दुबई मेट्रो.. माझे अनुभव

Submitted by दिनेश. on 22 March, 2016 - 10:08

माझे गल्फ देशांपैकी सर्वात जास्त वास्तव्य झाले ते मस्कत ( सल्तनत ऑफ ओमान मधे ) पण दुबईला माझे
नियमित जाणे होत असते. काही वेळा ट्रांझिट मधे असतो तर कधी कधी केवळ भटकायला जातो.
यावेळेस जाणे झाले होते ते ऑफिसच्या कामासाठी.

आमच्या कंपनीची नवीन फॅक्टरी दुबईच्या फ्री ट्रेड झोन मधे सुरु होतेय. त्या संदर्भात काम होते. आठवडाभर होतो
तिथे. घरून म्हणजे हॉटेल अपार्टमेंट मधूनच काम करत होतो. पण संध्याकाळी आणि विकेंड्स ना वेळ मिळाला.
तेव्हा निरुद्देश भटकलो.

मस्कतमधे शेअर टॅक्सीज असतात. त्यांचे रुटस ही ठरलेले असतात. आणि त्या फार स्वस्तही असतात.
दुबईमधे २००१ साली महिनाभर होतो. त्यावेळी माझा भर टॅक्सीज आणि बस वर होता. टॅक्सीज फार महाग नव्हत्या आणि बसेस तर फारच स्वस्त होत्या ( बस स्टॉप पण वातानुकूल होते ) नंतर २००८ साली गेलो होतो,
त्यावेळी मेट्रोचे काम सुरु झाले होते.

नंतरही एक दोन वेळा गेलो पण पर्यटक म्हणून गेलो होतो त्यामूळे दिमतीला गाड्या होत्या. मेट्रो सुरु झालेली
दिसत होती ( अगदी विमानातूनही दिसत होती ) पण त्यातून प्रवास करायचा राहिला होता. अटलांटीस ला
मोनो रेल ने गेलो होतो, पण ती या मेट्रो नेटवर्कचा भाग नाही. ती राहिलेली हौस यावेळी भरुन काढली.
तर हे माझे अनुभव.

या मेट्रोच्या एकंदर ३ शाखा आहेत. सर्वात मोठी ती रशिदीया ते यू ए ई एक्स्चेंज ( म्हणजे फ्री ट्रेड झोन )
आणि दोन छोट्या, त्यापैकी एक क्रीक वर जाते. एतिसलात ते क्रीक जाणारी लाईन, मेन लाईनला दोन ठिकाणी छेदते ( ती स्टेशन्स कॉमन आहेत ) तिथे लाईन बदलता येते. दुसरी लाईन ट्राम ने जोडलेली आहे.

या मेट्रोमूळे प्रवास ( तुलनेने ) स्वस्त आणि महत्वाचे म्हणजे वेळ वाचवणारा झालाय. शहराच्या मुख्य भागात
ट्राफिक जाम रोजचाच झालाय.

मेट्रोने सर्व महत्वाची ठिकाणे जोडलेली आहेत. स्टेशनवर उतरुन थोडेफार चालले कि सर्व दुबई आवाक्यात
आल्यासारखीच आहे.

या मेट्रोचा उल्लेख मेट्रो आणि ट्रेन, असा दोन्ही शब्दांनी केला जातो.

या मेट्रोला चालक ( किंवा गार्डही ) नसतो. ही संपुर्णपणे स्वयंचलित यंत्रणा आहे. या मेट्रोचे टाईमटेबलही
नसते, कारण त्याची गरज नाही. पीक अवर्सना दर तीन मिनिटांनी तर एरवी दर सात मिनिटांनी मेट्रो
येते. ती किती मिनिटांनी येणार आहे, ते बोर्डवर दिसत राह्ते. प्रत्येक मेट्रो हि स्टार्ट टू फिनीश जाते ( म्हणूनही टाईम टेबलची गरज नाही ). सकाळी सहा ( बहुतेक ) ते रात्री दहा पर्यंत ही सेवा असते. नंतर नाही. त्यांच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, सकाळी अकरानंतरच मेट्रो सुरु होते.

प्रत्येक मेट्रोला पाच डबे पण ते आतून जोडलेले असतात. शेवटचा डबा गोल्ड क्लास आणि त्याला लागून लेडीज डब्बा. त्यांना वेगळा रंग वगैरे नाही. सिट्स वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आडव्या, सरळ आहेत. तिथेही गरोदर स्त्रिया, व वृद्ध माणसे यांना अग्रक्रम द्यावा अशी लेखी विनंती आहे. पण तरी मोकळी जागा भरपूर आहे. अगदी टोकाला सीट्स नाहीत, त्यामूळे तिथे सज्ज्यात ऊभे राहिल्यासारखे वाटते.

