एक कधीही न झालेली चॅनलीय चर्चा

Submitted by वाट्टेल ते on 1 April, 2016 - 15:49

टायमध्ये गळा आणि pant मध्ये आवळलेले पोट टेबलाच्या आड दडवलेला, एक भक्कम आवाजाची देणगी लाभलेला चर्चेचा सूत्रधार सुरुवातीला एकटा दिसत आहे. काही वेळाने अजून काही लोक दिसतील आणि शेवट होईपर्यंत अख्ख्या चर्चेत फक्त तोच एकटा “बस मै ही मै हू “ म्हणणाऱ्या, महाभारतात रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या कृष्णासारखा भासेल. असो तर ९ च्या ठोक्याला एक वादळी music वाजते, रणशिंग फुंकले जाते. camera ३६० अंशांचा कोन करून येतो व एका मोठ्या प्रश्नचिन्हावर स्थिरावतो.

सूत्रधार - नमस्कार, मी अमूक तमूक jklmnop चॅनलवर आजच्या प्रश्न कम तांडव कम गप्पा कम थापा कम खडाजंगी कम आता करा नळावरची भांडणे TV वर मध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे (अगदीच दुसरे काही न सापडल्याने) सध्या असहिष्णुता वाढल्यासारखी वाटते का ? आपल्याबरोबर चर्चेसाठी अत्यंत मोठे मान्यवर विचारवंत आलेले आहेत. आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला पाठवू शकता facebook, twitter इत्यादी इत्यादी वर

Commercial break - प्रायोजक “महभृंगराज तेल - डोकेदुखी घालवी तत्काळ ! थोडासा मसाज आणि बुद्धी चाले अफाट”

यावेळी फक्त ९० अंशाच्या कोनात फिरून कॅमेरा पुन्हा प्रश्नचिन्हावर.

सूत्रधार - आज आपल्या studio मध्ये आल्या आहेत जेष्ठ लेखिका, समाजशास्त्राच्या अभ्यासक आणि आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात राहिलेल्या दुर्गाबाई भागवत.

बाईंवर camera. त्या त्याचं जुजबी पण प्रसन्न हास्य करून नमस्कार करतात.

सूत्रधार - आणि आपल्याबरोबर पुण्याच्या studio मधून आहेत महाराष्ट्रभूषण आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु ल देशपांडे. आजपर्यंत चर्चेसाठी दुर्गाबाई किंवा पु. लंना बोलवायच राहून जात होतं कारण दुर्गाबाई बोलायला लागल्या की चर्चेला फारसा वाव राहणार नाही आणि पु. ल. बोलायला लागले की आपण सगळेच जण चर्चा विसरून फक्त हसत बसू . पण आपण आज त्यांना मुद्दाम आमंत्रित केलं आहे कारण इन्दिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या वेळी या दोघा जेष्ठ साहित्यिकांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. आज भाजप - मोदींच्या राज्यात पण तशीच वेळ आली आहे का? एकीकडे पुरस्कार वापसी चालू आहे, दुसरीकडे दाभोलकर, कॉम्रेड पानसरे अशा साहित्यिकांच्या हत्या होत आहेत. रोहित वेमुल्ला आणि कन्हय्या सध्याच्या पिढीचे नवीन हिरो होत आहेत. एकून समाजात भयंकर अस्वस्थता आहे. तेव्हा या ठिकाणी असहिष्णूतेवर या जेष्ठ लोकांची मतं जाणून घेऊया. पहात रहा आजचा ********.

Commercial break - प्रायोजक कडक bagpiper whiskey ची शाहरुख खानची व अमूल बटर ची अमिताभ बच्चनची advertisement. शेवटी नेहमीप्रमाणे ९० अंशाचा कोन व प्रशचिन्ह आणि चर्चा सुरू .

सूत्रधार - दुर्गाबाई, आजच्या असहिष्णूतेबद्दल आपलं मत काय ? आपण आणीबाणीच्या काळात पद्मश्री सुद्धा नाकारली होती. मग आपला या सर्व पुरस्कार वापसीला पाठींबा आहे का?

