स्फुट ७ - थर्डक्लास तारे

Submitted by बेफ़िकीर on 13 April, 2016 - 04:27

वेळी-अवेळी, दुपारी वगैरे
वॉचमनला थोडे खुष करून
सोसायटीत येऊन
अनोळखी घरांच्या बेल्स वाजवून
आपला अपमान होईल ह्याचे भान ठेवून
स्पष्ट नकारासाठी तयार होऊन
तोंडावर दार आपटले जाईल हे मान्य करून
ओरडाआरडा होईल ह्याची जाणीव ठेवून
'हाऊ कॅन यू जस्ट नॉक द डोअर'
असे खेकसून घ्यावे लागेल हे गृहीत धरूनही

ज्या कृत्रिम नम्र चेहर्‍याने
अजीजीयुक्त मैत्रीपूर्ण स्मितहास्याने
साखरेत बुडवलेल्या शब्दांनी
मान तुकवून अभिवादन करत
एक अक्षरही उलटे न बोलता
अजिबात आग्रही भूमिका न घेता
ज्या तटस्थपणे
समोरचे दार आपटले गेले की
तू दुसरे दार वाजवायला जातोस

अरे दारोदारी फिरत्या विक्रेत्या

तितक्याच विरक्तपणे
कित्येक सुसंधी
शेकडो नवीन वाटांची चिन्हे
लाखो यशोमार्गांचे कवडसे
अनेक प्रेरणांच्या तिरीपी
कैक स्फुर्तींच्या लहरी

क्षणोक्षणी,अवकाशातून येत

प्रत्येक माणसाच्या मनाची बेल दाबत असतात
त्यांनाही कोणीतरी आत घ्यावे असे वाटत असते
त्यांनाही असतात मानापमान
त्यांच्यातही असते अजीजी, काहीशी लाचारी
त्यांनाही विकायचे असते स्वतःला
बदल्यात मिळवायची असते टिचभर जागा स्थिरावण्यासाठी
आपल्या मनात

पण ताणतणाव
मत्सर
कारस्थाने
संताप
हपापलेपण
दुराभिमान
ह्या गुंडांनी
मनांचे सातबारे स्वतःच्या नांवे करून घेतलेले असतात

आणि मग माणसे आपटतात धाडकन
आपल्याच मनाची दारे
ह्या अश्या सुसंधींवर

तुझा अपमान करणार्‍यांनी
त्याआधी काहीच क्षण
कैक आशांचा, दिलाश्यांचा, शाबासक्यांचा, सुसंधींचा
असाच अपमान केलेला असतो

तू रात्री घरी पोचतोस
बूट काढतोस
खिशातले सगळे भिरकावतोस
बायकामुलांवर खेकसतोस
जेवून विडीकाडी ओढतोस
दुनियेला चार शिव्या देतोस
आणि होतोस आडवा
तोंडात आणि मनात कडवटपणाचे प्रमाण वाढवून

आणि ह्या सुसंधी, प्रेरणा, स्फुर्ती वगैरे?

त्यांनाही कोणाच्याच मनाची जागा मिळालेली नसते
त्यामुळे त्या तुझ्यासारख्या घरी जाऊच शकत नाहीत
घरच्यांवर खेकसूही शकत नाहीत
त्यांना भूक नसल्यामुळे जेवतही नाहीत त्या
त्यांना तोंड आणि मन नसल्याने
त्या कडवटपणालाही आपलेसे करू शकत नाहीत

त्यांचे होतात मग अब्जावधी तारे
आणि जमतात आकाशात
वरून बघतात अभागी मानवाच्या मर्यादीत बुद्धीचे भणंग आविष्कार
हसतात, चमचमतात, काही काही तर हसता हसता निखळतातही

तेव्हा तू आणि तुझ्या तोंडावर दारे आपटणारे
आपापल्या बिछान्यावर उताणे पडून
खिडकीतून ह्याच सुसंधींकडे बघत असतात
हपापल्यासारखे
संतापल्यासारखे
आणि देत असतात शिव्या नशिबाला
आणि म्हणत असतात कडवटपणे
"साले माझे तारेच थर्डक्लास"

=======================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी हे खरेच छान जमले आहे. मी दोन महिने युरो क्लीन व्हॅक्युम क्लीनर दारोदार बॅग घेउन डेमो देउन विकले आहेत अ‍ॅक्वागार्ड सुद्धा. त्यामुळे अगदीच पोहोचले. मी निगेटिव्ह इमोशन्स बाहेर ठेवते उलट त्यामुळे मन कायम प्रकाशमान आणि अश्या काही निगेटिवीटी समोर आल्या कि त्या तश्याच वाटेला लावते परत आपले शायनी हॅपी. चालू. बट यू पुट इट इन बेटर वर्डस.

आवडले. खुपच सुरेख.

खासकरुन हे:

'आणि होतोस आडवा
तोंडात आणि मनात कडवटपणाचे प्रमाण वाढवून'

जितका कडवटपणा वाढवु, तितकाच ताण वाढत जाउन आपणच गर्तेत जातो, हेच खरे.

छान लिहिलंय..
"अरे दारोदारी फिरत्या विक्रेत्या" असा उल्लेख नसता, तरी कोणाबद्दल लिहिलंय हे व्यवस्थित पोचलं असतं असं वाटलं. कृ.गै.न.

छान Happy