व्हिव्हियाना हाईट्स भाग 3

Submitted by विश्वास भागवत on 9 March, 2016 - 02:41

भाग २इथे

http://www.maayboli.com/node/57954
-----------------------------------------
मनोज आजच्या त्या अघोरी पूजेनंतर रात्री पेंटहाऊस वरच थांबला होता.
" या क्षितिज च्या आयचा, साला हरामी, तुझ्या बद्दल बोलतो. जाता जाता चुना लावून गेला. तो मांत्रिक पण काय म्हणे तर अमानवी शक्ती आहे? मीने ऐकतेय का गं? तुझ्याबद्दल एक टक्का जरी माहिती असतं ह्यांना तर कधी असा बोलायला जीभ नसती वळली तुझ्याबद्दल. तुझ्या सारखी संवेदनशील स्त्री. केवढा आनंद झाला होता तुला पहिले इथे आलो तेव्हा. आपल्याला बाळ नसल्याची कमतरता तुझे पाळलेले पक्षी, मांजर पूर्ण करायचेत. तुझा सगळ्यांना लळा लावणारा स्वभाव कधी मला जमला नसला तरी मी त्याने परिपक्व होत होतो. माझ्याच्याने ना सांभाळलीे जाणारी नाती तू लीलया सांभाळून ठेवली होती, आणि मी प्रश्न विचारला की हसून म्हणायची की आपलीच तर आहेत सगळी. कसं ग तुला जमायचं हे सगळं. तांदुळाच्या गोणीत ठेवलेला चिमूटभर केशर पूर्ण तांदळाला सुवासीत करतात असं म्हणतात, तू तर माझ्याजवळ पूर्ण होती, त्याचा माझ्यावर परिणाम झाला नसता तरच नवल. मी पण हळूहळू खुलायला लागलो होतो, बाहेरच्या लोकांत मिसळायला लागलो होतो. आपल्याला बाळ नसल्याचं माझ्यापेक्षा तुलाच जास्त दुःख होतं मात्र कधी तू ते मला बोलून दाखवलं नाहीस. आणि तो दिवस आला, तुझ्या मैत्रिणीच्या चोळीच्या कार्यक्रमाला तू गेली होतीस. तिथे तिच्या सासूने वांझ म्हणून तुला तिची ओटी भरू नाही दिली. तू घरी येऊन रडलीस, तुझ्यासारख्या हळव्या मनाला ते सहन नाही झालं. मी फ्लाईट मध्ये असल्यानं तुझा शेवटचा आवाजही नाही ऐकू शकलो ग. गोतावळ्यात वाढलेल्या तुझ्या आजूबाजूला ही कोणीच नव्हतं, तुझं लाडकं मांजर कुठेतरी फिरायला गेलेलं. तुला हे सगळं सहन नाही झालं आणि तू स्वतःचा जीव त्यागलास. तूझ्यानंतर माझ्या जीवनात काहीच उरलं नव्हतं. जीव द्यायचा विचार मनात आला पण माझी हिंमत नाही झाली. मी फ्लॅट सोडला कारण हे तुझ्याशिवाय भकास असलेलं पेंटहाऊस माझ्या जीवावर उठायचं. मी माझ्या मूळ स्वभावपेक्षाही आणखी तुसडा झालो. लोकांशी मुद्दाम फटकळ वागायला लागलो. लोकांनी त्याचा अर्थ वेगळाच घेतला आणि आज माझ्यावर तुझ्या खूनाचं बालंट आलंय. कस समजावून सांगू या जगाला की तुझ्या नखालाही चुकूनही कधी मी धक्का नसता लागू दिला.
त्यादिवशी मला जास्तच झाली होती, विसरलो मी तू आता इथे नसते ते. बेल वाजवल्यावर क्षितिज ने दार उघडलं. त्याच्या पायात एक काळ मांजर होत. अगदी तुझ्या मांजरासारखं, त्याला पाहून मला चीड आली. वाटलं ते तेच मांजर आहे, कदाचित ते त्या वेळी घरी असतं तर तू माझ्यासोबत असती , माझा तोल सुटला आणि त्यांनतर पूर्ण रामायण घडलं. आज खूप आठवण येतेय ग तुझी म्हणून थांबायचं ठरवलं. मला माहितीय त्या क्षितिज ची खोटी गोष्ट पण कुठेतरी त्या बाकींच्यांचा विचार आला मनात. तुझी भीती घेऊन ते राहिले असते तर मला पटलं नसता. तुझा उल्लेख एक भूत म्हणून कधीही होऊ नये . म्हणून मी स्वतः त्या मांत्रिकाला आणलं. त्याने ही सोंग चांगलाच वठवलं. पण आता सगळं बास, मी हा फ्लॅट विकतोय मिनू. एक शेवटची रात्र तुझ्या आठवणीत इथे घालवायला आलो. "
मनोज रडत होता, त्याच्या मनात विचारांच काहूर माजलं होत. गेल्या आठवड्याभरातल्या घटनांनी त्याच्या चेहऱ्यावरचा खोटा माजोरडेपणाचा मुखवटा गळून पडला होता. स्फुंदून त्याचा गळा कोरडा पडला होता.
तेव्हढ्यात मनोजला आवाज आला . तो आवाज किचनच्या खिडकीतून येत होता. नख घासल्याचा खर-खर्रर्रर्र आवाज आणि त्यापाठोपाठ एक दुर्गंध त्याच्या नाकात शिरला.
------------------------------------------