दुर्गाबाई - लेखक , विचारवंतांवर बंधनं आली की विचार मरतो. मुक्त विचार संस्कृती पुढे नेत असतात. जेव्हा जेव्हा विचारवंतांवर बंधनं येतात तेव्हा तेव्हा जगात सर्वत्र अशा प्रकारचा विरोध झाला आहे. अगदी बुद्धाच्या काळात..

सूत्रधार - पण आजचे सरकार आणि आपल्या विचाराचे सरकार आहे म्हणून सोकावलेले सर्व हिंदुत्त्ववादी लोक अशा विचारांना विरोध करत आहेत आम्ही म्हणू तेच बरोबर, तीच राष्ट्रभक्ती असा दावा करत आहेत.

दुर्गाबाई - हो, समविचारी सरकार असल्याने त्यांना नव्याने बळ मिळाले आहे. पण या सर्व लोकांना विरोध करणाऱ्यांनी याबद्दल बोलण्याचा स्वत:चा नैतिक अधिकार गमावला आहे. याला कारण आपल्याकडचे pseudo secular लोक आहेत त्यांचे वागणे.हुसेन ला नग्न हिंदू देवदेवतांची चित्र काढायचा अधिकार आहे तसा रश्दीला platonic verses लिहिण्याचा किंवा मोहम्मदाचे कार्टून काढायचा अधिकार आहेत यावर तशाच पोट तिडकीने ते बोलत नाहीत. गुजरातेत अमानुष हत्या झाल्यावर माझ्याकडे पिस्तुल असते तर मोदींना मारले असे असते असे म्हणणाऱ्या तेंडुलकरांना ओमर अब्दुल्ला वगैरेंनी काश्मिरात जे चालवलं आहे त्याबद्दल काही विधान करावेसे वाटले असते का हा खरा प्रश्न आहे. सर्वांना एकाच तराजूत तोलण्याइतपत स्थितप्रज्ञा येण्यासाठी तुम्ही कोणाचे मिंधे असणे बरे नाही, याबाबत मी र. धों. कर्व्यांना मानते. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणारे कर्व्यांचे नाव घेत नाहीत किंवा राजारामशास्त्री भागवतांचे पण नाही. सावरकरांना मानणारे आता राज्यात आल्यावर गांधी आणि पटेल सुद्धा कसे आमचेच हे ही त्यांच्या सोयीने बोलत आहेत. ठाकरे बंधूंना तर त्यांचे प्रबोधनकार आजोबाही नाही आठवत. तरीही असे वाद चर्चा होणं हेच मुक्त संस्कृतीचं द्योतक आहे. त्यातूनच संस्कृती विकास पावते अशी माझी धारणा आहे.

सूत्रधार - पण म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूंना पाठींबा देताय … ( full toss - आता दुर्गाबाई यावर षटकार मारणारच)

दुर्गाबाई - मी माझ्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे कायम एक बाजू घेतलेली आहे. तळ्यात किंवा मळ्यात अशी विधाने केलेली नाहीत. लोकप्रियतेसाठी स्वत:च्या मनाला व बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना तुम्ही माध्यमे जवळ करता तसे करण्याचा दुटप्पीपणा मी कधीही केलेला नाही. बुद्धीच्या कसोटीवर सर्व गोष्टी पारखून घेतल्या की अंधभक्तीचा धोका कमी होतो. आमचे सर्व कुटुंब गांधी भक्त पण जेव्हा एका परदेशी बाईचे गांधींनी त्यांच्या आश्रमात मुंडण केले तेव्हा आम्हीच त्यांना विरोधही केला होता. पण तुम्हा माध्यमांची सगळी तऱ्हांच मुळी सुतावरून स्वर्ग गाठण्याची.

सूत्रधार - ( आता तरी याने गप्प बसावे ना, पण इतका कुठला धीर ? ) म्हणजे मरणोत्तर स्वर्गाची कल्पना आपल्याला मान्य आहे तर आणि त्यावरून होणारे शोषण ?

