लिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण!

Submitted by अभि_नव on 20 March, 2016 - 02:16

इतरत्र पुर्वप्रकाशीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सावधान: या लेखात व या लेखमालेतील पुढील लेखांत सांगीतलेली कोणतीही कृती करण्याआगोदर, आपल्या संगणकातील विदा (डेटा) चा सुरक्षीत बॅकअप घ्या. त्याशिवाय या लेखात सांगीतलेले काहीही करण्यास मनाई आहे. बॅकअप घेऊन किंवा न घेऊन ही जे काही कराल व त्यामुळे जे काही चांगले - वाईट / फायदा - नुकसान / विंडोज उडणे / पार्टीशन करप्ट होणे ई. होईल त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असाल. कोणत्याही फायदा / नुकसानीस लेखक किंवा लिनक्स प्रणाली किंवा मुक्तस्त्रोत समुदाय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी!

त.टी. मी पुण्याचा नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार.
लिनक्स (Linux) वापरायची सुरुवात करताना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे, कोणते लिनक्स वापरावे? मागे एकदा वाचले होते त्याप्रमाणे लिनक्स मधे ३०० वेगवेगळ्या डिस्ट्रोज (distros) आहेत. (तेव्हा तरी होत्या.)
तरी, नव्या वापरकर्त्यांनी सुरुवात करताना युबुंटु (Ubuntu) किंवा मिंट (Mint) यांचे मुख्य (युनिटी Unity) किंवा केडीई (K.D.E.) हे व्हर्जन वापरावे. (आजच्या तारखेचे मत).
याचे मुख्य कारण तांत्रीक नसुन, युबुंटू मागे असलेला समुदाय व त्यायोगे मिळणारे सहाय्य हे आहे. तांत्रीक दृष्ट्या दिलेल्या कोणत्याही एकाच प्रतलातील सर्व लिनक्स या सारख्याच ताकदीच्या असतात.
तसेच युबुंटु व कुबुंटु साठी अधिकृत सशुल्क सपोर्टही मिळत असल्यामुळे ज्यांना असा पेड सपोर्ट हवा असतो त्यांचीही सोय होते. हा पेड सपोर्ट वयक्तीक व संस्था अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांना मिळतो.
यात, तुम्हाला युबुंटु चे मुख्य डी.ई. युनीटी जरी आवडले नाही, तरी निराश होऊ नका. आपल्याकडे इतर अनेक पर्याय आहेत. त्यातील एखादा किंवा एका पेक्षा जास्त तुम्ही वापरु शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या लेखांत येईलच.

लिनक्स मिंट ही या आधी नव्या वापरकर्त्यांसाठी मी नेहमी सुचवत आलो आहे. पण मध्यंतरी सुरक्षेच्या काही कारणांमुळे तसे करावे किंवा कसे याबाबतीत संदिग्ध आहे. तरी लिनक्स मिंट मधे गाणे व चलचित्र (Videos) चालवण्याचे कोडेक्स (Multimedia Codecs) आधीच इन्स्टॉल करुन येत असल्यामुळे (pre-installed codecs) तुम्हाला ती वापरायची असेल तर तसे जरुर करु शकता.

या लेखमालेत आपण युबुंटू लिनक्स ची केडीई आवृत्ती म्हणजेच "कुबुंटू" (Kubuntu = K.D.E. + Ubuntu) ही डिस्ट्रो वापरणार आहोत. http://kubuntu.org/ इथे या डिस्ट्रोबद्दल सर्व माहिती मिळेल.
तरी, प्रत्येक वाचकाने त्याच्या पसंतीची डिस्ट्रो वापरावी असे मी सुचवेन. कोणती डिस्ट्रो निवडावी किंवा कोणते डि.ई. तुम्हाला आवडेल / चांगले काम करता येईल हे ठरवण्यासाठी या भागात लिनक्सचे जीवंत परिक्षण (लाईव्ह टेस्टींग) कसे करायचे ते आपण बघणार आहोत.

