जम्मू ते पुणे सायकल मोहीम - जम्मूत आगमन

Submitted by आशुचँप on 5 March, 2016 - 15:28

http://www.maayboli.com/node/57854 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध १

http://www.maayboli.com/node/57861 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध २

=================================================================

दिनांक २४ जानेवारी. सगळे पॅकींग झाले आहे. सगळे सामान कसेबसे कोंबून पॅनिअर्समध्ये माववले आहे. पुढचे १९ दिवस हे विचंवाचे बिऱ्हाड सायकलच्या पाठीवर वागवायचे आहे. त्यात जम्मुच्या थंडीपासून, राजस्थानच्या उन्हाळ्यापर्यंत सगळ्याला समावेश असे कपडे, बाकी गोष्टी, सायकलचे सामान, पंक्चर कीट असे सामान ओसंडून वाहत आहे. पण त्याला पर्याय नाही.

आता रात्री लवकर झोपून उद्या पहाटेच्या फ्लाईटसाठी लवकर उठायच्या प्लॅनमध्ये असतानाच उपेंद्रमामांचा फोन येतो.
"अरे जरा गडबड झालीये. आत्ताच स्पाईसजेटवाल्यांचा फोन आला होता, उद्या आपले (तुमचे) दिल्लीवरून जम्मुला जाणारे फ्लाईट रद्द झाले आहे."
शप्पथ हा एक जोरदार धक्का होता.
म्हणलं असे करूच कसे शकतात. तर म्हणे झालयं तर खरं आपल्याला तातडीने वेगळा प्लॅन करावा लागणार आहे.
म्हणलं थांबा आधी मला बोलू दे त्या स्पाईसजेट वाल्यांशी, झाडतो त्यांना चांगलेच.
नंबर घेतला आणि कस्टमर विभागात लागला आणि सुरुवातच मी वरच्या पट्टीत केलीये.
"मी ..... एक पत्रकार आहे, आणि आमचे जम्मुला एक महत्वाचे काम आहे, तुम्ही असे शेवटच्या क्षणी फ्लाईट रद्द केल्याचे सांगूच कसे शकता.?"
पत्रकाराचे कार्ड खेळल्यामुळे तो पहिल्यापासूनच बॅकफुटवर आहे, पण अगतिकतेने त्यांची काही चूक नाही असे सांगतोय.
मी अजून दांडपट्टा फिरवतोय.
"मला जर तातडीने तुम्ही दुसऱ्या फ्लाईटमध्ये जागा नाही दिलीत तर मी हे सगळे छापीनच शिवाय सोशल मिडीयावर सगळीकडे तिकीटाचा फोटो टाकून पसरवीन. आधीच तुमची फ्लाईट बदनाम होत चाललीये अजून त्यात भर पडेल."
आता तो गयावया करायच्या मोडमध्ये पण त्याचाही इलाज नाहीये. मला म्हणतोय की फुल रिफंड द्यायला कंपनी तयार आहे.
"अरे पण मला जर उद्याच जम्मुला पोचायचे आहे तर रिफंड घेऊन काय करू. रिफंडचा विषयच सोड, मला उद्याच्या उद्या जम्मुला पोचवले नाहीस तर बघ. "
ठीक आहे, मी बघतो बोलून असे सांगत त्याने मला टांगून ठेवलेय.
दरम्यान, दुसऱ्या फोनवर मामांना संपर्क. त्यांनी तेवढ्यात दुसऱ्या कुठल्या फ्लाईटचे बुकींग करू नये यासाठी. आणि त्यांना विश्वास नाहीये स्पाईसजेट वाले काही करतील याचा.
तब्बल १५-२० मिनिटे टांगल्यानंतर तो पुन्हा उगवलाय आणि अगदी साखरेच्या पाकात घोळवून मला सांगतोय की दिल्ला जम्मु तर फ्लाईट कॅन्सल आहे पण दिल्ली श्रीनगर आहे आणि तिथून जम्मुला जाता येईल.
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीये, आणि त्याच वेळी त्याला बजावतोय की कुठेही कसेही अॅडजस्ट कर. श्रीनगर वरून दे नाहीतर मुंबईवरून आम्ही एक पैसाही जास्त देणार नाही.
त्यावर पुन्हा त्याचा हिचकिचाट आणि इतडे तिकडे बोलून तो त्याचीही खातरजमा करतोय.
मी जाता जाता अजून एक चौकार मारायच्या विचारात आणि सांगतोय की तुम्ही फ्लाई़ट अवर्स वाढवलेयत त्यामुळे आम्हाला कंपनीने रिफ्रेशमेंट दयायला पाहिजे.
आता हे त्याच्यासाठी जरा जास्तच होतय त्यामुळे मला कटवण्यासाठी तो मी नक्कीच प्रयत्न करीन सांगत फोन ठेवतोय.

