"मोत्या शीक रे अ आ ई..., आमच्या लहानपणी कुत्र्याला शिकवायचे हे एकच गाणं होतं," आज्जीच्या या सूचनेवर तिच्या नातीने म्हणजे माझ्या मुलीने,
"शी आज्जी.. अ आ ई काय? आता कुणी कुत्र्याला अ आ ई शिकवतं का?" लगेच शंका काढली. इकडची कुत्री इंग्रजीत भुंकतात हे तिला माहीत होतं.
"आणि मोत्या म्हणजे?"
"अगं मोत्या हे कुत्र्याचे नांव." क्षणात मुलांनी कुत्र्याचे नांव आणि जुन्या पध्दतीचे शिक्षण दोन्ही निकालात काढून आपल्या आजीला फारसं काही कळत नाही असं स्वतः ठरवून टाकलं, आणि आज्जीच्या सगळ्या सूचनांना स्पर्धेतून बाद करून टाकलं.
घरी कुत्रा आणायची चर्चा सुरू झाली त्यादिवशी माझे ग्रह नक्कीच कुठल्यातरी गटारात नाहीतर पाण्याच्या टाकीत उतरले असावेत. तमाम वर्तमानपत्रांच्या राशीभविष्य विभागात नेहमीप्रमाणे वेगवेगळे भविष्य असले तरी त्याचा अर्थ माझ्याबाबतीत 'तुमचे हाल कुत्रा खाणार नाही,' एवढाच होतो. मुळात राशीभविष्याचे आणि माझे काय वाकडे आहे कोण जाणे. पण मी जेव्हा कधी माझे भविष्य बघतो तेव्हा एका वर्तमानपत्रात 'सुंदरी भेटेल' असे असले तर दुसर्यात 'खड्ड्यात पडाल, संभाळून रहा' असे नक्की लिहीलेले असते. 'अचानक धनलाभ' कधीतरी येतो वाट्याला पण तो धनलाभ म्हणजे मित्राने उसने घेतलेले दहा वीस डॉलर फक्त परत येतात. भारतातला पोपटशास्त्र्यांकडचा पोपट जाऊन ते 'पॉल द ऑक्टोपस' च्या मदतीने भविष्य सांगू लागतील तेव्हाच काहीतरी बदल होईल अशी आशा आहे.
शेजार्यांकडे कुत्रा आलेला बघून घरात मुलांनी 'आपल्यालाही एक कुत्रा हवा' असा हट्ट धरला. खरं तर मी कुत्र्याला अगदी वाघापेक्षाही घाबरतो. वाघ नेहमी पिंजर्यात असल्यामुळे असेल, मला त्याची कधीच भीती वाटली नाही. पण कुत्रा हा प्राणी कधी आणि कुठे भेटेल काही सांगता येत नाही. लहानपणी 'कुत्रा चावला की पोटात इंजेक्शने घ्यावी लागतात,' ही माहीती आईवडिलांनी मनावर ठासवून ठेवल्यामुळे मला कुत्र्याऐवजी डोळ्यासमोर इंजेक्शने दिसतात. लहानपणी माझे काही मित्र, कुत्रा म्हणजे 'नेमबाजीचा सराव करायचे निशाण' असं मानून कुत्रा दिसला की दगड भिरकावायचं काम अगदी मनापासून करायचे. पण मी मात्र कुत्रा दिसला की पळायचं तत्व पहिल्यापासून बाळगून होतो. गम्मत म्हणजे माझ्या एकाही मित्राच्या वाटेला कुठलंही कुत्रं गेलं नाही पण मी बाहेर पडलो की अनोळखी कुत्र्यांनादेखील माझ्याशी शर्यत लावायची हुक्की यायची. यातली एकही शर्यत मी कधी हरलो नाही नाहीतर....
आमच्या लहानपणी कुत्र्याचे दोनच प्रकार असायचे. भटका आणि पाळलेला. म्हणजे ज्या कुत्र्याला सकाळ संध्याकाळ एकाच घरी फुकट जेवायला मिळतं तो पाळलेला आणि उरलेला श्वानमंडळ हे भटक्यांमधे धरलं जात असे. आता कुत्र्यांमधे सतराशे साठ प्रकार असतात ही माहीती मला हल्लीच म्हणजे अमेरिकेला आल्यावर कळली. हे सगळे प्रकार फक्त अमेरिकन नावांचेच असतात, हे कळल्यामुळे भारतातले कुत्रे वेगळे आणि अमेरिकन वेगळे असा मी स्वतःचा समज करून घेतला. मग मला शिकवण्यासाठी इंटरनेट उघडून त्यावर चिवावा, पोमेरियन, बुलडॉग, सेंटबर्नाड म्हणजे काय हे फोटो दाखवून मुलांनी माझं बौध्दिक घेतलं. आणि मला कुत्रा या विषयात एक कोर्स पूर्ण केल्याचं समाधान मिळालं.
