बोट - अग्निशमन

Submitted by स्वीट टॉकर on 24 March, 2016 - 01:18

असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.

भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization ) खूप असतं. असायला हवं देखील. प्रत्येक जण प्रत्येकच काम करायचा प्रयत्न करू लागला तर कुठलंच काम ठीक होणार नाही. शिवाय जबाबदारीचं विभाजन करणं अवघड होईल. मात्र विभागीकरण शक्य असतं कारण तितकी माणसं उपलब्ध असतात. जर नसतील तर?

तूर्तास पाणी, झाडं आणि दिवे दूर ठेवू. सिर सलामत तो पगडी पचास! आग लागली तर?

आपल्या घरात वा बिल्डिंगमध्ये आग लागली तर प्रथम आपण विद्युतपुरवठा बंद करून आगीवर पाणी टाकून विझवायचा प्रयत्न करतो. जर ती आटोक्यात आली नाही तर बिल्डिंगच्या बाहेर पळ काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचतो आणि अग्निशामक दलाला फोन करतो. मग देवाचा धावा करतो.

पुढचं काम अग्निशामक दलाचं. आग विझवणं, आत जर कोणी अडकला असेल तर त्याला बाहेर काढणं हे काम त्यांचं. ते बाहेर काढलेल्याला बोलावलेल्या ऍम्ब्यूलन्स च्या ताब्यात देतात. आता त्याचा श्वासोश्वास सुरू करणं, भाजलेलं, कापलेलं, तुटलेलं बघणं आणि त्याला स्टॅबिलाइज करणं हे ऍम्ब्यूलन्समधल्या सेवकांचं काम. आपला जीव तर वाचलेलाच असतो. त्यामुळे आपल्या दृष्टीनी वाईटात वाईट परिणाम म्हणजे संपूर्ण बिल्डिंग जळून खाक होऊ शकते. पण जमीन तर तिथल्या तिथेच राहाते. जमीन काही आपल्याला सीतामाईसारखं गिळून टाकत नाही.

बोटीवरची परिस्थिती जरा वेगळी असते.

तिथे अग्निशामक दल आपणंच, ऍम्ब्युलन्स आपणच आणि शिवाय सूर्याजीने दोर कापलेले असतात. आग विझवली गेलीच पाहिजे. नाही विझवली आणि बोटीच्या stability ला धोका निर्माण झाला तर पायाखालची जमीन देखील गुल!

आधुनिक बोटींना खरं तर बुडण्यापेक्षा आगीचा धोका जास्त असतो. याचं कारण भरपूर मशिनरी आणि सामुग्री (equipment) कमीत कमी जागेत ठासून भरलेली असते. इतकी ठासून का भरतात? पैसे हे माल वाहण्यासाठी मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त जागा मालाला.

मशिनरी म्हटलं की उष्णता, घर्षण, विद्युत प्रवाह, तेल, वंगण सगळं आलंच. त्यामुळे ‘अग्निशमन’ हा आमच्या ट्रेनिंगचा एक प्रचंड महत्वाचा भाग आणि तो आयुष्यभर चालतो. प्रत्येक आग ही सुरू होते तेव्हां अर्थातच छोटी असते. इंजिन रूममध्ये सगळीकडे फायर एक्स्टिंग्विशर भरपूर प्रमाणात लावलेले असतात. मात्र ज्याला ही छोटी आग पहिल्यांदा दिसते त्यानी लगेच ती विझवायचा प्रयत्न करायचा नाही! हे वाचून आश्चर्य वाटलं असेल.

कोठलंही काम जर व्यवस्थित व्हायला हवं असेल तर ते करण्याची योग्य पद्धतच अवलंबायला हवी. आगीच्या बाबतीत ती पद्धत लक्षात ठेवायला सोपी व्हावी म्हणून ‘FIRE’ या शब्दाच्या स्पेलिंगला ती संलग्न केली आहे.
Find, Inform, Restrict, Extinguish
आग दिसल्यावर पहिल्याप्रथम बाकीच्यांना जागरूक करायचं. ठिकठिकाणी अलार्म पुश-बटण्स लावलेली असतात. ते दाबायचं. लगेच सगळीकडे घंटा वाजायला लागतात आणि कुठलं बटण दाबलं गेलं आहे हे देखील कळतं.