त्याआधी डिस्ट्रो व डि.ई. म्हणजे काय त्याबद्दलः
डिस्ट्रो हे डिस्ट्रीब्युशन (Distribution) चे लघुरुप आहे. सर्व डिस्ट्रो या लिनक्सच असतात व लिनक्स कर्नलच वापरतात. पण त्यात या डिस्ट्रोमागील समुदाय, समुदायाची उद्दिष्टे, टारगेट युजर, पॆकॆज मॆनेजर, डीफाल्ट डी.ई. (D.E.) व इतर काही गोष्टी आणि त्या करण्याची पद्धती यानुसार फरक पडत जातो. यातुनच नव्या डिस्ट्रोज बनत जातात. प्रत्येक डिस्ट्रो ही स्वतंत्र ओएस असते.

डी.ई. (D.E. = Desktop Environment) म्हणजे संगणकाशी संवाद साधन्याचे दृष्य माध्यम(जी.यु.आय.). यात, विंडो मॆनेजर, लॊगीन मॆनेजर, फाईल ब्राऊजर, नोटीफिकेशन सिस्टीम, कलर्स्, थीम्स, सिस्टीम सेटींग, सॉफ्टवेअर सेंटर, वेगवेगळ्या घटकांची अरेंजमेंट्स व इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी येतात. यातील एकाच डी.ई. ग्रुप मधे असणारे सर्व प्रोग्राम्स एकसारखे दिसणारे जी.यु.आय वापरातात जे त्या डी.ई ची खासीयत असते.

मायक्रोसॊफ्ट विंडोज मधे आणि ऎपल मॆक मधे वेगळे असे डी.ई. नसते. तर ते मुळ सिस्टीमचाच एक भाग असते. यात तुम्ही खुप काही बदल करु शकत नाही. अगदी मोजकेच बदल करु शकता. विंडोजचा सर्वात प्रसिद्ध एक्सपी डेस्कटॊप, त्याचा टेकडीचा वॊलपेपर आणि खालचा तो निळा टास्क बार तर तुम्हाला माहिती असेलच. साधारण याला डी.ई. म्हणुयात.
पण लिनक्समधील डी.ई मधे याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी असतात.
केडीई, जीनोम (Gnome), एक्सएफसीई (XFCE) सारखे डी.ई तर नुसते जी.यु.आय देऊन थांबत नाहीत तर त्यांचे स्वत:चे इतर अनेक उपयोगी सॊफ्टवेअर्स एकत्रीतपणे (बंडल्ड) देतात.

http://distrowatch.com/ या साईटवर जाउन लिनक्समधील सर्व डिस्ट्रो बद्दल माहिती घेऊ शकता.
यातील मुख्य काही डिस्ट्रोजची यादी खालीलप्रमाणे:

 • डेबिअन
 • स्लॅकवेअर
 • युबुंटु
 • लिनक्स मिंट
 • फेडोरा
 • रेड हॅट
 • सेंटॉस
 • सायंटीफिक लिनक्स
 • सुसे / ओपन सुसे

लिनक्सची सुरुवात कशी झाली, सुरुवातीच्या लिनक्स डिस्ट्रो कोणत्या होत्या, त्यातुन कोणत्या नविन लिनक्स उदयाला आल्या ई. माहितीचा नकाशा इथे बघु शकता: https://commons.wikimedia.org/wiki/File:Linux_Distribution_Timeline.svg

आता आपल्या जीवंत परिक्षणाकडे वळुया.
सर्वप्रथम कुबुंटुची अगदी अलीकडची आवृत्ती उतरवुन घ्या. त्यासाठी http://kubuntu.org/getkubuntu/ इथे जाउन बिटटोरंट भागात जा व कुबुंटु चे १५.१० या आवृत्तीचे तुमच्या संगणकाच्या स्थापत्यप्रकाराप्रमाणे (आर्किटेक्चरप्रमाणे) ३२ किंवा ६४ बिट आवृत्तीचे टोरंट उतरवुन घ्या. आताच्या जमान्यात शक्यतो सर्व संगणक ६४ बिटच असतात. हे बघण्यासाठी तुमच्या विंडोजच्या सिस्टीम इन्फो / सेटींग किंव तत्सम ठिकाणी जाउ शकता.
त्यानंतर तुमच्या संगणकातील टॉरंट सॉफ्टवेअर मधे जाउन, हे टॉरेंट अ‍ॅड करा व पुर्ण आय.एस.ओ उतरवुन घ्या. अंदाजे १.३८ जीबी एवढी साईझ आहे. तुमचा नेट स्पीड / बँडविड्थ खुप चांगल असेल तर रेगुलर डाउनलोड मधे जाउन थेट आय.एस.ओ उतरवुन घेऊ शकता.