चला निदान आता जम्मुला तरी उद्याच्या उदया पोचतोय या आनंदात गादीवर अंग टाकले. त्यांनी जर दाद दिली नसती तर मिळतोय तो रिफंड घेऊन रेल्वेने किंवा मग ऐनवेळी जास्तीचे पैसे भरून दुसऱ्या फ्लाईटने जाणे हा पर्याय होता. सुदैवाने ते सगळे टळले आहे.

मग दुसरे दिवशी धावतपळत विमानतळावर. बाकीचे आधीच आत जाऊन चेकइन करून बसलेत. मी पटापटा आत जाऊन सामानाचे वजन करून घेतोय. मला नेहमीच आपल्याकडे सामान खूप जास्त झालेय आणि आपल्याला दंड होणार अशी भिती असते पण सुदैवाने वजन लिमीटमध्येच आहे. विमानात मला नेहमीच विंडो सीट आवडते. टेकओफ घेताना आणि लँडींगच्या वेळी जी काय धम्माल येते त्याला तोड नाही खिडकीत बसल्यावर. पण यावेळी ते सुख नाही. त्यामुळे मग मी जास्त लोड घेत नाही. जॅकेट उशीसारखे घेऊन दहा मिनिटातच सकाळची अपुरी झोप पुरी करण्याच्या प्रयत्नाला लागतो.

...

जाग येते तेव्हा प्रसन्नवदना हवाईसुंदरी कुर्सीकी पेटी बांधण्याचे आदेश देत असते. अरेच्चा पोचलो पण दिल्लीला. बाहेर डोकाऊन बघतो, धुक्याचा एक पातळ पडदा. इथपर्यंत हेम आमच्यासोबत होता, पण दिल्लीवरून त्याचे एअर इंडिया आहे. त्यामुळे तो उतरायच्या तयारीत. तेवढ्यात लक्षात येते की श्रीनगरवरून चेकइन करताना सुरक्षा कारणास्तव केबिन लगेज नेता येत नाही. बाकी सगळे तर पॅनिअरमध्ये कोंबून टाकलेय पण एसएलआरची बॅग माझ्याबरोबरच. ती कार्गोमध्ये टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती मग हेमच्या हवाली करतो. त्याला दिल्लीवरून यायला काही प्रॉब्लेम नाही.

आता सकाळ उजाडलीये चांगली आणि हेच फ्लाईटपुढे श्रीनगरला जाणार असल्याने आम्हाला खाली उतरताही येत नाहीये. कडकडून भूक लागलीये आणि बरोबर काहीच नाहीये खायला. सगळेच वैतागलेत. तेवढ्यात सकाळी निघता निघत आईने आशिर्वादसारखे एक सुकामेव्याचे पाकीट दिल्याचे आठवते. ते सुदैवाने खिशातच आहे. सगळेच मग एक एक बकाणा मारत पोटाला आधार देतात पण तेवढ्याने भूक अजून चाळवतीये.

होल वावर इज अवर

तब्बल पाऊण एक तास वाट पाहिल्यावर लोकांची गर्दी वाढायला लागली आहे. लवकर श्रीनगरला पोचलो तर खाता तरी येईल या विचारांनी त्या विमानप्रवासाची मज्जा निघून गेलीये. आता फक्त खायला हवे आहे. शेवटी धीर निघत नाही आणि स्वतात स्वत असे नूडल्स आणि कॉफी मागवलीये. तेवढ्या रकमेत पुण्यात पोटभर थाळी जेवलो असतो, पण पर्याय नाही.

