'बुधवारा'तल्या 'रेडलाईट'मधली झुबेदा ......

Submitted by अजातशत्रू on 28 May, 2016 - 05:48

झुबेदा .....
रेडलाईटमधली अर्धीकच्ची झुबेदा एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून उभी असते तेंव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि पोपडे उडालेल्या भिंतीचा लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट, मोडकळीला आलेली कवाडे अन त्यावर खिळे बाहेर आलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात अधाशी पुरुषी चेहरयांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरी पासून ते सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे तिथे घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात..
झुबेदाला आता सारं सवयीचे झालेय,

फाटक्या वासाच्या गादीत सकाळी दहाएक वाजेपर्यंत झोपून देखील तिच्या बरगड्या ठणकत असतात,
रक्ताळलेल्या गालावर उमटलेले दात तिच्या गावीही नसतात,
गुंता झालेल्या केसांचा बुरखंडा तोंडाशी आला तरी तिला जाग कसली ती येत नाही.
शेजारच्या फळकुटातल्या पुनाम्माचा यार सकाळीच कुत्र्यागत तुडवत असतो तेंव्हाच्या
किंकाळ्यानी जाग येते.

कानतुटक्या कपातून चॉकलेटी वाफाळतं पाणी ती शून्यात नजर लावून पिते.
सकाळीच टीव्हीवर लागलेला एखादा जुनाट सिनेमा टक लावून बघत बसते.
नाश्तावाला अज्जू उप्पीट आणून तिच्यापाशी ठेवतो अन तिच्या हाताला हळूच शिवून जातो
तिचा सकाळचा हा पहिला अन एकच अलगद स्पर्श असतो.

शबनमदिदीच्या त्या खोलीत लटकणारया ढीगभर देवांच्या हार लागलेल्या तस्बिरींकडे
शून्यवत बघत ती न्हाणीत जाते,
कवाड पूर्ण न लावताच उघडी होते,
झाकायचं काय आणि कशासाठी असा तिचा यावर रोकडा सवाल असतो !

अंगाला हाती लागेल ते गुंडाळून ती पुन्हा त्या फाटक्या गादीवर येऊन पडते,
रंग विटून गेलेल्या छताकडे बघता बघता तिच्या डोळ्यांचा बर्फ होतो,
“अरी ओ झुबी, बैरी हो गई क्या तेरा गिऱ्हाक आया है” ही हाक,
तिची जेंव्हा तंद्री लागते तेंव्हाच तिला 'हाक' येते अन ती यंत्रवत आरशापुढे उभी राहते, नटमोगरी होते.

दुपारचे अन्न खाण्याआधी कोणीतरी येऊन तिला कुस्करून जातो
अन ती तशीच ओशट अंगाने बसल्या जागी जेवते,
कांताबाईने बनवलेल्या कसल्यातरी टमाटयाच्या रश्शात बोट बुडवत बसते.

चुन्नी तिला दुपारी तिच्या मोकळ्या पाठीवरून मायेने हात फिरवत सांगत असते,
“साईडवाली मरीनाला तिचा नवरा पुन्हा इथंच सोडून गेला
अन पुलिस येऊन मायाला घेऊन पेशगी म्हणून घेऊन गेलेत !
देख झुबी मर्दका भरोसा ना कर, दुनियाका सबसे कमीना जानवर मर्द है ! ” चुन्नीचं लॉजिक सुरूच असतं ...

आस्ते कदम पडक्या तोंडाने संध्याकाळ मयताचं सामान घेऊन यावं
तशी झुबेदाच्या पुढ्यात येऊन व्याकुळ होऊन उमलत जाते,
पुन्हा एकदा तिची अंघोळ होते, आरसा होतो,
चरबटलेल्या केसांवर अधाशी मोगरा नागवेटोळे घालून बसतो !

भकासलेल्या गल्ल्यांमध्ये आता पिवळे लाईट धगाटून गेलेले असतात,
ओघळलेल्या डोळ्यांनी वखवखल्या नजरा इकडून तिकडे फिरू लागतात.
सिगारेटी पिऊन डांबरागत राट ओठ झालेलेही कोवळ्या पाकळ्या शोधत फिरत असतात
अवजड,वेडावाकडा, खडबडीत देह कपड्यात लपवून लुसलुशीत मऊ मांसल देह हुडकत असतात
लूत भरलेले लेंडाचे गाडगे तोंडात धरावे तसे आपलाच माव्याचा थुंका गिळत फिरत असतात !