मनोज सावध झाला, दबक्या पावलांने तो किचन कडे जाऊ लागला. तो खर्रर्रर्र खर्रर्रर्र आवाज वाढत चालला होता. किचन ची खिडकी उघडी होती. भर एप्रिल महिन्यात त्या पूर्ण फ्लॅटचं वातावरण एखाद्या गुहेसारखं थंडगार झालं होत. मनोज खिडकी लावायला वळला. खिडकीतून बाहेर पहाताच त्याच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. प्रचंड वेगाने मीना पाईप वरून चढत वर येत होती. होय, मीनाचं होती ती. मात्र तिचा चेहरा कल्पनेबाहेर विद्रुप दिसत होता. तिच्या नखांनी भीतीला ओरखडे पडून अंगावर काटे उभे करणारा खर्रर्रर्र खर्रर्रर्र आवाज येत होता. दचकून मनोज खिड्कीपासून मागे सरला. कशालातरी पाय अडकून तो धाडकन पाठीवर पडला. तेव्हड्यात सर्व दिवे फडफडू लागले आणि फटकन आवाज होऊन विझले. मनोज जागीच थिजला, त्याने चाचपडत खिष्यातून मोबाईल बाहेर काढला. टॉर्चच ऑप्शन शोधून टॉर्च लावेपर्यंत अचानक सर्व दिवे पुन्हा पेटले आणि वातावरण नॉर्मल झालं. मनोज ला उठायची हिम्मत होत नव्हती. तो तसाच पडून राहिला. नखांचा आवाज थांबला होता मात्र तो दुर्गंध आणि थंडावा तसाच होता. हिंमत करून कसाबसा मनोज उठला आणि त्यानं हनुमंताचं नाव घेऊन खिडकीबाहेर पाहिलं. तिथे काहीही नव्हतं. आजच्या तणावामुळे भास झाला असावा हे समजून मनोज मागे वळला आणि त्याची नजर कॅबिनेट वर गेली. मीना कॅबिनेट वर बसून त्याच्याचकडे दात विचकून पाहत होती. तिच्या हातावर चाकूने केलेले घाव स्पष्ट दिसत होते आणि त्यातून घळाघळा रक्त वाहत होते. ती हसता हसता रडत होती आणि रडता रडता खिदळत होती. तिने मनोज कडे पहातच आपली नख मागच्या भिंतीत रोवली आणि सर सर चढून छताला पकडून छतावर उलटी सरपटू लागली. एका क्षणी तिने अवचित वरुन उडी मारली ती थेट मनोज समोरच. मनोजच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली.
"माझा खून केलास ना हात चिरून, आता तुही पहा कसा वाटत ते.",तिने हात लांबवताच टेबल वरचा चाकू उडून तिच्या हातात आला. मनोजने प्रसंगावधान ठेवून दरवाज्याकडे पळायला सुरवात केली. दरवाजा पूर्णपणे जॅम झाला होता. मनोजचे लक्ष छताकडे गेले, मीना छताकडे पाय करून चारही हातापायांवर चालत त्याचाचकडे येत होती. मनोजने दार बडवायला आणि मदतीसाठी ओरडायला सुरवात केली. अचानक मीनाने मनोजच्या पाठीशीच उडी घेतली. मनोजचा हाथ खसकन ओढून तिने सपासप त्यावर वार केले आणि हसू लागली. रक्त गेल्याने मनोजची शुद्ध हरपली आणि अचानक धाडकन दरवाजा निखळून उघडला.

