माझं लाजाळूचं झाड ते.... :)

Submitted by विद्या भुतकर on 11 May, 2016 - 09:55

कधी कधी गोष्टी लिहायला किती मजा येते नाही? मला तर वाटत होतं आपणच जावं त्या गोष्टीत. Happy

माझं लाजाळूचं झाडं ते.... Happy --

आजचा दिवसच एकूण भारी होता तुषारसाठी. या वर्षातली अजून एक कंपनी काही मुले रिक्रूट करायला आज कॉलेज मध्ये आलेली. लेखी परीक्षा संपली आणि पहिली यादी बाहेर आली. तुषार होता त्या यादीत. मग काय? त्याच्या पेक्षा त्याच्या मित्रांनीच सगळी तयारी केली त्याची. अगदी त्याचे कपडे पण त्यांनीच इस्त्री केले. इंटरव्ह्यूला आला तर मानसीही तिच्या मैत्रिणी साठी आलेली दिसली. तिने त्याला 'ऑल द बेस्ट' ही सांगितलं. तिच्याकडे पाहून तो हसला आणि आजची नोकरी आपल्याला मिळणारच असा विश्वास त्याला आला. संध्याकाळचे सात वाजले आणि निकालाची यादी बाहेर आली, निवडून आलेल्या मुलांची. तुषारचं नाव ऐकून त्याच्या मित्रांनी त्याला डोक्यावरच घेतलं.एकूण काय दिवसच लई भारी. त्याला तर जाम काही सुचत नव्हतं. नुसता गोंधळ, मित्रांचा दंगा, सिलेक्शन न झालेल्यांच्या निराशा. पण आज त्याचं कशाकडेही लक्ष नव्हतं. त्याला आज फायनल काय ते बोलायचं होतं मानसीशी.

मागच्या वर्षीच्या शेवटी कधीतरी तिला कळलं की त्याला म्हणे ती आवडते. आधी तर जरा घाबरली. म्हणालीही मैत्रिणीला, 'मी काही अशी थिल्लर वागते का गं? कधी त्याच्याशी बोलले नाही आणि हा असा कसा म्हणे आवडते?'. आता मैत्रीण काय बोलणार? खरंच मानसीचं आयुष्य एकदम सरळ होतं. शाळेत चांगले मार्क, मग चांगले कॉलेज आणि आता थोड्या दिवसांपूर्वी नोकरीही लागली होतीच दोनेक प्रयत्नात. कुठेही वादात पडायचं नाही, प्रेमात तर नाहीच. आपण, अभ्यास आणि जवळच्या दोनेक मैत्रिणी, बास इतकेच. बाकी मुलींचे मित्र असले तरी ती स्वत:हून मुलांशी बोलायची नाहीच. तरीही नकळत तीही त्याच्याकडे पाहू लागली. वर्गात त्याचं अस्तित्व तिला समजू लागलं. समोरासमोर कमीच बोलणं व्हायचं. तो बोलला तरी ती जपूनच बोलायची. तो आवडू लागला तरी तिने स्वत:शी कबूल केलं ना अजून कुणाकडे. आजही त्याच्याकडे चोरून बघत होतीच.

तुषारने कंपनीचे फॉर्म इत्यादी कामे आटपली. बरीच रात्र होत आली होती. रूमवर जायला मानसी निघणार इतक्यात तुषार आला आणि त्याने 'मानसी' अशी हाक मारली. अनेकदा त्याने,' मने', 'मनु', 'मना', 'मन्या' अशी तिच्या नावांची उजळणी मनातल्या मनात केली होती. पण ते असं बाहेर थोडीच पडतं. हाक ऐकून ती थांबली. त्याच्या आवाजातला बदल तिला कळत होताच. 'मला बोलायचं आहे तुझ्याशी, जरा थांबशील का? ' आता अस एकदम विचारल्यावर ती नाही कसं म्हणणार?

