पालखी घेऊन ये

Submitted by वैवकु रीटर्न्स on 24 May, 2016 - 05:58

गझल :

मान्य आहे हे मला की व्हायचे ते व्हायचे
पण तरी जन्मात एका मी किती सोसायचे

झगमगाटाला भुलत मी हाट अख्खा पाहिला
आणि आता विसरलो की काय होते घ्यायचे

तू कधी कोणाकडे केलीस का माझी स्तुती
मी तुझ्याबद्दल कशाला चांगले बोलायचे

वाट ही साधी सरळ पण प्रश्न पडतो सारखा
ह्या दिशेला जायचे की त्या दिशेला जायचे

कोण माझे कोण परके हे शिकू शकलो न मी
लोक माझ्या भावनांची छान 'शाळा' घ्यायचे

तूच आता पालखी घेऊन ये माझ्या घरी
मंदिरामध्ये मला नाही तुला भेटायचे

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झगमगाटाला भुलत मी हाट अख्खा पाहिला
आणि आता विसरलो की काय होते घ्यायचे

वाट ही साधी सरळ पण प्रश्न पडतो सारखा
ह्या दिशेला जायचे की त्या दिशेला जायचे

तूच आता पालखी घेऊन ये माझ्या घरी
मंदिरामध्ये मला नाही तुला भेटायचे

वरील शेर सुरेख.

ह्या दिशेला जायचे की त्या दिशेला जायचे >>>>>>.
........हेम्लेटच्या ...... टू बी ओर नॉट तू बी ..... ची आठवण झाली !! ....एकन्दरीत मस्त !!