सम अंकल

Submitted by दाद on 27 April, 2016 - 20:54

नाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.
मिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्हा पोरांनी सुरू केलेली धतिंग.
मारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’!

स्वप्नं कधी सुरू होतं ते कळतं का कधी... तसच सोम अंकल कधी क्लासला यायला लागले कुणालाच आठवत नाहीये. कनात वर करून सिनेमाच्या तंबूत शिरणार्‍या बिट्ट्या पोरासारखे आमच्या क्लासमधे आले. क्लासमधे गुरुजींनी तरी जत्राच भरवलेली असायची. सगळ्या पोरा-टोरांच्या आणि सिरियसली शिकणार्‍यांच्या आम सभा झाल्या की खास दंगा सुरू व्हायचा. त्यात आमच्यासारख्या गिन्याचुन्या घुसखोरांना प्रवेश होता. कधीमधी कुणाकुणा कल्लाकारांबरोबर साथीला बसायलाही मिळायचं. ते तीन चार तास क्लासमधे घालवण्यासाठी काहीही करायला तयार असायचो आम्ही. दोन तास आधी जाऊन क्लासला आलेल्या अगदिच अनभिज्ञांना मार्गदर्शन का काय म्हणतात ते करण्यापासून कारण नसताना मागच्या खोलीची साफ़सफ़ाई करण्यापर्यंत काहीही.
सोम अंकल तसल्या क्लॄप्त्या शोधून काढण्यात आमच्यात अग्रगणी असल्याचं आठवतय. स्वच्छं स्वच्छं दिसणार्‍या मागच्या खोलीत करायला काहीच नाही... मग?... आम्ही तिघा-चौघांनी तिथलं पायपुसणं आपटून आपटून त्यातली धूळ काढली होती. त्यानंतर त्याला आमच्यापैकीतरी कुणीही पाय लावला नाही. इतरजणही फ़ार प्रेमाने पाय लावायचे.... जरा जोरात पाय पुसलात तर ’धागा धागा अखंड विणू या’ करीत ते परत विणावं लागलं असतं.

सोमसुंदरम... सोम अंकल... सहा तरी फ़ूट उंच, सावळा... तजेलदार रंग अन कमावलेल्या बॉडीचे. एकदम सहा महिन्यांनी वगैरे उगवायचे तेव्हा केसांचा अगदी क्रूकट... सुट्टी संपवून बोटीवर निघेपर्यंत कवीलोकांसारखे छान केस वाढलेले असायचे. आमच्यामते काका सिंदबादच्या सफ़रीतला खलाशी. ते रेडिओ ऑफ़िसर होते म्हणजे काय त्याचा पत्ता नसलेल्या आमचे ते हिरो. सगळ्याच पोरांचा क्लासला जायचा रस्ता अंकलच्या घरावरून कसा काय जाऊ शकतो? पण जायचा. खाली उभं राहून ’अंsssssssकल... अंsssssssकल...’ असे कुकारे घालायचे किंवा स्वत:ची उंची पाच फ़ुटांच्यावर असेल तर ’ट्टॉक ट्टॉक’ असा जीभ टाळ्याला लावून आवाज.
’हाव्वाय्यू... भिडूsssज’ करीत नवनव्या डिओडरन्टच्या वासाचे अंकल दण्णादण्ण पायर्‍या उतरत खाली यायचे. घरी कधीच गेलो नाही... गॅंगच्या लीडरच्या घरी जायची पद्धत कुठे असते आपल्याकडे?

अंकलबरोबर अखंड बडबडींचे दोन-तिनतरी चॅनल्स एकाचवेळी चालू असायचे. रेडिओ ऑफ़िसर असल्याने सगळेच चॅनल्स ते एकाचवेळी ऐकू शकायचे का काय कुणास ठाऊक. पण झिपरे, ठमे, हनुमॅन, पिटपिट... राईसखान, उस्ताद, वस्ताद, खार, मोरावळा.. अशी आमची त्यांनी खास ठेवलेली नावं घेत ते अखंड बोलायचे. बरोबरच्या पोरांच्या दररोज एकदातरी बेटकुळ्या तपासून बघणार.. आणि ’एकतरी अंड खा रे दररोज... भावे, तुम्ही अंड नको.. वरण आणि दूध घ्या - प्रत्येकी दोन कप.. सकाळ संध्याकाळ.’ असं प्रिस्क्रिप्शनही.
मधेच खारीला ’तुला लिहून दिलेली मधुवंतीची चीज दाखव ना’ म्हणून गळ घालतिल तर राईसखानला ’तू नुस्ता ताक-भात खातोस.. अरे बिर्याणी खा जा.. मग बघ, सतार कशी टॉय टॉय वाजेल’ असला भयंकर सल्ला देतिल.

