अर्थान्वयन - सुनता है गुरु ग्यानी

Submitted by चैतन्य दीक्षित on 22 April, 2016 - 08:36

सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।

नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?

बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
पाहिले आये नाद बिंदू से
पीछे जमया पानी ।
सगळ्यां ढगांत पाणी पुरेपूर भरलेलं आहे. ही गोष्टही असंच सुचवते की आपल्या सर्वांच्या देहरूपी घटांत एकच परमेश्वर वास्तव्य करतो.
सब घट पूरण पूर रह्या है।
अलख पुरुष निर्बानी हो जी।
त्या पुरुषाला अलख पुरुष म्हटलंय. अलक्ष्य वरुन अलख हा शब्द आला आहे. अलक्ष्य म्हणजे न दिसणारा. सर्वामध्ये परमेश्वर कसा आहे? तर ढगांत असूनही पाणी दिसत नाही तसा!

सबंध काव्यात हेच पावसाचे, पाण्याचे, ढगांच्या आवाजाचे रूपक वापरून कबीर त्यातून साधनेच्या पायऱ्या दाखवून देतात.

आता ते पावसाच्या थेंबांशी जणू बोलतात की तू तिथून आलास, कुठे जायचं त्याचा पत्ता जणू लिहून घेऊन आलास.आणि तूच अनेकांची तहान भागवलीस.
वहां से आया पत्ता लिखाया ।
तृष्णा तोउने बुझायी ।।

पण मग तू नदीत राहणे सोडून खारट समुद्राकडे निघालास. म्हणजे एकाअर्थी स्वतःच उलट फसलास. यातलं रूपक ध्यानात घेण्यासारखं आहे. पाण्याचा थेंब म्हणजेच सर्व जीवांत असणारे आत्मतत्व असे आधीच्या कडव्यात आले आहेच. हा आत्मा कोणत्या रूपात जन्म घेणार हे सर्व आधीच ठरलेले असते. मनुष्य रूपात असताना, जेव्हा स्वतःचा उद्धार करून घेणे शक्य आहे तेव्हा मात्र तू विषयसुखात गुरफटलास आणि जन्ममृत्यूच्या फासात स्वतःला अडकवलेस.
अमृत छोडसो विषय को धावे ।
उलटी फाँस फसानी रे ।।

पुढच्या कडव्यात एक वेगळेच रूपक समोर येते.
कबीर म्हणतात, हा जो पाऊस पड़तोय तो म्हणजे जणू गगनमंडलात गाय दुहली जाते आहे. पावसाचे पाणी जणू तिचे दूध आहे. आणि जे संत आहेत त्यांनी त्या दुधाचे दही करुन ते घुसळले. आणि त्यातून येणारे लोणी खाल्ले. उरलेलं ताक सगळं जग वापरतंय.
गगन मंडलू में गो बियानी।
भोई पे दही जमाया।
माखण माखण संतो ने खाया ।
छाज जगत बापरानी हो जी ।।

दुधाचे दही होणे, त्याचे ताक होणे आणि अदृश्य असलेले लोणी वर येणे ही सामान्य प्रक्रिया आहे. पण एका अर्थी ही दुधाची उन्नती आहे. संतही या पावसाकडे फक्त पाणी या अर्थी न बघता त्यात दडलेला अर्थ जाणतात. पहिल्या कडव्यात आलेली उपमा (बिंदूच्या आधी नाद, इत्यादी साधनेतल्या पायऱ्या जाणून असतात) म्हणून जणू काही ते लोणी खातात आणि लोणी काढून टाकल्यावर उरणारे ताक इतर लोक वापरतात.
याचा थोड़ा वेगळा अर्थही निघू शकतो.
साधनामार्गात नाद, बिंदू, कला (सिद्धी) हे अनेक टप्पे असतात पण अंतिम टप्पा स्वतःला (किंवा परमतत्वाला) जाणून घेणे हाच. संतांना तो साधतो तर इतर लोक या आधीच्या टप्प्यांच्या अनुभवात अडकून पडतात.

एखाद्या काव्याचा अर्थ लावणे आणि आपण लावलेला अर्थच बरोबर असे म्हणणे दोन्ही अवघडच.
काव्य उतरत असताना कवीची भावावस्थाच अशी असते की कदाचित् कवीसुद्धा पूर्णपणे एखादी ओळ समजावून सांगू शकायचा नाही. असेच काहीसे पुढच्या कडव्याच्याबाबतीत माझे झाले आहे.कदाचित् कबीर खूप वेगळं काही सांगत असतील.