लिनक्स इन्स्टॉलचे दोन मुख्य भाग इथे केलेले आहेत:
१. पेन ड्राईव्ह मधुन लाइव्ह लिनक्स ( परिक्षण - अनुभव हेतु)
२. थेट तुमच्या संगणकातील डिस्क मधे लिनक्स इन्स्टॉल करणे / व्हर्चुअल बॉक्स मधे टाकणे ( नेहमीचे वापरण्यासाठी)

या भागात आपण पहिला प्रकार बघणार आहोत. लाइव्ह लिनक्स म्हणजे असे लिनक्स इन्स्टॉल ज्यातील डेटा व सेटींग या तात्पुरत्या असतात. एकदा संगणक बंद केला की त्या पुसल्या जातात. अर्थात एखादे महत्वाचे किंवा विदा कायमस्वरुपी साठवुन ठेवण्याचे काम करण्यासाठी याचा कुठलाही अडथळा येत नाही. लाइव्ह मोड मधेही आपण नेहमीचे सर्व काम करुन ते कायमस्वरुपी आपल्या मुळ हार्डडिस्क वर साठवु शकतो. पण इतर गोष्टी जसे की, इन्स्टॉल केलेले नवे सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअची सेटींग किंवा ओएस च्या इतर अनेक सेटींग्स या टिकवुन ठेवु शकत नाही. लाइव्ह मोड मधे ते कसे टिकवुन ठेवावे यावरही उपाय आहेत, पण तो आपला सद्ध्याचा विषय नाही. सद्ध्या ते नका करु.

लाइव्ह लिनक्सचा शोध क्नॉपिक्स (Knoppix) या लिनक्स डिस्ट्रोमागील डेवलपर्सनी लावला. लाइव्ह लिनक्स मुळे, लिनक्स तुमच्या संगणकावर इन्स्टॉल न करता - तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्क मधे काहीही न टाकता - त्याची पुर्ण पडताळणी (परिक्षण) घेता येते किंवा नेहमीप्रमाणे रोजच्या कामासाठीही वापरता येते.

आता तुमच्या विंडोज मधे, https://unetbootin.github.io/ इथुन युनेटबुटीन हे सॉफ्टवेअर उतरवुन घ्या. अ‍ॅपल मॅक चे वेगळे व्हर्जन ही आहे. ते नेहमी एखादे विंडोज सॉफ्टवेअर करतो तसे इन्स्टॉल करा.
दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे http://www.pendrivelinux.com/universal-usb-installer-easy-as-1-2-3/#button
या दोघांपैकी कोणतेही एक वापरु शकता. या लेखात युनेट्बुटीन चे उदाहरण घेतले आहे. पेन ड्राईव्ह लिनक्स कसे वापरावे त्यासाठी इथे बघा http://www.ubuntu.com/download/desktop/create-a-usb-stick-on-windows

हे सॉफ्टवेअर वापरुन आपण आत्ताच उतरवुन घेतलेली कुबुंटु ची आय.एस.ओ इमेज तुमच्या पेनड्राइव्ह मधे जाळणार (बर्न करणार) आहोत. कमीतकमी ४ जीबी आकार आसलेला पेन ड्राईव्ह घ्या. सर्वप्रथम त्याला "FAT32" या प्रकाराने संपुर्ण फॉरमॅट करा. असे करताना पेन ड्राइव्ह मधील सर्व डेटा पुसला जाईल. तेव्हा याआधीच त्याचाही बॅकाप घेऊन ठेवा आवश्यक असेल तर. तो संगणकाला जोडुन मग मघाशीच इन्स्टॉल केलेले युनेटबुटीन उघडा. ते साधारण असे दिसत असेलः

आवृत्तीच्या फरकामुळे थोडेफार वेगळे असु शकते. यात "डिस्कइमेज" हा पर्याय निवडुन, त्याच्यासमोरील तिन टींब असलेले बटन वापरुन, तुम्ही आत्ता उतरवुन घेतलेली कुबुंटु आयएसओ इमेज निवडा. तुम्ही याआधीच बॅकअप घेतला असेलच. नसेल घेतला तर पुढील कृती करण्याआगोदरच तो घ्या.