पुन्हा एकदा झोपायच्या विचारात पण आता सगळे हसतील यामुळे कानात हेडफोन कोंबून गाणी ऐकत वेळ काढतोय. तासाभराने श्रीनगर आल्याची घोषणा. बाहेरचे तापमान ६ डिग्री असल्याचे सांगतायत. ठीक आहे, फार नाही, अशी मनाची समजूत काढत बाहेर येतो तोच फ्रिजमध्ये आल्याचे फिलींग.

अय्यो, अचानक त्या थंड वातावरणात चांगलीच तंतरलीये. पटापटा हाताशी होती ती कानटोपी चढवली, खिशात हात खुपसले आणि बाहेर आलो. आता वैताग म्हणजे सामान ताब्यात घेऊन बाहेर जाणे आणि पुन्हा चेकईन करायच्या लाईनमध्ये राहणे. पण नुकत्याच कळलेल्या माहीतीनुसार फ्लाईटला अजून दोन तास अवकाश आहे.

सगळे सामान ट्रॉलीवर लादून बाहेर आलोय आणि अजूनच गारठलोय. त्यातल्या त्यात हिरवळीवर मस्त उन्ह पडले आहे आणि तिथे खुर्च्यांवर काही लोक अंग शेकत बसलेत. आम्हीही तिथल्याच काही खुर्च्या पटकावून बसलोय. सुदैवाने जवळच एक स्नॅक्स सेंटर आहे पण तिथलेही रेट पुण्या मुंबईला लाजवणारे. आता मरूंदे म्हणत सँडविच आणि भकास चवीचा चहा ढोसलाय.

---

ये दोस्ती हम नही छोडेंगे Happy

दोन तास करावे काय यावर जोरदार चर्चा. घाटपांडे काकांना जवळच असलेला दाल तलाव बघण्याची इच्छा आणि त्यासाठी त्यांचे जोरदार मोर्चेबांधणी. मला सगळे सामान घेऊन लळालोंबा करत फिरायची इच्छा नाही आणि दोन तासात केवळ पाहिले असे टिकमार्क करण्यातही नाही. पण सगळे तयार असतील तर मला चालणार आहे. पण एका स्थानिकाकडे चौकशी केल्यानंतर पुढे रस्त्याचे काम सुरु आहे आणि ट्रॅफिक जॅम आहे असे कळले. चुकुन त्यात अडकून फ्लाईट गेली तर सगळीच बोंब त्यामुळे मग काहीही न करता हिरवळीवर लोळण्याचा आनंद घेतोय. असाच बराचवेळ टाईमपास. एकदा नुसतीच बॅग ट्रॉलीवर ठेऊन ढकलत चक्कर मारून आलो तर सुरक्षारक्षकांच्या नजरा एकदम चौकस झाल्या. अजून त्यांनी अडवले नाही पण लांबूनच बारकाईने माझ्याकडे नजर ठेऊन आहेत याची जाणीव झाली. समोरच हिरवळीवर सामुदायिक नमाज पठण सुरु आहे.

बराच वेळ असा घालवल्यावर आत गेलो तर सिक्युरीटीने कसून तपासणी सुरु केली. आमच्या एकसारख्या दिसणाऱ्या पॅनिअर्समुळे त्यांची शंका बळावलीये आणि त्या वेचून बाजूला काढत त्यांनी आम्हाला बोलवलेय.