अंकलनी एका सफ़रीतलं वादळाचं वर्णन ऐकवल्यापासून ते परत आले की त्यांना पहिला भेटेल तो आपण तबला किंवा पेटी वाजवताना... ’वादळ?’ असं कसंतरी खुणेनेच विचारायचा. ते तोंड पाडून, मान हलवत ’साखर संपली रेशनवरची’ टाईप भाव आणून ’नाही’ म्हणायचे. त्याचं भाषांतर नंतर.. ’कस्लं काय... वादळ-फ़िदळ काsssय नाय... एकदम सप्पाsssट गुळगुळित दर्या. फ़ुल टू फ़ुस्सsss’ असं पसरायचं आमच्यात. मग अंकल भेटले की एकदम वेगवेगळी बंदरं, वेगवेगळ्या देशांच्या नाण्यांची देवाण-घेवाण ह्यावरच काय ते सुरू करायला हरकत नाही ह्यावर प्रत्येकाचं एकमत.
कड्ड्क सॅल्यूट केल्यासारखी काकांची दोन बोटं वर म्हणजे.. ’कस्लं अफ़लातून वादळ झालं म्हैतै... सरांचा पेटीचा झाला..’
’सरांचा पेटीचा झाला’ हे काहीतरी अचाट, अफ़ाट, बेस्टेस्ट, फ़ास्टेस्ट.. सहन करता न येणार्‍या वेगाचं माप होतं आमचं. कारण सर स्वत: पेटी घेऊन तबल्यावर दोघा तिघांना साथीला बसवायचे. द्रुत लयीपर्यंत सगळे जोमात... पुढे कोमात. सरांच्या अतिद्रुत झाल्याला ’पुरे पुरे...’ करीत दोन्ही हातात इंजेक्शन टोचल्यासारख्या येणार्‍या कळा सहन न होऊन आम्ही एकेक करीत बाद होत रहायचो.
’सरांच्या झाल्याच्या दोदाण्यात कसं गुदमरल्या सारखं होतं ना... तसं होतं डेक वर... वादळात... म्हाईतै? सॉलिड ग्रेट आहेत रे सर आपले’. अंकलची कोणतीही गोष्टं आम्हाला एकदम क्लासमधेच आणून सोडायची. सफ़र कोणतीपण असू दे शेवट आपले सर, आपला क्लास.. आपला तो हा... किंवा आपली ती ही.. ह्याच्यावरच यायची. आम्हीपण कुठेतरी वादळात, किंवा भलत्याच बंदरात न अडकता सुखरूप क्लासात परत यायचो.. म्हणजे आपापल्या घरी नीट परत जायला बरं.

सोम अंकल आमच्याबरोबर कल्ला करण्यापुरते येतात का काय असं वाटायचं आम्हाला कारण ते आमच्यासारखे सिरियसली शिकताना असे दिसायचे नाहीत. पण सोम अंकल अतिशय सुरेख सतार वाजवायचे. आधीच कुठेकुठे काय काय टेक्निकल शिकून आलेल्या ह्या शिष्याला सरांनी फ़ार प्रेमानं आंजारलं-गोंजारलं. स्वराचा लगाव इतका सुरेख असायचा... की कधीकधी अगदी सेंटी व्हायला होत असे. मग आमच्याच नकळत आम्ही.. ’बोअर झालं... अंकल फ़ास्ट लयीत वाजवा ना..’ म्हणून बिनदिक्कत फ़र्माइशी करायचो.