धुरकटलेल्या खिन्न पिवळ्या उजेडात झुबेदा रोज अशीच दाराशी उभी असते,
चटावलेल्या जिभा आत येत राहतात बाहेर जात राहतात,
उंबऱ्यावरच्या लाकडावर हागीमुतीने भरलेल्या चपला घासत जात येत राहतात.

त्या रात्री खिशातल्या पाकीटातील देवांच्या तसबिरीनाही ते आपल्याबरोबर घेऊन आत येतात,
नागवे होतात अन त्यांच्यातला दैत्य उफाळत राहतो,
चिंधाडलेल्या काटकुळ्या अंगावर आपलं बरबटलेलं शरीर घुसळत राहतात ...

झुबेदाच्या कातळलेल्या कमनीय देहाच्या प्रत्येक परिच्छेदावर तर
गीता, कुराण अन बायबल अशा सर्व धर्मग्रंथाच्या शब्दांचे अगणित वळ उठलेले असतात.

विस्कटलेली रात्र फुटक्या चंद्राला भगभग्त्या बल्बमध्ये असंच रोज बंदिस्त करून जात असते,
तेंव्हाच काळ्याकभिन्न आभाळातल्या चांदण्याचं बेट
तिच्या लुगड्यात उजेड शोधायला येतं अन कोनाड्यात बसून कण्हत राहतं !

झुबेदाला देवांचीही शिसारी आहे पण तिला दानवांचा रागही नाही, तिचे लॉजिकच वेगळे आहे !
तिला कुणाचा राग येत नाही, लोभ नाही, प्रेम नाही. काही नाही.
तिच्या कानातलं शिसं आतां काहीही ऐकलं तरी तापत नाही,
तिच्या डोळ्याला पाणीही येत नाही

मुडद्याचे आयुष्य जगता जगता कधी कधी ती जुन्या बचपनच्या गोष्टी सांगते,
अब्बू कसा इथं सोडून गेला अन दाल्ला पैसे घेऊन कसे पळून गेला ते सारं सारं सांगत राहते,

इथली घरे म्हणजे जिवंत स्त्रियांची चिरे निखळलेली भडक रंगातली थडगीच !
यातल्याच एका थडग्यात राहणारी झुबेदा जास्तीची पिल्यावर जे सांगते
ते एखाद्या फिलॉंसॉंफरपेक्षा भारी वाटते,
तिच्या मेंदूतल्या मुंग्या माझ्या शब्दशाईत कधी उतरतात काही समजत नाही !

मात्र माझ्याही पुरुषत्वाची तेंव्हा मला लाज वाटत राहते .... !

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2016/01/blog-post_10.html

 झुबेदा.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखात एका विशिष्ट वस्तीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यातल्या एका दिवसाचे वर्णन आहे. ते वर्णन वाचून आपण सुन्न होतो. असले आयुष्य जगणाऱ्या अभागी जीवासाठी आपण काहीही करू शकत नाही, निदान जवळ घेऊन मायेचा एक स्पर्श तिला द्यावा अशी इच्छा मनात येत असताना लेखाच्या खाली पहिली प्रतिक्रिया म्हणून ते वाक्य येते आणि आपल्या तोंडावरच आपटते. वाचल्यावर वाटते किती असंवेदनशील, क्रूर वाक्य आहे हे.

तुम्ही कोरड्या मनाने ह्यूमन ट्रॅफिकिंगची चर्चा करा, संख्याशास्त्राचे दावे मांडा आणि त्यात हे वाक्य घाला, अजिबात खटकणार नाही कारण सगळी चर्चाच मुळात कोरडी, रुक्ष, पोस्टमार्टेम करणारी असते. त्या जगातल्या कोण्या एकीच्या आयुष्यात त्या क्षणी काय चाललंय याला त्या चर्चेत जागा नसते, विषय कलेक्टिव्ह असतो.