मेट्रोमधे खाण्यपिण्यास बंदी आहे. च्यूईंग गम खायलाही बंदी आहे. सिटवर पाय ठेवायलाही आहे पण ती
बारीक नियमावलीत आहे. अर्थातच हि पुर्ण गाडी वातानुकूलीत आहे. त्यामूळे आत कमालीची स्वच्छता असते.
कुणी चुकून कचरा टाकलाच्च असेल तर शेवटच्या स्टेशनवर प्रत्येक मेट्रोची तपासणी होते. मी शेवटच्या
स्टेशनवर उतरत असल्याने हे नेहमीच बघत असे.

दरवाजे उघडल्यावर उतरणार्‍या प्रवाश्यांनी आधी उतरायचे. तोपर्यंत चढणार्या प्रवाश्यांनी कडेल उभे रहावे,
असे चित्राद्वारे सुचवलेले आहे. ( पण त्याचा अव्हेर करणारेही दिसतातच ) प्रत्येक गाडी हि स्टार्ट टू फिनीश धावत असल्याने, पहिल्या एक दोन स्टेशनातच बहुतेक सिट्स भरतात. पुढच्या स्टेशनवर चढणार्या लोकांना, क्वचितच सिट्स मिळतात.

दरवाजे बंद होत आहेत. आणि पुढचे स्टेशन कोणते या केवळ दोनच घोषणा मेट्रोत होतात. त्या देखील
इंग्लीश आणि अरेबिक मधे ( हम केंद्रीय सूचना प्रसारण कक्ष से बोल रहे है... असा प्रकार नाही ) या सूचना
लेखी प्रकारेही दिल्या जातात. त्यासाठी लाल रंगाच्या दिव्याचे बोर्डस आहेत शिवाय छोटे छोटे टिव्ही स्क्रीन्स पण आहेत (पण त्यापैकी काही बंद पडलेले मी बघितले )

वर्ल्ड ट्रेड सेंटर चे जसे मराठीत आपण जागतिक व्यापार केंद्र असे करु, तसेच अरेबिक मधेही करतात. ( अल मर्कझ अल तिजारीया अल आलमीया ) पण अरेबिक मधे सहसा अद्याक्षरे वापरत नाहीत. उदा. फर्स्ट गल्फ बँक ला आपण इंग्लीशमधे सहज एफ. जी. बी. म्हणू पण अरेबिक मधे तिला बांक अल खलीजी अल अव्वल असेच
म्हणतील. ( ही स्टेशन्सची नावे आहेत ) स्टेशनच्या नावाबाबत आणखी एक निरीक्षण म्हणजे यासाठी
खाजगी संस्थांच्या नावांचा वापर केलाय ( नूर बँक, इबन बतूता वगैरे )

स्टेशनमधे त्या नावांचे बोर्ड मोजकेच दिसले आणि स्टेशनच्या दरवाज्यावरही अगदी दिसेल न दिसेल असेच आहेत. बहुतेक स्टेशन्स एकसारखीच आहेत. ( डीझाईन तेच आहे) प्लॅटफॉर्मवर विक्रेते नाहीत पण तिकिट विंडो जवळ आहेत.

हि मेट्रो बहुतांशी जमिनीवरूनच गेलीय पण जुन्या भागात जिथे इमारतींची दाटी होती, तिथे जमिनीखालून गेलीय. जमिनीवरून जाताना तिचा मार्ग दोन्ही बाजूंनी बंदीस्त केला आहे, त्यामूळे कुणी रुळ ओलांडायचा प्रश्नच नाही. तरी ती एवढी उंच आहे कि दोन्ही बाजूंनी सुंदर दृष्य मालिका दिसत राहते.

या मेट्रोतून प्रवास करताना तासाभरासाठी फ्री वायफाय कनेक्शन आहे. ( त्यासाठी लोकल नंबर हवा. )

तिकिटाच्या बाबतीत मात्र पास वगैर असे लाड नाहीत. दोन दिवसांचा पास आहे पण त्यात कन्सेशन वगैरे नाही. तिकिटाच्याच बाबतीत एक बाब मात्र थोडी विचित्र आहे. तिकिट काढताना तिकिटाच्या रकमे एवढे कार्ड देतात शिवाय २ दिर्हामची वेगळी रिसिट देतात. ( ती बहुतेक जण तिथेच ठेवलेल्या कचरा पेटीत टाकतात. ) कार्ड लावून गेट उघडते. सुरवातीच्या आणि शेवटच्या अश्या दोन्ही टिकाणी कार्ड लावून दरवाजा उघडावा लागतो. त्यातून पैसे वळते होतात. हे दोन दिर्हाम मात्र मला उगाचच घेतल्यासारखे वाटले ( चक्क चाळीस रुपये हो. )

मेट्रोच्या आत जाहिराती नाहीत. स्टेशनवर आहेत पण भिंतीवर पोस्टर्स मात्र नाहीत. या नेटवर्कचे नकाशे सर्वत्र आहेत. स्टेशनवर उतरल्यावर आजूबाजूच्या परीसराचा नकाशाही आहे. त्याशिवाय आणखी माहिती हवी
असेल तर तिकिट काढताना मिळते. एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास जवळचे स्टेशन कुठले ते विचारून घेतले कि झाले.