’झिपरे, मुलगी आहेस आणि तबला वाजवतेस म्हणून भाव नको खाऊस.. मला प्रॅक्टिस दे थोडी.’ असं ते माझं नीट बांधलेलं पोनीटेल ओढून सांगायचे. वर आणखी साथीला बसलं की.. ’सर, हिच्या वाजवण्यात काही गोंधळ आहे का बघा... माझं सगळं अतिगत नाहीतर अनागत कसं येत?’ असं साळसूद चेहरा करून विचारायचे. सर हसतिल नाहीतर काय.
अंकलना मॉनिटर करून सर मधेच बॅन्केत-बिन्केत जाऊन यायचे. धन्नाधन चालू असलेल्या फ़ास्ट रेल्याबिल्याच्या रियाजात दंडात कळा यायला लागल्यास... मधेच आम्हाला पालथ्या मुठीवर थुंकी लावून 'टॅम्प्लीsssज' म्हणून हात झाडायची मुभा असायची. हे म्हणजे देवेssss म्हणताना मधेच श्वास घ्यायचा चान्स दिल्यासारखं भाsssरी.

सतार वाजवताना बोटांना लावायची तेलाची छोटी डबी.. खिशातच असायची त्यांच्या. पण सर खोलीत नसतिल तर अंकल शांतपणे उदयच्या चकाकणार्‍या तेलीमिच्चं डोक्याला बोटं लावायचे... तो ही समजून घेऊन अधेमधे आपलं डोकं सादर करायचा.
व्हिक्टरीची दोन बोटं उचलून दाखवणं म्हंणजे गॅंगची साईन झाली होती. मधे गावातल्या एका कार्यक्रमात आमच्यातल्याच एका वीराने भारी सोलो वाजवला. वाजवताना त्याने आमच्या दिशेनं बघितल की एकगठ्ठा साताठ हात व्हिक्टरीची दोन बोटं घेऊन वर उठायचे. इतर श्रोते आधी चक्रावले आणि मग कावलेच असणार. त्यानंतर गावातल्या एका बुजुर्गांनी आम्हाला बाजूला घेऊन आमच्या लीडरसकट सगळ्यांना नीट समजावून सांगितलं होतं. त्यांनी सरांकडे चुगली केल्याचं मोरावळ्यानं बघितलंही. अर्थात पुढल्या क्लासला गुरुजींनी जातीनं विचारपूस केली आमची. पण मधल्या काळात अंकलनी साईन बदलली होती गॅंगची. ह्यावेळी आम्ही सगळ्यांनी एकजात ’होय सर’ म्हणत अंगठा दाखवला होता. सरांनी कपाळावर हात मारून घेतला.

’शूsss... गप्पं बसा रे जरा' हे गुरुजी सोम अंकलकडे बघून म्हणायचे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं. मग वर्गातल्या एखाद्या लिडरने आपल्या गॆँगला गप्पं बसायला सांगावं तसं सोम अंकल आमच्याकडे बघून नुस्ती मान हलवायचे.. की अख्खी गॆँग हाताची घडी तोंडावर बोट.
तंबोरा लावताना जास्तं गप्पं बसावं लागतं... तबला लावताना थोडी गडबड चालते. चिमुरड्यांना (त्यांचं खरं नाव चिमुरे.. पण ते आमच्याच उंचीचे असल्याने हे अंकलनी त्यांना दिलेलं नाव) ऐकू कमी येत असल्याने ते तबला लावत असताना... ’पावडर पडेल’ अशी शांतता हवी... हे ’टाचणी पडेल’ चं क्लास व्हर्जन. म्हणजे तबल्यावर पावडर पाडताना होईल इतकाच आवाज.