सिक्युरीटीवाला एकदम गोरापान काश्मिरी. आणि त्याच्या काळ्या ग्रेटकोट मुळे आणखीच रुबाबदार वाटतोय. त्याने मृदु शब्दात चौकशी सुरु केली. आम्हीही सायकल मोहीम, कसे जाणार वगैरे माहीती दिली.
आम्हाला सगळी बॅग खोलून तपासावी लागले.
हरकत नाही, पण मोठ्या मुश्कीलीने भरली आहे, ती परत भरयला मदत करावी लागेल, माझा कारूण्यपूर्ण विनोद. खरेच होते, तो सगळा पसारा आईच्या मदतीने कसा भरला होता माझे मलाच माहीती.
त्याने हसून दाद दिली आणि तोंड भरून आश्वासन दिले की तो मदत करेल. मग आम्ही एकापाठोपाठ एक बॅग रिकाम्या करायला सुरुवात केली. ट्रेकमुळे माझी सवय की कपडे, वस्तु, आतले कपडे सगळे वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरायची. इथेही तेच. त्यामुळे प्रत्येक पिशवी उघडून चेक करावी लागतीये. त्याची सराईत नजर सगळ्या सामानवरून फिरत काही आक्षेपाह्र नाही ना याची खात्री करत चाललीये. स्पेअर ट्युब, हवा भरायचा पंप, स्पॅनर सगळेच त्याला अजीब वाटतेय.
आणि त्याला सापडतेच. पंक्चर किटमधले सोल्युशन. ते इनफ्लेमेबल असल्याचे ट्युबवर छापलेय.

"हे तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत."
"अरे दादा, ते पंक्चर काढायला लागते."
"ते काहीही असो, प्रत्येकाच्या बॅगेत आहे ना. मग नाही चालणार."

आता सगळे मिळून त्याला भिडलोय. आणि ते किती महत्वाचे आहे आणि ते नसल्याने आमचा किती खोळंबा होईल हे अजीजीने त्याला पटवून देतोय. तो बधत नाहीच शेवटी बराच अंत बघून मोठे उपकार केल्याच्या आर्विभावात तो ट्युब परत देतोय आणि पुन्हा असे करू नका असे बजावतोय.
वर आधीच प्रॉमिस लक्षात ठेऊन बॅग भरताना मदत करायलाही सरसावलाय. पण त्याच्या कोंबाकोंबीने अजूनच अवघड होईल याची जाणीव झाल्याने त्याला नम्रपणे नकार देत आम्ही कसेबसे पुन्हा ते काम पार पाडतो. दरम्यान, संधीचा फायदा घेत वॉर्म जॅकेट काढून अंगावर घालून टाकतो.

अर्थात अजून आमची पीडा गेली नाहीये. विमान लेट झालेय तेही तब्बल दीड तास. झाले कल्याण आता. तिथेच खुर्च्यावर अवघडून बसलोय. पुन्हा एकदा कॉफी प्यावी वाटतीये गरमागरम. ओबी आणि वेदांग गेलेच आणायला आणि तिथल्या कॉफीवाल्याशी सविस्तर गप्पा मारत त्याला आपलेसे केलेय. मी त्या खुर्चीवरच जितके पसरता येईल तितके पसरून पुन्हा झोप काढण्याच्या विचारात. काका बाजूला बसून दैनदिनी लिहीतायत. हेमचा तिकडे आमची वाट बघुन पुतळा झाला असणार.

माझे अधुन मधुन लक्ष प्रवाशांकडे. एखादी तरी काश्मिरी सुंदरी दिसावी यासाठी. पण एकजात सगळ्या पडदानशिन. नाही म्हणायला एखाद दुसरी बिना बुरख्याची दिसायची पण काश्मिरी सौंदर्य असे नाहीच. विमानतळ सगळे फिरून झाले, विंडोशॉपींग करून झाले, यच्चयावत पाट्या वाचून झाल्या. प्रसाधनगृह वापरून झाले. विमान कधी हलणार.

अंत बघून शेवटी विमानाची घोषणा झालीये. आताही मला खिडकी नाहीच पण खिडकीच्या शेजारच्या शेजारची मिळालीये. त्यामुळे अगदीच काही नाही तर डोकाऊन बाहेर बघता येतेय. आणि टेकअॉफ केल्यावर हिमालयन रांगांचे अप्रतिम दर्शन होतयं. मधुनच ढगातून विमान जातंय...आहाहा...स्वर्गाचा अनुभव...मधुनच डोकावणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पर्वतरांगा. वस्सूल प्रवास.

