ओढ रायगडाची..

Submitted by Yo.Rocks on 20 April, 2016 - 23:52

सात वर्षापुर्वी माझ्या ट्रेकची सुरवात ज्या गडाने झाली.. ज्या गडाने सह्याद्रीचे वेड लावले.. त्या 'रायगड'शी या दिर्घ कालावधीनंतर भेटीस जात होतो.. बायकोला घेउन तसे ट्रेक केले होते पण यावेळी माझी चिऊ (पुतणी) होती.. तिला रायगड दाखवायचे वचन जे दिले होते.. रज्जुमार्गेच जाणार होतो त्यामुळे ट्रेक कम सहलच होती.. पण मुख्य आकर्षण रायगडच होते..

पहाटेच्या अंधारातच पाचाडला उतरलो.. रस्त्याच्या कडेला अंतरा-अंतराने दिवे होते त्यामुळे फारशी अडचण वाटली नाही..  आमच्याशिवाय एक जोडपेदेखील होते.. ! देशमुखांच्या बंद हॉटेलबाहेरच झाडाखाली उजाडेपर्यंत ठाण मांडायचे ठरवले.. चिउ व बायको दोघींची एसटीसारख्या रणगाडयातदेखील चांगली झोप झाली होती त्यामुळे आता अगदी फ्रेश होते..  एसटी साडे-तीनच्या सुमारास पोहोचली..  त्यामुळे थांबायचे तरी किती म्हणुन अंधुक पहाटेची चाहूल होताच आम्ही चालू लागलो.. !!  आमच्या मागोमाग ते जोडपेही आले.. त्यांनाही सोबत हवी असणार.. पण मग कळले की ते रायगडच्या दुसऱ्या बाजूस पायथ्याला असणाऱ्या गावाकडे जाणार होते.. जून महिना नुकताच उजाडलेला पण आज पावसाचा मागमूस नव्हता. पंधराएक मिनीटांनंतर अंधुक प्रकाशात  रायगडची  भव्यदिव्य  आकृती दिसली.. !! ते दृश्य पाहूनच हरखून गेलो.. आतापर्यंत  चिऊदेखील अंधाराला सरावली होती नि तिला म्हटले .. हाच तो रायगड !!

आता  चांगले उजाडले  होते... ते जोडपे देखील वेगळ्या मार्गाने निघून गेले होते..  हिरकणीवाडी एव्हाना दृष्टीक्षेपात होती.. पण त्या सुनसान रस्त्यावर एक घर आडवे आले.. चहा-पोहे मिळतील म्हटल्यावर पाऊल पुढे पडले नाही.. त्यांच्या अंगणातच नाश्तापाणी तयार होईपर्यंत आम्ही आडवे झालो.. साडेआठच्या सुमारास रज्जुमार्ग चालू होतो त्यामुळे  बराच अवधी होता पण शाळेची सुट्टी अजून सुरु असल्याने गर्दी होण्याची शक्यता होती.. तेव्हा रज्जुमार्गासाठी जास्त वेटिंग नको म्हणून आवरते घेतले.. 

गर्दी नको म्हणून गुरु-शुक्रवार असे मधलेच दोन दिवस निवडले होते. पण रायगडाची ख्यातीच अशी की सकाळीच गेटबाहेर तुरळक गर्दी होतीच..रज्जुमार्गाचा गेट काही उघडला नव्हता.. इथे गेटच्या आसपास बरीच उपहारगृह आहेत.. पण आम्ही भुकेला मघाशीच खतपाणी घातल्याने निश्चिंत होतो.. बऱ्याच वेळाने दरवाजे उघडले गेले.. नि आम्ही तिकीट काढून रांगेत बसलो..रज्जुमार्ग देखील एक कुतूहलाचाच विषय आहे.. मान उंचावली तरी दिसणार नाही इतक्या रायगडाच्या उंचीपर्यंत पोहोचणार तरी कसे हा प्रश्न नवख्यांना पडतोच.. रज्जुमार्गाच्या टेस्टींगचे सोपस्कार पार पडल्यानंतर पर्यटकांना सोडण्यात आले.. पहिलीच वेळ असल्याने चिऊ व बायको थोडेफार दडपणाखाली होते.. शेवटी आमचा नंबर आला नि आम्ही वर जाउ लागलो..