'प्रिया जा पुढे तू, मी येतेच मेसवर', असं म्हणून मानसी थांबली. आता ती थांबल्यावर मात्र त्याला काय ते सुचेना. तो म्हणाला,"कुठे हॉटेल मध्ये बसायचं का जेवणही होईल, निवांत बोलू". पण खरंतर आज पर्यंत अशी ती कुठल्याच मुलासोबत एकटी बाहेर फिरायला, जेवायला गेली नव्हती. तिला त्यांनी रात्री असं थांबणंही अवघडल्यासारखं वाटत होतं. शेवटी तो तिच्यासोबत चालू लागला. त्याचा फ़ोर्मल ड्रेस तसाच होता अंगात. "स्मार्ट दिसतोय, नाही?", तिने मनात विचार केला. हातात फ़ाईल घेऊन तो चालत होता.

"Congrats पुन्हा एकदा. कसं वाटतंय?", ती बोलली.

"मस्त, एकदम हलकं वाटतंय. तुला कसं वाटतंय?", त्याने आपली नजर तिच्यावर रोखत विचारले. कुणाचे डोळेही आपल्याला इतके सैरभैर करू शकतात? आपल्यावर रोखलेली त्याची नजर असली की कुठे पाहू, कुठे नको असं होतं, नाही? तिला कळेना असं का विचारतोय ते.

"म्हणजे? ", ती.

"म्हणजे असं की मला नोकरी मिळाली याबद्दल तुला कसं वाटतंय?", तो.

"छानच आहे की. आय एम हैपि फॉर यू.", ती.

"माझं जाऊ दे गं. पण आपलं काय?", तो.

'आपलं?' आता ती घाबरली होती. तिला कळून चुकलं होतं की आजचाच 'तो' दिवस आहे.

"म्हणजे तुला मी हे सांगायला नकोच की तू मला आवडतेस.", त्याचा असा एकदम डायलॉग ऐकून तिने पटकन आजूबाजूला पाहिलं. नशीब कुणी ऐकलं नाही.

"इतकी काय घाबरतेस लोकांना? चल बैस जरा. ", एका डिपार्ट्मेण्टच्या पायऱ्यांवर तो बसलाच. कुणी माणूस किती हक्कानं बोलू शकतो आणि 'नाही' म्हणणं मग जमणारच नसतं. तीही बसली मग नाईलाजाने.

"ही नोकरी मिळायची वाट बघत होतो बघ. इतके दिवस तुला हे न विचारता कसे काढले ते मला माहीत. माझ्याशी लग्न करशील?", त्याने बॉम्ब टाकला होता. कितीही हिम्मत केली तरी तोंडातून अशी वाक्य गेली की हात एकदम थरथरतोच. कानशिलं तापतातच आणि पुढे काय होणार हे ऐकू येण्याइतकी शुद्धही रहात नाही. त्याची अशी अवस्था तर ती रडकुंडीलाच आलेली.

पण तो सावरला लगेचच,मिश्किल हसत म्हणाला, "घाबरतेस काय गं इतकी? आपण काय लगेच पळून चाललोय का? आणि मला माहितेय तुलाही मी आवडतो." त्याची हिम्मत वाढतच चालली होती.

"हे बघ माझा निर्णय ठाम आहे. तुला काय वाटतं तो विचार कर दोन दिवस. मी घरी जातोय उद्या. घरचे खूष आहेत एकदम नोकरीचं ऐकून. सोमवारी येतो, मग आपण बोलू.चालेल? ", त्याने एका दमात सांगितलं.

तिने फक्त मान हलवली. तिचा हात हातात घेण्याच्या त्याच्या प्रयत्नाला मात्र तिने जुमानलं नाही. काय होतंय हे कळायला आणि विचार करायला वेळ हवाच होता. पुढे मग एकही शब्द न बोलता त्याने तिला रूमवर सोडलं आणि आपल्या हॉस्टेलला धावतच सुटला.

