सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव

Submitted by मार्गी on 2 May, 2016 - 09:32

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

सायकलीशी जडले नाते २८: परत नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस

चाकण- माणगांव

६ डिसेंबरच्या सकाळी सहा वाजता चाकणवरून निघालो. एका मोठ्या मोहिमेची सुरुवात तर आहेच, पण सोबत लॅपटॉप ठेवून कामही करायचं आहे. पहाटेपासून दुपारी २ पर्यंत सायकल चालवेन आणि दुपारी थोडा वेळ आराम करून लॉजवर थांबून लॅपटॉपवर माझं कामही करत राहीन, असा विचार केला आहे. पण आपल्याला जसं वाटतं, तसं होत नसतं! सकाळी ६ वाजता सायकल घेऊन निघालो खरा, पण रात्री चांगली झोप मुळीच लागली नव्हती. मोठ्या राईडला निघताना नेहमी रात्रीची झोप बरोबर होत नाही. हे नवशिक्याचं लक्षण आहे. कारण ज्याला अशा राईडस किंवा एक्सपिडिशनची‌ सवय असेल, त्याला रात्री शांत झोप लागणारच ना. आज १२५ किलोमीटरचं लक्ष्य आहे. पुण्यातल्या चाकणपासून कोकणातल्या माणगांवपर्यंत जाईन. मागच्या वर्षीही ह्या रस्त्याने गेलो होतो, पण ऐंशी किलोमीटरच सायकल चालवता आली. आता बघायचं आहे आज काय होतं. माझ्या सायकलिंगसाठी हा खूप मोठा दिवस आहे.

एकदा हेही वाटलं की, ह्या प्रवासासाठी तांत्रिक दृष्टीने तयारी पुरेशी झालेली नाहीय. काहीच दिवसांपूर्वी पंक्चर होऊनही नवीन ट्युब घेतलेली नाही. सायकलची सर्विसिंगही केलेली नाही. आणि हेच शरीराच्या बाबतीतही आहे. शरीर चांगल्या 'फॉर्म'मध्ये नाहीय. पण हे सगळं असूनही जातोय, कारण जेव्हा मोठ्या एक्सपिडीशनमध्ये जाईन, तेव्हा आदर्श स्थिती कधीच असणार नाही. सायकलही थकलेली असेल आणि शरीरही ताजतवानं असणार नाही. त्यामुळे आज असं गेलो तर त्यावेळेसाठी तयारी होईल. एकदा निघाल्यावर मन शांत होत गेलं. ज्या काही शंका होत्या, त्या निघेपर्यंतच होत्या. एकदा शरीराने काम सुरू केल्यावर हळु हळु मन शांत झालं.

रस्ते नेहमीचेच आहेत, पण आज लांब जायचं असल्यामुळे अगदी वेगळेच वाटत आहेत. पहिल्या तासात अठरा किलोमीटर पूर्ण झाले. पहिला नाश्ता केला. नंतर माझ्या मित्राला- गिरीशला भेटून पुढे निघालो. पुण्यातल्या हिंजवडीमधून हा रस्ता जातो आहे. इथे 'माण' नावाचं एक गांव आहे. एका क्षणासाठी वाटलं की, चला पोहचलो 'माण' गांवामध्ये! इथून काही अंतरापर्यंतचा रस्ता माझ्यासाठी नवीन असेल. हळु हळु शहरी वस्ती मागे राहिली आणि डोंगर व नजारे सुरू झाले! चार तासांमध्ये सुमारे पन्नास किलोमीटर पूर्ण झाले. पाण्यातून सारखं इलेक्ट्रॉल घेतोय आणि मध्ये मध्ये चिक्की- बिस्किटही खातोय.

मुळा नदी लागली. सिंहगड वेगळ्याच अँगलने दिसतोय! पौड ओलांडल्यानंतर मुळशी- ताम्हिणीचा परिचित रस्ता मिळाला. इथून हळु हळु वस्ती कमी होत जाईल. मागच्या वेळी मुळशीजवळच्या काही चढांनी त्रास दिला होता. ह्यावेळी आरामात पुढे जात राहिलो. एका जागी परत नाश्ता केला. पाणी भरून घेतलं. चिक्कीचा बार घेतला. पुढे चांगलं हॉटेल खूप नंतरच मिळेल. आता मस्त ऊन लागतंय. आणि साठ किलोमीटर झाल्यामुळे शरीराचाही ताजेपणा गेलाय. पण मुळशी धरणाजवळ सुंदर दृश्य बघून हा सगळा थकवा वसूल झाला! आता पहिला पडाव ताम्हिणी गाव. इथे काही मिळेल असं वाटलं होतं. पण फक्त पाणी आणि चिप्स मिळाले. आता खरा घाट लागेल. पण काळजीचं कारण नाही, तो उतरायचाच आहे. मागच्या वेळी इथे येईपर्यंतच गळून गेलो होतो. त्यामानाने अजून स्थिती बरी आहे. पण वेळेचं गणित चुकतं आहे. दोन वाजेपर्यंत माणगांवला पोहचायचं होतं. आत्ता दुपारचे बारा वाजले आहेत आणि फक्त सत्तर किलोमीटर झाले आहेत. म्हणजेच माणगांवला पोहचणं बरंच अवघड जाणार आहे. .