दुर्गाबाई - तुम्ही माझे म्हणणे सिद्ध करीत आहात. सुतावरून स्वर्ग गाठणे ही एक म्हण आहे . आपल्या शिक्षणपद्धतीने पद्धतशीरपणे भाषा बिघडवली आहे आणि मग असे प्रश्न विचारले जातात. जुन्या पठडीत शिकलेल्या आमच्यासारख्या लोकांच्या किंवा अशिक्षित समाजाच्या तोंडी वाक्प्रचार, म्हणीची रेलचेल असते. ती भाषाच सशक्त असते कारण ती संस्कृतीशी अखंड जोडलेली असते. माझे वाक्य पुरे व्हायच्या आधीच त्यावरून भलता अर्थ तुम्ही काढलात, हेच तुम्ही सर्वच बाबतीत करत असता. विषयाच्या खोलात जाणे, त्यासाठी अभ्यास करणे यासाठी तुम्ही वेळच देत नाही. दुर्गाबाईंनी आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी भूमिका घेतली, म्हणजे अशा सगळया विरोधकांच्या त्या ठेकेदार. बोलवा त्यांना ५ - ५० channel वर चर्चांमध्ये. तुमच्या चर्चेत तेच ते ४ -५ जण असतात, पुन्हा पुन्हा तीच मते ते मांडत असतात. त्यांची स्वत:ची एक धारणा असते त्यात अजून काहीही अभ्यास, चिंतन यांची भर होत नसते. मग जाणकार प्रेक्षकांनी का म्हणून तुम्हाला ऐकून घ्यावे ? सामाजिक असहिष्णूतेबद्दल १ तासात चर्चा होऊ शकत नाही, हा गमतीचा विषय नाही आणि चार बनचुक्या लोकांनी इथली तिथली माहिती जमवून त्याबद्दल बोलावे इतका कमी महत्वाचा तर मुळीच नाही. लोकांनी यासाठी प्राणांचे मोल दिले आहे. माध्यमांनी टीका केलीच पाहिजे मात्र तुमच्या कार्यपद्धतीवर कोणी टीका केली की ती तुम्हाला सहन होत नाही. अशा वेळी तुम्हाला इतरांना असहिष्णू म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.

सूत्रधार - ठीक आहे दुर्गाबाई, आपले म्हणणे लक्षात आलय. आता घेऊयात छोटासा break आणि break नंतर जाऊया पुण्याच्या आपल्या स्टुडियोत, महाराष्ट्रभूषण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु ल यांच्याकडे.

इतके होते तोवर प्रेक्षकांनी दहा हजार वेळा पाहिलेल्या जाहिराती. गलेमे खिचखिच - अमुक तमुक लो - आराम पाओ. घरोघरी TV mute होतात त्यामुळे घशाला नाही तरी कानाला निश्चित थोडासा आराम मिळतो. पु ल दिसू लागे पर्यंत mute राहते. पुन्हा कार्यक्रम. यावेळी फक्त ९० अंशाच्या कोनात फिरून कॅमेरा प्रश्नचिन्हावर

सूत्रधार - पु. ल., तुमचा विनोद निर्विष आहे. त्या विनोदाने कोणाला दुखवलेले नाही तर फक्त खळखळून हसवलेच आहे. आज असाच विनोद झेलण्याची परीस्थिती राहिली आहे का, तुम्हाला काय वाटते ?

पु. ल. - अरे, माझ्या विनोदाने लोक दुखावले गेले नाही आणि हसले , म्हणजे आपला समाज किती सोशिक आणि सहिष्णू आहे बघ. आणि इतक्या गंभीर चर्चेला माझ्यासारख्या विनोदी लेखकाला बोलावून अजून channel वर दगडफेक झाली नाहीये तर तो सोशिकपणा आणि सहिष्णुता वाढलीच असण्याची शक्यता आहे. नाहीतर विनोदी लेखकांना कोणीही इतक्या गंभीर चर्चेला प्रेक्षक म्हणून सुद्धा बोलावणार नाहीत.

सूत्रधार - (लाडात येत) भाई, तुम्ही कमाल करता. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल काय म्हणता याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष असते. एखादे पुस्तक किंवा नाटक चांगले आहे असे तुम्ही म्हणालात की ते धो धो चालते. अर्थात तुम्हीसुद्धा कशालाच वाईट म्हणत नाही, ती गोष्ट वेगळी. तेव्हा तरी पण सांगाच - काय वाटते तुम्हाला समाजात असहिष्णुता वाढलीये का?

