#PledgeForParity शपथ समतेची

Submitted by आतिवास on 7 March, 2016 - 00:31

उद्या ८ मार्च. उद्या आहे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. ‘महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट’ असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता..

अनेकांसाठी ही तर फक्त १७-१८ तासांची कसरत, फार नाही,. ९ मार्चला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. ‘महिला दिन’ असतो तसा ‘पुरूष दिन’ही असावा किंवा ‘हल्ली पुरूषच कसे दीन झाले आहेत’ असले नेहमीचे विनोदही आहेत. असले विनोद ‘महिला दिना’ची नीट माहिती नसल्याने केले जातात असं मला अनेकदा वाटतं.

दोन मुद्दे आधीच स्पष्ट करते. एक म्हणजे या जगात फक्त स्त्रियांना समस्या आहेत आणि सगळे पुरूष एकजात सुखी आहेत असं मी मानत नाही. सामाजिक वास्तवाची जाणीव असणारी कोणतीही व्यक्ती असं एकांगी विधान करणार नाही. पुरूषांनाही समस्या आहेत, संघर्ष आहेत, जबाबदा-या आहेत, दु:खं आहेत, ताण आहेत हे नाकारण्याचं कारण नाही. पण सामान्यत: स्त्री-पुरूष नात्यांत व्यवस्थेने पुरूषाचा वरचष्मा निर्माण झाला आहे. स्त्री-पुरूष नातं म्हणते फक्त पत्नी-पती हे नातं नाही. मुलगा-आई, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, सहकारी .. अशा नात्यांच्या अनेक पदरांत ‘पुरूष प्राधान्य’ दिसून येतं. सामाजिक रचनेचा आणि संस्कारांचा हा परिणाम आहे. स्त्रियाही पुरूषांना प्राधान्य देतात कारण त्याही पुरूषप्रधान समाजरचनेत जन्म घेतात आणि वाढतात. ‘पुरूषसत्ता’ हा आजच्या लेखाचा विषय नाही. परंतु स्त्री चळवळीने व्यक्तिगत पुरूषांना आव्हान दिलं नसून पुरूषसत्तेला – म्हणजेच स्त्रिया आणि पुरूष यातल्या श्रेणीक्रमाला, उतरंडीला आणि साचेबद्ध भूमिका आणि अपेक्षांना- आव्हान दिलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे सर्वच पुरूष स्त्रियांबाबत असंवेदनशील असतात आणि सर्व स्त्रिया इतर स्त्रियांबाबत संवेदनशील असतात – असं घाऊक विधान कोणी करत असेल तर त्यात तथ्य नाही. काही पुरूष संवेदनशील असतात, तर काही पुरूष असंवेदनशील असतात. जगातले सगळे पुरूष त्यांना भेटेल त्या स्त्रीचा छळ करत असतात, तिच्यावर अत्त्याचार करत असतात असं नाही. तसंच काही स्त्रिया संवेदनशील असतात, तर काही स्त्रिया असंवेदनशील असतात. परिवर्तन स्त्रिया आणि पुरूष या दोघांमध्येही अपेक्षित आहे. त्यामुळे ‘स्त्री चळवळ’ स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही बरोबर काम करते. वर्षानुवर्षांच्या परंपरेने काही संस्कार आपल्यावर होतात, आपल्या काही सवयी पक्क्या होतात. मात्र या परंपरेने स्त्रियांना व्यवहारात दुय्यम स्थान दिलं आहे. हे फक्त भारतात घडलं-घडतं असं नाही तर जगभरात घडलं-घडतं. ‘स्त्रिया हा एक स्वतंत्र वर्ग आहे’ असं एके काळी मानलं जायचं. पण व्यवहारात असं दिसतं की स्त्रिया ज्या समाजाच्या (धर्म, वंश, प्रांत, जात, भाषा इत्यादी घटक समाजरचना घडवतात) सदस्य असतात त्याचा त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो. पण दुस्-या बाजूने स्त्रीला कायम स्त्रीत्त्वाचं जोखड वागवावं लागतं. म्हणून जगभरातल्या स्त्रियांमध्ये बरेच फरक असले तरी त्यांच्या स्थितीत काही विलक्षण साम्यही दिसून येतं.

