'शेवंता' - हुरहूर लावणारी मधाळ गोष्ट .....

Submitted by अजातशत्रू on 26 May, 2016 - 22:17

शेवंता तेलीण म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर तिच्या केळीच्या खोडासारख्या तराट गोरयापान पिंडरयाकडे जादू झाल्यागत नजर जाणारच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. तिच्या काजळ घातलेल्या पाणीदार मोसोळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर माळ्याच्या बाया लावायच्या तसा आडवा रेषेचा अन गोलाकार गंध असायचा. तिच्या उभट चेहऱ्याला तो फारच खुलून दिसायचा. कानातले लांब झुबे सतत डुलत रहायचे.ओठाच्या पाकळ्या उघडल्या की आतले पांढरे शुभ्र मोगरयाच्या कळ्यासारखे दात अजूनच बेचैन करून टाकत. क्वचित कधी केस मोकळे सोडलेले दिसले तर ती अजूनच जालीम दिसायची. तिने बहुतांशी सैलसर अंबाडा बांधलेला असायचा अन त्यात कधी तरी एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात एक मोहनमाळ अन काळ्याकुट्ट मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीला लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या मोठ्या गळ्यावर अशी काही रूळायची की बघणारा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्याने गच्च दंडावर बांधलेला काळा दोरा अन त्यात बांधलेली बारीक काळपट पितळी पेटी अजूनच आवळ वाटायची. तिच्या गुटगुटीत हाताला देखील काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला कंबरेलगत बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की त्याने तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लाल बारीक वळ कधी कधी दिसायचे. तिंच सारं अंग अंग गाभूळल्या चिंचेसारखे होते, बघणारयाच्या तोंडालाच पाणीच काय लाळ सुटायची.

वेशीबाहेर गावकुसाच्या उजव्या अंगाला असणारया आमराईत केकताडाच्या कोपरयात तिचे खोपटवजा घर होते. लिंबाच्या आढ्यावर माळवद अन एकाला आड एक अशा दोन खोल्या. आजूबाजूला फुलांची झाडे. अंगण सदा लख्ख सारवलेले. रांगोळी काढलेली अन घरात कसला तरी तरतरीत वास असायचा. दरवाजे नेहमी अर्धउघडे. तिच्या अंगणात तुळससुद्धा होती. कधी कधी सकाळी तिच्या घरातून घंटी वाजवल्याचा आवाज यायचा. तिच्या घराकडे जाणारी एक पायवाट आमराईतून दिसायची. आजूबाजूच्या गावातली अन आमच्या गावातली काही माणसं अधून मधून तिथे घुटळायची, गुळाच्या ढेपेवर असणारया माशागत ती तिथच मागपुढ फिरायची. दिवसा क्वचितच कुणीतरी तिच्या घरात आतबाहेर करायचा, पण अंधारून आल्यावर मात्र तिच्या घराभोवती चोरून जाणारा कोणी ना कोणी असायचा. पण या सारयाना अपवाद होता बापू रावताचा. बापू राऊत. खात्या पित्या घराचा, घरी बायका पोर असलेला गडी सदानकदा तिच्या अंगणात पडलेला असायचा. खाटकाच्या दुकानापुढे एखादे हडकुळे कुत्रे बसलेले असावे तसा तो तिथे असायचा. बिड्या ओढून ओढून अन 'नवसागराची' पिऊन पिऊन त्याच्या अंगाचे पार चिपाड झालेले. मळके धोतर अन पिवळट सदरा, डोईवर तेलकटलेली टोपी अशा वेशात तो तिथं आंदण दिल्यागत पडून असायचा.

शेवंतीच्या घरी वाण्याचा म्हातारा गडी किराणा माल घेऊन आला की आशाळभूत नजरेने तिला न्याहळत बसायचा.तिची प्रत्येक हालचाल अधाशागात बघत रहायचा. तिच्या हातचा चहा घेऊपर्यंत तिथून हलत नसायचा. जाताना पैसे देण्यासाठी तिने पोलक्यात घातला की याचाच जीव खालीवर व्हायचा तेंव्हा बापू राऊत त्याच्यावर खेकसायचा. कधी कधी कापडी गोणीत साड्या घेऊन तिच्याघरी तालुक्याहून काही व्यापारी यायचे. काही वांड पोरे तिला काही चीज वस्तू आणून देत असत. तिचा आवाज देखील तिच्याच सारखा मधाळ होता. तिने काही गुणगुणले तरी कानाला गोड लागायचे.

