रंग खेळू कागदावर नाही अंगावर !!

Submitted by विद्या भुतकर on 22 March, 2016 - 21:00

सण म्हणजे तरी काय? सण म्हणजे तरी काय हो? हौस पुरवायचे दिवस , मुलांचे आणि आपलेही. हौस तरी कशाची? गाण्याची , नाचण्याची , खाण्याची, आपली कला लोकांसमोर करण्याची आणि हे सर्व करताना हसत खेळत आनंदाचे चार क्षण गोळा करण्याची. गेल्या काही वर्षांपासून शहरांमधून 'सोसायटी संस्कृती' तयार होत आहे. प्रत्यके सोसायटीच्या स्वत:च्या कल्पना, त्यांना साथ देणारे लोक आणि विविध कार्यक्रम पार पाडण्याची हौस यातून अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. सण-समारंभ पार पाडण्याचा उत्साह तर प्रचंड. आमची सोसायटीही अशीच अत्यंत हौशी आहेच पण त्यासोबत सामाजिक जाणीवही वेगवेगळ्या प्रसंगातून, कार्यक्रमातून सर्वांनी दाखवलेली आहे. अनेक प्रकारचे उपक्रम जेंव्हा समोर येतात तेव्हा आपण या सोसायटीचा एक हिस्सा आहे याचा अभिमान वाटतो. Happy

यावर्षीच्या दुष्काळामुळे सोशल मिडीयावर अनेक लोक पाण्याशिवाय होळी कशी साजरी करावी याबद्दल मेसेज फोरवर्ड करताना दिसतात. पण तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावे हे सर्वांच्या लक्षात येतेच असे नाही. अगदी सुक्या रंगानी होळी खेळले तरी, आंघोळीसाठी, सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यासाठी पाणी लागेलच ना? तर काल आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर हा मेसेज आला सर्वांना. तो मुद्दाम इथे देत आहे कारण मला वाटतं हे वाचून एका व्यक्तीने किंवा सोसायटी मधल्या काही लोकांनी जरी हे अमलात आणले तर एक सण चांगल्या प्रकारे साजरा झाला असे म्हणता येईल. तुमच्या सोसायटी मधेही असाच एखादा उपक्रम नक्की आयोजित करा.

उपक्रम

।।प्रत्येक सण आनंदच घेउन येत असतो घरी।।
होलिकादहनामधे सर्व वाईट गोष्टी व दुष्ट विचार नष्ट करुन होळीची पुजा होते आणि त्यानंतर धुलीवंदन आणी रंगपंचमी (आजकाल दोन्हीचा अर्थ एकच) ची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करुन देणारा सण. पण ह्या वर्षी दुष्काळाच्या झळा सर्वांपर्यंत पोचल्या आहेत. पाण्याचा उपव्यय टाळणे हे सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या सोसायटीतील बच्चे मंडळी सुद्धा पाण्याचे महत्व जाणून ह्यावर्षी रंग न खेळण्याचे ठरवताना दिसत आहेत.
पण सर्व सणांचे एक वेगळे महत्व असते आणि ते जपण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. या उद्देशातून ह्यावर्षी आपण अंगावर रंग न उडवीत जर ते कागदावर उतरविले तर ?? काय मज्जा येईल ना आणि ते सुद्धा जर मुला-मुलीं बरोबर मोठी मंडळी पण सामील झाली तर…धमाल मजा येईल. मग आपण या वर्षी २४-मार्चला सकाळी ८ ते १० या वेळेत आपल्या लॉन वर हिरवळीत सर्वजण कागदावर रंगाच्या छटा उमटवू. तर मग लागा तयारीला आणखी एका मजेदार उपक्रमाकरिता. सोबत येताना रंगाचा बॉक्स घेवून या, कागद आम्ही देवू.
कार्यक्रमाचे यश घरातील सर्वांच्या सहभागावर अवलंबून आहे. म्हणून सर्वजण नक्की या.

दि. २४-मार्च-२०१६
स्थळ : राहुल पार्क सी विंग लॉन, वारजे, पुणे.
वेळ : सकाळी ८ ते १०
उपक्रम : "रंग खेळू कागदावर नाही अंगावर"
सहभाग : लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम पण शीर्षक गडबडलंय. योग्य ठिकाणी विरामचिन्ह हवी आहेत या वाक्यात. नाहीतर उलटा अर्थ निघतोय.

रंग खेळू कागदावर नाही अंगावर >>
रंग खेळू कागदावर,नाही अंगावर.
रंग खेळू ..कागदावर नाही, अंगावर.