पु. ल. - मी या शब्दाची २९ च्या पाढ्या पेक्षा जास्त धास्ती घेतलीये. या चर्चेला यायचं म्हणून गेले २ दिवस घरात नुसती चर्चा झडत होती त्यात असहिष्णुता हा शब्द मनाच्या श्लोकात मन जितके वेळा येतो त्यापेक्षा जास्त वेळा म्हटला गेला. जसे पट्टीचे गाणारे ख्याल, ठुमरी, दादरा काहीही गाउ शकतात, तसे आमच्या घरात सुनीता पट्टीची बोलणारी आहे, म्हणजे कच्चा पापड पक्का पापड वगैरे १०० पापड लाटून होईपर्यंत न थांबता बिनचूक ती म्हणू शकते. पण या असहिष्णुतेने मात्र तिची बोलती बंद केलीये. त्यामुळे असहिष्णुतेने बाहेर अस्वस्थता असली तरी आमच्या घरात बऱ्यापैकी स्वास्थ्य निर्माण झालय.

सूत्रधार - नाही भाई, तुम्ही प्रश्नाला बगल देऊ नका, सुनीताबाईंची बोलती असहिष्णुतेने बंद झाली म्हणजे काय? त्यांच्यासारख्या स्त्रीला सुद्धा ही समाजातली असहिष्णुता जाणवायला लागली म्हणजे ती समाजात निश्चितच वाढली आहे असे नाही का वाटत आपल्याला?

पु. ल. - अजून मला राज्यसभेत कोणी खासदार म्हणून पाठवल नाहीये आणि channel वरच्या चर्चेचा पण जास्त अनुभव नाही, त्यामुळे प्रश्नाला बगल देण्याची कला अवगत नाही. तिथे जाउनच शिकण्यासारखी गोष्ट आहे ती. तर झाले असे की, असहिष्णुता हा शब्द इतक्या वेळा म्हणताना ५० वेळा जीभ चावली जाऊन तुकडा पडायची वेळ आली. आपलेच दात आणि आपलीच जीभ, त्यामुळे दातांनी इतक्या वेळा चावून पण जीभेने तिचा नेहमीचा पट्टा सोडला नाही. शेवटी जिभेची दया येऊन असहिष्णूतेबद्दल चर्चा न करण्याचे सहिष्णु धोरण मी घरात ठेवले आहे.

break. कार्यक्रमाचे प्रायोजक Colgate Palmolive toothpaste - किटाणू वगैरे वगैरे आणि वाघ बकरी कडक चाय - सुबह सुबह फ्रेश हो जाय वगैरे वगैरे.

९० अंशाच्या कोनात फिरून कॅमेरा प्रश्नचिन्हावर

सूत्रधार - आता आपण जातोय दुर्गाबाईंकडे. दुर्गाबाई, पु. ल. काय म्हणाले तुम्ही ऐकलं, तुमचे काय म्हणणं आहे?

दुर्गाबाई - पु. लं नी नेहमीप्रमाणे विनोदाने मूळ विषयावर पांघरूण घातले आहे. अर्थात ते त्यांच्या आजवरच्या सामाजिक प्रतिमेशी सुसंगतच आहे, म्हणून त्याबद्दल अधिक काही बोलत नाही. अशा पळवाटा शोधणारे आपल्या पुराणांमधून खरा आशय कधी लक्षात घेत नाही. संस्कृतीचे त्या त्या वेळचे संदर्भ त्यात असतात ते बघत नाहीत. कलावंत, विचारवंतांवर बंधने विचाराच्या वाढीसाठी अनुकूल नाहीत अशी माझी स्वच्छ भूमिका आहे. विचारवंतानीसुद्धा कोणत्याही गोष्टीच्या दडपणात राहून सोयीस्कर तेव्हाच आणि तिथेच अर्धवट मतप्रदर्शन करणे अजून घातक आहे, या लोकांच्या अशा वागण्याने ते केवळ टीकेचे आणि चेष्टेचे धनी होतील आणि जेव्हा काही मूलगामी आणि महत्त्वाचे सांगू बघतील तेव्हा त्यांना कोणीही महत्त्व देणार नाहीत. लांडगा आला ते आला मधल्या मुलासारखी त्यांची गत होईल.

breaK - Asprin - डोकेदुखी पळवा १ मिनिटात आणि स्ट्रेपसील - गळ्याला आराम तात्काळ

सूत्रधार - दुगाबाई, हेच सांगायला तुमच्यासारखे लोक आज आहेत हे या समाजाचे सद्भाग्य ( जीभ चावत) म्हणजे दैव, भाग्य वगैरे वर आमचा विश्वास नाही, केवळ एक वाक्प्रचार म्हणून हा शब्द वापरला. पु. ल., तुम्ही “एक शून्य मी” मध्ये जितके निराशावादी होतात त्यापेक्षा आज झाला आहात का? ७२ सालच्या पार्श्वभूमीवर बघता, सध्या सामाजिक वातावरण “असामी असा मी” मधले प्रोफेसर ठिगळे म्हणतात तसे तसे loose आहे का tight, आपले काय मत?