अलीकडील काही दिवसात अण्णा पवारांचा गजा रात्री अपरात्री तिच्या घराभोवती येऊ लागला होता. गजा म्हंजे नुकतेच मिसरूड फुटलेला तरण्याबांड देखणा पोर. लालबुंद रंगाचा अन पिळदार अंगाचा गजा हा अण्णा पवाराचा धाकला पोर. यानंतर पुढच्या एक दोन दिवसात अण्णाच्या कानात कुजुबुज झाली अन त्यांनी गजाला जित्राबाच्या चाबकाने सोलून काढला. इस्तवाच्या डोळ्याचा अण्णा पवार हा अगदी कडक अन रग्गील होता. त्याने या आधीपण शेवन्तेला लांब हाकलून देण्याचे प्रयत्न खूप केले होते पण रंगेल सरपंच अन टग्या पाटलाच्या पुढे त्यांचे काही चालले नाही. दोनेक दिवसांनी त्यांनी गजेंद्र म्हणजे गजाला शिकायला म्हणून त्यांच्या बहिणीकडे शहरात लांब पाठवले. तसे बघितले तर गजा अन शेवंता यांच्यात दहाएक वर्षांचे तरी अंतर होते, त्यांच्यात तसे काही वेगळे नाते निर्माण होईल अशी कुठली चिन्हे नव्हती. पण अण्णाच्या करारी स्वभावापुढे कोणाचे काही चालले नाही.

गजा गावातून गेला तसा शेवंतीचा चेहरा फिक्कट पडला. कितीएक दिवस गेले अन एका मध्यरात्री बापू राव्ताची बायको तिच्या न्हात्याधुत्या झालेल्या तीन पोरी अन लहानगा पोरगा घेऊन तिच्या घरी आली. शेवंताच्या घरात तिच्या रडण्याचा आवाज बराच वेळ येत होता. काही वेळाने पदराने डोळे पुसत ती माऊली घराबाहेर पडली अन जाताना शेवंतीच्या अंगणात पडलेल्या आपल्या नवरयाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. ती रडताना शेवंतीचे डोळे सुद्धा डबडबले. त्या घटनेनंतर दोनच दिवसात शेवंता घर सोडून गेल्याची बातमी गावभर झाली अन गावतल्या बायका तिची खुल्याने चर्चा करू लागल्या. शेवंता वेस ओलांडून गावात कधीच येत नसायची. अपवाद फक्त वर्षातला एकच दिवस, नवरात्रीतल्या सहाव्या किंवा सातव्या माळेला ती गावात देवीला दर्शनाला यायची. देवीची खणा नारळाने ओटी भरून जायची. त्या दिवशी डोईवरून पदर घेतलेली अन खाली नजर ठेऊन हळूच चालत जाणारी शेवंता बघितली की सारे जन विस्फारून तिच्याकडे बघत, याला बायका देखील अपवाद नसत. तिने लावलेले अत्तर, तिने घातलेली साडी चोळी अन तिच्या दाग दागिन्या विषयी बायकांच्या पाणवठ्यावरल्या गप्पा पान रंगाव्या तशा रंगत.

अशीच काही वर्षे अबोल गेली. एके दिवशी पवारांचा गजा गावात परत आला.त्याची पार रया गेली होती, "शिक्षण काय झालं नाय पण प्वार वाया गेला" असं गावातली माणसं त्यांच्याकडे बघून बोलू लागली. डोक्यावर परिणाम झालेलं ते तरणेताठे पोर सदा मळ्यात एकांतात राहू लागले. त्याच्याकडे बघवत नव्हते. इकडे शेवंतीचे अंगण भकास झाले होते. सारया पडवीत पाला पाचोळा साठला होता. फुलझाडे जळून गेली होती त्यांची वठलेली काडी कामटी शिल्लक होती. तिच्या अंगणातले लिंबाचे झाड देखील निष्पर्ण होऊन गेले होते. मागे दाट केकताड झाले होते. ती गेल्या पासून आमराईला बहर तो कसला आलाच नव्हता. मधल्या काळात बापू रावताच्या तिन्ही पोरींचे लग्न उरकले. त्याची शिल्लक जमीन आता त्याची बायको अन नुकताच हिरवा होऊ लागलेला त्याचा पोरगा कसत होते. बापू रावताने मात्र अंथरून धरले होते.

