चिकन ग्रेवी इटालियन स्टाईल)

Submitted by आशिका on 13 May, 2016 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही पाककॄती झी मराठी या वाहिनीवर करुन दाखवण्यात आली होती. रेसिपी सोपी होती. घटक पदार्थही मिळण्यासारखे होते. मग त्यानंतरच्या रविवारी याचा घाट घातलाच. अगदी सोपी आणि वेगळ्या चवीची म्हणून इथे देतेय ही पा. कॄ.

मूळ पा. कॄ. त काही बदल केलेत मी. मूळ पा. कृ. त मशरूम्स घातले आहेत, ते मी वगळले, मला आवडत नाहीत म्हणून. तुम्ही ते घालू शकता.लसूण व टोमॅटो चे तुकडे न ठेवता ग्राईंडरवर वाटून घेतले, चिकनचा एकच भला मोठ्ठा पिस , अख्खं चिकनच न कापता/चिरता शिजवलं होंतं. त्याऐवजी बोनलेस चिकनचे तुकडे घेतले.

साहित्यः-

१. बोनलेस चिकन अर्धा किलो, लहान तुकडे करुन
२. ८-१० लसूण पाकळ्या
३. टोमॅटो सॉस - २ मोठे चमचे
४. ४ मोठे टोमॅटो उकळत्या पाण्यात थोडा वेळ ठेवून, त्याची साले काढून
५. रंगीत सिमला मिरच्या (पिवळी, हिरवी, लाल प्रत्येकी १) उभे काप करुन
६. इटालियन हर्बस ३-४ लहान चमचे (दुकानात या नावानेच मिळतात)
७. कांदा -२ बारीक चिरलेला
८. पार्सली वरुन शिवरायला
९. रेड चिली फ्लेक्स २ लहान चमचे
१०. मीठ - चवीनुसार
११. ऑलिव्ह ऑईल - २ मोठे चमचे

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुवून त्यास चिली फ्लेक्स, मीठ, थोडे ऑ.ऑ. चोळून १५-२० मिनीटे मॅरिनेट करत ठेवणे. लसूण पाकळ्या व उकडलेल्या टोमॅटोचा साले काढल्यानंतरचा गर ग्राईंडर वर एकजीव वाटून घेणे. फोडणीला ऑ.ऑ व त्यावर २-३ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या टाकणे. लसूण परतल्यावर कांदा व नंतर सिमला मिरचीचे काप परतून घेणे. मग मिक्सड हर्ब्स, चिकन आणि त्यावर टोमॅटो, लसणाचे वाटण घालणे. वरुन टोमॅटो सॉस घालून मंद गॅसवर झाकण ठेवून वाफेवर शिजत ठेवणे. साधारण वीस मिनीटांत चिकन शिजते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी पुरेसे
अधिक टिपा: 

गरम मसाला, आले वगैरे घटक नसल्यामुळे आणि टोमॅटोमुळे हलक्या आंबट व कमी तिखट चवीचे हे चिकन पास्ताबरोबर खाल्ले जाते. पण आपल्या चपाती, भाताबरोबरही छान लागते. लहान मुलांना चिकन खायची सुरुवात म्हणूनही चांगला ऑप्शन वाटतोय.

माहितीचा स्रोत: 
झी मराठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो कातिल दिसतोय.
चिकनच्या ऐवजी पनीर घेऊन ट्राय करीन .
मला जास्त मसालेदार पदार्थ आवडत नाहीत म्हणून हे आवडेल

सोपा आहे प्रकार. फोटोपण छान.

आशिका, आधी प्रतिसादातली लिंक कॉपी करून घ्या. मग रेसिपी संपादन करायला घ्या. आणि तिथे ती लिंक पेस्ट करा. मग रेसिपी परत सेव्ह करा. झाले.