---------------------------------

दरवाजा उघडताचं सिद्धार्थ, साठे, कदम आणि कुलकर्णी एकदम आत शिरले. सगळ्यांना आतलं अमंगळ वातावरण एकदम जाणवलं. सिद्दार्थ ने मनोज ची नाडी तपासली. "श्वास सुरुय यांचा, लवकर ऍम्ब्युलन्स ला बोलवा आणि कशालाही हात लावू नका.", तो ओरडला.
- - - - - - - - - - - - - -

ऍम्ब्युलन्स येऊन धांडे ला घेऊन गेली होती, रक्तस्रावामुळे जरी त्याची शुद्ध गेली असली तरी वेळेत उपचार भेटल्याने त्याचा जीव वाचू शकतो असं डॉक्टरने सांगताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र हल्ल्याचे स्वरूप कळताच सगळ्यांनी पार हैराण होऊन क्षितिज ला बोलवून घेतले होते.
पोलीस पण येऊन सगळ्यांचा साक्ष घेत होते. झालेल्या प्रकाराने ते ही गोंधळले होते. पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या मधातल्या Cctv मध्ये कोणीही वरून येताना किंवा वर जातांना दिसत नव्हतं मात्र हल्ल्याच्या एक तासा आधी पर्यंत सातव्या मजल्यावरच्या cctv फुटेज मध्ये नुसत्या मुंग्या दिसत होता . हल्ल्याचे हत्यार चाकू असल्याचं त्यांचं मत निघालं मात्र चाकू स्वयंपाकघरातच त्याच्या जागीच होता, त्यावर कोणतेही रक्ताचे डाग नाही सापडले. हल्लेखोरांचा काहीही पत्ता नसल्याने ते गोंधळले होते. बरं आत्महत्येचा प्रयत्न म्हणावा तर आत्महत्येसाठीचे हत्यार पण कुठे भेटलं नव्हतं. वैतागून त्यांनी तुटलेल्या दरवाज्यापुढे टेप लावली आणि सगळ्यांना आत ना जाण्याची ताकीद देऊन आणि एक शिपाई तिथे थांबवून ते निघून गेले होते, तो शिपाईदेखील प्रसिद्धी जाणून असल्याने सातव्या मजल्याऐवजी सहाव्या मजल्याच्या जिन्यावर थांबला होता, अर्थात तिथून वर एकच फ्लॅट असल्याने कोणी जाण्याचा प्रश्न नव्हता त्यामुळे कोणी त्याला हरकत नाही घेतली.
आतमध्ये दिसलेल्या प्रकाराने सगळे सभासद घाबरले होते, आत छतावर आणि भिंतीवर नखाने ओरबडल्याच्या खुणा दिसत होत्या, आणि किचन ची खिडकी पण उघडी दिसत होती.
- - - - - - - - - - -

"आम्ही काल पूजेनंतर झोप न येत असल्यानं कुलकर्णींच्या फ्लॅट मधेच उशिरापर्यंत ह्या सगळ्या प्रकारची चर्चा करत बसलो होतो. शेवटी बारा-साढ़े बाराच्या सुमारास उशीर झाला म्हणून आम्ही आपापल्या फ्लॅट कडे निघालो तर वरतून धांडे चे आवाज आणि दार ठोकण्याचं आवाज ऐकू आला. ताबडतोब आम्ही वर गेलो, दार पक्कं लागलं होतं आणि शेवटी खूप प्रयत्नानंतर मी आणि कदम काकांनी जोर लावून ते निखळवून उघडलं.", आत धांडे शुद्ध हरपून पडला होता आणि एक विचित्र दुर्गंध पूर्ण फ्लॅट मध्ये पसरला होता.", सिद्धार्थ क्षितिज ला सांगत होता.