मॉल ऑफ एमिरेट्स, दुबई मॉल असे सर्व मोठे मॉल्स मेट्रोने जोडलेले आहेत. पण स्टेशनपासून मॉल पर्यंत जायला बरेच अंतर एका बंदीस्त पूलावरून चालावे लगते. दुबई मॉलला जाताना तर किलोमीतर भर पेक्षा जास्त अंतर असावे. अर्थात त्यातला बराच वेळ, बुर्ज खलिफा दिसत राहते. एअरपोर्टवर जायलाही ती सोयीची आहे आणि अर्थातच त्यातून बॅगाही नेता येतात.

यातून प्रवास करणारे बहुतेक लोक भारतीय व पाकिस्तानीच असतात. पण प्रत्येक जण अगदी व्यवस्थित शिस्तीत वागतो. कुठेही कचरा नसतो. गाडीच्या आतही मोठ्यामोठ्याने आरडा ओरडा नसतो. चेकर वगैरे
कुठेही दिसला नाही पण काही ठिकाणी शक्य असूनही कुणी विनाटिकीट प्रवास करताना दिसत नव्हते. ( कसे शक्य ते नाही लिहित इथे )

तर हे सगळे मुंबई लोकलवर पोसल्या गेलेल्या आणि आजही तिचा डाय हार्ड फ्यान असलेल्या, एका मुंबईकराच्या नजरेतून ( तपशीलात चूका असतील तर नक्की सांगा. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वात मोठी म्हणजे रेड लाईन ही एतिसलात हून नसून रशिदियापासून सुरु होऊन युएई एक्सचेंज (आधीचं जेबेल अली) ला संपते. ग्रीन लाईन एतिसलात पासून सुरु होते आणि क्रीकला संपते.

मला वाटतं ट्रेनच्या वेळामधलं अंतरही सात मिनीटं नसून पाच मिनीटं आहे कारण काऊंटडाऊन पाच मिनीटांचं बघितलंय. ट्रामही गेल्या साताठ महिन्यांपूर्वीच सुरु झालीये.

आभार आडो, बदलले आता.
मी तिथे असतानाच जोरदार पाऊस झाला होता. रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. पण नंतर मेट्रो चालू झाली.
रस्त्यावरचे पाणी दोन तीन दिवस हटले नव्हते.

दुबई मेट्रो चांगली आहेच पण मला आपलं वाटतं की सुधारणेला खूप वाव आहे अजून. पूर्वी आडव्या सीटसमोर उभं राहिलं तर वर पकडायला हँडल्स नव्हती, आता ती अ‍ॅड झालीयेत. दोन ट्रेनमधला वेळ अजून कमी व्हायला हवाय कारण कायमच गर्दी, क्वचितच बसायला मिळतं. तसंच ट्रेनचे डबेही वाढायला हवेत. Proud

दुबई मेट्रोसारखीच स्टेशन्सही अगदी बघण्यासारखी आणि स्वच्छही. पण बाकी काहीही असलं तरी निदान दुबईमध्ये मेट्रोमुळे प्रवास खूपच सोईचा झालाय. अबु-धाबीकडे पैसा असून त्यांना असं काहीही करावसं वाटत नाही. २०१६ मध्ये अबुधाबीमध्येही मेट्रो सुरु होणार अश्या अफवा ऐकल्या होत्या.

छान लेख !
पुण्यातून गेलेल्या माणसाला दुबई मेट्रो म्हणजे सुखच सुख वाटते
खाण्यापिण्याला बंदी त्यमुळे आपसूकच स्वच्छता राहते .
मला वाटतंय कि monthly pass / कार्ड असते.

हि मेट्रो एवढी लोकप्रिय होऊन तिला गर्दी होईल असे बहुतेक शेख साहेबांना वाटले नसावे. पीक अवर्सना मुंबईसारखीच गर्दी असते. कदाचित डबे आणि गाड्या वाढवतील लवकरच.

मंथली पास बद्दल नीट माहिती मिळाली नाही ( कार्ड असते ) पण ते प्रत्येक प्रवासानंतर स्वॅप करावे लागतेच. त्याला टॉप अप करताना लोक दिसत होते.

पण शिरडीवाले साईबाबा, केशिवा माधिवा, चायना का माल, भजन, लेडीज स्पेशल, बार डब्बा, कामगार विशेष.. असलं काही नाही हो !