...

दुपारचे दोन वाजून गेलेत आणि सकाळपासून आम्ही केवळ एक मॅगी, एक सँडविच आणि कॉफी एवढेच खाल्लेय. कावळे, गिधाडे, बदके सगळे कल्लोळ करतायत. काका सुंदरीला रिफ्रेशमेंटची आठवण करून देतात. पण ती सपशेल कानावर हात ठेवते. आम्हाला काही सूचना नाहीत. मग वादावादी पण काही नाहीच. शेवटी वैतागून महागड्या लंचची अॉर्डर. हे नंतर आपल्याला त्यांना वाजवून परत घेता येतील अशी त्यांना भाबडी आशा.

काही का असेना पोटात काहीतरी भरीव गेल्याचे समाधान. आता कधी का येईना जम्मू.

आणि बघता बघता आलेच की. बाहेर मस्त धुके किंवा ढग. बाहेर आल्या आल्या गारव्याने शहारलो. तरी श्रीनगरपेक्षा कमीच वाटतय. आता हेमचा शोध. त्याचा प्रिपेड आणि जम्मुमध्ये प्रिपेड चालत नाहीत त्यामुळे त्याचा आणि माझा फोन बंद पुढचे दोन दिवस.

सुदैवाने तो लॉबीतच सापडला आणि एअर ईंडीयाने कसे मस्त दिले खायला असे सांगून जळवतोय. त्याच्या तर ना च्यायला.

==================================
हेमचे व्हर्जन

मी बाकीच्यांपेक्षा महिनाभरानंतर विमानतिकीट काढलं. गोंधळ असा होता की थेट जम्मूचं तिकीट मिळेना. पुणे टिमसोबतचं स्पाईसजेटचं दिल्लीपर्यंत मिळालं पण पुढचं उपलब्ध नव्हतं म्हणून दिल्ली-जम्मू एअर इंडीयाचं काढलं. माझं पहिलं विमान पुण्यातून सुटणार ७.२५ ला. दिल्लीत पोहोचणार ९.२० ला. पुढचं विमान सुटणार ११.१० ला. म्हणजे पावणेदोन तासाचा मधे वेळ.. रिजर्वेशन झाल्यावर पुढची गोची समजली की पहिलं विमान पोहोचणार दिल्ली टर्मिनल १ ला. पुढचं विमान टर्मिनल ३ वरुन. दोन्हीत ८ किमी चं अंतर.. विमानप्रवास प्रथमच करत होतो. शेवटी शेवटी तर मोहीमेपेक्षा या विमानप्रवासाच्या लफड्याचंच टेन्शन यायला लागलं. जर धुक्यामुळे वगैरे पहिलं विमान थोडं जरी लेट झालं तरी पुढचं विमान पकडण्याचं गणित कोलमडणार होतं. पण यावेळी मनिषने, माझ्या भावाने तर्कट भारी सांगितलं ( तो ४ देश फिरलाय) जर पहिलं विमान धुक्यामुळे लेट होणार असेल तर बाय डिफॉल्ट दुसऱ्यालाही धुक्याचा फटका बसेलच की. तेही लेटच होणार. तरी मी आदल्या दिवसापर्यंत याला त्याला विचारुन भंडावून सोडत होतो.
अचानक आदल्या दिवशी संध्याकाळी कांडी फिरली. एअर इंडीयाकडून मेसेज आला की विमान १२.१५ ला सुटेल. हुश्श! मी निश्चिंत झालो पण बाकी टिमचं उलट झालेलं.. त्यांचं दुपारचं विमान रद्द झालेलं. त्यांनी मग फोनाफोनी करुन दिल्ली श्रीनगर जम्मू असा प्रवास कंपनीकडून पदरात पाडून घेतला.

