यथा शास्त्रप्रमाणेनं...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 2 May, 2016 - 12:45

सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)

(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.

वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.

पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.

अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.

2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?

@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?

@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?

@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?

इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!

सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.

(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users