साकार-निराकार हा भेद समजणे अवघडच. पण सद्गुरु सगळं सोपं करतात. धरा नाहीच असे पाहिले तर केवळ एक गोलाकार मंडल दिसेल. सरोवराशिवाय, म्हणजे सरोवराच्या आकाराशिवायही पाणी हे पाणीच उरते. सरोवरामुळे त्याला आकार मिळतो. आणि ज्याला आपण सरोवर म्हणतो त्याला सरोवर म्हटले नाही तर ते नुसते पाणीच !
म्हणजे आपण निराकाराला नुसता आकार नाही तर नावही कल्पिले आहे. पण निराकार असे नामात किंवा आकारांत अडकणारे नाही असेच गुरु सांगतात आणि अज्ञानाचा अंध:कार दूर होऊन ज्ञानाचा उजेड होतो.
बिन धरती एक मंडल दीसे ।
बिन सरुवर ज्यू पानी रे ।
गगन मंडलु में हो उजियारा।
बोल गुरुमुख बानी रे ।।

हे एकदा झालं की सकल चराचरात साठलेलं चित्स्वरूप मीच आहे याचा साक्षात्कार होतो. सो$हं सो$हं असा जणू बाजा वाजू लागतो.
ओहं सो$हं बाजा बाजे,
त्रिपुटी धाम सुहानी रे।
इथे ओहं हे यमकात्मक वाटतं. किंवा फार तर त्याला 'ॐ' चा अपभ्रंश म्हणता येईल. अर्थाच्या दृष्टीने मात्र, 'सो$हमात्मा' 'मी आत्मा आहे', 'सकल जीवांच्या हृदयात 'मी' म्हणून जी स्फूर्ती होते, तोच मी आत्मा' अशी स्पष्ट, निःसंशय जाणीव होते. हे ज्ञान म्हणजे स्वतः सकलविश्वाशी एकरूप असल्याची जाणीव देणारे असल्याने त्यातून होणारा आनंद बाजा वाजावा तसा जणू व्यक्त होतो. साधक शांत होतो. भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र कार्यान्वित होते. नाक आणि दोन भुवया यांच्यामधला भाग म्हणून त्रिपुटी असे म्हटले आहे. सुहानी हे बहुतेक त्या बाजाच्या ध्वनीशी संलग्न असावं. त्या सो$हंरूपी बाजामुळे आज्ञाचक्र सुखावलं असा काहीसा अर्थ असावा.
इडा पिंगला सुखमन नारी ।
सुन्नध्वजा फहरानी रे ।
इडा-पिंगला नाड्या सम होऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होते असे वर्णन आहे. सो$हं च्या साक्षात्काराचा हा परिणाम.
शून्यध्वजा ! किती विलक्षण शब्द आहे! निर्गुण जाणलं म्हणजे काय झालं? हे सांगणं अवघड आहे. शून्यध्वज फडकल्यासारखंच हे ! शब्दात बांधताच न येण्यासारखं.

कबीर म्हणतात माझ्या बंधूनो, ही जी आगमवाणी आहे ती ऐका! आगम म्हणजे योगमार्गाशी संबंधित शास्त्र-पुराणे इत्यादी. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र किंवा तंत्र. आगमात योगमार्ग, ध्यानाच्या पद्धती आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.
पाऊस पडणे, त्यापूर्वीचा ढगांचा आवाज या रूपकातून कबीर जे सांगतात ते म्हणजे ही आगमवाणीच !
कहे कबीरा सुनो भाई साधो
ज्या यी अगम की बानी रे ।
दिन भर रे जो नजर भर देखे ।
अजर अमर वो निशानी हो जी ।

जो कुणी याकडे लक्षपूर्वक बघेल त्याला एक अजरामर अनुभवच मिळेल.म्हणजेच साधकाने सातत्य, डोळसपणा सोडता कामा नये असेच कबीर सुचवत असावेत.

इतकं सगळं लिहूनही अपूर्णत्व आहेच.
हीच अनुभवापुढे लेखनाची मर्यादा !

-चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर.....आधीचे पण खूप छान वाटलेले.....

असेही कुमार ऐकताना शब्द कळायची जरा गडबड होते. मी

गगन मंडलू में गो बियानी।
भोई पे दही जमाया।

हे गो बियानी च्या ऐवजी गोपिकायानी असे काहीतरी ऐकले. म्हणजे, गोपिका डोक्यावर दही घेऊन चालल्या आहेत, त्याचे लोणी संतांनी खाल्ले आणि बाकी जनतेने ताक....

गुरुजी आता - उड जायेगा हंस अकेला वर पण निरुपण ऐकण्याची इच्छा आहे

चैतन्य _/\_

दिवसाची सुरूवात तुमच्या या लेखाच्या वाचनाने होत आहे. वाह, आजचा दिवस आत्ताच सार्थकी लागल्यासारखे वाटत आहे.

तुम्ही "कौन ठगवा" बद्दल लिहिले आहे का ? नसेल तर अवश्य लिहा अशी प्रेमळ विनंती. Happy

सुंदर लिहिलंय .
असेही कुमार ऐकताना शब्द कळायची जरा गडबड होते.+१
तुलना म्हणून नाही तर आपल्या पिढीतल्या एका गायकाने योग्य न्याय देत गायलेले म्हणून , राहुल देशपांडेंच्या आवाजातलं ऐका : https://youtu.be/NMLBq2I3Fzc फारच सुंदर गायलंय !

हा एक फार चांगला उपक्रम सुरू केलास चैतन्य. मनःपुर्वक धन्यवाद Happy
अनेक आवडत्या रचना आता नीट समजून घेता येतील आणि ऐकण्याचा आनंद द्विगुणित होईल.