"ह्याचा अर्थ मीनाचं भूत आणखी तिथून गेलं नाही? आजची पूजा फेल गेली म्हणायचं का मग?", कुलकर्णी उद्गारले.

क्षितिज थक्क होऊन सगळं ऐकत होता, सोबत आलेल्या वैभवला देखील काही कळतं नव्हतं. ” जर मीनाच्या भुताची गोष्ट आपणं मनाने बनवली तर ती सत्यात कशी आली आणि धांडे वर हल्ला कसा झाला,तेही आपण सांगितल्या प्रमाणेच? त्याने खरंच तिचा जीव घेतलाय कि काय आणि जर त्याचा बदला घ्यायचा होता तर मग त्याला आज जिवानिशी का नाही संपवलं?", हा विचार करून त्याचा मेंदू फुटायला आला होता.

"क्षितिज तू काय विचार करतोयस?", कुलकर्णींनी विचारलं.

"मला वाटत तू त्यांना खरं सांगायला हवं क्षितिज.",वैभवने क्षितिज कडे पाहिलं आणि बोलला.
"काय खरं?", कदमांनी चमकून विचारलं.
सगळे क्षितिज कडे पाहत होते. अपराधी वाटून क्षितिज ने सगळ्यांना त्याच्यासोबत झालेली खरी घटना सांगायला सुरवात केली.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलत गेले. पहिले आश्चर्य, नंतर क्षितिजच्या बुद्धीचे आणि अभिनयाचे कौतुक, त्याच्या खोट बोलून केलेल्या फसवणुकीचा राग पण त्याच्या शुद्ध हेतू पाहून दया.
"असा करायची काय गरज होती तुला क्षितिज, एकदा फक्त सांगितलं असता आम्ही सहज सगळे एकत्र आलो असतो. तू आम्हाला फसवलंस, आमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतलास'', साठे रागावले होते.

"सध्याचं ते राहू द्यात, इथं मुख्य मुद्दा हा आहे की क्षितिजचं सांगितलेलं खरं येतंय सगळं.", वैभव म्हणाला आणि सगळे भानावर आले. मोठा धोका समोर होता आणि आता तो खरं खरं असल्याची जाणिव त्यांना झाली होती.
"आता काय करणार आपण कुलकर्णी आजोबा? तो मांत्रिक पण खोटा निघाला.", सिद्धार्थ ने विचारलं पण उत्तर त्यांच्याहीकडे नव्हतं.
"आता वेळ आहे त्यांना बोलवायची, त्यांच्या शिवाय चांगलं व्यक्ती मला तरी वाटत नाही कोणी असेल ह्या प्रकारावर उत्तर काढायला.", वैभव बोलला आणि सगळ्यांनी चमकून पाहिलं.
_____________________________
(क्रमश:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वात आधी रोज नविन भाग टाकताय यासाठी धन्यवाद!

हाही भाग मस्त.

आता समर्थ येणार का? +१
आधी मला वाटले की क्षितीजची खेळी झाली आता ही मनोजची खेळी असेल पण 'ते' येणार म्हंजे काहीतरी गुढ असेल

समर्थ कोण?

मस्त जमलाय भाग! अंगावर काटा आला वाचताना.

वर्तुळ पण अशाच वळणावर येऊन अडकलीय.. त्याची उगीच आठवण झाली. Happy

कथेचा वेग बांधणी उत्तम.

अजुन येउ दयात

आता प्रतिक्रया शेवटाला देईन....

पुढिल लिखाणास मनपुर्वक शुभेच्छा.

छान रंगली आहे कथा............... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

Pages