हिरकणी कडयाला बिलगून आम्ही वरच्या दिशेस सरकत होतो.. खोली वाढत होती. तसतसा सभोवताली पहिल्या पावसाने खुललेला निसर्ग दिसू लागला..  आज पावसाचे चिन्ह दिसत नव्हते त्यामुळे अगदी दूरपर्यंत नजारा दिसत होता.. आसमंतामध्ये विखुरलेल्या ढगांची गर्दी व त्यातून डोकावणारी सह्यशिखरे... काही ढगांच्या सावलीत तर काही सुर्यकिरणांची उब घेत..  दरीत घुमणारी पक्ष्यांची गुंजन कानी पडत होती.. बाकी सारं शांत..

जेमतेम पंधरा मिनिटांत आम्ही वरती आलो.. पायऱ्या चढून गडावर आलो नि स्वागतासाठी गाईडलोक्स सामोरे आले.. "तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला.. सगळं दाखवतो इतिहास सांगतो.. नक्की डोळ्यात पाणी येईल ..."वगैरे वगैरे सांगून झाले. नम्रतेने नकार देत आम्ही पुढे गेलो.. डाव्या बाजूस राहण्यासाठी एमटीडीसीच्या खोल्या आहेत.. कुठेच सोय नाही झाली तर इथे येऊन राहू म्हणून तिथे लिहिलेला फोन नंबर फिरवून चौकशी करून घेतली.. 

नंतर सुरु झाली गडावरची भटकंती.. एकामागून एक ऐतिहासिक वास्तू सामोऱ्या येऊ लागल्या.. कोठारं, सदर, महल, खलबतखाना, दरवाजे, स्तंभ..  काही अजूनही मजबूत तर काही पडीक अवस्थेत तर काही दुरुस्त केलेलं.. प्रत्येक वास्तू आपापलं वैशिष्टय जपून आहे.. आपण शांतपणे पाहायचं.. मूक संवाद साधायचा.. अमुक एका वास्तूत पूर्वी नक्की काय चालत असेल याबद्दल अनेक दुमत असतील पण इथे कुण्या एका काळी राजांचे वास्तव्य होते हेच जास्त महत्वाचे..

आमच्या चिऊला जास्तच उत्साह संचारलेला.. हे पाहू की ते पाहू.. हे काय आहे ते काय आहे.. प्रश्न सुरूच होते.. रायगडच्या राजभवनात प्रवेश करण्याआधी पालखी दरवाज्याने बोलावून घेतले.. त्या सुंदर पायऱ्या नि सुंदर दरवाजा.. गतवैभवकाळी याच वाटेवर किती लगबग असेल.. कित्येकदा पालखी याच वाटेवरून गेली असेल.. आपण फक्त तर्क करायचा..

राजदरबारात प्रवेश केला की नजर आपसूकच राजांचे स्थान म्हणजेच सिंहासनावर जाते.. पूर्वी रिक्त असलेल्या या जागेवर  आता राजांचा पुतळा आसनस्थ आहे.. ही महापराक्रमी आदर्श व्यक्ति.. काहींचे दैवत तर काहींचा आदर्श.. यांचे काही कट्टर भक्त तर काही समर्पित अभ्यासक.. काही त्यांना मनोमन जपणारे तर काही लोकांसाठी मोठे कुतूहल .. 

या सिंहासनापुढे नतमस्तक होऊन निघणार तोच एक सहल म्हणून फिरायला आलेले कुटूंब.. पटापट सिंहासनावर चढतात काय..!! राजांच्या पुतळ्यासोबत मोबाईल ने फोटो काढतात काय.. !! शुद्ध वेडेपणा.. ! तिथेच बसलेला एक हौशी फोटुग्राफर पचकलाच की थोडं तरी भान ठेवा.. सिंहासनावरती काय चढता..??  सुदैवाने म्हणावं पण त्या कुटूंब चालकाला पटले नि त्याने सगळ्यांना खाली आणले..