पुढची पायरी म्हणजे ती आग पसरणार नाही याची काळजी घेणे. जर एखाद्या विद्युत उपकरणाला आग लागली असेल तर त्याचा विद्युत पुरवठा बंद करणे, इंजिनला किंवा गळक्या तेलाला लागली असेल तर त्याचा इंधनपुरवठा बंद करणे, खोलीत असेल तर तिथे जाणारा व्हेंटिलेशन डक्ट आणि खोलीचं दार बंद करणे इत्यादी.

सरतेशेवटी आग विझवणे.

अशी असंख्य उदाहरणं आहेत की आग दिसल्यावर बाकीच्यांना बोलावण्याऐवजी स्वतःच विझवण्याच्या प्रयत्नात धूर फुफ्फुसात जाऊन लोक कोसळले आहेत. माहीत असूनही कित्येक जण अशी चूक का करतात?

याला दोनपैकी एक कारण बहुदा असतं.
१. त्या व्यक्तीच्या चुकीमुळेच ती आग लागलेली असते आणि दुसर्‍या कुणाला समजण्याआधी आपण ती बिनबोभाट विझवावी अशी त्याची इच्छा असते.
२. ‘छोटीशीच तर आहे. आपणच ती विझवू.’ हा फाजील आत्मविश्वास.

आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू बनवताना इतक्या प्रकारची रसायनं वापरलेली असतात की ती वस्तू जळल्यावर त्यातून कल्पनातीत विषारी वायू बाहेर पडतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.

आगीमध्ये जी काही जीवितहानी होते त्यातील फक्त दहा टक्के प्रत्यक्षात भाजून होते. नव्वद टक्के धुरामुळे श्वास कोंडून होते. बोटीवरील जवळजवळ प्रत्येक जागा – कॅबिन, इंजिन रूम, स्टोअर रूम्स, जिथे माल लादलेला असतो ते holds and tanks (घनरूप मालासाठी होल्ड आणि द्रवरूप मालासाठी टॅंक) वगैरे सगळे बंदिस्त असतात. त्यामुळे धूर लगेचच जमतो.

मी ज्यूनियर इंजिनियर असतानाचा अनुभव. माझ्या ड्यूटीवर एकदा आमच्या एअर कंडिशनिंग मशिनरीजवळ फायर अलार्म आला. ही खोली इंजिनरूमच्या बाहेर होती. खोलीचा विद्युत आणि हवेचा पुरवठा बंद केला. मी नेहमीप्रमाणे दरवाज्याला हात लावून अंदाज घेतला. अजिबात गरम नव्हता. (गरम असता तर अंगात अग्निरोधक कपडे [Fire Proximity Suit] घालून आणि हातात फायर होझ घेऊनच दोघांनी एकत्र प्रवेश करायचा असतो.) दरवाजा उघडला. आग अगदीच किरकोळ असणार कारण विझून देखील गेली होती. एक जळका रबरी व्ही बेल्ट जमिनीवर पडला होता. (व्ही बेल्ट - पिठाच्या गिरणीत जो पट्टा असतो तो ‘फ्लॅट’ बेल्ट. तसंच काम करणारा, त्याहून छोटा पण ‘व्ही’ आकाराचा). मी मागचा पुढचा विचार न करता खोलीत पाय ठेवला आणि श्वास घेतला मात्र! एखाद्या मुष्टियोध्यानी मला माझ्या गळ्यावर (Adam’s Apple) प्रहार केल्यासारखं वाटलं! क्षणार्धात माझा श्वासच बंद झाला! माझ्या पायातली शक्ती गेली.

माझ्या मागेच माझा असिस्टंट (त्यांना आम्ही त्या काळी ‘तेलवाला’ म्हणायचो) होता. त्यानी मला पटकन काखेखाली हात घालून मागे ओढलं, जवळजवळ फरफटंत बाहेर डेकवर मोकळ्या हवेत नेलं. तिथे भडाभडा ओकल्यावर माझ्या जिवात जीव आला.