'चिवावा' नामक एक श्वानप्रकार आणून तो कुठल्याश्या नटीप्रमाणे पर्समधून फिरवावा असं एकीचं म्हणणं पडलं. पण 'इतका छोटा कुत्रा चुकून पायाखाली आला आणि त्याचा एकादा अवयव मोडला तर काय घ्या,' असं म्हणत मी चिवावाला माझा विरोध दर्शवून त्याची कारणं पुढे केली. कुत्रा फिरवायला रस्त्यावर जाताना मला काखेत पर्स घेऊन फिरावे लागणार याची भीती होती. मग एकदम 'सेंट बर्नाड' म्हणजे 'जो कुत्रा घरात आणल्यास सगळं घर व्यापून टाकेल, आणि मालकाला म्हणजे मला घराबाहेर जाऊन रहावं लागेल,' तो कुत्रा आणावा असं दुसरीचं म्हणणं पडलं. कुत्र्यासाठी बापाला घराबाहेर काढण्याची योजना माझ्या लगेच लक्षात आली, आणि मी ती ही तातडीने फेटाळून लावली. राष्ट्रपती ओबामाने 'पोर्तूगीज वॉटरडॉग' घेतल्यापासून माझ्या साताठ मित्रांनी त्यांचं कुत्रं हे 'पोर्तूगीज वॉटरडॉग' वंशावळीशी कसं जवळचं नातं ठेऊन आहे हे मला सांगितलं होतं. त्यात त्यांच्या कुत्र्याला राष्ट्रपतींघरच्या श्वानाप्रमाणे चार पाय आणि दोन कान आहेत यापलिकडे मला तरी काही साम्य दिसलं नव्हतं. 'अलास्कन हस्की' नामक एक कुत्रा असतो हे पण मुलांनी मला सांगितलं पण यात मला काही नवल वाटलं नाही, कारण पेलीनबाईंची वक्तव्ये ऐकल्यापासून मी अलास्काबद्दल काहीही ऐकले की मला 'हसकी' असं सांगण्याअगोदरच हसू येतं. या कुत्र्याचा आणि हसण्याचा काहीही संबंध नाही हे पण मुलांनी मला सांगितलं, पण असला कुत्रा पाळला तर घर कायम अलास्का सारखं थंड ठेवावं लागतं या सबबीवर मी ती ही कल्पना फेटाळून लावली. सांगून आलेल्या प्रत्येक कुत्र्यामधे मी काही ना काहीतरी खोड काढणार हे मुलांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी 'कुत्रा कुठला ते नंतर ठरवू, आधी कुत्र्यासाठी करायला लागणारी तयारी तर करू,' या तत्वावर त्यादिवशीच्या वाटाघाटी संपवल्या.
कुत्रा पाळायचाच असं ठरलं असेल तर ब्रीडरकडे जायलाच हवं असा सल्ला माझ्या मित्राने दिला. त्याच्याकडे गेल्यावर्षीपासून एक कुत्रा असल्याने तो या विषयात निष्णात असल्याचं स्वतः म्हणाला. मला आधी ते 'बिल्डर' ऐकू आलं.
"घर बांधून देतो तो बिल्डर आणि कुत्रा देतो तो ही बिल्डरच का?" या माझ्या प्रश्नाला,
"हे बघ. एका अर्थाने ब्रीडर कुत्रा बांधूनच देतो पण ते आपण नंतर बोलू," असं म्हणून माझा मित्र 'मेड टू ऑर्डर' कुत्रा बांधणार्या एका ब्रिडरकडे आम्हाला घेऊन गेला.
"तुम्हाला कुत्रा हवा आहे ना? मग आज ऑर्डर नोंदवा, आणि चार सहा महिन्यानी तुम्हाला हवा तसा कुत्रा घेऊन जा," असं त्याचं म्हणणं पडलं.