आम्ही आता भव्यदिव्य अश्या नगारखान्यातून बाहेर पडलो.. या दरबाराचे हे मुख्य प्रवेशद्वार..! रायगड म्हटले की डोळ्यासमोर  उभ्या राहणाऱ्या  वास्तुपैंकी एक..  इथून आम्ही मोकळ्या होळीमाळावर आलो.. पण मी आता निवाऱ्याची व खाण्यापिण्याची सोय होईल का म्हणून शोधू लागलो.. त्याच शोधात मी शिकाई देवीच्या देवळी समोरून जाणाऱ्या वाटेवर आलो.. जिल्हा परिषदच्या आरामदायी तीन खोल्या.. बाजूला लागूनच पत्र्याची शेड.. तिथल्या मामांनी आधी दिलेला नकार पण सोबत परिवार बघून दिलेली सहमती..! बाथरूम सोडला तर बाकी  दिसायला खोली एकदम टिपटॉप ! मग कळलं की खास सरकारी लोकं आले की त्यांना प्राधान्य ! त्यातलं कोण आलं तर खोली बदलावी लागेल या सुचनेनंतरच मामांनी किल्ली दिली.. भुकेचा प्रश्नही सुटलेला कारण त्या खोल्यांच्या खालच्या बाजूस असलेल्या त्यांच्या घरातून झुणका भाकर येणार होती..एव्हाना पाऊस दाटून आला नि लगेच रिपरिप सुरु झाली.. चारी बाजूंनी आमच्या परिसराला अचानक ढगांनी वेढलेले.. त्याच ढगांच्या विळख्यातून दोन व्यक्ती दम टाकत आल्या.. पायऱ्याची वाट चढून आले होते.. मग कळले हे भिडे गुरुजींच्या शिष्यापैंकी एक.. जे रोज नेमाने आलटून पालटून शिवरायांना हार घालायला येतात.. गेले कित्येक वर्ष हे अखंडीतपणे चालू आहे.. त्यांची विचारपूस करेपर्यंत झुणका भाकर आली आणि ढेकर येईपर्यंत तृप्त जेवलो..  खिडकीतून गंगासार तलाव नि वरती असलेले स्तंभ दिसत होते.. त्यांना बघतच मग मोठी वामकुक्षी घेतली.. चिऊ मात्र टंगळ मंगळच करत राहिली..

आळस झटकून बाहेर आलो तेव्हा लख्ख ऊन पडलं होत..तेव्हा लागलीच आटपून आम्ही बाहेर पडलो.. शिकाई देवीला नमस्कार करून होळीच्या माळावर आलो.. पाऊस पडून गेल्यांनातरची एक वेगळीच धुंदी वातावरणाला आली होती.. डोळ्यांना त्रास होत असला तरी ते लख्ख ऊन अंगाला मात्र टोचणार नव्हतं.. आकाशाचा निळा रंग जास्त गडद भासत होता.. ढग कुण्या दैवताने त्या निळ्या पडद्यावर सहज म्हणून पेंट ब्रश फिरवावा तसे पसरले होते.. आणि या सुंदर छताखाली रायगडाचे सख्खे शेजारी म्हणजेच अनेक सह्यकडे नुकतीच अंघोळ करून आल्यागत एकदम फ्रेश वाटत होते.. त्यांचे माथे त्या लख्ख उनात चमकू लागले होते..!

- - -

- - -

आम्ही तिघंही आता कुशावर्त तलावाजवळील मंदिरा कडे आलेलो.. होळीमाळाच्या उजवीकडे खाली उतरलेल्या वाटेवर.. नेहमीच्या रुळलेल्या वाटेशी वाकडं करून खाली उतरलेली.. त्यामुळे नेहमीची गर्दीही या वाकड्या वाटेला न जाणारी... माझ्या पहिल्या भेटीत ही जागा जितकी भावली होती तितकीच आताही.. माहीत नाही पण तासनतास इथं बसून राहावस वाटतं.. महादेवाचं जुनं पुराणं मंदिर व समोर भग्नावस्थेत असणारा नंदी.. आणि समोरच कुशावर्त तलाव.. अगदी शांत परिसर.. चिऊला देखील ते छोटं मंदिर आवडून गेलं.. 