या कारणाने आमचा बोटीवरचा फास्ट फ्रेंड म्हणजे SCBA (Self Contained Breathing Apparatus). पाठीवर हवेचा सिलिंडर, चेहर्यावर घट्ट बसणारा मुखवटा (mask). मग बाहेर धूर असो नाहीतर विषारी वायु असो. आपली साधारण पंचवीस मिनिटांची हवा आपल्याबरोबर. (ज्यांनी स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे त्यांनी साधारण अशा प्रकारची एक्विपमेंट वापरली असेल.)

वेगवेगळ्या परिस्थितीत आग विझवण्याचं वेगळं तंत्र असतं पण आपण Worst Case Scenario घेऊ या.

इंजिन रूममध्ये आग लागली आहे. इंजिनरूममध्ये धूर भरल्यामुळे ड्यूटी इंजिनियर आत अडकला आहे. तो फोनला उत्तर देत नाही त्या अर्थी बेशुद्ध पडलेला असणार.

आमची बहुतेक मशिनरी इंजिन रूममध्ये असली तरी आपात्कालीन लागणारी मशिनरी बाहेर सुरक्षित ठिकाणीच असते. मुख्य इंजिन आणि जनरेटर बंद झाल्यामुळे सगळा अंधार होऊन सगळं ठप्प होतं. इमर्जन्सी जनरेटर आणि इमर्जन्सी फायर पंप चालू करतो जेणेकरून उजेड, आग विझवायला पाणी आणि बाकी आपात्कालीन सर्व्हिसेस सुरू होतात.

बोटीवर काहीही इमर्जन्सी आली की घणाघाती घंटा वाजते. कितीही डाराडूर झोपला असला तरी ताडकन उठू अशी. सगळ्यांनी एकत्र जमण्याची एक सुरक्षित अशी ठरलेली जागा असते. त्या जागेला Muster Station असं म्हणतात. काय इमर्जन्सी झाली आहे त्याची माहिती तिथे सगळ्यांना दिली जाते, कोणी लापता आहे का हे समजतं आणि आता कोणी कोणी काय कामं करायची हे ठरवलं जातं. हे सगळं पटापट व्हावं म्हणून काही पद्धती असतात. उदा, प्रत्येकाच्या उभं राहाण्याच्या ठिकाणी जमिनीवर एक एक गोळा रंगवलेला असतो. हजेरी घ्यायची जरूर पडता कामा नये. जो गोळा रिकामा आहे तो casualty असणार.

इंजिन रूममध्ये नेहमी हवा खेळती राहाण्यासाठी चार किंवा पाच भलेमोठे पंखे बाहेरची स्वच्छ हवा आतमध्ये ढकलंत असतात. इंजिन रुममधली जुनी गरम हवा फनेलच्या मागच्या बाजूनी लूव्हर्स करवी (हे लूव्हर्स म्हणजे आपल्या बाथरूमच्या खिडक्यांना असतात तसेच, पण काचेऐवजी लोखंडी आणि दहा फुटी लांब असतात) बाहेर जात असते.