"आईशप्पत, आपण प्रपोज केलं की तिला!!!", मनातल्या मनात किंचाळून घेतलं त्याने. आजचा दिवसच भारी होता एकदम.

मानसी, मेस काय, कुठेही जाण्याच्या मनस्थितीत नव्हती. इतके दिवस जपलेलं आपलं गुपित त्याला माहीतच होतं म्हणजे. आपण पण किती वेडे ना, त्याला काहीच कळत नाहीये याची खात्री होती तिला. पण त्याला कळलं होतं. कितीतरी वेळा तिने वर्गात प्रवेश करताना त्याला शोधलं होतं. कॅन्टीन मध्ये मुलींच्या भागात बसून कान मुलांच्या सेक्शनला लावून त्याचं हसू ऐकलं होतं. मोठ्या सुट्टीवरून परत आल्यावर त्याला हळूच न्याहाळलं होतं. कधी घरी असताना अभ्यास करत त्याच्याबद्दल विचार करायला मनाला थोडं मोकळं सोडलं होतं. पण तरी आज हे असं सर्व झाल्यावर काय करावं ते सुचत नव्हतं. दोन दिवस !!! विचार विचार तरी किती करणार माणूस. शेवटी डोकं दमतच ते. कधीतरी तिची झोप लागून गेली. पुढचे दोन दिवस तो आपल्या गावात नाहीये या विचारानेच तिला एकट वाटत होतं. कितीही मन रमवलं तरी रमत नव्हतं. असे कसे झालो आपण? आणि कधी? याचा विचार करत होती ती. पुढे काय होईल माहीत नाही पण दोन दिवसांत तिचा निर्णय पक्का झाला होता.

सोमवार सकाळ उजाडली तशी ती हरखली. एकदम छान आवरून कॉलेजला गेली. त्याला पाहण्यासाठी पाय आपोआप जोरात पडत होते. वर्गात आली ते हसतच. पण तो दिसला नाही. अक्खा एक तास त्याची वाट बघत घालवला तिने. अभ्यासात लक्ष नाही असं पहिल्यांदाच झालं असेल तिचं. वाटलं अजून आला नसेल गावाहून. पुढचे दोन तासही तसेच गेले. तिची चुळबूळ वाढली होती. जेवायची वेळ झाल्यावर तिला काही सुचेना. मैत्रिणीला आणि मेसला दांडी मारून तिने कॅन्टीनला जायचं ठरवलं. तिथे त्याचा आवाज, त्याचं हसू कुठे ऐकू येतंय का हे ऐकत बसून राहिली. पण किती वेळ करणार ते तरी? अर्ध्या तासाने तिला उठावं लागलं. एकटी मुलगी किती वेळ बसणार? तिथून ती प्रक्टीकॅल साठी आली. आता तरी तो आला असेल असं वाटलं तिला. पण कुठेही तो दिसला नाही. दिवस संपल्यावर तिने कॉलेजला फेरी मारण्याच्या कारणाने ग्राउंडलाही चक्कर मारली. कुठे तो क्रिकेटच्या मैदानात तर दिसत नाहीये ना अशी खात्री करून घेतली. काय करावं तिला सुचत नव्हतं. कुणासाठी इतकं बेचैन होण्याची तिची पहिलीच वेळ होती.

रात्री मेसवरून येताना तिने त्याच्या मित्राला पाहिलं एकट्यालाच. म्हणजे हा 'घरून आलेला दिसत नाहीये' तिने मनात विचार केला. पण सोडून देणं जमणार नव्हतं. हिम्मत करून तिने,'सचिन!' हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं. 'तुषार आला का रे घरून?" तिने विचारलंच.

"काय माहीत नाही. सकाळपासून पाहिला नाही त्याला. काही काम होतं का?",सचिन बोलला.

"नाही नाही,असंच " ती म्हणाली. पुढे बोलू नये असं वाटत होतं, पण मन मानत नव्हतं.

तिने त्याला विचारलंच,"त्याचा नंबर आहे का रे तुझ्याकडे?".