या धंद्यात असलेल्या स्त्रियांच्या तोंडीही हे वाक्य वाचलंय. जिथे आयुष्यच नासलेय तिथे कोणी ह्या वाक्याचा आधार घेऊ इच्छित असेल तर घेऊदे. त्यातली व्यर्थता त्यांनाही माहितीय, आपण मुद्दाम ती का दाखवा आणि त्या मेलेल्या मनांना अजून मारा?

पण एका संवेदनशील चित्रणाखाली जेव्हा असे काही वाचायला मिळते तेव्हा भयानक राग येतो. या वाक्याखाली एक छुपे समर्थन दडलेय, स्त्रियांनी अशा नरकात राहण्याचे. समाजाबद्दल एवढे वाटतेय तर अशा उन्मत्त पुरुषांना वेसण घालायचे उपाय करा ना. त्यांना ठेवा वेगळे, नरक भोगूद्या त्यांनाही. हजारो वर्षे स्त्रियाच का हा नरक भोगताहेत?

आणि अशा वस्त्यामुळे आपल्या आयाबहिणी सुरक्षित राहात असतील तर उद्या काही कारणांनी इथली लोकसंख्या घटली तर ती परत वाढावी आणि आपली माणसे सुरक्षित राहावी यासाठी आपण हातभार लावणार आहोत काय?

भयानक आहे हे सगळे. हे वाक्य वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या चर्चेत खरे आणि योग्य असेलही. पण इथे ते वाक्य अयोग्य आहे.

साधना, निदान तुम्ही चर्चा घडेल अश्या शैलीत लिहिलेत तरी (जसे तुम्ही नेहमीच लिहिता). त्यामुळे काही वेळाने ह्यावर प्रतिसाद देईन.

साधना, संपुर्ण पोस्ट ला अनुमोदन..
ऐवढे सगळे मला तरी शब्दात मांडता आले नसते येणार नाही पण नेमके मानात हेच विचार आलेले ..फक्त असहम एवढेच लिहुन चुप राहने उचित वाटले त्यातुन लिहिणार्‍या व्यक्तिबद्दल प्रचंड आदर आहे व त्या व्यक्तिची खुप संवेदनशिल म्हणुन प्रतिमा मनात कोरलेली आहे..

साधना,

हे तुमचे दोन पॅरा कोट करत आहे.

>>>लेखात एका विशिष्ट वस्तीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यातल्या एका दिवसाचे वर्णन आहे. ते वर्णन वाचून आपण सुन्न होतो. असले आयुष्य जगणाऱ्या अभागी जीवासाठी आपण काहीही करू शकत नाही, निदान जवळ घेऊन मायेचा एक स्पर्श तिला द्यावा अशी इच्छा मनात येत असताना लेखाच्या खाली पहिली प्रतिक्रिया म्हणून ते वाक्य येते आणि आपल्या तोंडावरच आपटते. वाचल्यावर वाटते किती असंवेदनशील, क्रूर वाक्य आहे हे.

तुम्ही कोरड्या मनाने ह्यूमन ट्रॅफिकिंगची चर्चा करा, संख्याशास्त्राचे दावे मांडा आणि त्यात हे वाक्याची घाला, अजिबात खटकणार नाही कारण सगळी चर्चाच मुळात कोरडी, रुक्ष, पोस्टमार्टेम करणारी असते. त्या जगातल्या कोण्या एकीच्या आयुष्यात त्या क्षणी काय चाललंय याला त्या चर्चेत जागा नसते, विषय कलेक्टिव्ह असतो.<<<

ह्याचा अर्थ असा होतो की ते वाक्य बरोबर वाटते की नाही हे तुम्ही बाकीचे लेखन कश्यासंदर्भात आणि कसे आहे ह्यावर ठरवत आहात! ही सापेक्ष भूमिका पटत नाही. एक तर हे वाक्य खरे असेल किंवा खोटे असेल. 'अश्या अश्या पार्श्वभूमीवर लिहिले' तर अयोग्य आहे आणि 'रुक्ष चर्चा केली' तर योग्य आहे हे पटत नाही.