पु. ल. - ते ज्याच्या त्याच्या पोटावर अवलंबून आहे. एक शून्य मी ची आठवण करून दिलीस म्हणून सांगतो, मी अजिबात निराशावादी नाही, त्या पुस्तकात फक्त स्वत:च्या माणुसकीवर जमलेली पुटं झटकण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे साफ़सफ़ाईचॆ department सुनीताकडे आहे त्यामुळे सवय नसल्याने ही सफाई मला फारशी जमली नाही हेच खरे. सहिष्णुता अथवा असहिष्णुता - जी कोणी असेल ती असो, जी आपल्याला, आपल्या माणूसपणाच्या रस्त्यावर जास्त पुढे घेऊन जाईल तीच रहावी असे मला मनोमन वाटते.

सूत्रधार - अर्थातच पु.ल. पण तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना सरकारला ४ खडे बोल सुनावले म्हणून या असहिष्णुतेचा सामना करावा लागला होताच. काय वाटते त्याबद्दल आपल्याला.

पु. ल. - सामना म्हणजे अक्षरश: “सामना”च करावा लागला होता. तत्कालीन राज्यकर्त्यांची असहिष्णूता, ज्याला साधी माणसं गुंडगिरी म्हणतात त्याबद्दल बोलल्याने सर्व गोंधळ झालेला पण मतमतांतरे तेव्हा ही झाली, आताही होतील. फरक असा आहे, आता राजकारणातले सर्वच नग, सर्वच पार्ट्या एकसारख्या वाटतात. कोण कुठल्या पार्टीचा, कोण कुठल्या बाजूचा हेच कळेनासे होते. माध्यमे सांगेन युक्तीच्या गोष्टी ४ म्हणून जे काही भन्नाट सबसे तेज सांगत राहणार आणि या सगळ्या भानगडीत सामान्य माणसाचा अर्जुन!

सूत्रधार - वा ! पु. ल. म्हणजे तुम्ही कबूल तर केलेत की राजकारण आता कुरुक्षेत्रावर येऊन ठेपले आहे. या दोन मान्यवरांनी त्यांची मते इथे मांडली याबद्दल मी jklmnop channel तर्फे त्यांचा अतिशय आभारी आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्या याच वेळी एक नवीन युद्ध घेऊन.

camera ३६० अंशांचा कोन करून येतो व एका मोठ्या प्रश्नचिन्हावर स्थिरावतो.

पुढील कार्यक्रम - “उचलली जीभ लावली टाळ्याला” या मराठी चित्रपटाचे promotion. चित्रपटाचे Item song वाजू लागते.

( वरील लिखाण अर्थातच अत्यंत शुद्ध हेतूने केले आहे, त्यात कोणाला दुखवण्याचा हेतू नाही. दुर्गाबाई आणि पु. ल. या दोन्ही व्यक्ती, त्यांचे विचार, व्यक्त होण्याची शैली याचे आकर्षण आणि त्यांच्या निधनामुळे जे अनुभवणे आता शक्य नाही ते आज घडत असलेल्या अनेक घटनांवर त्यांनी कसे भाष्य केले असते याबद्दलच्या कुतूहलामुळे वरील लिखाण झाले आहे. दोघांचे किंवा त्यांच्याबद्दल इतरांनी केलेले जे काही लिखाण मी वाचले आणि त्यावरून दुर्गाबाई आणि पु. ल. - जे काही माझ्या स्वल्प बुदधीला उमगले, त्यावरूनच वरील लिखाण केले आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. मात्र पुलंनीही आणीबाणीत बराच विरोध केला होता ना? त्यांना इथे प्रश्न टाळताना का दाखवले समजले नाही.