गरीब श्रीमंत!

Submitted by झुलेलाल on 15 May, 2016 - 03:29

परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही.
तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली.
आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते.
साहेब, हे कपडे कचऱ्यात नका टाकू... मी घेऊन जातो, माझी पोरं वापरतील. मलाही कामाला येईल'... तो म्हणाला.
'हे कपडे तुम्ही वापरणार?' मी थोडासा खजिल होऊन त्याला विचारलं,आणि त्यानं अंगातला शर्ट वर उचलला.
सुतळीनं कमरेभोवती गच्च आवळलेली, मापाशी पुरती विसंगत पँट त्यानं घातली होती.
'साहेब, माजी पोरं खुश होतील हे कपडे बघून!'... कचऱ्याच्या पिशवीतले कपडे काढून त्याच्या नीट घड्या घालत केविलवाणं हसत तो म्हणाला, आणि बॉक्स खांद्यावर घेऊन हातातली कचऱ्याची पिशवी सांभाळत तो जिना उतरू लागला.
'तासाभरानं पुन्हा चक्कर मार... असं मी नकळत सांगून टाकलं आणि पुन्हा कपाट उपसलं.
काही शर्टपीस पिशव्यांमध्ये गुंडाळलेले सापडले.
मग किचनमध्ये ओट्याखालचं कपाट उघडलं.
काही भांडी मिळाली
एक चांगला रॉकेल चा स्टोव्हही सापडला.
थोड्या वेळाने तो परत आला, आणि मी त्या साऱ्या वस्तू त्याच्या हाती सुपूर्द केल्या.
त्याचे डोळे आनंदानं भरले होते.
.... खिशात हात घालून एक नोट काढून मला देण्यासाठी त्यानं हात पुढे केला..
हे त्याच्या व्यावसायिक स्वाभिमानानुसारच होतं.
मी त्याच्याच हात धरून ती नोट पुन्हा त्याच्या खिशात घातली.
... त्याचे आनंदाने हसणारे डोळे पाणावलेही होते!...

**
आज मित्रांशी गप्पा मारताना कशावरून तरी परवाची ही आठवण ताजी झाली.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा 'गरीबी हटाव' हा नारा ऐकला होता. पुढे तो ऐकू येतच राहिला...
आजही 'गरीबीसे आजादी' हवी म्हणून कुणी लढतायतच!
... "सोन्याच्या शर्टमुळे राज्यभर टीकेचे धनी ठरूनही येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी आपल्या ४५ व्या वाढदिवशी सोन्याचा शर्ट घालून आपली हौस भागवली. सोन्याचा शर्ट घालणार नसाल तर, वाढदिवसाला हजर राहीन असे छगन भुजबळ यांनी बजावले होते. पण, ऐकतील ते पारख कुठले? भुजबळ जाताच पारख यांनी सोन्याचा शर्ट परिधान करून त्यांचीही फसवणूक केली." असं कौतुकभरलं वर्णन एका पेपरात मागे वाचलं होतं.
परवा माझ्या घरी भंगारवाला कचऱ्यातले जुने कपडे वेचत होता, त्याच दिवशी एक बातमी वाचली.
सोन्याच्या शर्टाची जागतिक विक्रमात नोंद झाली होती!!
... आज सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली. मथळा होता, 'भारताचा विकासदर 7.4% राहणार!'
भारताची अर्थव्यवस्था या वर्षात पूर्वपदावर येतेय, असा दावाही त्या बातमीत होता.
... त्या भंगारवाल्यासारख्यांच्या जगण्यात या बातमीचं प्रतिबिंब कसं असेल??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

सोन्याचा शर्ट किती तोळ्याचा आहे ? तेवढे पैसे आले कुठून ? वगैरे चौकशी होईल तेव्हा होईल.. झालीच कधी तर !!!