झटपट मेक्सिकन

Submitted by मेधा on 16 February, 2009 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

गेल्या शुक्रवारी माझी अगदी नायजेला किंवा रेचल रे सारखी परिस्थिती झाली. ऑफिसमधून येता येता एक मित्र-मैत्रिण अन त्यांची दोन मुलं जेवायला येणार असल्याचं कळलं. घरात तयार पदार्थ काहीही नव्हते. जवळच्या पिझ्झा वाल्याने घरपोच पिझ्झा पाठवणे बंद केलंय. आता काय करावे म्हणून पँट्रीत खुडबूड करत होते. तर ब्लॅक बीन्सचा एक कॅन दिसला. त्याच्याच मागे एक चिपोटले मिरच्यांचा कॅन दिसला. मग त्या दोन कॅन्सच्या आधारे हे प्रकार केले.

साहित्य
ब्लॅक बीन्स चा कॅन १६ औंसाचा
चिकन चे ब्रेस्ट / थाय पीसेस ३-४
४ कांदे
४ टोमॅटो ( किंवा एक क्रश्ड टोमॅटो चा कॅन)
एक कॅन चिपोटले इन अडोबो सॉस
कॉर्न टोर्टिया - माणशी १०-१२
तांदूळ २ कप
तेल, व्हिनेगर, सुका ओरेगानो, अडोबो सिझनिंग ( नसल्यास काही अडत नाही )
लसूण -३-४ पाकळ्या
भोपळी मिरची १ ( किंवा सेलरी पण चालेल )- मध्यम डाइस करुन घ्यावी

क्रमवार पाककृती: 

चिकनचे तुकडे बुडतील एवढं थंड पाणी एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून, त्यात चिकन व अर्धा कप बारीक उभा चिरलेला कांदा घालून शिजत लावावे. ( फ्रोझन चिकन असेल तरी चालतंय )
एखादं तेज पान घालावं.

२ कप तांदळाचा भात करून घ्यावा.
उरलेला कांदा उभा पातळ चिरावा.
लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा .
टोमॅटॉ बारीक चिरून घ्यावे.

ब्लॅक बीन्स सूप साठी
एका पातेल्यात २-३ टे स्पून तेल घालून ( ऑलिव्ह ऑइल चालतंय ) त्यावर २ पाकळ्या एवढा लसूण घालावा. मिनिटभरात एक कप बारीक उभा चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून त्यावर फुगी मिरची घालावी. थोडं परतून त्यावर ओरेगानो ( १ टी स्पून ) , अडोबो सीझनिंग ( १ टी स्पून ) घालावे. १-२ टे स्पून व्हिनेगर घालावा व ब्लॅक बीन्स त्यात ओतावेत. थोडं पाणी घालावं. चवी पुरतं मीठ घालून उकळू द्यावं. उकळी आल्यावर मंद आचे वर ८-१० मिनिटे ठेवावं.

चिकन टिंगा साठी
एका जाड बुडाच्या पातेल्यात २-३ टे स्पून तेलावर उरलेला लसूण थोडा परतावा. त्यावर १ कप बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा मऊ झाला की टोमॅटो घालावे व कॅन मधल्या २-३ चिपोटले मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. त्याच कॅन मधला रस पण २-३ चमचे घालावा. मिश्रण मिळून येईपर्यंत चिकन शिजेल. त्याचे स्किन/ हाडे काढून छोटे छोटे तुकडे करावेत ( श्रेडेड चिकन तयार असेल तर साधारण दोन कप लागेल ).
ते चिकनचे तुकडे घालून मीठ घालून सगळं मिश्रण मंद गॅसवर शिजू द्यावं १०-१२ मिनिटं.

अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर , मीठ हे कालवून ठेवावे. हौशी मंडळींनी अर्धी हाबनेरो मिरची बारीक चिरून टाकायला हरकत् नाही.

वाढताना एका सुप बाउल मधे थोडा भात घालावा. त्यावर ब्लॅक बीन्स वाढून त्यावर थोडे कॉर्न चिप्स कुस्करून घालावेत.

टाकोज तव्यावर थोडे गरम करून
प्रत्येक टाकोवर चिकन चे मिश्रण, कांदा व आवडत असल्यास थोडे मेक्सिकन चीझ किंवा कुठेलेही व्हाईट चीझ किसून घालावे.

सोबत प्यायला
उंच बीअर ग्लास मधे एक-२ टेस्पून लाइम जूस ( लेमन नव्हे ) , १/२ टी स्पून मीठ घालून त्यावर कुठलीही लाईट बीअर हळू हळू ओतावी - याला मिचेलाडा म्हणतात . कुठल्याही तिखट पदार्थाबरोबर एकदम मस्त !

वाढणी/प्रमाण: 
४-५ मोठी माणसे
माहितीचा स्रोत: 
मैत्रिण - टिंगा करता , वेब - ब्लॅक बीन्स करता, मित्र- मिचेलाडा करता.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू, रेसिपी कसली, कशी आहे हे सगळं सोडून दिले. पण ते "( ऑ ऑ चालतंय )" हे जबरी आहे. किती हसले ते मी मोजले नाही. लोळायची बाकी होते.. माबो वर सारखी येत नाही हल्ली मी त्यामुळे हा इथला प्रचारातला शॉर्टफॉर्म असला तर कल्पना नाही पण खल्लास ! :))
रागावू नये.
रेसिपी एक नवी कळली.. अगदी बीअरची सुद्धा!

शोनू, एवढं नको गं मनावर घेऊस.. मी गमतीनं म्हटलं.. पहिल्यांदाच वाचलं म्हणून..