पुरूषसत्ता म्हणजे काय? विस्तारभयास्तव मी विस्तृत लिहित नाही. वंशसातत्यासाठी ‘मुलग्यां’ ना दिलं जाणारं महत्त्व; खाण्यापिण्यात, शिक्षणात घरात मुलगा-मुलगी यांच्यात केला जाणारा भेदभाव (हा स्त्रियाही करतात कारण त्याही ‘पुरूषसत्तेत’ वाढलेल्या असतात); घरकाम फक्त स्त्रियांची आणि मुलींची जबाबदारी असणं; मुली आणि स्त्रियांवर असणारी अनेक बंधनं (त्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणाशी बोलावं-बोलू नये, एकटीने फिरू नये इत्यादी); लैंगिक शोषण; परंपरेने स्त्रियांना वारसाहक्क नसणं (कायद्यात सुधारणा झाल्या आहेत); मुले-मुली किती आणि कधी व्हावीत यासंबंधी निर्णय घेण्याचा स्त्रियांना अधिकार नसणं असे अनेक मुद्दे ‘पुरूषांना दिलं जाणारं महत्त्व’ अधोरेखित करतात. यातल्या प्रत्येक मुद्द्याला अपवाद असू शकतो पण आपण इथं आत्ता सर्वसाधारणपणे समाजात काय दिसतं त्याची उजळणी करतो आहोत.

थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांची उत्पादन शक्ती, स्त्रियांची पुनरूत्पादन शक्ती, स्त्रियांची लैंगिकता, स्त्रियांचं हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य, साधनसंपत्ती (शेती, घर इत्यादी) यावर पुरूषांचं नियंत्रण असणं म्हणचे पुरूषसत्ता. धर्म, कुटुंब, कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था, बाजार, राजकारण ... अशा अनेक व्यवस्थांमधून पुरूषसत्तेला बळ मिळत असतं.

‘पुरूषसत्ता’ खरं तर पुरूषांनाही कधीकधी जाचक वाटते, त्यांनाही ती नकोशी वाटते कारण त्यात त्यांच्यावरही अनेक जबाबदा-या असतात आणि ‘पुरूष म्हणजे असाच असायला हवा’ या अपेक्षांचं त्यांनाही ओझं पेलून न्यावं लागतं. स्त्री चळवळीने स्त्रियांचे स्वत:बदद्लचे-पुरूषांबद्दलचे समज, स्वत:कडून आणि पुरूषांकडून असलेल्या अपेक्षा - अशा अनेक बाबतीत परंपरेला छेद देणारा विचार मांडला आहे. स्त्री आणि पुरूष यांच्यात जीवशास्त्रीय भेद आहेत (तेही फक्त प्रजननसंस्थेत), पण त्याच्या आधारे सामाजिक भेदांचं एक विश्व रचलं गेलं आहे. प्रश्न विचारले जात आहेत ते या सामाजिक रचनेबाबत, बदल अपेक्षित आहे तो सामाजिक रचनेत. समाजाच्या धारणांमध्ये तसेही बदल होत असतात – आपले आजोबा-वडील-आपण स्वत: किंवा आपली आजी-आई- आपण स्वत: यांच्या जीवनावर एक नजर टाकली तरी खूप बदल झालेले दिसून येतील. स्त्री चळवळीला अपेक्षित असलेले बदल होणं काहीसं अवघड असलं तरी अशक्यप्राय मात्र नाही.

स्त्रियांमध्ये बदल झाला तर परंपरेने मिळत आलेल्या काही फायद्यांवर पुरूषांना पाणी सोडावं लागेल हे खरं आहे. पण म्हणून ‘स्त्री चळवळ’ (त्यात वेगवेगळ्या विचारधारा आहेत) म्हणजे ‘पुरूषांच्या विरोधातलं कारस्थान’ असा काही विचार तुम्ही करत असाल, तर तो कृपया डोक्यातून काढून टाका. स्त्रिया परग्रहावरून आलेल्या नाहीत. आजी, आई, आत्त्या, मावशी, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, सहकारी .... या सगळ्या ‘आपल्या’ आहेत. माणूस म्हणून स्त्रियांच्या हक्कांची प्रस्थापना करण्याच्या या लढाईत स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही सहभागी होण्याची गरज आहे.

