लोपली युगे अनेक, ओलसर जखम तरी

Submitted by बेफ़िकीर on 11 May, 2016 - 06:00

एका ग्रूपवर डॉ. कैलास गायकवाड ह्यांनी दिलेल्या तरही मिसर्‍यानुसार रचलेली गझल! कैलासरावांचे आभार!

-'बेफिकीर'!

==========

काळ लावतो सदैव लेप अन् मलम तरी
लोपली युगे अनेक, ओलसर जखम तरी

केवढ्या अपूर्ण वासना नभात साचल्या
चांदणे बघून हेच वाटले प्रथम तरी

वेल फक्त आपलाच कार्यभाग साधते
नांदते खुशाल, झाड जाहले कलम तरी

ती मला बघून खिन्न होउनी चपापली
राहिली म्हणा कुणात एवढी शरम तरी

पावसाळली हवा नि कुंद जाहली मने
आळसून थांब तू, हवी कुणास रम तरी

धड जमत नसेल तर इथे तरी निघून ये
मी नको असेन तर तिथे निदान रम तरी

विविधतेत एकता जिथे तिथे दिसायची
स्वार्थ केवढे समान, वागणी विषम तरी

हे कवित्व की धगीत तडफडून हासणे
रांगड्या व्यथा मनात, शायरी तलम तरी

'ती' निबीडश्या रुढींत घुसमटून गोठली
भाग्यवान 'तो', किमान पावला उगम तरी

एकटाच राहिलास ह्या जगात शेवटी
राहिला कुठे तुझ्यासवे तुझा अहम् तरी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धड जमत नसेल तर इथे तरी निघून ये
मी नको असेन तर तिथे निदान रम तरी

>>

आवडला !

मतल्यात काफिया जस्टीफाय होतोय का नक्की ? (मला एक 'तरी' अनावश्यक वाटला.)

अफाट !