त्या तलावापाशीच एका झाडाच्या बोगद्यातून 3-4 व्यक्ती फोटो काढत येताना दिसल्या.. मग लक्षात आले महाराष्ट्र देशा ची क्लिप्स बनवणारे  स्वप्नील पवार व त्याची टीम.. त्यांच्याशी हाय हॅलो झाले.. ही मंडळी अगदीच आडवाटेला असलेला वाघदरवाजा करून आली होती.. खरंच रायगडच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाच्या पुसट खुणा कुठे ना कुठे दडल्या आहेत.. हे सगळं पाहण्यासाठी यावं एकदा तीन दिवसाच्या मुक्कामावर अस मनोमन विचार करून आम्ही वरती आलो...

चिऊला बाजारपेठेच्या रिक्त जागा दाखवत आम्ही आता जगदीश्वर मंदिराकडे चाललेलो.. अर्थात डावीकडच्या धारदार टकमक टोकाकडे लक्ष जाणारच.. पण आधी मंदिर नंतर त्या कड्यावर.. एव्हाना सकाळपेक्षा गर्दी वाढलेली.. गडबड गोंधळ सुरु झालेला.. टकमक टोकावरून हल्लागुल्ला करणारे आवाज कानी पडत होते.. रायगडावरची शांतता लुप्त झालेली..

 होणारी गर्दी ही टप्प्याटप्प्याने सुरु होती.. त्यामुळे एक जथ्था पुढे सरकला कि मग आम्ही.. मागून दुसरा जथ्था येईपर्यंत तेवढीच मोकळीक.. याचप्रकारे जगदीश्वर मंदिरात गेलो.. पण गाभाऱ्यात प्रवेश होताच अंतर्मुख व्हायला होतेच.. ओम नमः शिवाय हे स्वर आपसुकच ओठात येतात.. गाभाऱ्यातच बसकण मारलेली.. त्यामुळे मागचा जथ्था आला.. त्याच्यामागून एक.. आणि पुन्हा कल्लोळ..! महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गर्दी कमी होईपर्यंत आवारातच वेळ घालवू लागलो.. हि गर्दी टिपिकल होती.. फक्त रायगड दर्शनासाठी घाईघाईत आलेली.. लिंबू सरबत, ताक पिण्यासाठी आलेली.. नि लगेच परतीची वाट धरलेली..

गर्दी ओसरेपर्यंत जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून मेघडंबरी, नगारखाना, होळीचा माळ, स्तंभ असा नजरेत भरणारा सर्व परिसर बघत बसलो.. आता सांजकाळी रायगडावरून सूर्यास्त बघण्याचे मनसुबे होते.. पण अचानक पावसाळी वारे  वाहू लागले.. काळ्या ढगांचा फेरफटका सुरु झाला.. काही मिनिटांतच वातावरणात झालेला बदल लक्षणीय होता.. संध्याकाळ होण्यास अवकाश होता पण आधीच अंधारून आले होते.. सुर्यास्त पाहण्याचा योग जुळून येण्याची आता अंधुकशीही आशा वाटत नव्हती.. 

गर्दी पांगली तसे आम्ही चालू पडलो.. टकमक टोकावर जे जाणे बाकी होते.. पण आता सभोवताली काहीतरी अजब घडतंय असच वाटत होते..वातावरणात आगळी वेगळी धुंदी चढली होती.. जगदीश्वर मंदिराकडून माघारी येताना उजवीकडे माथ्याचा आकार  पिंडीसदृश असलेला  एक डोंगर पावसाळी काळोखात अदभुत वाटत होता.. त्या डोंगरमाथ्यावर असलेल्या मेघकवचातून ढगांचे सुती पडदे जणू त्या डोंगराभोवती सोडले होते.. मंद हवेच्या तालावर हे पडदेही हलत होते.. बराच वेळ ते अनोखं दृश्य पाहत बसलो.. भटकंती करताना मिळणाऱ्या  निसर्गाविष्काराच्या अनुभतीमध्ये आणखी एक भर पडली होती.. माझ्यासाठी तर या दृश्यानेच रायगड भेटीचे सार्थक झाले..