इंजिनरूममध्ये आग लागली की सर्वप्रथम हे पंखे बंद करून हवा आतबाहेर जाण्याचे मार्ग बंद केले जातात. (आगीला नवीन प्राणवायू मिळता कामा नये.) आता दोन कामं करायची आहेत. आत अडकलेल्या इन्जिनियरला बाहेर काढायचं आहे आणि आग विझवायची आहे. दोन्ही कामं एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न करायचा नाही. (If you chase two hares, both will escape.) प्राथमिकता जिवाला. दोघांनी फायर सूट आणि हवेचे सिलिंडर चढवायचे, वॉकी टॉकी, विजेरी, कुर्‍हाड आणि फायर होज घेऊन इंजिन रूममध्ये प्रवेश करायचा. (तयार झालेला फायर फायटर हा ऍक्शन हीरोसारखा दिसतो. मात्र छातीत धडधड असते आणि सामानाच्या वजनामुळे दमछाक लवकर होते.) अडकलेल्या साथिदाराला शोधून काढायचं, पण त्याला वर कसं आणणार? इंजिनरूममधले जिने प्रचंड चिंचोळे आणि उंच (स्टीप) असतात. त्या जिन्यांनी बेशुद्ध व्यक्तीला उचलून आणणं कर्मकठीण! सबंद इंजिन रूमला एक चिंचोळा इमर्जन्सी एस्केप वरपासून थेट खालपर्यंत जातो. दिसायला आपल्या लिफ्टच्या शाफ्टसारखा. मात्र यात लिफ्ट नसून लांबच्या लांब शिडी असते. वरच्या टोकाला त्याला एक कप्पी लावलेली असते त्यातून एक मजबूत दोर खालपर्यंत लोंबकळत असतो. दोराच्या खालच्या टोकाला एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रेचर बांधलेलं असतं. नॉर्मल स्ट्रेचरमध्ये रोग्याला आडवं ठेवलं जातं. मात्र या स्ट्रेचरमध्ये एखाद्याला व्यवस्थित बांधलं की त्याला उभं उचलता येतं. एस्केपला इंजिन रूमच्या प्रत्येक मजल्यावर एक Fire proof दरवाजा असतो. जखमी साथिदाराला या एस्केपमध्ये घेऊन जायचं आणि स्ट्रेचरमध्ये बांधायचं. मग वरचे लोक कप्पी आणि दोरखंडानी त्याला वर ओढून घेतात आणि प्रथमोपचार सुरू करतात.

हे सगळं होईपर्यंत फायर फायटर्सच्या सिलिंडरांमध्ये पुरेशी हवा शिल्लक असली तर ते दुसर्‍या कामाला – आग विझवण्याच्या – लागतात. नाहीतर ते बाहेर येतात आणि नव्या दमाचे नवे दोन गडी आत प्रवेश करतात.

जरी मी म्हटलं असलं की सिलिंडरमध्ये पंचवीस मिनिटांची हवा असते, तरी प्रत्यक्षात वेगळंच घडतं. सराव करताना प्रतेक गोष्ट आपल्या नियंत्रणात असते. जेव्हां खरी वेळ येते तेव्हां आत गेलेल्या फायर फायटर्सना प्रचंड एकटेपणाची जाणीव होते. आपल्याच श्वासोश्वासाचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो. (ज्यांनी स्कुबा डायव्हिंग केलं आहे त्यांना याचा थोडाफार अनुभव असेल. स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स – घेतला श्वास, बुड्बुडबुडबुडबुडबुड्बुड – सोडला श्वास!) आगीत धुरामुळे पुढलं नीट दिसत नाही त्यामुळे आपण बंदी झाल्यासारखं वाटायला लागतं (claustrophobia). आपल्याला इथे काही झालं तर आपल्याला मदत करायला कोणाला सहज येता देखील येणार नाही या जाणिवेनी कित्येक जण बिथरतात. श्वासोश्वास उथळ आणि जलद होतो आणि पंचवीस मिनिटांची हवा पंधरा मिनिटातच संपते. त्यात त्यांना धोका काही नसतो कारण संपण्याआधी पुरेसा वेळ एक धोक्याची शिटी येते. त्यानंतरही परत बाहेर जायला पुरेशी हवा सिलिंडरमध्ये असते. मात्र आत जाऊन काम करू शकले नाहीत तर जो बेशुद्ध पडलेला असतो त्याचा जीव वाचण्याची शक्यता कमी होते.

आता असं समजू या की आपण आत अडकलेल्या इंजिनियरला इमर्जन्सी एस्केपकरवी बाहेर धाडलं आहे पण आग फारच पसरली आहे आणि अति उष्णता आणि धुरामुळे आगीशी लढणं अशक्य झालं आहे. या परिस्थितीसाठी प्रत्येक बोटीवर एक हुकमी एक्का असतो. त्याला आम्ही म्हणतो Fixed Fire Fighting System.

