इंडियन रेल्वेज् (सुधारित)

Submitted by पराग१२२६३ on 11 April, 2016 - 14:17

इंडियन रेल्वेज्

नक्की दिनांक माहीत नाही, पण भारतीय रेल्वेकडून स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक माहितीपूर्ण मासिक प्रकाशित होत आहे. 'इंडियन रेल्वेज्' या नावाने प्रकाशित होणारे हे मासिक रेल्वेप्रेमींच्या दृष्टीने एक महत्त्वाचे प्रकाशन ठरत आहे. या मासिकामध्ये रेल्वे मंत्रालयाचे निर्णय, रेल्वे यंत्रणेवरील घडामोडींचा समावेश असतोच, शिवाय रेल्वे, पर्यटन, योग इत्यादी विषयांवर लेखन प्रकाशित होत असते. वेगळ्या पद्धती मांडणी असलेले हे मासिक सर्वांसाठी हिंदी (भारतीय रेल) आणि इंग्रजी (इंडियन रेल्वेज्) भाषांमधून उपलब्ध आहे.

IMG_20160411_0001.jpg

साधारणपणे मे ते मार्च या काळात हे मासिक ७० पानांचे असते, तर एप्रिलचा अंक भरगच्च असतो, २२५ पानांचा. एप्रिलचा अंक इतका मोठा असण्याचे एक कारण म्हणजे त्यात गेल्या वर्षातील रेल्वेच्या प्रत्येक विभागाच्या, उत्पादन केंद्राच्या कामकाजाचा आढावा असतोच; शिवाय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्य मंत्री यांची मनोगतेही असतात. एप्रिलचा वार्षिक अंक म्हणून ओळखला जातो. किंमतीच्या मानाने हे मासिक अतिशय उत्कृष्ट ठरते. कारण छपाई स्पष्ट, पानांचा दर्जाही चांगला असतो. दर महिन्याचा अंक १० रुपयांना, तर एप्रिलचा वार्षिक अंक मिळतो फक्त ४० रुपयांना.

भारतीय रेल्वे हा माझ्या हृदयाला भिडणारा विषय असल्याने मी इंटरनेटवर रेल्वेचे चांगले एखादे पुस्तक वगैरे आहे का हे शोधत असताना रेल्वे मंत्रालयाच्या या प्रकाशनाची माहिती मिळाली. थोडं अधिक शोधून त्याचा पत्ता आणि वर्गणीविषयीची माहितीही मिळवली आणि या प्रकाशनाचा वर्गणीदार होण्याचा निर्णय घेतला. मग वार्षिक वर्गणीही पाठविली ८० रुपयांची. वर्गणीचा आकडा बघून मनात विचार येऊन गेला की, प्रकाशनाची छपाई सुमारच असणार बहुतेक, आठ-दहा पानांचे प्रकाशन असेल बहुतेक इत्यादी-इत्यादी. मग जून-२००३ मध्ये पहिला अंक हातात पडला. अंक पाहून अचंबितच झाले. कारण माझ्या शंकाना जबर धक्का बसविणारा तो अंक होता. पानांचा चांगला दर्जा; स्वच्छ, चांगली, स्पष्ट छपाई; माहितीपूर्ण मजकूर आणि फोटो इत्यादींचा त्यात समावेश होता. या मासिकातील प्रत्येक प्रत्येक लेख-बातमीत शक्यतो फोटोंचा समावेश असतो. मग असा अंक हातात पडल्यावर वर्गणीदार होण्याचा निर्णय किती चांगला होता याचा माझा मला अभिमान वाटू लागला. तेव्हापासून आजपर्यत या मासिकाच्या अंतरंगात बदल होत गेलेले पाहायला मिळाले.

त्यानंतर सन २००४ चा एप्रिल आला. तेव्हा या मासिकाचा वार्षिक अंक निघतो याची कल्पना नव्हती. त्या महिन्यात पोस्टमनने आता ओळखीच्या झालेल्या पाकिटातील 'इंडियन रेल्वेज्' अंक पेटीत टाकला होता. पाकीट हाताला जाडजूड लागल्यावर मला वाटले होते की, चुकून एका पाकिटात दोन-तीन अंक घातले गेले असतील. मग घरात जाऊन गडबडीने पाकीट उघडून पाहिले तर काय, साधारण २०० पानांचा वार्षिक अंक होता त्यात. पुन्हा मी अचंबित झालो. भारतीय रेल्वेवरील प्रत्येक विभागाच्या, कारखान्याच्या वार्षिक कामगिरीचा आढावा त्यात होता. त्याचबरोबर रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांचे लेख आणि रेल्वेत होत असलेले संशोधन यांचाही या मासिकात सातत्याने समावेश होत असतोच.

रेल्वे मंत्रालयाच्या या माहितीपूर्ण प्रकाशनाचा मी गेली १३ वर्षे नियमित वाचक आणि लेखकही आहे. तेव्हापासून या मासिकाची दर महिन्याला आतूरतेने वाट पाहण्याची सवय लागली आहे. आणि एप्रिल आला की, याचा वार्षिक अंक कधी हातात पडतोय असे होते. हा वार्षिक अंक आकर्षक वाटत असल्यानेच मी त्याच्या आजपर्यंतच्या प्रती जपून ठेवलेल्या आहेत. असाच यंदाचा एक उत्कृष्ट वार्षिक अंक ११ एप्रिलला हातात पडला आणि या मासिकाबद्दल छोटेसे विवेचन करावेसे वाटले.