काकांच्या नादी लागून भन्नाट वात्रट भाषा तयार झाली होती आमची. ’तबला हसतोय’ म्हणजे वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या सुरात वाजतोय. पेटी आपणहून वाजतेय म्हणजे भात्यात खूप हवा साठल्याने पिपाणी वाजतेय. एखाद्या मुलीनं पेटी वाजवताना लोहारखानी भाता मारल्यास... नुस्तच ’अहो सौ’ म्हणायचो. ’सौ लोहारकी एक सुनारकी’ मधल्या त्या ’सौ’. तोच मुलगा असल्यास त्याला "ऐरणीच्या देवा".
’जाळ कमी’... हे फ़ुंकणीसारखी फ़्लूट वाजवणार्‍याला.
’पाणी आणा’.. म्हणजे ’इकडम तिकडम वाजवण्याचा मसाला अती झाला... साधा ताल वाजव आता’.
’तिन तिघाडा’.. म्हणजे ’किती त्या तिहाया.. पुरे’
’दुहायी दुहायी’ म्हणजे दोनदा नव्हे... कृपा कर आणि आत्ता वाजवलस तसं परत कध्धीकध्धी वाजवू नकोस.
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या दिवशी अंकलनी अल्पोपहाराला ’दुधी हलवा आणि चहा/कॉफ़ी, बिस्किटं’ आहे असं आम्हाला सांगितलं होतं. आपापला कार्यक्रम सादर करून मागे जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी अत्यंत गंभीर चेहर्‍याने टांगून ठेवलेला दुधी दाखवला होता.
ह्या आणि असल्याच धतिंगबाजीत त्यांचं नाव सम अंकल झालं ते झालच. काही म्हणा पण आमच्यातल्या प्रत्येकाला आपली आणि अंकलची सम एकच आहे असं मॅडकॅपसारखं वाटायचं.

कायम असला धुरळा उडवणारे सम अंकल सरांच्यामागे तानपुरा घेऊन बसायचे तेव्हा मात्र वेगळेच दिसायचे. आम्ही त्यांची ’बैजू बावरा’ पोज म्हणायचो. क्लासच्या अशाच एका खास सभेत गुरुजी शेवटी गायला बसले.. मी तबल्यावर साथीला. गुरुजींनी मोहना सुरू केला. पहाटेचा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरी ऐकताना आधी गंमत वाटत राहिली. गाताना सरांचे स्वर इतके गोड लागत राहिले की त्या वयातही तबला वाजवताना नकळत डोळे भरून येऊ लागले. कुणी बघत नाहीयेना असं आजूबाजूला बघताना सरांच्या मागे बसलेले अंकल दिसले. मिटलेल्या डोळ्यांमधून सैराट पाणी वहात होतं. तानपुर्‍याला डोकं टेकून गाण्याला मूकपणे शरण गेलेला आमचा लीडर... मग मला कुठेच बघावं लागलं नाही. मी पण बिन्धास्तं पाणी येऊ दिलं आणि बाहीने पुसलंपण सगळ्यांच्या देखत.

क्लासच्या एका कार्यक्रमात मी अत्यंत तयारीने गुरुजींबरोबर साथीला बसले. इतकं कौतुक झालं की पाय तर जमिनीवर नव्हतेच पण डोकंही जाग्यावर नसणारच बहुतेक. दुसर्‍या दिवशी अंकल घरी आले. माझ्याच हातचा हवा म्हणून आल्याचा चहा मागून घेतला आणि मला समोर बसवलं.

’चांगलच वाजवलस काल. पण सरांशी बोल तू उद्या क्लासला जाशील तेव्हा.’
मला कळेना सरांशी काय बोलायचय? ’अंकssल... कालचं सगळ्यांनाच आवडलय म्हटलं’
’तू नक्की कसं वाजवलस ते फ़क्तं सर सांगू शकतात....’
म्हणजे? अंकलना म्हणायचय काय? तितकं चांगलं नाही वाजवलं मी? ’म्हणजे? ऐकणारे आणि इतकं छान म्हणणारे एकतर मूर्ख किंवा खोटं बोलतायत का?... की तुम्हालाच आवडलं नाहीये अंकल?’. मी जवळ जवळ भांडणाचा पवित्रा घेतला.