अती महत्वाचे:
यानंतर, आपल्याला डिस्क निवडायची आहे. शक्यतो तुम्ही आधी पेन ड्राईव्ह लावुन मग हे सॉफ्टवेअर चालु केले तर पेन ड्राइव्ह तिथे आधीच दिसत असतो. पण तुम्ही याची खात्री करा की, "ड्राइव्ह" या शब्दासमोरील ड्रॉपडाऊन बॉक्स मधे निवड केलेली डिस्क ही तुमची संगणकातील हार्डडिस्क नसुन पेन ड्राईव्हच आहे. अन्यथा तुमच्या संगणकाच्या हार्डडीस्कमधील सर्व डेटा + विंडोज पुसले जाऊ शकते. आधीच तिथे काही निवड केलेली नसेल, तर तुम्ही स्वतः "ड्राइव्ह" या शब्दासमोरील ड्रॉप डाउन मधे तुमचा पेन ड्राइव्ह निवडा.
ओके हे बटन दाबा. यात तुमच्या पेन ड्राईव्हची / तुमच्या संगणकाची आरोग्य स्थिती ई. मुळे २ मिनिटे ते १५ मिनिटे इतका वेळ लागु शकतो.

हे झाले की, तसे सांगणारा एक संदेश येईल, त्यात आताच रिबुट करायचे का असे विचारले असेल. तुमच्या सोयीप्रमाणे तो पर्याय निवडा किंवा नंतर रिस्टार्ट करणयाचे बटन दाबा.

कुबुंटु तुमच्या पेन ड्राईव्ह मधे जळलेली आहे. पण त्यात बुट करण्याआगोदर आपल्याला बायोएस मधील एक सेटींग चेंज करावी लागेल. आता पेन ड्राइव्ह सुरक्षीतरीत्या काढुन घ्या. संगणक बंद करा व परत चालु करते वेळी बायोएस मधे जा. त्यासाठी तुमच्या संगणकाच्या बायोएस व्हर्जन / कंपनी प्रमाणे वेगळी कळ असेल ती दाबा. ही कळ Delete बटन किंवा F[1-12] या पैकी एखादी असु शकते. बायोएस मधे गेल्यानंतर तिथे "First Boot Priority" / "Boot Order" / "Boot Priority" / "Boot Options" / "UEFI Boot" / "UEFI Boot Order" / "UEFI USB Boot" किंवा नुसतेच "Boot" असे किंवा या अर्थाचा पर्याय शोधा. त्यात जाउन पहिले प्राधान्य तुमच्या पेन ड्राइव्ह अर्थात एक्स्टर्नल यु.एस.बी ड्राइव्ह / डिस्क ला असेल असे करा.

 1. हे साठवुन ठेवा (सेव करा).
 2. मघाशी कुबुंटु जाळलेला पेन ड्राइव्ह जोडा.
 3. संगणक परत चालु करा.

काही संगणकांमधे बायोएस मधे न जाता, थेट ओन द फ्लाय पेन ड्राइव्ह मधुन बुट करण्याची सोय असते. त्यासाठीची तुमच्या संगणकाची कळ शोधा व पेन ड्राइव्ह तसाच जोडलेला असताना संगणक परत चालु करा व अगदी सुरुवातील ती कळ दाबा. इथे तुम्हाला सर्व पेन ड्राइव्ह व हार्ड डिस्क ची यादी दिसेल. इथे फक्त पेन ड्राइव्ह निवडा. यात बायोएस मधे कोणताही कायमस्वरुपी बदल न करता तुम्हाला पेन ड्राइव्ह मधुन बुट करता येते.