अमेरिकेत दुकानामधून 'टाचणीपासून हत्तीपर्यंत, म्हणजे Pin To Elephant काहीही मिळू शकते असे भारतातले आमचे मास्तर आम्हाला नेहमी सांगत. पण पण 'मेड टू ऑर्डर' कुत्रा मिळवायला ऑर्डर देऊन वाट बघावी लागणार हे काहीतरी नवीनच ऐकत होतो.
"लगेच घरी नेता येईल असा एकादा कुत्रा मिळेल का हो?" मी भीत भीत विचारलं
"लगेच?" "आगे जाव भाय, फोकट में खालीपिली टाईमपास कायताय," असा चेहर्यावर भाव आणत त्याने एक मेन्यूकार्ड काढून माझ्या हातावर ठेवलं.
"आधी हे मेन्यूकार्ड बघा आणि कुत्रा निवडा."
'इथे हे लोक कुत्रा जीवंत विकणार की...' हा शंका माझ्या मनात येते न येते एवढ्यात माझी त्या कार्डाच्या उजव्या बाजूला नजर पडली, आणि 'मेड टू ऑर्डर' कुत्र्याच्या किम्मतीत मला एकादी गाडी विकत घेता आली असती हे माझ्या लक्षात आलं.
कुत्र्याच्या एका पिल्लाची किंमत पाहून मला फेफरं यायचं शिल्लक होतं. उगाच नाही लोक कुत्र्याला काखोटीला मारून फिरत. एवढे पैसे देऊन मी कुत्रा विकत घेतला, तर मी तो बँकेच्या लॉकरमधे ठेवला असता.
"तुला कुत्र्याची किंमत किती असेल असं वाटलं?" मित्राने माझ्या चेहर्याकडे पाहून म्हणाला.
"१००/१५० डॉलर असेल," मला वाटलेला आकडा नाईलाजाने दसपट केला.
"१०० डॉलर? अरे हल्ली १०० डॉलरमधे रस्त्यावरच्या कुत्र्यालाही 'हाड' करता येणार नाही तुला," माझा मित्र.
"म्हणजे? कुत्र्याला 'हाड' म्हणायला देखील आपण पैसे मोजायचे?" मी फक्त खाण्याच्या हाडाचे पैसे हिशोबात धरले होते.
'मला वाटतं, तू एकादं बेवारशी कुत्रा शोध. तो परवडेल तुला.... कदाचित,' तो म्हणाला. बेवारशी कुत्र्यांच्या वाटेला मी स्वतः म्हणून कधीच गेलो नव्हतो. आताही त्या भानगडीत पडण्यात अर्थ नव्हता.
'तसं नाही रे. पण इकडे बेवारशी कुत्रा म्हणजे त्याच्या मालकाने टाकलेला कुत्रा. आपल्याकडे पूर्वी कश्या टाकलेल्या बाय....'
'कळलं कळलं,' मी लगेच त्याचं वाक्य तोडलं. मुलं बरोबर नसली तरी बायकोसमोर हे ज्ञान मला दाखवायचं नव्हतं.
'म्हणजे, मोठा झालेला, नीट शिकवलेला पण मालकाने सोडून दिलेला कुत्रा तू घे,' तो मला म्हणाला. मलाही ही कल्पना आवडली आणि मी लगेच बेघर कुत्र्यांच्या घराची वाट धरली.
अमेरिकेतला बेवारशी कुत्रा हा बेवारशी नसतोच, तो फक्त हवापालट करायला आल्यासारखा मालकपालट करायला आलेला असतो, हे मी नवीन शिकलो. त्या कुत्राघर चालवणार्याने कुत्र्याबद्दल काहीही बोलायच्या आधी असंख्य फॉर्म मला भरायला लावले. त्यात माझी, माझ्या बायकोची, आणि आम्हा दोघांच्या सात पिढ्यांची चौकशी करणारे प्रश्न होते.
'तुम्हाला बायको अगर नवर्याला मारहाण केल्याबद्दल कधी अटक झाली होती का?'
'तुमचे अगर तुमच्या बायकोची आधी झालेली लग्नं?'
'पुढील दोन वर्षात तुम्ही तुमच्या बायकोला, अगर तुमची बायको तुम्हाला घटस्फोट देण्याची शक्यता आहे का?'
'तुम्ही दिवाळखोर आहात अगर गेल्या सात वर्षात दिवाळखोरी केली होती का?'