>>>पण एका संवेदनशील चित्रणाखाली जेव्हा असे काही वाचायला मिळते तेव्हा भयानक राग येतो.<<<

हे मूळ लेखाचे यश आहे साधना! थोडक्यात, हेच दिनेश ह्यांचे वाक्य तुम्हाला इतर रुक्ष लेखनाखाली चालले असते. ह्याचाच अर्थ त्या वाक्याबद्दल तुम्हाला नेमके काही म्हणायचे नसून ते येथे लिहिले गेले आहे ह्याबद्दल हरकत आहे.

>>>या वाक्याखाली एक छुपे समर्थन दडलेय, स्त्रियांनी अशा नरकात राहण्याचे. समाजाबद्दल एवढे वाटतेय तर अशा उन्मत्त पुरुषांना वेसण घालायचे उपाय करा ना. त्यांना ठेवा वेगळे, नरक भोगूद्या त्यांनाही. हजारो वर्षे स्त्रियाच का हा नरक भोगताहेत?<<<

ही वैयक्तीक मते आहेत. तसेच, ही एकंदर 'स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी' स्वरुपाची मतेही आहेत. स्त्रिया अन्यायग्रस्त आहेत आणि हजारो वर्षे आहेत ह्यात दुमत नाहीच. पण म्हणून हे वाक्य लिहिणारा माणूस एकदम स्त्रियांवर अन्याय करणार्‍यांपैकी कोणी आहे अश्या अर्थाचा प्रतिसाद पटत नाही.

झुबेदाबद्दल वाईट वाटणे, त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य वाचणे (स्वतंत्ररीत्या न वाचणे) आणि मग त्या वाक्याचे असे 'लिंक्ड' मूल्यमापन करणे हे योग्य होईल का?

मला ह्या वाक्याबद्दल काय वाटले ते मी माझ्या मूळ प्रतिक्रियेत लिहिलेले आणि परत वरच्या प्रतिक्रियेत शेवटच्या दोन परिचछेदात लिहिले. तुम्ही आणि महेश यांनी हे वाक्य योग्य नसले तरी खरे आहे असे जे लिहिले त्याला उद्देशून मी वरील प्रतिक्रियेतले पहिले तीन परिच्छेद लिहिले. याउप्पर माझ्या प्रतिक्रियेतली सेलेक्टिव्ह वाक्य उचलून मला हे चालते आणि ते चालते असे निष्कर्ष काढायचे असतील तर मी काही करू शकत नाही कारण हा पब्लिक फोरम आहे. मला जे बोलायचे ते बोलून झाल्याने आता प्रतिवाद करण्यात रस नाही आणि या विषयावर परत परत तेच मुद्दे काढून प्रतिवाद करणे म्हणजे शेळी गेली जिवानीशी, खाणारी म्हणतो वातड कशी असे आहे.

रच्याकने, मूळ वाक्य लिहिणाऱ्या दिनेशदाविरोधात मी काहीही लिहिलेले नाही. मुळात हे वाक्य त्यांचे स्वतःचे नाही. फक्त त्यांनी ते जिथे लिहिले ती जागा अयोग्य हेमावैम आणि त्यासमर्थनार्थ मी जे लिहिले ते वर आलेय.

मला माहित नाही कारण ते कोण्या प्रसिद्ध व्यक्तीची प्रसिद्ध वाक्ये या टाईपचे वाक्य नाही तर या विषयांवर जे स्टॉक लेख, मुलाखती येतात त्यात भरपूर वेळा quote केलेले वाचलेय.

दिनेशदांनी कोट केलेले वाक्य अनेक ठिकाणी मी ऐकलेले आहे. मी त्या विधानाशी सहमत आहे. बेफिकिर यांनी त्याचे केलेले विश्लेषण ही मला अगदी पटते. तुम्ही त्या विधानाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पहाता यावर ते अवलंबून आहे. निचरा होण्याची सोय नसेल तर अजूनच अनागोंदी माजेल. कामातुराणां न भयं न लज्जा। हा प्रश्न समाजाच्या लैंगिक व्यवस्थापनाचा आहे.

भितीदायक आहे.
'समाजात त्या आहेत म्हणून गरत्या पोरी बाळी सुरक्षित' वगैरे सर्व विशफुल थिंकिंग आहे. ज्याचं शोषण सहज करता येतं त्याचं शोषण होतं.
बरेचदा अपकृत्ये करणारे लोक पैसे मोजून हे सर्व मिळेल अश्या वर्गातले असतात. कोणाच्या हालात कोणाला आसुरी आनंद मिळेल सांगता येत नाही.
त्यातल्या त्यात शोषण सहज करता येईल असा वर्ग कमी करणे, जिथे शक्य तिथे असा वर्ग बनूच नये हे प्रयत्न करणे इतकंच आपल्या हातात.