आता तुम्ही कुबुंटु ग्नु / लिनक्स मधे बुट करत असाल.
सुरुवातीची बुट स्क्रिन:

यात कीबोर्ड आणि वापर सुलभता (अक्सेसिबिलिटी) असे दोन चिन्ह दिसत आहेत. तुम्ही कोणतेच बटन दाबले नाही तर थेट लाइव्ह कुबुंटु मधे बुट करणे सुरु होईल. जर तुम्ही कीबोर्ड वरील कोणतेही बटन दाबले तर तुम्हाला खालील मेनु दिसेलः

 • काही वेळेला जुना पेन ड्राइव्ह असल्यास किंवा आय.एस.ओ जाळताना काही समस्या आल्यास ते चेक करण्यासाठी "चेक डिस्क फॉर डिफेक्ट्स" हा मेनु वापरु शकता.
 • रॅम मधील बिघाड / कमी रॅम ई. चेक करण्यासाठी टेस्ट मेमरी हा मेनु आहे.
 • तुम्ही जर चुकुन या पेन ड्राइव्ह मधे बुट केले असेल तर परत तुमच्या संगणकातील डिस्क मधुन तुमचे नेहमीचे विंडोज बुट करण्यासाठी शेवटचा बुट फ्रॉम फर्स्ट हार्ड डिस्क हा मेनु वापरु शकता.
 • या पैकी काहीही न करता थेट कुबुंटु मधे जाण्यासाठी पहिला स्टार्ट कुबुंटु हा पर्याय निवडा.
 • या मेनु विंडो मधे न येता थेट कुबुंटु चालु करण्यासाठी, तुमच कुबुंटु पेन ड्राइव्ह चालु होताना कुठलेही बटन दाबु नका व (अंदाजे) ५ सेकंद त्या किबोर्द व अक्सेसिबिलीटी चिन्ह असलेल्या स्क्रिनवर वाट बघा.

आपण स्टार्ट कुबुंटु निवडुया. आज आपण कुबुंटु इन्स्टॉल न करता फक्त तिचे जीवंत परिक्षण करणार आहोत. त्यामुळे खालील मेनु मधुन, ट्राय कुबुंटू हा पर्याय निवडा. कुबुंटु (किंवा तुम्ही निवडलेली इतर डिस्ट्रो) कशी इन्स्टॉल करावी हे पुढील भागात पाहु.

त्यानंतर आपण कुबुंटु मधे आलेलो असु व सुरुवातीचा डेस्क्टॉप तुम्हाला असा दिसत असेलः

हे लाइव्ह यु.एस.बी असल्यामुळे इथे डिफॉल्ट लॉगीन वगैरे विचारले जात नाही. आता तुम्ही पुर्णपणे कुबुंटू बुट केलेली आहे. आता इथे तुम्ही सर्व प्रकारचे परिक्षण करु शकता.
याचा हेतु,

 1. तुम्हाला लिनक्सची ओळख करुन घेणे
 2. लिनक्समधे काय काय कुठे असते ते बघणे
 3. रोजच्या कामासाठी लागणारे सॉफ्टवेअर्स कसे असतात ते बघणे
 4. या पुढे जाऊन लिनक्स इन्स्टॉल करुन ती वापरायची की नाही हे ठरवणे
 5. वापरायची असेल तर कुबुंटु घ्यायची की दुसरी कोणती
 6. त्यातही के.डी.ई की आणखी काही वापरायचे

हे सगळे तपासणे असा आहे.
तर यात वरच्या डाव्या बाजुला अर्धपारदर्शक राखाडी रंगात डेस्क्टॉप फॉल्डर दिसतो आहे. नेहमीप्रमाणे डेस्क्टॉप फोल्डरचे कंटेंट तुमच्या पुर्ण डेस्कटॉपभर पसारा घालुन ठेवु नये म्हणुन अशी वेगळी सोय दिलेली आहे. यात सद्ध्या फक्त इन्स्टॉल कुबुंटू असा एकच आयकॉन आहे. जसे डेस्क्टॉप फॉल्डरचे फाइल्स वाढतील तसे तुम्हाला स्क्रोलबारने वर खाली करता येइल. पण कितीही फाइल आल्या तरी मागचा वॉलपेपर डेस्कटॉप स्वछ्छच राहील.

