील २ सिनेमा आवर्जून पहा असे सुचवेल

१ टिंकर टेलर सोल्जर स्पाय

२ थ्री डेज ऑफ़ द कॉनडॉर

मी पाहिलेला नाही पण युद्धपट आहे असे वाटते.

https://en.wikipedia.org/wiki/Haqeeqat_(1964_film)

अन्य काही हिंदी चित्रपट
आँखे, हम दोनो, प्रेमपुजारी, इ. पण ते युद्धपट कमी आहेत.

Pages