स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी अनेक शतकं संघर्ष चालू आहे. आर्थिक हक्क, नागरी हक्क, सामाजिक-सांस्कृतिक हक्क आणि राजकीय हक्क अशी या हक्कांची साधारण वर्गवारी केली जाते. काळाच्या ओघात स्त्रियांच्या संघर्षाचं स्वरूप बदललं, त्यांची साधनं बदलली आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही बदलला. या दीर्घ वाटचालीत अनेक संवेदनशील पुरूषांनी स्त्रियांना साथ दिली. स्त्रियांच्या हक्कांची दखल घेणारे अनेक कायदे झाले. पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीवही झाली. ही जाणीव केवळ आपल्या देशापुरती नाही तर जागतिक स्तरावर आहे.

‘स्त्री चळवळीचा’ इतिहास मोठा आहे. या लेखात त्याचा आढावा घेता येणं शक्य नाही. पण आपण ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ कसा आला आणि कसा रूजला हे थोडक्यात पाहू.

१९०८ मध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) शहरातील कापड उद्योगातील स्त्रिया संपावर गेल्या. कामाच्या ठिकाणी योग्य त्या सोयी नाहीत, कामाचे तास खूप जास्त आहेत, कामाचं मोल अगदी कमी मिळतं अशा त्यांच्या असंख्य तक्रारी होत्या.

१९०९ मध्ये अमेरिकेत पहिला ‘महिला दिन’ साजरा झाला. तो दिवस होता २८ फेब्रुवारी. १९१० मध्ये कोपनहेगन शहरात ‘आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद’ भरली होती. या परिषदेत १७ देशांतील सुमारे १०० महिला प्रतिनिधी सामील झाल्या होत्या. महिला हक्कांच्या चळवळीला पाठिंबा देणं आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ठिकठिकाणी चालू असलेल्या प्रयत्नांना समर्थन देणं अशा दुहेरी उद्देशांना समोर ठेवून या परिषदेने ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मात्र हा दिवस कोणता असावा यासंबंधी परिषदेत काही ठरलं नाही.

२६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेने २१ वर्षावरील स्त्रियांना (पुरूषांप्रमाणेच) मतदानाचा अधिकार दिला. एका अर्थी भारतातल्या स्त्रियांना हा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला नाही, कदाचित त्यामुळेच जगभरात याविषयी झालेल्या संघर्षाची आपल्याला कमी माहिती आहे. काही देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला ही माहिती स्त्रियांच्या लढ्याचा अंदाज आपल्याला देईल. (पूर्ण चर्चेत प्रौढ स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत उल्लेख आहे. काही देशांत सर्व प्रौढ पुरूषांनाही मतदानाचा अधिकार अनेक वर्ष नव्हता हेही एक वास्तव आहे.)

स्वीडन – १७१८ मध्ये सिटी गिल्डच्या सदस्य असणा-या आणि कर भरणा-या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो १९२१ मध्ये. अमेरिका – १७५६ मध्ये Uxbridge (Massachusetts) इथल्या एका स्त्रीला शहराच्या मीटींगमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळाला. १९१० मध्ये राज्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यायला सुरुवात झाली आणि १९२० मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. ग्रेट ब्रिटन १९२८, न्यूझीलँड १९२९, रशिया १९१७ (झारच्या पदच्युतीनंतर), १९३५ मध्ये ब्रिटीश राज (भारतातही सुरूवात) आणि बर्मा (आताचा म्यानमार), १९४५ – फ्रान्स, इटली आणि जपान, १९४७ चीन आणि पाकिस्तान (१९४७ मध्ये पाकिस्तानने फक्त शिकलेल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, तो १९५६ मध्ये सार्वत्रिक करण्यात आला.) ही प्रक्रिया अगदी २०१५ मधल्या सौदी अरेबियाच्या निर्णयापर्यंत चालू आहे.