इथे मी तुम्हाला फक्त जुजबी ओळख करुन देणार आहे. कारण तुम्ही स्वतः वापरत असताना ही लिनक्स तुम्हाला कशी वाटते हे बघणे या मुख्य हेतु आहे. पुढिल लेखात संपुर्ण ओळख, कुबुंटू कसे वापरावे इ. दिले जाईलच.

डेस्कटॉप उजवी टिचकी मारली असता, डेस्कटॉप सेटींग अंतर्गत वॉलपेपर बदलण्याचे वगैरे पर्याय दिसतील.
मुख्य मेनु उघडन्यासाठी ALT + F1 ही कळ वापरु शकता. त्याचा आयकॉन खालच्या बाजुला असलेल्या टास्क्बारच्या सर्वात डाव्याबाजुला आहे. तिथे के.डी.ई. चा लोगो आहे. त्याच्यावर "K" असे लिहिलेले आहे. मुझ्य मेनु मधे, सिस्टीम सेटींग,सर्व प्रकारचे अ‍ॅप्स, रिसेन्टली युज्ड ई. मेनु आहेत.
टास्क्बारवरच उजव्या बाजुला विविध प्रकारची माहिती देणारे आयकॉन्स आहेत. यात आवाजाची तिव्रता, बाहेरुन जोडलेल्या पेन ड्राइव इ. ची माहिती, वेळ / तारीख ईत्यादीचा समावेश आहे.
मुख्य मेनु मधील, ऑफीस या मेनुत जाउन रोजच्या कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसर ई. सॉफ्टवेअर बघु शकता.
मुख्य मेनुतील पर्सनल इन्फॉरमेशन मॅनेजर हे ऑफस कामासाठी उपयुक्त असे सॉफ्टवेअर आहे. यात इमेल, कॉन्टॅक्ट्स, चॅट, कॅलेंडर, मिटींग्स, नोट्स, ब्लॉग ई.चे फिड्स व इतर अनेक फिचर्स व त्याचा डॅशबोर्ड आहे.
परिक्षण म्हणुन, मुख्य मेनुमधुन सॉफ्टवेअर सेंटर मधे जाउन एखादे छोट्या आकाराचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु शकता. असे करताना कुठेही टरमिनल वापरायची आवश्यकता नाही.
मुख्य मेनु मधे सर्वात वरचा बाजुला शोध घेण्याची सुविधा आहे. तिथे टाईप करुन थेट शोधु शकता.

पुढिल भागात कुबुंटु कसे इन्स्टॉल करावे, काय काळजी घ्यावी व कसे वापरावे याबद्दल चर्चा करु.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख. खुप मेहनत घेऊनही लिहिलाय. माझ्यासारखे अनेकजण, विंडोजच्या कुबड्या सोडून असे काही करायचे धाडस करणार नईत, तरी पण वाचणार नक्कीच आहे.

छान लिहिले आहे.
लिनक्स मिंट ही या आधी नव्या वापरकर्त्यांसाठी मी नेहमी सुचवत आलो आहे. पण मध्यंतरी सुरक्षेच्या काही कारणांमुळे तसे करावे किंवा कसे याबाबतीत संदिग्ध आहे >> मी तरी म्हणेन यापुढे नका सुचवत जाऊ. मध्यंतरी झालेला हल्ला समजा बाजूला ठेवलात तरी मिंटवाल्यांचे पॅकेजेस बाबतीतले गेल्या काही वर्षांपासून बदललेले धोरण हे डेबियन/कॅनोनिकल(उबंटू) वाल्यांशी जबरी फारकत घेते. त्यामुळे जरी शक्यतो कोणाला काही अडचण येत नसली तरी ती इतर लिनक्सच्या मानाने सुरक्षेच्या बाबतीत पूर्वीपासून ढिसाळ आहे. तुम्ही सध्या सुचवत आहात ती कुबंटू सुरुवात करायला उत्तम प्रणाली आहे, मी सुद्धा ९०% वेळा ती सुचवेन.