- - - 

- - -

आता आम्ही टकमक टोकाच्या दिशेने चाललेलो.. पावसाळी काळोख पसरतच जात होता.. ढगांचे थवे  रायगडावर मुक्तपणे विहार करत होते.. पाऊस येण्याचे लक्षण दिसताच पर्यटक गर्दी देखील माघारी परतलेली.. आम्ही मात्र आता गडाची मूळ वाट सोडून टकमक टोकाच्या दिशेने खाली उतरलेलो..  इथं चिटपाखरू कोणी नाही म्हणून बायको व चिऊ थोडे टरकलेले.. त्यात ढगांच्या गच्च धुक्यामुळे पाच फुटापालिकडे नीटसं दिसत नव्हते.. पण अधून मधून वारा होता आणि तीच जमेची बाजू समजून मी दोघांना घेऊन पुढे निघालो..  जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ म्हणत पायाखालच्या वाटेवरील खुणा लक्षात ठेवत चालू पडलो... कोण जाणे गच्चं धुक्यात वाट भरकटलो तर..

टकमक टोक.. रायगडाच्या भव्यतेची शान वाढवण्यात हातभार लावणारा एक कडा.. त्याच्या टोकाकडे चालत जाणे म्हणजे स्वर्गात जाणारी वाट जणू.. दोन्ही बाजूने थरकाप उडवणारी दरी धुक्यात विलीन झालेली.. जोरकस हवा आली की त्या धुक्याला पडणाऱ्या छिद्रातून आजूबाजूचा परिसर पहायचा... आमच्या चिऊसाठी हे सगळं नवीनच.. हे सारं पाहून चकित व्हायचं की घाबरायचं हा प्रश्न तिला पडत होता..

आता टकमकच्या टोकावर.. दरीत घुमघुमणारा वारा वरती येऊन धडकत होता.. त्या तालावर भगवं निशाण फडफडत होते..  पायऱ्यांच्या वाटेने उतरणाऱ्या लोकांचा किलबिलाट ढगापलिकडून ऐकू येत होता.. पावसाचे थेंब टपाटप बरसू लागले होते.. आता जास्त वेळ थांबणं योग्य नव्हते.. गोमुख दरवाज्यापर्यंत घेऊन जाण्याचा मानस होता पण चिऊ व बायको दोघही मनस्थितीत नव्हते.. आणि पावसाचा वाढता जोर पाहून जोखीम घ्यायची नव्हती.. निघू म्हणेस्तोवर गोमुख दरवाज्याचे दर्शन झालेच..

धुक्यात वाट शोधत आम्ही पुन्हा मूळ पठारावर आलो.. मघाशी गर्दीचा सुरु असलेला किलबीलाट एव्हाना या धुंद वातावरणात लुप्त झालेला.. ताक लिंबू सरबत विक्रेते देखील गर्दीच्या मागोमाग गायब झालेले..  अशीही रिक्त असणारी बाजारपेठ आता नुकताच बाजार उठवलाय नि सारकाही शांत झालंय असे वाटत होते.. सदैव ध्यानस्थ अवस्थेत असलेले जगदीश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे टोक इथून स्थिरप्रज्ञ दिसत होते.. होळीच्या माळावर आलो तर दाट धुक्याचा दरबार भरला होता... राजेंच्या छत्रावर ढगांचा अभिषेक सुरु होता... तिथंच दोन मिनिटं घुटमळत राहिलो.. !

थोडी पेटपूजा करावी म्हणून आता रज्जूमार्ग स्थानकाजवळील उपहारगृह गाठायचे ठरवले.. पण पावसाने धुमशान सुरु केले.. या मोसमाच्या पावसात पहिल्यांदाच भिजण्याचे भाग्य लाभले होते तेदेखील रायगडावर.. अजून ते सुख कोणते.. पावसाची मोठी सर आली म्हणून नगारखान्याच्या आडोश्याला आलो.. तिथे तीन-चार पर्यटकांना एक छोटा गाइड आपली छाती फुगवून आपल्या छत्रपतींचा इतिहास जीव तोडून सांगत होता.. बाहेर धुवांधार पाऊस सुरु पण या प्रवेशद्वाराच्या वास्तूमध्ये या छोट्या गाईडचाच आवाज घुमत होता.. फक्त गडाचे महत्त्व, इतिहास सांगून त्यावर शिदोरी भागावणाऱ्या या गाईडलोकांचे पण कौतुकच.. कोणी इतिहास सांगून कमवतय.. कोणी चुलीवरची पिठलं-भाकरी विकून कमवतय.. तर कोणी ताक, लिंबू सरबत, काकडी विकून.. काळ लोटला.. पण आताही राजांची अशी कृपा येथील जनतेवर आहेच..!

