आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 18 April, 2016 - 23:13

गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी..

HealthApps.jpg

‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल. मोबाईल हा संपर्कक्षेत्राच्या साधनांमधील एक चमत्कार आहे. त्याची व्याप्ती आता केवळ संपर्कापुरती मर्यादित राहिली नसून तो आता प्रतिसंगणकाचे रूप धारण करत आहे.
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती मोबाईलला बरोबर लागू पडते. बाजारातील कंपन्यांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे आपल्याला हव्या त्या बजेटमध्ये, आपल्याला हव्या असणा-या सुविधा असलेला फोन घेणे आता सर्वसामान्यांना सहज शक्य होत आहे.
संगणक वापरून आपण जी काही कामे करत होतो ती सर्व आता मोबाईलद्वारे करणे शक्य होत आहे. मोबाईल तंत्रज्ञान आपल्याला वेगवेगळी ‘अ‍ॅप्स’ फ्री किंवा सशुल्क उपलब्ध करून देते. त्याचा वापर बँकिंग, खरेदी, तिकीट बुकींचे (वाहतूक + मनोरंजन) टाईमटेबल, फोटो काढणे, रेडिओ, मनोरंजन, खेळ अशा नानाविध गोष्टींसाठी करता येतो.
आजकालची तरुण पिढी ही टेन्कोसॅव्ही आहे. वेळेचा अभाव, पैशाची उपलब्धता यामुळे ऑनलाईन सर्व गोष्टी करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे.
वैद्यकीय विषयाशी निगडित जी अ‍ॅप्स आहेत त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे सर्वेक्षणाद्वारे दिसून येते आहे.
या घडीला ५०,००० वैद्यकीय अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत आणि जवळजवळ ५० कोटी लोक त्याचा वापर करत आहेत.
वैद्यकीय विषयातील सर्वात जास्त वापरली जाणारी अ‍ॅप्स ही आहार, लठ्ठपणा, लठ्ठपणा कमी करणारे विविध प्रकारचे आहार, वेगवेगळ्या अन्नघटकांतून मिळणा-या कॅलरीज, विविध प्रकारचे व्यायाम प्रकार त्यातून जळणा-या कॅलरी, त्याचे फायदे/तोटे याविषयी मार्गदर्शन करणारी आहेत. काही अ‍ॅप्स ही मधुमेह रक्तदाब मोजणारी आहेत. फक्त बोट स्क्रीनवर ठेवा आणि तुमचे बीपी किंवा मधुमेह किती आहे ते जाणून घ्या.
मुंबईतील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात डॉक्टरकडे जाऊन प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षा आणि मोबाईलवरील रीडिंग यात फारच तफावत असते असे आढळून आले आहे.
आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यात ‘पी हळद नि हो गोरी’ वृत्ती जनमानसात वाढत आहे. लोकांनी समजून घेतले पाहिजे की प्रत्येकाची शरीररचना, चयापचय, अनुवंशिकता, आरोग्य, अन्नघटक, जेवणाखाण्याच्या सवयी, राहणीमान भोवतालचे पर्यावरण हे भिन्न असते. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो.
उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सवरील घटकांचा विचार न करता लोकांना त्यांचे आरोग्य, आहार दिनचर्या, व्यायाम याविषयी चुकीचे मार्गदर्शन करून दिशाभूल करणारी असतात.
विशेषत: वजन कमी कसे करावे, याविषयीचे विविध अ‍ॅप्स वापरून व्यक्ती स्वत:ची दिशाभूल करून घेत आहेत, असे मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. हीच बाब मधुमेह, रक्तदाब या विषयांवर माहिती देण्याऱ्या अॅप्सना सुध्दा लागू आहे. दिल्लीतील मधुमेहतज्ज्ञ सुधीरकुमार यांनी या अ‍ॅप्सची वाढती लोकप्रियता आणि त्यांनी दिलेली हमी याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.
काही लोक आपली लक्षणे रोगाचे निदान करणा-या अ‍ॅप्सवर टाकून आपल्याला कोणता आजार किंवा रोग झाला आहे हे स्वत:च ठरवतात आणि मन:स्ताप करून घेतात.
प्रत्यक्षात डॉक्टरकडे गेल्यावर यातला कोणताही आजार किंवा रोग त्यांना झालेला नाही असे दिसून येते. काही लोक औषधांची माहिती देणा-या अ‍ॅप्सचा वापर करून स्वत:च कोणती औषधे घ्यायची हे ठरवतात.
ही जी काही विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ती काही कोणी प्रमाणित केलेली नसतात. त्यांच्या सत्यतेबद्दल आपण कशी माहिती मिळवणार, कशी खात्री करून घेणार हाही एक अनुत्तरित प्रश्नच आहे. ब-याचशा अ‍ॅप्सचे मूळ हे परदेशी आहे. ती त्यांच्या राहणीमानावर आधारित असतात.
इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी हवी ती माहिती आपल्याला बोटावर चुटकीसरशी मिळवता येते. पण माहितीचा योग्य वापर करण्यासाठीसुद्धा कौशल्य आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याचा आपल्याला विसर पडता कामा नये.
वेळ नाही म्हणून आपण सगळ्याच गोष्टींसाठी (विशेषत: आरोग्य) अ‍ॅप्सच्या मृगजळामागे धावणारा असू तर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतील.
मोबाईल अ‍ॅप्सच्या ‘फॅड’ला वेळीच आळा घातला नाही, तर मोबाईल कंपन्यांचा नफा फक्त वाढेल आणि ग्राहकांच्या पदरी मात्र निराशाच येईल.
- ममता आठल्ये, मुंबई ग्राहक पंचायत
पुर्वप्रसिध्दी - दैनिक प्रहार - प्रतिबिंब

मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅपचे व्यायाम व डायेट वापरून मला खूपच फायदा झाला आहे. लेखात लिहिलेले सगळे चेतावणी इशारे डॉक्टर लोकांनी किंवा डायेटीशियन यांनी दिलेले दिसतात. या लोकांचा नफा अ‍ॅपमुळे कमी होऊ लागल्यावर अशा प्रकारे अ‍ॅपची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे.
तसेच अ‍ॅप वापरून आपल्याला दिलेल्या औशधाचे जनेरिक औषध कोणते मिळेल तेही शोधणे सोपे जाते. व आपले पैसे वाचतात.

लेख आवडला नाही. कुठली apps वाईट आहेत, हे नावानिशी न सांगता भोंगळ टीका केलेली वाटली. १-२ डॉक्टरांचे वाईट अनुभव आले की सगळे डॉक्टर वाईट नाहीत, तसच काही apps खराब असतील. सगळीच ही असू शकतील, पण मग तुलनात्मक फरक इ. वाचायला आवडले असते. apps वापरताना काय काळजी घ्या, सल्ले मूठभर मिठाबरोबर घ्या, कुठे थांबा असं काही लिहिलं असतं तर गुणात्मक फायदा झाला असता.
हा लेख घाबरवून टाकणारा वाटला आणि म्हणूनच आवडला नाही. ग्राहक पंचायत आयडीने लिहिल्याने प्रतिक्रिया ठोस आणि स्वच्छ नकारात्मक दिली आहे. पर्सनल आयडीने दिशाभूल आणि एखाद्या संघटनेच्या आयडीने असं लिहिणं यात फरक केलेला आवडेल.
धन्यवाद.