पद्मा आजींच्या गोष्टी ११ : परीक्षा आणि सुरा

Submitted by पद्मा आजी on 23 April, 2016 - 12:38

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
काही कामामुळे मध्ये जरा लिखाणात खंड पडला.

मी आज तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीची (सुधाची) गोष्ट सांगणार आहे. ती नागपूरला रहायची. तिने BA केले होते. जेव्हा तिला पाहायला आले तेव्हा तिच्या होणाऱ्या सासू बाईंनी तिला विचारले, "पुढे शिकणार आहे का?"
तेव्हा मुलींच्या शिक्षणाला जास्त महत्व दिले जायचे नाही. त्यामुळे तिने सावध उत्तर दिले. "विचार केला नाही."
तेव्हा त्या म्हणाल्या, "मुलींनी शिकायला पाहिजे जास्त. B Ed कर."

लग्न झाल्यावर तिच्या सासूबाई च्या प्रोत्साहना मुळे तिने B Ed केले. त्यांनी तिला नोकरी करायला हि प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिला चांगली नोकरी हि मिळाली. महाल या नागपूरच्या भागात एक मोठ्या शाळेत तिला मुख्याधापिका ची नोकरी मिळाली. तेव्हा महाल हा भाग काही फार पुढारलेला नव्हता. मुख्याधापिका झाल्यावर तिने पण अनेक मुलांना मदत केली काहींच्या फी भरल्या तर काहींच्या घरी समजवावे लागे इत्यादी.

तिचीच पुढची गोष्ट सांगते. एकदा काय झाले, तिच्या शाळेत वार्षिक परीक्षा चालू होती. दहावीचा पेपर चालू होता. क्लास मध्ये एका टीचर ने एका मुलाला कॉपी करताना पकडले. त्या मुलाने काय केले लगेच सुरा बाहेर काढला व त्याने टीचर ला धमकाविले कि त्याला जर कॉपी करू दिली नाही तर तो सुरा मारेल.

सगळे घाबरले. त्या टीचर घाबरून बाहेर पळाल्या आणि माझ्या बहिणीकडे आल्या. त्यांनी तिला सांगितले तेव्हा माझी बहिण म्हणाली चला मी बघते काय करतो तो.

एव्हाना बाकी टीचर गोळा झाले होते. सगळ्यांनी तिला म्हटले, "बाई जावूद्या. पक्का गुंड आहे तो."
पण माझी बहिण पण खमकी. ती म्हणाली, "आज याने सुरा दाखविला. उद्या दुसरा कोणी भीती दाखवेल. मी बघते."

असे म्हणून ती आतमध्ये गेली आणि त्या मुलाला म्हटली. "उठ."
तेव्हा तो मुलगा अंगावर आला तिच्या सुरा घेवून.
माझी बहिण हलली नाही. तिने वेगळा पवित्रा घेतला.

तिने त्याला विचारले. "तू कॉपी का करतो आहेस."
"पास होण्यासाठी."
"पास का व्हायचेय?"
"नोकरी मिळण्या साठी."
"नोकरी का पाहिजे?"
"पैसे मिळवण्यासाठी."

"म्हणजे तुला चांगले आयुष्य पाहिजेय. बरोबर?"
"हो."
"मग विचार कर, मला मारले तर जेल मध्ये जाशील. पंधरा वर्षे बसशील तिथे. कसले चांगले आयुष्य? त्यापेक्षा या वर्षी नापास झाला तर पुढच्या वर्षी नीट आभ्यास कर. काही अडचण तर मला येउन भेट."

त्या मुलाला तर रडायला आले. त्याने तिला नमस्कारच केला व सुरा हि तिच्या हातात दिला आणि कॉपीची नोट पण दिली.

अशी होती माझी बहिण (सुधा)
गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोष्ट आवडली... खुप विचारी आणि धाडसी निर्णय होता बहिणीचा. अनेकान्चे आयुष्य घडवणार्‍या तुमच्या बहिणीला माझा नमस्कार.

गोष्ट आवडली... खुप विचारी आणि धाडसी निर्णय होता बहिणीचा. अनेकान्चे आयुष्य घडवणार्‍या तुमच्या बहिणीला माझा नमस्कार. >>. +१