अंकलनी खिशातून छोटा रेकॉर्डर बाहेर काढला, ’तू किती छान वाजवलस ते सगळ्यांनीच सांगितलं. तुला सरांनी किती ठिकाणी संभाळून घेतलं ते ह्याच्यावर ऐक. अजून काय सुधारू शकतेस ते सर सांगितलच. पण तू आपणहून जाऊन सरांना विचारलस तर बरं नाही का? मी सांगतोय ते ऐक’. मी आठ्या घातलेल्या चेहर्‍यानं ते ऐकून घेतलं.
तो छोटुकला रेकॉर्डर कसा वापरायचा ते मला शिकवून अंकल निघाले. मी तिथ्थे तश्शी बसून राहिले. दारापर्यंत सोडायलाही गेले नाही. रागच आला होता अंकलचा. परत येऊन माझं पोनीटेल उडवीत अंकलनी सांगितलं, ’आज ऐकून ठेव आणि रेकॉर्डर घेऊन उद्या आधी घरी ये. मग क्लासला जाताना आपण दोघे जाऊया.. चालेल?’

अंकलना दाखवून द्यायचंच. ... चुकलेच नाही तर सर सांगतिल काय? अंकल गेल्या गेल्या ऐकायला बसले.
माझं ऐकून झालं तेव्हा मी रडकुंडीला आले होते. सरांनी मला इतकं बेमालूम संभाळून घेतलं होतं अनेक ठिकाणी. मी ठेचकाळणार हे कळल्यासारखं सरांनी मला उचलून घेतलं होतं. आणि तरीही कुठेही सावरून घेण्याचा आव नव्हता. किंबहुना ते सावरून घेणंही माझ्या बरोबरीनं इरेसरीनं सादर केल्यासारखं सर गायले. आत्ता सावचित्तानं ते ऐकताना कळत राहिलं... कुठे मात्रा-अर्ध्या मात्रेच्या उड्या पडल्यात, लय पुढे-मागे झालीये, विनाच्या कारणी कुसर केलीये, कित्ती ठिकाणी ’पाणी आणा’ आणि ’तिन तिघाडा’ झालय... अंकल मनात नुस्तं ’दुहायी दुहायी’ म्हणत असणार.

दुसर्‍या दिवशी बाबांबरोबर आधी अंकलकडे. पहिल्यांदाच जात होते. घर कित्ती म्हणजे कित्ती नीट, बापरे. घरात छान उदबत्तीचा वास होता. दारातच माझ्याहीपेक्षा उंच पितळी समई होती आणि ठिकठिकाणी छान छान साऊदिंडियन चित्रं-बित्रं होतीच.
शिवाय स्वयंपाकघरातून अजून पण कसले कसले छान छान.. अंकलच्याच भाषेत ’वासेज’ येत होते. आता मला कधी पडले नव्हते ते प्रश्नं पडायला लागले. अंकलची आंटी असेल ना छानशी... आणि मुलं? दोनतरी असणार. लहान असतिल म्हणून अंकलनी आणली नसतिल क्लासमधे. आणि आंटीला अंकलसारखं मराठी येत नसेल. कमीतकमी वीणा-बिणा वाजवत असेल आंटी... किंवा गात पण असेल.. काय सांगत येत नाही.

अंकल बाबांशी गप्पा मारत होते. मिसेस इथेच असतात पण आज घरी नाहीत. मुलं बोर्डिंग स्कूल्स मधे असतात.. अंकलच्या भटक्या नोकरीमुळे असा सगळा गोंधळ आहे. स्वयंपाकघरातून दोन्ही नाकात चमक्या घातलेल्या एक प्रेमळ अम्मा येऊन येऊन खाणं आणून ठेवत होत्या. गरम गरम इडली वडे पुन्हा पुन्हा आग्रहाने वाढत होत्या. मधेच अंकलनी आंडूगुंडू करीत माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. त्यातलं मी ’झिपरी हे नक्की ऐकलं. मागचं पुढचं माझ्याबद्दल छान छान असणार कारण त्या हसर्‍या अम्मांनी अजून दोन वडे माझ्या ताटलीत सारले.