"हो आहे ना" म्हणत सचिनने नंबर दिला. तो घेऊन ती झर्रकन मैत्रिणी सोबत निघून गेली.

आपण म्हणजे त्या मुलाला शोधायला काहीही करतोय याची तिला एकदम लाजच वाटली. एका दिवसाने काय फरक पडणारेय? असे समजावून काही उपयोग होत नव्हता. रूमवर आली तरी चैन पडेना. तिने त्याला मेसेज केला फोन वर,"हाय" इतकाच. अर्धा तास काहीच उत्तर नव्हतं. म्हणून मग फोनच लावला. आजपर्यंत, दिलेल्या फोनचा केवळ मैत्रिणी आणि घर या दोनच ठिकाणी तिने वापर केला होता. त्याच्याकडे तर आपला नंबरही असेल की नाही काय माहीत. दोन वेळा फोन लावून उचलला नाही म्हटल्यावर तिने नाद सोडून दिला. आपण कुणासाठी आणि एकाद्याच्या एका नजरेसाठी इतके उतावीळ होऊ शकतो हे तिला अजूनही पटत नव्हतं. मैत्रिणीशी गप्पा मारण्यात थोडा वेळ काढला. पण रात्री फोनवर गाणी ऐकताना मात्र त्याच्या आठवणीने तिच्या डोळयात पाणी आलंच.

दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा नव्या उमेदीने आवरायला सुरुवात केली. पुन्हा पहिले दोन तास तसेच निराशेत गेले. आता तिचा संयम संपला होता. दोन दिवस कॉलेज कसा बुडवू शकतो हा? आणि अशा निष्काळजी मुलाच्या प्रेमात आपण इतके वेडे का झालोय? दुपारच्या जेवणाच्या वेळी तिने सचिनला गाठलेच. म्हणाली," अरे त्याच्याकडे काम होतं जरा. फोन उचलत नाहीये तो. त्याच्या घरचा नंबर आहे का?"

सचिनने थोड्या अविश्वासाने तिला त्याचा घरचा नंबर दिला. घरी फोन करू की नको असा निदान हजार वेळा तरी विचार तिने केला असेल. समोर काय शिकवत आहेत याकडे तिचं लक्ष नव्हतंच. होतं ते फक्त त्याला शोधण्यात. त्याचा आवाज ऐकण्यात. शेवटी तिने घरी फोन लावलाच. रिंग वाजल्यावर अनेकदा तिच्या मनात त्याच्या आवाजाची आवर्तनं झाली. पण फोन त्याच्या आईने घेतला होता.

"तुषार आहे का?" तिने जमेल तितक्या सौम्य आवाजात विचारले.

"कोण बोलतंय? तो तर गेला सांगलीला परवाच. " असं उत्तर ऐकल्यावर तिचा धीर खचलाच. कुठे गेला असेल, का बोलत नसेल कितीतरी विचार येऊन गेले.

"हां मी मानसी बोलतेय. काम होतं प्रोजेक्टचं. मोबाईल लागला नाही म्हणून घरी केला. ", मानसीने उत्तर दिलं.

"हां अगं तो त्याच्या चुलतभावाकडे असेल तिथेच गव्हर्न्मेण्ट कॉलनीत राहतो. ", त्याची आई बोलली.

आता तिथे कसं शोधणार त्याला? तिने 'ओके ओके' म्हणून फोन ठेवून दिला. संधाकाळ झाली तशी तिची त्याला भेटायची इच्छा अनावर झाली. पुन्हा एकदा सचिनकडे जाणं भाग होतं. त्याला कुठे शोधणार म्हणून ती त्याच्या मेसकडे गेली. तिथे नशिबाने तिला तो दिसला. पण मुलांच्या मेस मध्ये मुलीने जायचं म्हणजे अनेक टाळकी उभी असायची तिथे. त्या घोळक्यातून सचिनला हाक मारून तिने त्याला विचारले," अरे मला महत्वाचं काम होतं तुषारकडे पण तो भेटतच नाहीये. फोन पण लागत नाहीये. त्याची आई म्हणाली कि चुलतभावाकडे गेला असेल. तुला माहित आहे का त्याचा पत्ता?" तिने कसंतरी त्याला विचारलं.