कोपनहेगन परिषदेचा परिणाम म्हणून १९११ मध्ये १९ मार्च या दिवशी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लँड या देशांत ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. दहा लाखांपेक्षा जास्त स्त्रिया आणि पुरूष या समारंभात सामील झाले. मतदानाच्या हक्कांबरोबर स्त्रियांना काम (नोकरी) करण्याचा अधिकार, व्यावसायिक शिक्षण घेण्याचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी अशा मागण्या या दिवशी मांडल्या गेल्या.

१९१३ मध्ये ‘पहिल्या जागतिक युद्धा’ला विरोध दर्शवत, शांतीची मागणी करत रशियातल्या स्त्रिया फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या रविवारी रस्त्यावर उतरल्या. तर युरोपमध्ये १९१४ मध्ये ८ मार्च आणि त्याच्या एक दोन दिवस पुढे-मागे ‘महिला दिन’ साजरा झाला. १९१७ मध्ये रशियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारीमधल्या शेवटच्या रविवारी ‘भाकरी आणि शांती’ चा उद्घोष करत रशियन स्त्रिया मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्या. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा दिवस होता ८ मार्च. (रशियाने १९१८ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं.) यानंतर चार दिवसांत झारची सत्ता संपली.

यानंतर विविध देशांत ‘महिला दिन’ साजरा होत राहिला. ‘अखिल भारतीय महिला परिषदे’च्या (All India Women’s Conference) पुढाकाराने भारतात १ मार्च १९३० या दिवशी ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. (१३ फेब्रुवारी हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो.)

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ ख-या अर्थाने जागतिक झाला तो १९७५ मध्ये. ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून जाहीर केला. त्यानंतर जगभर या दिवशी स्त्रियांच्या हक्कांसंबंधी विचारमंथन होण्यास अधिक जोमदार सुरूवात झाली.

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा एक दिवसाचा उपक्रम होऊ नये याकरिता दरवर्षी एक दिशादर्शक वाक्य, घोषवाक्य (थीम) जाहीर केलं जातं. १९७५ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली’ अशी थीम होती. स्त्रिया आणि मानवी अधिकार (१९९८), स्त्रियांवरील हिंसेपासून मुक्त जग (१९९९), आजच्या अफगाण स्त्रिया – वास्तव आणि संधी (२००२), स्त्रिया आणि एचआयव्ही एड्स (२००४), निर्णयप्रक्रियेत स्त्रिया (२००६), ग्रामीण स्त्रियांचे सबलीकरण – भूक आणि गरीबी संपवणे (२०१२) अशा काही थीम मला सहज आठवल्या.

२०१६ ची ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ची थीम आहे #PledgeForParity – ‘शपथ समतेची’ किंवा ‘समतेसाठी शपथ’. व्यक्तिगत पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर करता येतील असे चार विविध उपक्रम सुचवण्यात आले आहेत. १. स्त्रिया आणि मुलींना त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मदत करणे: कळत-नकळत असलेल्या (जाणीव-नेणीवेतल्या) पूर्वग्रहांना आव्हान देणे (Help women and girls to achieve their ambitions: challenge conscious and unconscious bias). २. लिंगभाव संतुलित नेतृत्वाला साद (Call for Gender balanced leadership) ३. स्त्री आणि पुरूषांच्या योगदानाला समान मूल्य देणे (Value women’s and men’s contribution equally) ४. सर्वसमावेशक आणि लवचीक संस्कृती निर्माण करणे (Create inclusive, flexible cultures) असे चार पर्याय आहेत. यापलीकडचा एखादा पर्याय आपल्याला सुचत असल्यास त्यानुसार उपक्रम करायला काहीच हरकत नाही. मी एक क्रमांकाची शपथ घेतली आहे – संकल्प केला आहे.

या ठिकाणी जाऊन आपण शपथ घेऊ शकता. हे सगळं काहीसं फेसबुकी शैलीचं (म्हणजे उथळ) वाटू शकतं याची मला कल्पना आहे. त्यामुळे शपथ न घेताही आपण आपल्यापुरता, आपल्या भवतालच्या परिस्थितीशी सुसंगत असा संकल्प करू शकतो.