’झिपरे, तुला वाचायला येतं म्हणतायत बाबा तुझे. पुस्तकं आहेत मुलांच्या खोलीत. गो गो... तुला हवी ती घेऊन जा वाचायला’. मी उड्या मारीत गेले. कित्ती सुंदर राखलेली मुलांची खोली. बंक बेड. खालचा निळा वरचा गुलाबी. अर्ध्या भिंतीवर नीळा समुद्र आणि त्यावर डोलणारं शिडांचं जहाज.. त्यावर गुलाबी झाकेचं आकाश.. त्यात पंखवाल्या पर्‍या. मस्तं डिझाईनची बेडशिटं आणि उश्या. सगळीकडे अंकलनी कुठकुठून पैदा केलेली सुव्हिनीअर्स होती.
आणि... आणि अंकलपेक्षाही उंच असे दोन शेल्फ़ं भरून पुस्तकं. मला जाम म्हणजे जाम हेवा वाटला अंकलच्या मुलांचा.

हारीनं ठेवलेली, नीट कव्हरं घातलेली पुस्तकं ... उचलावं ते पुस्तक नव्या वासाचं, ताठच्या ताठ कण्याचं.. कधीच न उघडलेलं. भीतीच वाटली पुस्तकं घ्यायची. काढलेली पुस्तकं जशीच्यातशी ठेवून मी खोलीबाहेर पडले. राक्षसानं पळवून नेलेल्या राजकन्या किंवा राजपुत्राच्या महालात आल्यासारखं वाटलं... सुंदर, नीटनेटकं पण उदास.

बाबा जीना उतरायलाही लागले होते. ’तुमची मुलं आली की येईन खेळायला आणि नेईन पुस्तक’ असं मी म्हटल्यावर अंकलची विझलेली नजर खूप मोठं झाल्यावरही आठवते मला.
का कुणास ठाऊक पण त्यांच्या मुलांविषयी.. एकुणच घराविषयी विचारलच नाही गॅगनं कधीच. हनुमॅन, ठमी आणि वस्तादलापण माझ्यासारखंच वाटलं. मोरावळा तर गणित शिकत होता त्यांच्याकडून.. म्हणजे बर्‍याच्वेळा गेला होता. पण त्यानेही त्या हसर्‍या अम्मा सोडून कुणालाच बघितलं नव्हतं म्हणे. पिटपिटने मात्रं भलतच काहीतरी ऐकलं होतं अंकलबद्दल. त्याची आई म्हणत होती की... त्यांची बायको म्हणत होती की... मुलांना तिकडे लांब ठेवलय कारण अंकल बंदरांमधे वाईट-साईट बायकांबरोबर ...
वस्तादने बोलूच दिलं नाही पुढे ... ’हातोडीने ठोकीन अंकलबद्दल कायपण बोललास तर’ म्हटल्यावर पिटपिट गप्पं झाला होता. पण भलतच कायतरी कालवलं गेलं ते गेलंच गॅंगमधे.

त्यानंतर अंकल आले.. पण आम्ही कानकोंडेच झालो होतो. हाका मारून अंकलना बोलवायचे थांबलो. वादळाची-बिदळाची चौकशी नाही...ऐरण नाही... तिघाडे, दुहाया.. काही नाहीच. आम्हा पाखरांचा चिवचिवाट बंद झाला. सगळंच शिस्तीतच सुरू झालं क्लासात. अंकलच्या साथीला अटीतटीनं बसणारे आम्ही क्लास संपला की कारणं सांगून घरी पळायला लागलो. आपापलं काय ते शिकून वाजवून पोरं निमूट घरी. दंगा थांबला.
’मोठी झाली का काय सगळीच एकदम’ असं सरही म्हणाले.. पण कुणीच हसलं नाही.. अगदी सरही नाहीत. अंकल तर नाहीच.. मोठेच झाले सगळेच एका दमात.

एका रवीवार संध्याकाळी सगळेच क्लासात आहोत असं बघून सगळ्यांसाठी अंकल आईसक्रीम घेऊन आले. आम्ही सगळ्यांनीच नको-नको केलं तर... भिजलेल्या डोळ्यांनी..’रागावलात काय रे माझ्यावर पोट्ट्यांनो’ म्हणाले. आम्ही अजूनच केविलवाणे.
शेवटी सरांनीच घेतलं एक.. आणि दिलं प्रत्येकाला. मग मान खाली घालून आवाज न करता संपवल्या क्यॅंड्या सगळ्यांनी. क्लासमधून निघालो तेव्हा गप्पं बसलेल्या आमच्या लीडरकडे बघवलच नाही. सगळ्यांनी कट्टी घेऊन वाळीत टाकलेल्या पोरासारखे दिसत होते अंकल.