'हो हो माहितेय ना. " सचिन म्हणाला आणि त्याने तिला पत्ता सांगितला. 'मी येऊ का?' असंही त्याने विचारलं.

"अरे नाही नाही जाईनच असं नाही. आणि वाटलं तर एकटी जाऊन येईन. " ती बोलली.

'सचिन बिचारा चांगला आहे' मनात तिने विचार केला. पण आता खरेच त्याच्या त्या चुलतभावाकडे जायचे की नाही हा प्रश्न होताच. रात्रीचे नऊ वाजत आले होते. पण काय करणार,'दिल है की मानता नही!'. तिने गाडी त्या रस्त्याला लावली होती. शोधत शोधत ती त्या दिलेल्या पत्त्यावर आली. अंधार तर होताच. दाराच्या पाटीवरचे आडनाव बरोबर होते. पाच मिनिट ती दारासमोर विचार करत उभी राहिली. शेवटी तुषारचा चेहरा आठवून तिने दार ठोकले. एका तिशीच्या माणसाने दार उघडले. त्याचा भाऊ वाटत होता. तिने,"तुषार आहे का?" विचारले.

"तुषार? तो नाही आला इकडे. पर्व फोन आला होता नोकरी लागली म्हणून पण भेट नाही झाली. काही काम होतं का?", त्या भावाने विचारले.

"हा जरा प्रोजेक्टचे काम होते. काकू म्हणाल्या इथे असेल म्हणून आले. ", ती बोलली.

"नाही आलाय. पण आला तर काय सांगू?", भाऊ.

"मानसी विचारत होती म्हणून सांगा.", ती बोलली.

"ओके", तो उत्तरला.

तिने गाडी काढली. काल पासून आपण याच्या नादात काय काय करत आहोत आणि कुठल्या कुठल्या लोकांशी बोलत आहोत. त्यांच्याशी बोलायची तिने कित्येक महिनेही हिम्मत केली नसती. त्याची आई आणि भाऊ तर नाहीच नाही. तो भेटला नाही म्हणून, त्याची आठवण येतेय म्हणून की आपण असे वेड्यासारखे फिरतोय म्हणून, हे माहित नाही, पण तिला आता रडू फुटलं होतं. गाडी चालवत जोरजोरात रडत ती रूमवर निघाली. किती मूर्खपणा करतेय मी? यालाच प्रेम म्हणायचं का? असे अनेक विचार येत होते तिच्या मनात. गाडी लावून ती जिना चढू लागली. आणि दाराच्या पहिल्या पायरीवरच तिला "तो" दिसला. तुषारच होता तो. गेले दोन दिवस ज्याच्या एक क्षण नजरेसाठी आपण इतके वणवण फिरलो तो असा दिसल्यावर तिला एक थोडं हुश्श झालं. पण लगेचच थांबलेलं रडू पुन्हा फुटलं होतं. त्याने तिला हातानेच शेजारी बसायची खूण केली. त्याच्या शेजारी बसल्यावर तिचा श्वास वाढला. डोळे पुसून ती जरा शांत झाली. तेव्हा कुठे त्याने बोलायला सुरुवात केली.

"रडतेस काय वेडाबाई? मी कुठे जातोय?", तो.

"पण होतास कुठे? मी तुला किती शोधलं?" ती.

"हो मला माहितेय. कॅन्टीन, ग्राऊण्ड, मेस, फोन, घरी फोन सगळं माहितेय मला. ", तो.

"मग ????? भेटला का नाहीस मला?" तिला आता खूप संताप झाला होता. कुणी किती वाईट वागावं याला काही लिमिट?