मला याआधी ते मराठीत "पाहिले आहे" असे वाटायचे. Happy
राहूलने फारच छान म्हणले आहे. त्याच्या रूपाने वसंतराव, कुमार, भिमसेन, इ. चा सशक्त वारसा चालू राहिला आहे.

धन्यवाद मंडळी!
आशु, पुढची रचना उड़ जाएगा हीच डोक्यात आहे Happy

अनाहत नाद साधनेच्या सुरुवातीला ऐकू येतो असं लिहिलंय त्याबद्दल एका मित्राने सुचवले की
"साधनेच्या सुरुवातीला असं न म्हणता, साधना पक्व होऊ लागली की अनुभव येऊ लागतात. त्यात सुरुवातीला नाद ऐकू येतात मग रंग दिसू लागतात आणि मग कला (सिद्धि) प्राप्त होतात.
सद्गुरू या सर्वांच्या पलीकडे असतात म्हणून त्यांना
"बिन्दुनादकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः !" असं म्हणतात.

खुपच सुंदर !!! ऐकताना जाणवायचा काही तरी गुढ आहे पण अर्थ कधीच कळला नाही! तुझ्यामुळे आज कळला. आता अर्थ समजुन घ्याय्चा प्रयत्न करत ऐकताना अंगावर काटा आला!
कुमार झिनीझिनी म्हणतात त्याचा नाद कसला वेगळा आहे, विवरात अनंतकाळ घुमल्यासारखा !
इतकं सगळं लिहूनही अपूर्णत्व आहेच.
हीच अनुभवापुढे लेखनाची मर्यादा !>>>>> खरंय! सगळंच सांगता येत नाही!

बाकी अनाहत नाद ह्या विषयी खुप उत्सुकता आहे. कारण पुर्ण शांतता कधीच नसते मिळत..मला तरी. अगदी सगळं शांत असलं तरी कानात एक हाय फ्रिक्वेन्सी आवाज असतो बॅकग्राऊंड ला बाय डीफॉल्ट!

मला तरी. अगदी सगळं शांत असलं तरी कानात एक हाय फ्रिक्वेन्सी आवाज असतो बॅकग्राऊंड ला बाय डीफॉल्ट!>>>>>
याला कर्णनाद / tinnitus म्हणतात.

अप्रतिम अर्थान्वयन !

निर्गुणी भजने ही एक आयुष्यभर अनुभवत रहायची चीज आहे. ती कळली असा अट्टाहास करूच नये, फक्त ऐकत रहावीत - अर्थ मनात झीरपत राहतो.

'मला प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग' असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. पण एखाद्या संगीतप्रेमीकरता मुक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे निर्गुणी भजने. कुमारांचे संगीत आपल्याला प्रेमात पडायला लावते त्या भजनांच्या, आपण ऐकतच राहतो आणि कधीतरी अर्थ उकलू लागतो. कसलेच कष्ट नाहीत, निव्वळ आनंद!

पण कुमारांचे संगीत हीच कधीकधी मार्गातली धोंड ठरते, इतके जखडून टाकते ते संगीत की त्यापलीकडे लक्ष जायला खूप वेळ लागतो कधी कधी.

कुमारजी जेंव्हा झीनी झीनी वर पोहचतात तोपर्यंत मनात रिमझीम पाऊस पडायला लागतो माझ्या मग अर्थ लावायचे भान कधी उरतच नाही. तु लावलेला अर्थ खूप पटला आणि आवडलाही.

कुमारांचे संगीत हीच कधीकधी मार्गातली धोंड ठरते, इतके जखडून टाकते ते संगीत की त्यापलीकडे लक्ष जायला खूप वेळ लागतो कधी कधी>> हा तर्क पटतोय. कुमारांचं गारुड होतंयच. अधेमधे, जसं अवधूता करम की गती न्यारी, कौन ठगवा नगरिया, उड जायेगा हंस अकेला, अशा आणखी एखाददोन मोजक्या भजनांमधे सूरांपलिकडेही पाहता येतं असं वाटतंय. त्यातली रुपकं जर्रा आवाक्यातली आहेत म्हणुन काय?

आता चैतन्य लिहील तेव्हा समजेलच काय ते.

निर्गुणी भजने ही एक आयुष्यभर अनुभवत रहायची चीज आहे. ती कळली असा अट्टाहास करूच नये, फक्त ऐकत रहावीत - अर्थ मनात झीरपत राहतो.>>>>

अगदी अगदी माधव.
कुमारांच्या संगीताबद्दलही योग्य बोललास.
मला वाटतं त्यांनी या भजनांसाठी वापरलेला ठेका हा त्यातला एक मुख्य भाग असावा. सतवा असं या ठेक्याला त्यांनीच नावही दिल्याचं मी ऐकलं आहे.
कबीर, सूरदास, गोरखनाथ यांचे अनुभवातून आलेले शब्द इतके प्रभावी आहेत की ते अर्थ न कळताही एखाद्याला अनुभवाप्रत नेऊ शकतात.
पुनश्च धन्यवाद.
~चैतन्य