पद्मा आजींच्या गोष्टी ९ : शोधून सापडेना

Submitted by पद्मा आजी on 18 March, 2016 - 23:43

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
मी तुमचे सर्व प्रतिसाद वाचते. बरे वाटते. मागच्या गोष्टीच्या अभिप्रायात कोणी तरी ढेकूणाच्या औषधा बद्द्ल लिहिले म्हणून मला हि छोटीशी गोष्ट आठवली.

एकदा काय झाले. माझ्या डोक्याला चाई झाली. चाई म्हणजे डोक्याला काही ठिकाणी खाज येते आणि तिथले केस गळतात.
बरीच औषधे लावली पण काही फरक पडेना. आमची आवडा आत्याही तेव्हा गोंदियाला होती. त्यामुळे तिचेही औषध मिळाले नाही.

शाळेत मुलीही बाजूला बसायला घाबरायच्या. न जाणो त्यांनाही झाले तर काय म्हणून. तेव्हा अमरावतीला कापसे नावाच्या homeopathic डॉक्टर होत्या. एके दिवशी खेळायला जात असताना त्यांच्या घरासमोरून मी जात होते. तेव्हा त्यांनी मला हाक मारली.

थोडे काही बोलणे झाल्यावर त्यांनी विचारले कि माझे केस गळत आहेत का?
हो. मी सांगितले कि डॉक्टर म्हणतात आहे कि चाई झाली आहे.

तर त्या म्हणाल्या, एक औषध सांगू का? करणर असशील तर सांगते.

मी आग्रह केल्यावर त्यांनी सांगितले कि एक दोन ढेकूण पकड आणि त्यांचे रक्त लाव डोक्याला दररोज रात्री. बरी होईल चाई लगेच.

म्हणजे बघा ढेकूण आपले रक्त पितात आणि आपण पण त्यांचे रक्त वापरू बघतो. कोण कोणाला रक्तपिपासू म्हणणार?

असो, गम्मत अशी झाली, मी सगळे घर, बिछाने शोधून काढले पण एका ढेकणाचा पत्ता नाही. मग मी म्हटले ढेकुण बाहेरून आणावे लागतात मला आता.

झाले, माझे बोलणे ऐकले आणि सगळेजण ओरडले माझ्यावर. "अजिबात नाही. घरातले पकडून काय करायचे ते कर. पण अजिबात नाही आणायचे बाहेरून."

नंतर अनेक दिवस सगळ्यांनी माझी चाई बरे करण्यात भाग घेतला. औषध आणून दे काय, विचारपूस काय, माझ्यावर संशयी नजर काय.

त्यांना भीती होती लवकर बरे नाही झाले, तर मी आणणार ढेकूण बाहेरून कि मग सगळे कल्याण.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी ढेकुण शोधायला निघाल्या, बाहेरुन आणेन म्हणाल्या आणि सगळे हादरले.
आणि त्यांनी तसे करायला नको म्हणुन सगळे त्यांची चाई ठीक होण्यास मदत करु लागले.
हीच गंमत.
पुढे चाई कशाने बरी झाली तो भाग वेगळा, असे मला वाटते.