माझ्या घरात, माझ्या कामाच्या ठिकाणी, मी ज्या ज्या ठिकाणी वावरते/वावरतो अशा सर्व ठिकाणी ‘मी जाणीवपूर्वक स्त्री-पुरूष समतेसाठी प्रयत्नशील राहीन’ असा निश्चय आपण करू शकतो का? तो आचरणात आणू शकतो का? ही शपथ फक्त पुरूषांनी घेणं अपेक्षित नाही, स्त्रिया आणि पुरूष यांची ही संयुक्त जबाबदारी आहे. स्त्री-पुरूष समतेच्या मार्गावर आपण एकटेच नाही, अनेक जण आणि अनेक जणी सोबत आहेत याची खातरी असू द्या. हा एका दिवसाचा उपक्रम नाही, हा सातत्याने करण्याचा प्रवास आहे.

‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या सर्वांना शुभेच्छा.

शपथ घेतल्यावर (अथवा संकल्प केल्यावर) तुमच्या वाटचालीतले अनुभव जरूर सांगा. मला ते वाचायला नक्कीच आवडतील.

बदल - ८ मार्च दुपारी १.०० वाजता केला आहे. ललिता-प्रीति यांनी प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे शपथ दुवा आता पूर्ण वाक्यासाठी दिला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Very well written. Covers all the imp points. Will take the pledge. I do practice/Support all the four initiatives.

छान लिहिलंय. पहिला (महिला-दिनाच्या इतिहासाच्या आधीचा) चिंतनात्मक भाग आवडला.

माझ्या घरात, माझ्या कामाच्या ठिकाणी, मी ज्या ज्या ठिकाणी वावरते/वावरतो अशा सर्व ठिकाणी ‘मी जाणीवपूर्वक स्त्री-पुरूष समतेसाठी प्रयत्नशील राहीन’ असा निश्चय आपण करू शकतो का?

>>> नक्कीच करू शकतो. दैनंदिन आयुष्यात अगदी साध्या-साध्या गोष्टी याच्याशी रिलेट होणार्‍या असतात. चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम या चालीवर म्हणता येईल की अगदी साध्या साध्या बाबींतही दिसणारी असमानता ओळखणे आणि त्याला विरोध करणे हे घराघरांत घडायला हवं. आणि यासाठी आक्रस्ताळेपणा किंवा वागण्यातला उन्मादच हवा असं काही नसतं. ठामपणा, निर्धार, आत्मविश्वास महत्त्वाचा!

धन्यवाद साती, नताशा आणि ललिता -प्रीति.
नताशा, ते चारही पर्याय तुम्ही म्हणता तसे एकमेकांशी संबंधित आहेत.
ललिता -प्रीति, ठामपणा महत्वाचा हे मान्यच.

सुरेख लेख अतिवास. तुम्ही माझा फार वेळ वाचवलात. न राहवून लिहायला घेतले होते, तो विचारच सोडून दिला. अतिशय व्यवस्थित आणि मुद्देसूद लिहीले आहे तुम्ही.
फार आभारी आहे.

आता जिकडे तिकडे शेअर करते.

सही केली, फेसबुक वर शेअर केले, हापिसात शेअर केले. Happy

खूप छान लेख! तुमचा लेख वाचून काहीतरी छान वाचायला मिळणार ह्या अपेक्षेने उघडते आणि आजवर अपेक्षाभंग झाला नाही Happy

आजच्या दिवसाची सुरवात या लेखाच्या वाचनाने करायची म्हणून काल राखून ठेवला होता. सोपा, मुद्देसूद आणि गोळीबंद लेख. शपथ तर घेतलीच आता शेअरही करते. धन्यवाद आतिवास.