पावसाचा जोर ओसरला नि आम्ही सदर, खलबतखाना वगैरे ओलांडून रज्जू मार्गाकडे जाऊ लागलो.. मध्येच रज्जूमार्गे आलेले एखाद- दुसरे पर्यटक भेटत होते.. म्हटलं आताच अंधार पडत चाललाय मग हे आता इतक्या कमी वेळात सगळं बघणार तरी कधी.. की नुसती धावाधाव करणार.. गडाचा अपमानच म्हणावा लागेल.. कदाचित फक्त राजांचे मुखदर्शन घेण्याचा मनसुबा असेल.. !

भर पावसात उपहारगृह गाठून खादाडी आटपून पुन्हा होळीचा माळ येईपर्यंत बायको व चिऊची चांगलीच दमछाक झाली.. खरं तर उद्या पायरीमार्गे उतरायचे होते पण यांना झेपणार नाही तेव्हा बघू काय ते म्हणत खोली गाठली.. 

पावसाने एन्ट्री मारल्यामुळे संध्याकाळ खूपच लवकर आटपली गेली.. आता वेळ कसा घालवायचा प्रश्न होता.. पावसाचे आगमन निर्गमन चालूच होते..  खोलीवर आल्यावर कळले कि स्वप्नील पवार व टीम पत्र्याच्या शेडखाली मुक्कामाला होते.. तिथेच तंबू ठोकला होता.. तर एका बाजूला चुलीवर चहा बनवण्याचा कार्यक्रम सुरु होता.. चिऊला हे सगळं नवीनच होतं.. त्या ग्रुपबरोबर गप्पाटप्पा मारण्यात मस्त वेळ गेला.. चिऊला तंबूच आकर्षण वाटत होतो सो ती जास्त वेळ तंबूतच रेंगाळत राहिली.. या टीमने मागे हरिश्चंद्रगडावर पुष्करणी तलाव स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.. त्याची फिल्म युट्युबवर मस्तच गाजलेली.. आणि आता इथे रायगडावर फोटोग्राफीसाठी गेले चार दिवस मुक्कामाला होते !!!

रात्रभर पावसाने पत्रे दणाणून सोडले..  त्या आवाजातही झोप कधी लागली कळलं नाही.. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वप्नील व टीम यांचा आणि त्या मामांचा निरोप घेऊन निघालो.. अपेक्षेप्रमाणे चिऊ व बायको दोघंही पायारीच्या वाटेने जाण्यास निरुत्साही होते..  पुन्हा कधीतरी म्हणत रज्जूमार्गाची वाट धरली.. पुन्हा एकदा निरव शांततेत शिवरायांना अभिवादन करून निरोप घेतला.. 

आता रज्जूमार्गच्या स्थानकात... खालून ढगांचे जथ्थेच्या जथ्थे धडकत आहेत !! आता या दरीत उडी घेण म्हणजे हा देखील एक विलक्षण अनुभवच.. रज्जूमार्गच्या डब्यात बसायचे नि या ढगांत लुप्त व्हायचे.. ! बस्स..

ढगांच्या गुंत्यातून आम्ही खाली सरकलो.. हिरकणीवाडी नजरेस पडली.. आणि रायगड भूमी सोडल्याची जाणीव झाली.. !

फार जास्त काही फिरलो नाही वा संपूर्ण रायगड धुंडाळता आला नाही.. कसलाही उद्देश उरी न बाळगता गेलो होतो त्यामुळे मनसोक्त फिरता आले होते.. धुंद पावसात भिजलो होतोेे.. खरच गर्दीविना शांततेत रायगड काय वाटतो हे एकदा तरी अनुभवावे..! तिन्ही प्रहारात गड वेगळा वाटतो.. गडफेरी मारता मारता तुम्ही नकळत गडाच्या प्रेमात पडतात.. शिवरायांचे आपसूकच स्मरण होते आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा रायगड भेटीची ओढ वाढत जाते.. !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्दी नको म्हणून गुरु-शुक्रवार असे मधलेच दोन दिवस निवडले होते, हे बर केले. बाकी वर्णन मस्तच.