'तुमच्या घराण्यात कुणाला वेड लागल्याचा इतिहास आहे का?'
असले असंख्य प्रश्न त्याने आम्हाला विचारले. त्यात 'वेड लागल्याचा इतिहास' म्हटल्यावर बायकोने माझ्याकडे मराठीत टाकलेला कटाक्ष त्याला इंग्रजीतही कळला. खरं तर या प्रश्नाला मी उठणार होतो, पण आत्तापर्यंत घालवलेला वेळ बघता पुन्हा कुत्राशोध करण्यात अर्थ नाही म्हणून बसून राहिलो.
"आता फक्त दोन गोष्टी राहील्या. आम्ही तुमच्या घराची तपासणी करून ते कुत्र्याला रहायला योग्य आहे की नाही ते बघू."
"ही तपासणी कधी होईल?"
"ते आम्ही आधी सांगू शकत नाही. अचानक येऊन तपासणी केल्यावर आम्हाला खरं काय ते कळेल. त्याशिवाय तुम्ही कुत्रा पाळायला योग्य आहात, असे सर्टिफिकेट तुम्हाला निदान दोन वर्षं ओळखणार्या शेजार्यांकडून आणावे लागेल."
हा मनुष्य बेवारशी कुत्रा मला देणार होता, की त्या कुत्राघरामधे माझी सोय करणार होता हेच मला कळेना. पण तरी फुकटात कुत्रा मिळतोय हे तरी बरंय असा विचार करत आम्ही घरी आलो.
आता कुत्रा घरी येणारच तेव्हा आपलं घर 'कुत्रा प्रूफ' करणं आवश्यक होतं. मुलांनी या बाबतीत भलताच उत्साह दाखवला.
"आधी आपण बाबांना कुत्र्याशी बोलायच्या क्लासला पाठवू," एकीचं म्हणणं पडलं.
"मला?" आता मलाच शाळेत पाठवायचा बेत ठरायला लागला.
"मग तुम्ही इंग्रजी बोलताना चुका किती करता? आपल्या कुत्र्याला कसं समजणार?" आता मी बोलताना 'स' ऐवजी 'श' म्हणतो कधीतरी, आणि त्यामुळे कुत्र्याला 'सिट' म्हणताना गोंधळ होईल पण त्यासाठी मला शाळेत पाठवायचं?
"त्यापेक्षा आपण बाबाला सायकॅट्रीस्टकडे पाठवू. म्हणजे कुत्रा जवळ आला तरी तो घाबरणार नाही," दुसरी म्हणाली.
"आता वेड्यांच्या डॉक्टरकडे?"
"सायकॅट्रीस्ट म्हणजे काही वेड्यांचा डॉक्टर नाही, पण तो डोकं ठिक करतो."
"नाहीतरी यांना गरज आहे सायकॅट्रीस्टची," तिच्या आईने पण तिचीच बाजू घेतली.
"पण कुत्र्याला ट्रेनिंग देण्यासाठी आपण बाबाला ट्रेनरकडे पाठवूया," पहिलीने अजून एक शाळा शोधली.
"आता मला शाळेत पाठवा, डॉक्टरकडे न्या, FBI करून तपासणी करा, अजून कुत्र्याचा विमा, त्याच्या डॉक्टरचे पैसे भरतो. अजून काय काय करू?" मी ओरडत सुटलो पण माझ्या या चिडण्याने कुणाला काहीही फरक पडला नाही.
एवढं करून एक कुत्रा घरी आला. पहिले सात आठ दिवस मुलांनी कुत्र्याला फिरवून त्यांची हौस भागवून घेतली. त्यानंतर कुत्रा आणि मी दोघेच 'एकामेकांसाठी उरलो'. हल्ली मी सकाळ संध्याकाळ हातात प्लॅस्टीकच्या पिशव्या घेऊन कुत्र्याबरोबर घराबाहेर फिरतो. दोरीचं एक टोक कुत्र्याच्या गळ्यात आणि एक टोक माझ्या हाताला बांधून मी कुत्रा नेईल तिथे जात असतो. बोलायचं असलं की कुत्र्याशी गप्पा मारतो. ओरडायचं असलं की कुत्र्याच्या अंगावर ओरडतो. कुत्राही माझ्या अंगावर भुंकायचं सोडत नाही. बाकी सगळं शिकला तर त्याला एकच गोष्ट येत नाही. ती म्हणजे 'मोत्या शीक रे अ आ ई..'