"हे बघ चिडू नकोस. त्यादिवशी नोकरीच्या आनंदात होतो मी. एकदम बोलून गेलो सगळं. म्हणजे ते सर्व खरंच होतं. पण तुला किती टेन्शन आलं असेल याचा विचारच केला नाही मी. आणि त्यात तू अशी लाजाळू. मला वाटलं आपण उगाच घाई तर करत नाहीये ना? घरी जाऊन खूप विचार केला मी. वाटलं, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे अजून कितीतरी मोठ्या गोष्टी असतील. पण त्या सगळ्यात तू माझ्या सोबत राहशील का? की अशीच लोकलाजेस्तव गप्प राहशील? पुढे जाऊन अर्धवट सोडायचं नव्हतं मला हे. म्हणूनच मग मी दोन दिवस अजून तुला वेळ दिला थोडा. सच्याने सांगितलं मला तू कुठे कुठे शोधत होतीस मला. मीच त्याला गप्प बसवलं होतं. शेवटी काकांकडे गेलीस तेव्हा कळलं की ही वेडी काय करेल काही सांगता येत नाही. म्हणून इथे आलो आणि बसून राहिलो, तुझी वाट बघत. तुझ्यासारखे मलाही जड गेले ते दोन दिवस पण त्यात जे कमावलंय ना त्याच्यासमोर हे दोन दिवस काहीच नाहीत. परवा हॉटेल मध्ये माझ्यासोबत यायलाही लाजणारी तू, माझ्या घरी, काकांकडे, मेसवर कुठे कुठे फिरलीस. अशीच धडपडशील का आपल्या दोघांसाठी? सर्व लोकांची पर्वा न करता? माझं लाजाळूचं झाड ते…हं? ", त्याने तिच्या डोळ्यात बघत प्रेमानं विचारलं.

तिला बोलायला त्राण होतेच कुठे? त्याच्या हातात हात देऊन त्याच्या खांद्यावर ती विसावली होती. तिचं सर्व सुख तिच्या शेजारी बसलं होतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान गोष्ट ! छोटीशीच पण मस्त.
प्रेमाने मानसीला आलेला धीटपणा किती छान रंगविला आहे!
मी तिच्या जागी असते तर काय केले असते असा विचार करीत होते...... Happy
म्हणजे आता ते वय नाही राहीलेलं...ती फेजही नाही आयुष्याची........पण तरीही ....

हातातुन सुटलेली वाळू.....वेळ.....संधी आठवली....खूप छान लिहिलय!!

कसली गोग्गोड गोष्ट आहे गं!!!

>> एक्झॅक्टली हेच्च लिहायला (हेच शब्द) इथे आले होते. किती योगायोग. Happy

मानसी आणि तुषार दोघंही डोळ्यासमोर उभे राहिले. खुपच गोड गोष्ट आहे.
वीज कडाडल्यावर प्रियकराच्या लगेच मिठीत शिरणारी प्रेयसी, प्रसंगी अंधार्‍या रात्री किर्र जंगलात त्याला शोधायला जीवाचं रान करते, ही दोन रूपं तिचीच आणि खरीच.

फार सुंदर कथा. आवडली.
वर्णनावरुन सांगलीच्या वालचंद कॉलेजची आठवण आली. कँपस प्लेसमेंट आणि जवळच असलेली गव्हर्न्मेण्ट कॉलनी. सगळे जुने दिवस आठवले आणि प्रत्यक्ष बघितलेला डिट्टो प्रसंग पण Happy

रंगासेठ, वर्णन सांगलीच्या वालचंद कॉलेजचेच आहे. Happy फक्त प्रसन्ग काल्पनिक आहे. पण तो तिथे घडू शकतो यात वाद नाही. Happy
वालचंद !! वालचंद !! Happy

बाकी, मला आवडलेली गोश्ट तुम्हालाही सर्वाना आवडली यात आनन्द आहे. धन्यवाद.

विद्या.

Happy Short and sweet

Pages