रेल्वे काहीच करत नाही, आपली रेल्वे जुनाट कशी आहे, हे आणि असे विचार मांडणाऱ्यांसाठी हे प्रकाशन रेल्वे काय करते हे थोड्या प्रमाणात का असे ना पण माहीत करून घेण्याचे एक साधन ठरू शकते.
---000---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहीती Happy भा.रे. जिव्हाळ्याचा विषय आहेच!
हे मासिक कसं, कुठून मागवायचं; वर्गणी कशी, कुठे भरायची याचीही माहीती द्याल का कृपया?

रेल्वे काहीच करत नाही, आपली रेल्वे जुनाट कशी आहे, हे आणि असे विचार मांडणाऱ्यांसाठी हे प्रकाशन रेल्वे काय करते हे थोड्या प्रमाणात का असे ना पण माहीत करून घेण्याचे एक साधन ठरू शकते.

जितक्या प्रचंड प्रमाणात माल वाहतूक अन प्रवासी वाहतूक भारतीय रेलवे जितक्या किफायतीशीर किमतीत अन बऱ्यापैकी वेळेवर करते तितक्या वेळात अन किमतीत तितकीच् क्वांटिटी इतर कुठल्याही तथाकथित अतिप्रगत रेलवे प्रणाली ने करून दाखवावी तेव्हा मानले जाईल!!

ते येऱ्यागबाळ्याचे काम नोहे! तेथे हवी फ़क्त इंडियन रेलवे

छान माहिती. या नियतकालिकाबद्दल ऐकले आहे पण वाचलेले नाही कधी. आता पुन्हा कुतूहल आहे. बघतो मिळते का.

>>हे मासिक कसं, कुठून मागवायचं; वर्गणी कशी, कुठे भरायची याचीही माहीती द्याल का कृपया?
ही माहिती येथे द्याच, अनेक रेल्वेड्यांना त्याचा उपयोग होईल. Happy

छान माहिती. या मासिकाबद्दल माहिती नव्हतं.>> +1

जितक्या प्रचंड प्रमाणात माल वाहतूक अन प्रवासी वाहतूक भारतीय रेलवे जितक्या किफायतीशीर किमतीत अन बऱ्यापैकी वेळेवर करते तितक्या वेळात अन किमतीत तितकीच् क्वांटिटी इतर कुठल्याही तथाकथित अतिप्रगत रेलवे प्रणाली ने करून दाखवावी तेव्हा मानले जाईल!!>>>>>>> +100

?

मंदार डी,

साहेब, मला ठोकुन द्यायची सवय नाही , असो!.

Let me know of u r negatively prejudiced about IR if so I would use my right to abstain and withdraw from trying to explain u anything. if u r open for discussion and are flexible enough to accept the numbers I shall be more than happy to contend my case for the "FOR" side.

And BTW

AT ANY GIVEN MINUTE THE TOTAL PASSENGERS SITTING IN ROLLING STOCKS OF IR IS EQUIVALENT TO THE ENTIRE POPULATION OF THE NATION OF AUSTRALIA Happy

मस्त माहिती पराग!
या नियतकालिकाबद्दल माहिती नव्हतं. पण जिव्हाळ्यापोटी ट्रेन्स अ‍ॅट ग्लान्सही खूपच बारकाईने वाचायची सवय लागली होती, २००३ च्या आसपास ५-६ वर्ष नियमितपणे ट्रेन्स अ‍ॅट ग्लान्स विकत घेतली, पण त्यानंतर भ्रमंती थांबली, आयआरसीटीसी ब्राऊज करण्याची सवय लागली आणि पुस्तकाचा संबंध जवळपास सुटलाच.
रेल्वेच्या या नियतकालिकाविषयी काहीच माहिती नव्हती.

Just check the Indian Railways and Chinese railways freight handling/overall comparison on net. The difference is too big. Anyway I am deleting my comment as it looks like you got hurt by my comment. Sorry.

मस्तच! आता 'पाणी एक्सप्रेस'मुळे तर भारतीय रेल्वेला मानाचा त्रिवार मुजरा आहे!
भारतीय रेल जिंदाबाद _/\_

ट्रेन्स अ‍ॅट अ ग्लान्समधेच किती रंगून जायला होतं Happy आता हे मासिक बघायला हवं.
थँक्स पराग, खजिन्यात नवी नवी भर घालताय दर वेळेस.

छान माहिती ! एप्रिलचा अंक कुठे मिळेल? कस्स कायवर आज मा. प्रभुनी काय काय केलं माहिती आलीये ...

सुंदर ओळख करुन दिलीय.

रेल्वेची बुकिंग प्रणाली ज्या कंपनीने तयार करुन दिली, त्या कंपनीशी माझा काही काळ संबंध होता. इतकी क्लीष्ट प्रणाली, ज्या कार्यक्षमतेने हाताळली जातेय त्याला तोड नाही. सी. एस. टी. ला जाऊन बूकिंग करणे हे आता आनंदाचे काम झालेले आहे. त्यानंतर मोबाईल वरुन पी एन आर बघत राहणे... ग्रेट.

सामान्यतः आपल्या धडाडीच्या मीडियापासून (विशेषतः मराठी बाण्याच्या आणि जग जिंकायला निघालोय असा दावा करणाऱ्या) रेल्वेने केलेल्या सुधारणा कायमच लपून राहिलेल्या आहेत. त्यांचे त्याकडे लक्षच जात नाही. कारण तसे करणे त्यांना झेपतही नाही आणि त्यांच्या मते, तसे करणे म्हणजे सरकारचा उदोउदो करणे. यामुळेच हे मासिक अतिशय मोहक वाटते.

हे मासिक कसं, कुठून मागवायचं; वर्गणी कशी, कुठे भरायची याचीही माहीती द्याल का कृपया?>>>>>>>>>

मासिकाची वर्गणी कुठे भरायची याची माहिती
http://indianrailwayemployee.com/content/indian-railway-magazine या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.