या वर्षी दिवाळीत मी भाउबीज म्हणून वेश्यांना एक देणे देउ इच्छित होतो. त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत अशी प्रतिक्रिया मीही एके ठिकाणी दिली होती तर काहींना ती असंवेदनशील वाटली होती. जर कर्वेसंस्थेत भाउबीज दिली जाते तर वेश्यांना भाउबीज का देउ नये? मी यावेळी सहेली या पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी काम करणार्‍या संस्थेस भाउबीज दिली. वेश्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. माझा मित्र उत्पल व बा. याचे कडून बॅंक डिटेल्स घेतले.त्याने त्याच्या फेबु वॉलवर पुर्वी आवाहन केले होते.

उत्पल व बा हे मिळून सार्‍याजणी चे कार्यकारी संपादक आहेत सहेली' सेक्स वर्कर्स कलेक्टिव्हतर्फे पुण्यातील बुधवार पेठ वेश्यावस्तीत लॉकडाउनच्या काळात मदत कार्य सुरू केले होते. या कामात आर्थिक वा अन्य प्रकारे मदत करायची असल्यास sahelisangha@gmail.com किंवा utpalvb@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क करावा. मी आर्थिक मदत न करता रक्कम आत्ता दिवाळी च्या वेळी भाउबीज म्हणून दिली. Name of account holder-Saheli HIV AIDS Karyakarta Sangh

Bank Address (Branch)-Bank of Baroda,0448 laxmi Road, 181,Budhawar Peth, Ganpati chowk PIN 411002

Account Number( Saving Account) -- 04480100005412

RTGS No-- BARB0POOCTY

( Please note the fifth character is ZERO and not the alphabet 'O')

Swift Code-BARBINBB PCB
आपल्यालाही भाउबीज ही कल्पना आवडली तर आपण देउ शकता. दिल्यावर उत्पल ला जर वॉट्सप नं 9850677875 वर कळवले तर सोयीचे होईल.

हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.≥>>>>>>>>

असली विधाने वाचली कि भयानक राग येतो. इथे कोणीही सुरक्षित नाहीय आणि याचे कारण नालायक आणि घाणेरडी पुरुषी मानसिकता आहे. एवढा मोठा, अंगावर काटा उभा करणारा लेख वाचल्यावर सुद्धा असले विधान केले गेले याचे आश्चर्य आणि राग आलाय. Angry तिथे जाणार्या पुरुषांना जर तिथे गेले नसते तर थेट मृत्युनेच गाठले असते तर कदाचित...कदाचित मी हे वाक्य वाचू शकले असते पण तिथे कोणी पुरुष मजबुरी म्हणून जात नाहीय. त्या बायका आहेत म्हणून इतरत्र होणारे बलात्कार थांबले असते तर कदाचित मी हे वाक्य एक अंदाज म्हणून स्वीकारू शकले असते. पण दुर्दैव...<<<<<<अगदी बरोबर ...मानसिकता हेच कारण आहे.. आणि ते वेश्यावस्ती असल्याने बदलत नाही

लैंगिकतेचे शमन की दमन?
लैंगिकतेचे शमन हवेच
लोकस्त्ता चतुरंग ५ जाने २०१३ आणी लोकसत्ता चतुरंग १२ जाने २०१३ मधील मंगला सामंत यांचे लेख जरुर वाचावेत. समाजाच्या लैंगिक व्यवस्थापनाची नव्याने विचार करण्याची गरज आहे. मानवी लैंगिक प्रेरणा व वर्तन हा एक वेगळाच विषय आहे.

मला एक प्रश्न अजून पडतो कि या स्त्रियांना जर सरकारने वा सामाजिक संस्थांनी रोजगाराची हमी दिली वा अन्य रोजगाराचा पर्याय दिला तर त्या हा व्यवसाय सोडून द्यायला सहज तयार होतील का? झाल्या तर किती होतील?

Pages