लेख लिहिला छान म्हणून आवडला. शैली आवडली. शब्द आवडले. पण लेख म्हणून कुठेनाकुठे स्त्रिचा उहापोह जास्तच झाला आहे. आजच्या काळात पुढारलेल्या स्त्रिया एकत्रित येऊन शहरात महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ह्या अशा महिला कितपत खेड्यापाड्यातील गोरगरीब गरजू महिलांचे प्रश्न समजवून घेतात आणि त्यांच्या पर्यंत पोहचतात? फक्त फॅशन म्हणून महिला दिन साजरा करताना स्त्रियांना पाहिले की हसू का रडू असे होते मला!!!

दुसरा मुद्दा, कित्येक स्त्रिया नवर्‍याच्या उरावर नाचतात. त्याच्या पैशावर मज्जा करतात. आपल्याच घरातील इतर स्त्रियांवर अत्याचार करतात. मग नक्की पुरुष कुठे चुकतो आहे हे उमगत नाही. घरात बायांना आपल्या धाकात ठेवणारे पुरुष बरे की घरात स्वैराच्चार करणारी स्त्रि बरी?!!!

>>>> घरात बायांना आपल्या धाकात ठेवणारे पुरुष बरे की घरात स्वैराच्चार करणारी स्त्रि बरी?!!! <<<<
दोनही प्रकारे बरे नाहीत, सुसंस्कृत घरात..... !
अन दोन्हींचाही एकमेकांशी अर्थाअर्थी संबंधही नाही.

एक मराठी शब्द आहे - औचित्य. म्हणजे एखाद्या लग्नाला गेलं की आपण म्हणतो - "लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे". कुणी असं म्हणत नाही की "हडळीला भेटला समंध". असे बोलणे १०० टक्के खरे असले तरी उचित नसते. महिलादिनाच्या धाग्यावर येऊन महिलांच्या वर्तनाला नावे ठेवायचे हे काही औचित्यपूर्ण नाही. महिलांच्या गैरवर्तनावर वेगळा धागा काढावा ते जास्त योग्य.

सुंदर लेख आतिवास, दि विल्मार ८ नावाचा एक सुरेख सिनेमा आहे. जमल्यास जरूर बघ. इक्वल ऑपॉर्च्यूनिटी बद्दल आहे.

फार छान लेख!
विशेषतः आज जिकडेतिकडे चालू असलेल्या महिलादिनाच्या 'उत्सवा'च्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचण्याचा अनुभव सुखद होता.

शपथ घेण्याची लिंक जिथे दिली आहे, तिथे 'या ठिकाणी जाऊन आपण शपथ घेऊ शकता' या संपूर्ण वाक्याला हायपरलिंक देणार का? म्हणजे ती लगेच लक्षात येईल.

मस्त आहे लेख! खरंतर कालच वाचला होता, आजच्या दिवशी प्रतिसाद देतेय आणि त्या लिंकवर शपथही घेतली.

सीमंतिनी!

I pledged to challenge conscious and unconscious bias. हा दुजाभाव नेहमीच टोचतो पण आता त्याला वाचा फोडण्याची शपथ घेतली आहे!

मी पण आत्ताच शपथ घेतली.

create inclusive, flexible cultures
After competitive pay and benefits, workers in eight countries rank working flexibly and still being on track for promotion as what they value most in a potential job.

Organizations should recognize that lines between career and personal lives are becoming more fluid. They should create progressive policies like flexible working that allow everyone - regardless of age, gender, rank or geography - to manage their personal and professional lives and realize their ambitions.

Individuals can create trusting, team-oriented work environments by encouraging flexible working supporting choice about the times, places and ways work gets done.

साति, घरात स्वैराच्चार म्हणजे स्वतःच्या वर्चस्वाखाली इतरांना आपल्या मनासारखे वागवणे.

छान लेख.

२६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेने २१ वर्षावरील स्त्रियांना (पुरूषांप्रमाणेच) मतदानाचा अधिकार दिला. एका अर्थी भारतातल्या स्त्रियांना हा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला नाही, कदाचित त्यामुळेच जगभरात याविषयी झालेल्या संघर्षाची आपल्याला कमी माहिती आहे.>>> हे वाचून खरच अभिमान वाटला. आणि काही गोष्टी आपण किती ग्रुहीत धरतो जाणवले.

Pages