वैशाखाच्या एका धगधगत्या दुपारी अण्णांच्या गजाने त्यांच्या वस्तीतल्या लिंबाच्याच झाडाला गळफास लावून जीव दिला अन सारे गाव हळहळला. त्याच्या बहिणींच्या आणि आईच्या आक्रोशाने सारी सृष्टी जणू बधिरच झाली. त्याचे क्रियाकर्म झाले अन लोकांना त्याचा विसर पडला.

पण पुढच्याच चांदपुनवेला रात्री शेवन्तेच्या अंगणात लगबग दिसली. ती परत आली होती. आल्यावर तिने सारे अंगण काही साफ केले नाही, थोडासा पाला पाचोळा सांदाडीत लोटला. सकाळ झाली. गावभर बातमी झाली, 'शेवंता परत आली'. ती आली खरी पण तिचे चैतन्य हरवले होते, तिचा जोशही ओसरला होता. काया पिवळट पडली होती. ती आल्या दिवसाच्या दुपारी वाण्याने तिच्या घरी नवीन गडी धाडला. तो घरी आला , पण नेहमी अर्धे असणारया दाराची कवाडे पूर्ण बंद होती. त्याने तिच्या नावाच्या हाळया दिल्या. बरयाच वेळाने किंचित दार किलकिले झाले. तिने आतूनच 'किराणा सामान नको असल्याचे' त्याला सांगितले.तो हात हलवत अन निराश होऊन गावात परत आला. शेवंतीला बघता न आल्याची खंत त्याच्या पोरसवदा चेहऱ्यावर स्पष्ट होती.

तो दिवस फार जड गेला. सूर्य लवकर मावळलाच नाही. अखेर रात्र झाली. शेवंतीच्या घरात बारीक तेवत असलेला कंदील हळूहळू धुसर झाला. भल्या पहाटे मात्र आमराईत आवाजाचा गलका उठला. शेवंतीचे घर पेटले होते. तिच्या अंगणातला निष्पर्ण लिंब धडाडून पेटला होता. सारा पाला पाचोळा रणरणला होता. काही वेळातच तिच्या घराच्या आढ्याचे वासे पेटले अन धाब्यासह तिचे खोपट कोसळले,. सारया आसमंतात धूर,धुराळा उडाला. तिच्या घराजवळ दूरवर कोणाचीही वस्ती नसल्याने विझवायला लगेच पाणी मिळाले नाही अन सारे होत्याचे नव्हते झाले. आरसपानी अंगाची शेवंता त्या धगीत राख होऊन गेली पण तिच्या ओरडण्याचा साधा आवाज देखील आला नाही. दुसरया दिवशी बापू रावताच्याच पोराने तिच्या आधीच जळालेल्या देहाला अग्नी दिला अन ती मुक्त झाली.

आता किती तरी दिवस लोटलेत. तिची ती जळालेली ओसरी आता अगदीच भयाण झालीय. तिकडे आता कोणी कोणी फिरकत देखील नाही. मला मात्र कधी कधी त्या आमराईच्या कोपरयात डबडबलेल्या डोळ्याने उभा असलेला गजा दिसतो तर कधी करपलेल्या नजरेने डोळ्यात पाणी आणून कोणाची तरी वाट पाहत उभी असणारी रडवेली शेवंता दिसते. मी कावरा बावरा होतो अन डोळे पुसत तिथून घरी परत येतो. मी लहान असताना तिने मला शेताला जाताना बोलावून घेऊन रुमालात बांधून दिलेली गोड शेवकांडी किती तरी दिवस मी घरात कुणालाही न दाखवता लपवून ठेवली होती. अजूनही मला त्या रुमालाला तिच्या हाताचा हवाहवासा वाटणारा वास येतो.

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2015/04/blog-post.html

Indian_women_paintings_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट Happy

बापू राव्ताची बायको का रडली? शेवंता मध्येच कुठे गेली? काहीतरी अर्धवट वाटतंय.

तुमच शेवन्ताच वर्णन फोटोला म्याच होत नाहीये.

लेखनशैली आवडली .