यातही प्रकार आहेत पण आपण सगळ्यात पॉप्यूलर असलेली कर्बद्विप्राणिलवायू (CO2) सिस्टिम बघू या. द्रवरूप CO2चे सिलिंडर्स सुरक्षित ठिकाणी असतात. इंजिन रुमला अजिबात हवाबंद करण्यासाठी झडपा असतात. त्या बंद करून पुन्हा एकदा सर्व लोकांना मोजायचं. आता कोणीही इंजिन रूममध्ये नाही याची खात्री करून ह्या सर्व सिलिंडरांमधला CO2 धाडकन एकदम इंजिनरूममध्ये सोडायचा. आग कितीही भयानक असली तरी ती विझते. मात्र यासाठी एक म्हणजे इंजिन रूम व्यवस्थित बंदिस्त झालेली पाहिजे आणि सगळा CO2 दोन मिनिटात सुटला पाहिजे. त्यासाठी या दोन्ही सिस्टिम्सचा मेंटेनन्स अगदी व्यवस्थित पाहिजे.

या मधून एक फार महत्वाची शंका निर्माण होते. जर आग लवकर वाढली आणि आत अडकलेल्या माणसाला काढता आलं नाही तर CO2 सोडतात की नाही? अतिशय अतिशय अवघड निर्णय!

तो आत असताना CO2 सोडणं म्हणजे त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखंच! जर “तो आत आहे तोपर्यंत मी काहीही झालं तरी CO2 सोडणार नाही” असं ठरवणं धोक्याचं ठरू शकतं. जर का आग वाढत वाढत तेलाला लागली तर बोटच बुडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे एकाच्या ऐवजी पंचवीस जणांचे जीव! कोठला निर्णय योग्य ठरेल हे कसं सांगणार? कोठलाही घेतलात तरी काही चांगलं आणि काही वाईट होणार हे अटळच आहे.

कोठलाही निर्णय घेतला तरी दोन परिणामांना सामोरं जायलाच हवं. एक म्हणजे अपघाताची जी चौकशी होईल तेव्हां तुमच्या निर्णयाची चिरफाड ही होणारंच! जो निर्णय तुम्ही प्रचंड स्ट्रेसखाली पाच मिनिटात घेतलात तो योग्य होता की नाही हे कित्येक एक्स्पर्ट्स एकत्र बसून तासन् तास चर्चा करून ठरवणार. दुसरा परिणाम म्हणजे त्यातून जे काही वाईट निष्पन्न झालेलं असेल त्याची बोच तुम्हाला राहाणारच. कदाचित आयुष्यभर.

“जर माझ्यावर अशी वेळ आली तर माझ्या निर्णयप्रक्रियेत मी कोठल्या गोष्टीला किती महत्व देईन?” याचा निर्णय कित्येक कॅप्टन आणि चीफ इंजिनियर आधीच करून ठेवतात. करावा देखील. शेवटच्या क्षणी ग म भ न पासून सुरवात नको.

या नोकरीमुळे काही सवयी अंगवळणी पडतात. थियेटरमध्ये आपल्या खुर्चीवर जाऊन बसलं की “अंधारात जर जवळच्या exit ला जावं लागलं तर किती ओळी आणि किती खुर्च्या ओलांडायच्या आहेत” याचं मोजमाप नकळंत होतं. हॉटेलमध्ये आपली खोली पहिल्यांदा उघडण्याआधीच एकदा इमर्जन्सी एस्केप जिन्यापर्यंत चालत जाऊन पावलं मोजून येतो.

कोणी याला नकारात्मक विचार म्हणेल तर कोणी सकारात्मक. मी ते आयुष्यभर करंत राहीन आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचं महत्व शिकवत राहीन एवढं मात्र नक्की!
---------------------------------------------------------------------------------------------------------
आधीच्या लेखांच्या लिंक्स
http://www.maayboli.com/node/56993
http://www.maayboli.com/node/56385
http://www.maayboli.com/node/56300
http://www.maayboli.com/node/52087

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट !
तुमची डिटेलवार पण सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत लिहायची पद्धत विलक्षण आहे ! वाचताना तिकडेच कुठेतरी तुमच्या आजूबाजूला असल्यासारखं वाटतं .