***काल्पनिक***
छान छान, ते 'पेट डॉग घ्यावा?'
छान छान, ते 'पेट डॉग घ्यावा?' असा प्रश्न पडलेल्या धाग्यावर लिंक द्या
मस्तच. आमच्या इथले
मस्तच. आमच्या इथले शेल्टरवाले पण $ ३००-५००-६०० अशी अडॉप्शन फी घेतात
गोगा, हे मस्तच जमलंय. मजा आली
गोगा, हे मस्तच जमलंय. मजा आली वाचायला.
मस्त मजेदार लिहिलं आहे.
मस्त मजेदार लिहिलं आहे.
त्यात 'वेड लागल्याचा इतिहास'
त्यात 'वेड लागल्याचा इतिहास' म्हटल्यावर बायकोने माझ्याकडे मराठीत टाकलेला कटाक्ष त्याला इंग्रजीतही कळला./>>>
पूर्ण कविता इथे:
पूर्ण कविता इथे: http://balbharatikavita.blogspot.com/2012/01/blog-post_8476.html
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
मस्त...
मस्त...
गोगा, मस्त जमलंय!
गोगा, मस्त जमलंय!
मस्त जमलंय सांगून आलेल्या
मस्त जमलंय
सांगून आलेल्या प्रत्येक कुत्र्यामधे मी काही ना काहीतरी खोड काढणार >>>
जबरी लिहिलयं देसाई , भारी
जबरी लिहिलयं देसाई , भारी पंचेस
सही आहे!! नक्की काल्पनिक आहे
सही आहे!! नक्की काल्पनिक आहे का हे?
भारी लिहिलंय देसाई
भारी लिहिलंय देसाई
गोगा भन्नाट लिहिलयंत.
गोगा भन्नाट लिहिलयंत.
एकदम जबरी
एकदम जबरी
अगदी अगदी.
अगदी अगदी.
(No subject)
:d
छान
छान
काल कुत्र्याच्या धाग्यावर
काल कुत्र्याच्या धाग्यावर वाचलं होतंं. छान आहे.
पण खरंच काल्पनिक आहे का?
जाम भारीये
जाम भारीये
हाहाहा :हहपुवा: काय हे मस्तं
हाहाहा :हहपुवा:
काय हे मस्तं जमलंय
कालच कुत्र्याच्या धाग्यावर
कालच कुत्र्याच्या धाग्यावर वाचलं होतंं. आवडलच !
भारीये
भारीये
मस्त लिहिलंय मजा आली
मस्त लिहिलंय मजा आली वाचायला...!
काल कुत्र्याच्या धाग्यावर
काल कुत्र्याच्या धाग्यावर वाचलं होतं. भारी आहे
गोगा, score - 25 . पेटच्या
गोगा, score - 25 . पेटच्या धाग्यावर तुम्ही expectation लिहिलंत त्याच्या तिप्पट आहे.
कालही वाचलं होतं! धमाल आहे!
कालही वाचलं होतं! धमाल आहे!
'अलास्कन हस्की' नामक एक कुत्रा असतो हे पण मुलांनी मला सांगितलं पण यात मला काही नवल वाटलं नाही, कारण पेलीनबाईंची वक्तव्ये ऐकल्यापासून मी अलास्काबद्दल काहीही ऐकले की मला 'हसकी' असं सांगण्याअगोदरच हसू येतं. या कुत्र्याचा आणि हसण्याचा काहीही संबंध नाही हे पण मुलांनी मला सांगितलं, पण असला कुत्रा पाळला तर घर कायम अलास्का सारखं थंड ठेवावं लागतं या सबबीवर मी ती ही कल्पना फेटाळून लावली.
हे मस्त जमलंय!
त्यात 'वेड लागल्याचा इतिहास'
त्यात 'वेड लागल्याचा इतिहास' म्हटल्यावर बायकोने माझ्याकडे मराठीत टाकलेला कटाक्ष त्याला इंग्रजीतही कळला.>>
गोगा, बघा कित्ती प्रतिसाद
गोगा, बघा कित्ती प्रतिसाद आलेत!
मस्त जमलाय हा लेख!
मस्त लिहिलंय. कालच कुठले
मस्त लिहिलंय.
कालच कुठले तरी फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या बायकोपासून पुढच्या ६ महिन्यात घटस्फोट घेणार आहात का या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय.
Pages