पद्मा आजींच्या गोष्टी ८ : गुपचूप औषध

Submitted by पद्मा आजी on 12 March, 2016 - 02:39

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

ही गोष्ट तशी फार जुनी आहे. जवळजवळ पन्नास वर्षे जुनी. माझी मावशी एकदा माझ्या मामांकडे आली. त्याला भेटायला. तिचे मिस्टर हि बरोबर आले होते. ते डॉक्टर होते चांगले.

एक दिवशी काहीतरी झाले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते मामांना म्हणाले, मी जरा माझ्या मित्राकडे जाऊन येतो. त्यांचा मित्र तेव्हा इर्विन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता. इर्विन मोठे हॉस्पिटल होते अमरावतीत.

मामांनी काय केले, त्यांच्या सोबतीला माझ्या मामे बहिणीस पाठविले. दोघे गेले टांग्यात बसून. बराच वेळ गेला. सगळे काळजीत अजून का नाही आले परत? नंतर फक्त माझी मामे बहिण आली घाबऱ्या चेहेऱ्यानी. डॉक्टरांनी मावशीच्या मिस्टरांना म्हणजे माझ्या काकांना admit करून घेतले होते.

झाले, आमचे सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला रवाना. दोन दिवस गेले. तीन गेले. काकांना काही बरे वाटेना. ते अस्वस्थ तर होतेच त्यात सारखी झापड यायची डोळ्यावर. बोलता बोलता काही तरी असंबद्ध बडबडायचे आणि अगदी बेशुद्ध झाल्यासारखे झोपायचे.

बरे, डॉक्टर तर त्यांचा मित्रच होता. त्यामुळे औशोधोपचारांची तर काही कमी नव्हती. त्यांचा मित्र तर सारखी चक्कर मारायचा. आम्हाला धीर द्यायचा. पण फरक काही पडत नव्हता.

तेव्हा माझी आत्या -- आवडा आत्या, जिची एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आधी, आठवते का? तर आवडा आत्या आली. तिला अनेक औषधे माहित होती. दोन - तीन दिवस तिने बघितले काय चालले आहे, काय होते आहे. बारकाईने.

ती मावशीला म्हणाली, मी औषध दिले असते पण ते तर डॉक्टरांच्या ताब्यात आहेत. आपण काय करू शकतो. विषय थांबला तिथेच. पण अजून दिवस गेले तरी काही फरक नाही. काका तर बेशुद्ध असल्यासारखेच होते.

शेवटी, मावशी डॉक्टरांना म्हणाली कि आम्ही काही उपचार करू का? आत्यांना माहित आहेत काही औषधे. देवूया का?"

पण डॉक्टर म्हणाला. "अहो, आम्हाला समजत नाही तर त्यांना कसे समजणार? डॉक्टर आहेत का त्या?"

मावशी म्हटली, "आयुर्वेदिक आहे. त्यांना माहीत आहेत."

"पण त्या डॉक्टर आहेत का? Degree आहे का त्यांच्या कडे? माझा पण मित्र आहे तो. मलाहि काळजी आहे. फरक पडेल. वेगळे औषध मागविले आहे."

परत एक दिवस गेला. औषध काही कुठे मिळत नव्हते. तेव्हा आवडा आत्या घरी गेली . तिने वावडिंग, लसुन, मोहरी, अश्या वस्तू घेवून पाट्या वरवंत्त्या वर चांगली पेस्ट तरी केली त्याची. नंतर तिने अजून एक दुसरे मिश्रण बनविले. व दोन्ही मिश्रणे घेवून ती हॉस्पिटलला आली आणि मावशीला म्हणाली. "आज रात्री लावायचेच . डॉक्टर ला काही सांगू नयेच. आपण गुपचूप करू सगळे."

झाले, रात्री त्या दोघी काकान शेजारी बसल्या. डॉक्टरांची रात्रीची चक्कर झाल्यावर, आवडा आत्याने ती पेस्ट काकांच्या डोक्यावर माखली आणि वरून स्कार्फ सारखे एका कापडाने बांधले. पण तिने त्यांना बेड वर बसून ठेवले. आडवे नाही पडू दिले.

सुरुवातीला आग झाली, माझे काका जागे झाले आणि त्यांनी झटकण्याचा प्रयत्न केला. पण दोघींनी त्यांना पकडून ठेवले. डॉक्टर केव्हाही येईल अशीही भीती होती.

सुदैवाने थोड्या वेळाने ते शांत झाले आणि बसल्या बस्यला च शांतपणे झोपले. नंतर काही तासांनी, आवडा आत्याने दुसरे मिश्रण त्यांच्या पोटावर लावले. व दोघी त्यांना धरून बसल्या. पाठीमागून उषा लावून टेका लावून ठेवला होताच.

सकाळी सकाळी डॉक्टर मित्र आला. सगळे पाहून फार रागाविला. आवाजाने माझे काका जागे झाले. पण त्यांना ताजे तवाने वाटत होते. बोलले पण चांगले. नंतर म्हणे, toilet ला जायचे. आणि बघतात तर काय शौचाद्वारे एक मोठा जंत बाहेर पडला. ते स्वतः डॉक्टर असूनही चकित. त्यांचा डॉक्टर मित्रही चकित. कारण कोणालाही त्यांना जंत झाले असतील अशी शंका वाटली नव्हती.

आवडा आत्याने जर पुढाकार घेवून, डॉक्टरांना बाजूला ठेवून मिश्रण लावले नसते, तर भलतेच उपचार चालू राहिले असते.

म्हणून माझी आयुर्वेदावर श्रद्धा. निसर्गाशी निसर्गानेच मुकाबला.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली

पुर्वी नारू झाला की विड्यातून चार ढेकूण देत असत यावरूनच औषधालाही ढेकूण नाहीतहो आमच्याकडे हावाक्प्रचार आला. हे षट्कर्णी झाल्यावर कोणी विड्यातून कोणतेच औषध घेण्यास तयार होईनासे झाले आणि ढेकणांची हत्त्या थांबली.

पद्मा आजी, तुमच्या आठही गोष्टी आज वाचल्या.

अगदी गोष्ट सांगितल्यासारखीच वाटते ही प्रत्येक गोष्ट वाचतांना. सहजसुंदर लेखनशैली !

सार्‍या गोष्टीही आवडल्या.