मस्त लेख.

आज नवरा फिफि ट्रायलला गेला आहे. त्याबद्दल थोडंसं लिहाना. पण बहुतेक फिफिचा उपयोग दुसर्^या जहाजावर लागलेली आग विझवायला म्हणून केला जातो. बरोबर का?

सर्वजण,

धन्यवाद. हल्ली लिहायला वेळ मिळत नाही. त्यामुळे उशीर होतो.

नंदिनी - तुमच्या वर्णनावरून असं वाटतंय की तुमचे यजमान supply vessel, support vessel अथवा tug बांधतात. या प्रकारच्या बोटी आकारानी लहान असल्या तरी अतिशय powerful असतात आणि आमच्या सारख्या बोटींना अथवा ऑइल रिग्जना त्या सपोर्ट देतात.

त्या सपोर्टमध्ये आमची हाताबाहेर गेलेली आग विझवणं हे देखील मोडतं. ऑइल टँकरच्या अपघातांच्या फोटोंमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जळणार्या टॅंकरजवळ छोट्या बोटी दिसतात ज्या प्रचंड प्रमाणात आणि जबरदस्त दाबानी पाण्याचे झोत त्या टँकरवर मारत असतात. ती त्यांची FIFI सिस्टिम. FIFI हा Fire Fighting चा शॉर्ट फॉर्म आहे. त्यांचे फायर पम्प हे प्रचंड ताकतीचे असतात ज्यामुळे त्या बोटी दूर सुरक्षित अंतरावरून पाण्यचा मारा करू शकतात.

मी ज्या सिस्टिमचं वर्णन केलं आहे ती वेगळी. ती म्हणजे आमच्या बोटींपुरती, ती देखील फक्त इंजिन रूम, पम्प रूम वगैरे बंदिस्त जागांसाठी केलेली सिस्टिम.

तुमच्या वर्णनावरून असं वाटतंय की तुमचे यजमान supply vessel, support vessel अथवा tug बांधतात. >> हो. सध्या पीएस्वी आणि ए एच टी एस वर काम करत आहेत. रत्नागिरीमध्ये व्हेसलची फिफि ट्रायल असली की आम्ही भगवतीवर जाऊन बसायचो. तिथून पाण्याचा मारा अतिशय सुंदर दिसायचा. फोटो मिळाले तर बघते.

माहिती पुर्ण लेख! सगळे अगदी डोळ्या समोर उभे राहिले.
कालच कॅप. फिलीप बघताना आपली आठवण झाली. लेख वाचाताना मेर्सेक अलाबामा च डोळ्या समोर उभे ठाकले. Happy
इतक्या क्रिटीकल परिस्थितीत ही डोके शांत ठेवुन काम करावे लाग़णे, करणे, किती अवघड आहे याचा अंदाज येतोय.
खुप खुप धन्यवाद!

फारच मस्त लिहिता तुम्ही गोडबोलेसाहेब.. Happy

प्रत्येक विशिष्ट ठिकाणची बारकाव्यासहित माहिती आणि त्या त्या क्षणी काय करायला पाहिजे ही मानसिकता - हे सर्व काही इतके भारी लिहिले आहे की बस्स...

यावरचे तुमचे वा तुमच्या मित्रांचे अनुभव वाचायला आवडतील (अर्थात सुटका कशी झाली तेच... Happy )

असेच बोटीवरचे विविध अनुभव जरुर शेअर करणे. या लेखाकरता मनापासून धन्यवाद.

हा लेख वाचला होता आणि मोबाईल वरुन प्रतीसाद लिहीताना गेला होता.
जबरदस्त लिहीलंय.यात इतके बारकावे असतात हे माहिती नव्हतं.

सेफ्टी चा विचार येतोच.तुम्ही एक्झिट पासून अंतर मोजता आम्ही मनातल्या मनात 'वोल्वो चं इंजिन उजवीकडे असतं' म्हणून 'आग लागली तर' चा विचार करुन डाव्या बाजूची तिकीटं बुक करतो.