आजचा रस्ता. जास्त उतार

रस्ता अगदी निर्जन भागातून जातोय. मध्ये मध्ये कच्चा रस्ता आहे. पण काय जबरदस्त नजारे! इतक्या मोठ्या डोंगरांमधून हा रस्ता हळु हळु कोकणाकडे जातोय! इतके उंच डोंगर! जितकं बघतोय, ते कमीच वाटतंय. चांगली गोष्ट ही की लवकरच उतार येणार आहे. पण त्यासाठी अजून बराच वेळ तसंच खराब रस्त्यावर पुढे जावं लागलं. मध्ये मध्ये माकडं दिसत आहेत. एखादं खेडं लागत आहे. लवकरच ती जागा ओलांडली जिथून पूर्वी अगदी थकून परत आलो होतो. आता खरा नवीन प्रवास सुरू होईल. पुणे जिल्ह्याची‌ सीमा ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला. आता सहा- सात किलोमीटर तीव्र उतार. दूर खाली कोंकण दिसतंय! वा वा!

ह्या उतारावरही खूप काळजी घ्यावी लागेल. हळु हळु उतरत गेलो. अर्धा तास लागला. उतरल्यानंतर पहिल्यांदा निवे नावाचं एमआयडीसीजवळचं गाव लागलं. दुपारचे चार वाजले आहेत. माझे जेमतेम १०० किलोमीटर पूर्ण झाले आहेत. खूपच थकलो आहे. एकदा वाटलं की इथेच थांबावं. पण इथे हॉटेल नाहीय. थोडा वेळ आराम केला. नाश्ता केला व निघालो. माणगांव तर अजून खूप लांब आहे- २५ किलोमीटर तरी असेल. पण त्याआधी निजामपूर नावाचं गाव आहे. कदाचित तिथे मुक्कामाची सोय असेल. आता शरीर खूप बोलायला लागलं आहे. ते पुन: चालवलं. इतक्या खड्ड्यांच्या रस्त्यावर येऊनही सायकल अगदी ठीक आहे. पुढे तर जातोय, पण ह्या सगळ्या मोहिमेविषयी प्रश्नचिह्ने मनात आहेत. दुपारनंतर तर मला लॅपटॉपवर काम करायचं होतं. पण आता पोहचेपर्यंतच संध्याकाळ होते आहे.

रस्ता सपाटच आहे. पण लवकरच असा विचित्र रस्ता सुरू झाला जो सपाटही नव्हता, चढाचाही नव्हता. मध्येच तीव्र चढ, परत उतार, परत चढ! सायकल कोणत्या गेअरमध्ये ठेवू, हेच कळत नाहीय. चढामुळे एकदम हलक्या गेअरवर ठेवली तर परत उतार येतो. गेअर बदलले नाही की लगेच चढाव! थकल्यामुळे एक प्रकारचं डेस्परेशन आलं आहे. निजामपूर! अजूनही दहा किलोमीटर दूर आहे. आणि सूर्य पश्चिमेकडे कलला आहे. निजामपूर मोठं गाव नाहीय. पण इथे लॉज मिळाले. पण ते बरेच महाग आहेत. थोडा वेळ रेटचं बार्गेनिंग केलं. पण रेट तेच होते. इथून माणगांवही आता दहा किलोमीटर आहे. पण माझ्यासाठी आता ते फक्त दहा नसून 'इतके जास्त' झाले आहेत. पण काय करणार? परत सायकल सुरू केली.

रस्ता परत तसाच आहे. नक्की कोणत्या गेअरमध्ये सायकल चालवू कळतच नाहीय. अचानक चढ- उतार येतात. रस्ता वळत जात असल्यामुळे गेअर ठरवता येत नाहीय. पण हळु हळु आता बरंही वाटतंय की, आज माणगांवला तर पोहचेनच. दुपारी दोन वाजता नाही, पण संध्याकाळी सहा वाजता तरी पोहचेन. माणगांवकडे इतके डोळे लावून चालवतोय की, रस्त्याखालून गेलेली कोंकण रेल्वेची लाईनही दिसली नाही. आता लॉज शोधायचा आहे. मुख्य चौकात जाऊन रिक्षावाल्याला विचारलं. मग एका लॉजचा पत्ता मिळाला. माझ्या रेटमध्ये चांगला लॉज मिलाला. फक्त अडीचशे रूपयात एक रूम. भटक्याला एक रात्र घालवण्यासाठी अगदी योग्य.

थोडा वेळा आराम केला. पण घाई करायला हवी. थोड्याच वेळात आंघोळ केली. कपडेही धुतले. मोहीम मोठी असल्यामुळे सामान कमी म्हणून दोन- तीनच कपडे सोबत आहेत. आता रात्र झाली आहे. आश्चर्य म्हणजे इतकी सायकल चालवल्यानंतरही मस्त भूक लागली. थोडा ताजेपणाही जाणवतोय. नाही तर पहिल्यांदा मोठ्या राईडनंतर भूक कमीच लागायची. चांगलं जेवून परत लॉजवर आलो. उद्या इथून किना-यावरच्या श्रीवर्धनला जाईन. आज खूप डोंगर- पहाड मिळाले, उद्या समुद्र! रस्त्याची थोडी चौकशी केली. फ्रेश वाटतंय. त्यामुळे पाऊण एक तास लॅपटॉपवर कामही केलं. चला, दुपारी नाही, पण दिवसभर सायकल चालवल्यावरही लॅपटॉपवर काम करता येतंय तर. आज खूप मोठ्या गॅपनंतर शतक पूर्ण केलं! त्यामुळे उद्याची काहीच काळजी वाटत नाहीय. उलट मी उद्या पहाटे चारला उठून लॅपटॉपवर दोन- तीन तास काम करेन. डेडलाईन पूर्ण करून मगच पुढे जाईन. पण तरीही रात्री लवकर झोप लागली नाही. अनोळखी जागी झोप लवकर येत नाही. शिवाय सारखं बाथरूमला जावं लागत आहे. कदाचित दिवसभर इलेक्ट्रॉल घेतलं, त्यामुळे असेल. पण त्यामुळेच लवकर झोप लागली नाही.

   पुढील भाग ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users