नटराजा ये करीत तांडव

Submitted by चैतन्य दीक्षित on 10 March, 2016 - 00:49

नटराजा ये करीत तांडव ।
परि हृदयी मम असु दे मार्दव ।।
नटराजा ये दैत्या मारित-
-आतिल, सत्वा ये साकारित ।।
धुधुकारे तव हाती फणिवर ।
शोभे माथ्यावरि रजनीकर ।
नागासम त्या दे चपळाई ।
वृत्ति शांत चंद्रासम देई ।।
नटराजा ये मुक्त जटांनी ।
ऊर्जेच्या अन् विविध छटांनी ।
नटराजा ये सुनृत्यमुद्रा ।
जाळित ये अंतस्थ अभद्रा ।।
डिमडिमतो डमरू तव हाती ।
वामकरी ज्वाळा धगधगती ।
डमरूसम दे यत्न अनाहत ।
ज्वाळेसम शुद्धी अप्रतिहत ।।
नटराजा तव नर्तनमात्रे।
लयास जाती वैश्विक गात्रे ।
नवसृजनास तुझा अभयंकर ।
ब्रह्मयास वरदान परात्पर ।।
नटराजा तव मूर्ति मनोहर ।
पौरुष अन् लास्याची मोहर ।
भव्यत्वाच्या-सूक्ष्मत्वाच्या
अद्वैताची कविता सुंदर ।।

- चैतन्य दीक्षित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य - अतिशय सुंदर रचना.

काही शंका - पौरुष अन् लास्याची मोहर । >>> लास्य म्हणजे काय ?
लयास जाती वैश्विक गात्रे >>>> इथे गात्रे याचा तुला अभिप्रेत असलेला अर्थ काये ?

शशांकजी,
धन्यवाद
लास्य-> लावण्य अशा अर्थाने वापरला आहे शब्द. नृत्याचं एक अंग आहे 'लास्य'.

वैश्विक गात्रे- नटराजाचे नृत्य हे आनंद तांडव म्हणून ओळखले जाते. (दुसरे ते रौद्र तांडव)
त्याच्या नृत्यामुळे विश्वाचा लय होऊन ब्रह्माने नवीन विश्वनिर्मिती करण्यासाठीची ती पूर्वतयारी समजली जाते.
म्हणून 'वैश्विक गात्रे' असे म्हटले आहे. विश्वातील सर्वच गोष्टी असा अर्थ अपेक्षित आहे.

सुंदर कविता दीक्षितजी. यमक - अनुप्रासही विलोभनीय आहेत.
_____________________________________
वामांगीचा लास्यविलासु! जो हा जगद्रुपाआभासु|
तो तांडवमिसे कळासु|दाविसी तू|

शंकराच्या नृत्याला तांडव आणि पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात. न्रुत्यामध्ये लय आणि सुसंवाद असतो. माणसाला आनंद झाला की तो स्वाभाविकपणे नाचतोच पण दु:ख , वियोग, संहार इत्यादि अनुभवही नृत्यकलेमधून तो दाखवितो. म्हणजे त्या त्या भावांचे आभास निर्माण करण्याची शक्ती नृत्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगदरूपी आभास हे पार्वतीचे (मायेचे) लास्य आहेत. हे लास्य गणपतीच्या साक्षीने चाललेले आहेत. इतकेच नव्हे तर हे गुरो, हे गणपती, मायेच्या नृत्यातील जगदाभास दाखविण्याचे कौशल्य तू आपल्या नृत्यकलेच्या द्वारे दाखवितोस. पार्वतीचे लास्य जसे गणपतीच्या साक्षीने चालतात, तसे शिष्याचे जीवन सद्गुरुंच्या साक्षीने चाललेले असते. आणि शिष्य जर या जगदाभासात रमू लागला, तर हा साक्षीभाव सोडून तांडवनृत्य करून ते तो आभास दूर करतात.

स्रोत - http://www.scribd.com/doc/52892929/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%...