मग अंकल हरवलेच. एखाद्या भिडूला अख्ख्या टीमने ठरवून सारखं लायनीवरच बसवलं तर तो कसा... चुपचाप निघून जातो... खेळात दंग टीमला कळत पण नाही. तसे ’बाय’ पण न म्हणता गेलेच कुठेतरी.

मी खूप मोठी झाल्यावर आई एक दिवस म्हणाली... अंकल साऊथला त्यांच्या गावी कायमचे गेले म्हणे.. त्यांची बायको बाहेरख्याली म्हणे... तिनं पद्धतशीरपणे मुलांना फ़ितवलं होतं बापाच्या विरोधात...

मला घशात टोचल्यासारखं होऊ लागलं. आख्खी गॅन्ग जमवून पुन्हा एकदा रवीवार संध्याकाळ क्लासात जावसं वाटलं. जाताना अंकलच्या बिल्डिंगीखाली जाऊन सगळ्यांनी हाका मारमारून त्यांना बोलवायचं.. गराडा घालून मोठ्ठ्याने एकाचवेळी ’अंकल आम्ही सॉsssरीsss' म्हणून ओरडायचं.
टॅम्प्लीssज म्हणून थांबलेला भिडू पालथ्या हाताची थुंकी पुशीत परत येतो ना.. तस्से येतिल अंकल नक्की... दणाद्दण्ण पायर्‍या उतरत.
आम्ही विचारू .. ’वादळ?’
सगळी सगळी वादळं सांगतिल ते आम्हाला... मोठे झालेत त्यांचे भिडूजसुद्धा.
समाप्तं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुमचं सर वाचून तुमच्या क्लासची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिलीच होती... ती आता हे वाचून आणखी ठळक झाली... खूप भाग्यवान आहात तुम्हाला अशी माणसं भेटली...केवळ केवळ अप्रतिम!

रडवलंत दाद....
हरितात्या आठवत राहिले...तितक्या तोडीचं लिखाण झालंय हे सांगण्यापुरता हा उलेख. अन्यथा तुलना होऊच शकत नाही इतकं उच्च लिखाण आहे हे. खूप दिवसांनी काही तरी जबरदस्त वाचलं.बसमध्ये कुणी बघेल की नाही हा विचार न करता रडलोय हे वाचताना.
धन्यवाद!!!!

एकदम चित्रदर्शी लिहीलंस दाद! डोळ्यांत पाणी! अंकल , गुरुजी, तुमचा कल्ला सगळं दिसायला लागलं डोळ्यांसमोर!
खूप दिवसांनी काही तरी जबरदस्त वाचलं>>>> एकदम खरंय!

काय लिहिते गं तू.....

हसवता हसवता केव्हा पाणी आलं डोळ्यात कळलंच नाही.....

______________________/\_______________________

आभारी आहे सगळ्यांची. तबल्याचा क्लास, तिथली माणसं.. अत्यंत समृद्धं करून टाकलं आमचं छोटसं आयुष्य. त्यातलं काही शब्दांत काही शब्दातीत.
अंकलना भेटवावं असं खूप खूप वाटत होतं.. त्यांचंच टँम्प्लीज चाललेलं अजूनपर्यंत Happy

नेहेमी प्रमाणेच मस्त !

त्यांचंच टँम्प्लीज चाललेलं अजूनपर्यंत >> म्हणजे टाईम प्लिज संपला की नाही नीट कळत नाहीये.
संपला असेल तर मस्तच नसेल तर त्यांना शोधायला, टाईम प्लिज संपवायला सोशल मिडीया ची मदत घे !
नक्की भेटाल तुम्ही सगळे, मोठे झालाहात तेही सांगा त्यांना
शुभेच्छा त्याकरता.