कोणी इतिहास सांगून कमवतय.. कोणी चुलीवरची पिठलं-भाकरी विकून कमवतय.. तर ताक, लिंबू सरबत, काकडी विकून.. काळ लोटला.. पण आताही राजांची अशी कृपा येथील जनतेवर आहेच..!
>> खरंय!

दगडु भौ , लै भारी मुहुर्त निवडला , रायगडाबद्द्ल लिहायचा.... आज हनुमान जयंती...छत्रपतिंची पुण्यतिथी.... ज्या गडाने राज्याभिषेक पाहीला, त्यानेच या छत्रपतींचा मृत्युयोग ही पाहीला,... रायगडावर बहुदा, सगळ्यात जास्त मारुतीची देवळ आणि चबुतरे आहेत,पण हनुमान जयंतीला पालखी निघते ती माझ्या राजाची....
यंदा माझे जाणे चुकले मित्रा, पण तुझ्या या लेखाने परत जणु पाल्खीला जाउन आल्याचे समधान मिळाले..... धन्यवाद... त्या साठीच
गड्पति नामाभिमान राजानांच शोभते ते या रायगडामुळेच....
किमान ३ दिवस काढा बाजुला रायगड बघायला ....मग बघा इथे पावलोपावली राजांच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवतात..

खुप सुंदर वर्णन आणि फोटोही.
मी सातवीत असताना, म्हणजे १९७३ साली गेलो होतो. त्यावेळी फक्त ती पत्र्याची शेड होती. कुठेही रेलिंग्ज नव्हते. मळेकर नावाचे एकच गाईड होते. रोपवे अर्थातच नव्हता पण महाराजांचा पुतळाही नव्हता. टकमक टोकावर भन्नाट वारा होता. पण आम्ही सगळे तिथे गेलो होतो.

रायगड, प्रतापगड आणि महाबळेश्वर अशी सहल होती. ५ दिवसांची.. खर्च वट्ट ४५ रुपये.

सुंदर!

वरच्या फोटोत तो टकमक टोका समोर दिसणारा महाकाय पहाड म्हणजेच पोटल्याचा डोंगर आहे का? ज्यावर मे १८१८ मध्ये मेजर हॉलने तोफा चढवुन अवघा रायगड भाजून काढलेला?

धन्स रे यो. मस्त फिरवून आणलास रायगड. गेले काही दिवस विचार चालू आहेच जाण्याचा. नुसता विचार नाही खूप खेच जाणवतेय. पण ह्या तळतळत्या उन्हात जायची हिम्मत होत नाहीये.

कोणी सांगेल का? मेच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात जावं का रायगडाला? रज्जुमार्गाने वर जाणे आणि परतताना उतरून येणे असा विचार आहे.

अगदीच नॉन ट्रेकर पब्लिक आणि काही चिल्लीपिल्ली असा बेत आहे. बोरिवलीहून रात्रीत निघून सकाळी पोहोचून पुन्हा रात्रीत निघून तिसर्‍या दिवशी सकाळी बोरिवलीत पोहोचणे, जमण्यासारखे आहे ना?

धन्यवाद.. _/\_ Happy

सगळ्यात जास्त मारुतीची देवळ आणि चबुतरे आहेत, >> माहित नव्हतं..

@ दा.. १९७३ !!! सही वाटत असेल तेव्हा तर...
@ प्रसाद.. ठाउक नाही रे.. कन्फर्म करायला हव..
@ वेल.. मे महिन्याच्या दुसर्या तिसर्‍या आठवड्यात जाण्यास काही हरकत नाही.. मुक्काम असेल आधीच बुकींग करुन ठेवा.. सुटटीचे दिवस आहेत गर्दी असू शकते.. ! शक्यतो शनिवार रविवार सोडून जायचे बघा..