अवांतर - सम आंटीकरता 'बाहेरख्याली' शब्द विशेषतः तो 'म्हणे' स्वरुपात असताना नसता वापरला तरी चालला असता. त्याने मूळ लेखाला काहीही बाधा येणार नाही.

अफलातून, दाद. संगीत समजत नाही अन्यथा काय वाटलं हे त्याच भाषेत सांगितलं असतं.
'शारदा संगीत' ही कथा/लेख अशा आठवणीबाबत वाचलेले सर्वोत्तम लेखन वाटायचे, आता हा लेखही त्या जागेवर राहील माझ्यासाठी. धीम्या गतीने सुरु झालेली रोलर कोस्टर अखेरीस भिरमिटून काढत जमिनीवर उतरवते, तशी क्षणिक निःशब्दता आली वाचून, ग्रेट.

यासाठीच मायबोलीवर यावंसं वाटत रहातं....

डोळे गच्च आवळून पाणी आतल्याआत जिरवावं लागलं वाचून झाल्यावर.
'हमेशा देर कर देता हू मैं' मुनीर नियाजींची नज्म दिवसभर छळत राहणार आज.

खूप सुरेख,

वर हर्पेन नी म्हन्ट्ल्या प्रमाणे सोशल मेडीया ची मदत घेऊन पहा.

भेटणे शक्य आहे.

हलवून सोड्लत एकदम

पुन्हा एकदा आभार.
हर्पेन, विचार करतेय. <<अवांतर - सम आंटीकरता 'बाहेरख्याली' शब्द विशेषतः तो 'म्हणे' स्वरुपात असताना नसता वापरला तरी चालला असता. >>
ते सगळे शब्दं एका मध्यमवयीन बाईच्या तोंडी आहेत... ते थोड्या मोठ्या झालेल्या माझ्या तोंडचे नाहीत. म्हणून तसा वापरलाय.
मला कळत नाहीये.. "म्हणे"च्या संदर्भात तो का बसत नाहीये. प्लीज सांग रे

अगं 'म्हणे' म्हणजे सांगोवांगी झालं ना ते.
आणि सम आंटीची बाजू काहीही माहित नसताना तिला 'बाहेरख्याली' म्हणणं बरं नव्हे असं वाटून मी लिहिलं तसं

ते अवांतर जाऊ दे

समअंकल आता मोठेपणी भेटले का तुला ?

प्रचंड आवडले.

दोन टोकांचा ताळमेळ सुरेख जमून आलाय अणि शशांकनी म्हटल्याप्रमाणे ते transition अगदी अल्लद झालय.

आणि जाताजाता मनात डोकावायला लावलंच - आपण नाही ना असा कोणावर अन्याय केला हे तपासून बघायला.

<< अवांतरः मला तरी ते 'बाहेरख्याली' आणि 'म्हणे' हे शब्द खूप महत्वाचे वाटले. एक ऐकिव ते दुसरे ऐकिव असा प्रवास अधोरेखीत होतोय त्या शब्दांनी. >>

हर्पेन, अरे अंकलबद्दल सुद्धा असं "म्हणे"च ऐकलं रे. तिथे सुद्धा पिटपिटची आई ने अंकलबद्दल "काहीतरी" ऐकलय.
म्हणजे मला हवाय तोच मेसेज जातोय. गुड.
मला काळजी आहे ती भाषेच्या लहज्याची.
असो...

जबरदस्त लिहीलय. बिच्चारे सम अंकल. गैरसमजाचे बळी, किती वाईट वाटलं असेल त्यांना, सगळ्यांनी वाळीत टाकलेलं बघून. Sad
हसवता हसवता केव्हा पाणी आलं डोळ्यात कळलंच नाही...>>>>>.+१

टाईम प्लिज संपवायला सोशल मिडीया ची मदत घे !
नक्की भेटाल तुम्ही सगळे, मोठे झालाहात तेही सांगा त्यांना>>>>>>>>>>.+१ त्यांनाही कित्ती आनंद होईल.

अप्रतिम ! ( आता असे लेख वरचेवर का वाचायला मिळत नाहीत, असे विचारले तर अशी माणसं वरचेवर भेटत नाहीत, असेच उत्तर मिळणार !!)

Pages