२४ जाने.२०१६.
रात्री घाटपांडेकाकांनी फोन करुन मला सांगितलं की ते मला पहाटे धनकवडीतून पिकप करतील.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे ५.१० च्या ठोक्याला ते हजर होते. मीच काही मि. लेट होतो. विमानतळावरील प्रवेशप्रक्रिया मला आत्तापर्यंत चारेकजणांनी समजावून सांगितलेली त्यामुळे नाविन्य न वाटता मी ती पूर्ण करीत होतो. विमानात शिरल्यावर माझी सीट बाकीच्यांपेक्षा मागे होती. या मंडळींनी एकाला manage करुन मला त्यांच्यात घेतलं आणि एकदाचं विमान सुटलं..
आशुने पहिल्या १० मि.तच घोरासन सुरु केलं. दिल्लीत विमानाचं स्वागत गच्च धुक्याने झालं. तापमान होतं ६°.
बाकी लोकांचा जम्मूत भेटू म्हणून निरोप घेतला. त्यांनीही बाहेर पडतांनाची प्रक्रिया नीट सांगितली होती त्यामुळे सराईताप्रमाणे माझे पॅनिअर्स घेऊन बाहेर पडलो. चौकशी करुन टी३ ला जाणारी शटल बस पकडली. टी ३ ला चौकशी करुन दुसऱ्या मजल्यावर गेलो. १५ मि.त प्रक्रिया पूर्ण करून मी साडेदहाला माझ्या निर्धारीत विमान फलाटावर येऊन बसलो. झोप काढायच्या बेताने खुर्ची पकडली कारण दिड तास काढायचा होता पण आजूबाजूला जरा टाईमपास माणसं दिसायला लागली व सावरुन बसलो. समोरच एक नवविवाहित जोडपं बसलेलं. दोघंही मोबाईलवर.. आळीपाळीने तर कधी एकदम, खुदखुदत होती.. उजव्या कोपऱ्याकडे मध्यमवयीन जोडपं. एकाच मोबाईलवर एकाच इअरफोनवर दोघंही सिनेमा पहात असावीत. पलिकडे एक तरुण समोर शुन्यात नजर लावून दर पाच मि. नी घड्याळ, सिक्युरिटी काउंटर, मोबाईल, डाव्या बाजूच्या लाऊंजमधे पुन्हा समोर शून्य.. या क्रमाने बघत राहिलेला..
सव्वाबाराला विमानात शिरलो. चक्क विंडोसीट. Spicejet पेक्षा भारी विमान. होस्टेसपण नव्या करकरीत.. शेजारी दोघे काश्मिरी भाषेत गप्पा मारत होते. त्यांच्याबरोबर गप्पा सुरु केल्या तोवर विमान उडालं. तेही आणखी अर्धा तास लेट. माझा शेजारी दिल्लीत फार्मसी विषयात पीएचडी करत होता. त्याने मोहीम जम्मूतूनच कां श्रीनगरमधून कां नाही विचारलं. मग त्याला घाटरस्ता, थंडी इ.मुळे त्या ३०० किमी साठी आमचे ४ दिवस कसे वाढतील ते सांगितल्यावर त्याला पटलं. जम्मूत विमान उतरलं तेव्हाही धुकं व तापमान ४° होतं. विमानतळाचं नुतनीकरण सुरु असल्याने बराच राडारोडा होता. आमच्या सायकल्स ताब्यात घ्यायच्या होत्या त्यामुळे मला ग्रुपने आतच वाट पहायला सांगितलं होतं. तिथे खाण्यापिण्याचेही हाल होते. एअर इंडीयाने मस्त जेवायला दिलं होतं म्हणून बरं नाहीतर भुकेमुळे मला बाहेर जायला लागलं असतं. पाणी होतं बरोबर. पावणेतीन तास वाट पाहील्यानंतर आमची मंडळी श्रीनगरहून आली. तोवर मला लहान मुलांचा टाईमपास झालेला. ९९% पब्लिक वैष्णोदेवीसाठी येत होतं. लाउंजमधेच त्यासाठी मदतकेंद्र व टॅक्सीसेवा बुथ होता. टीम एकत्र झाल्यावर काका व लान्स कार्गो गोदामाकडे सायकल्स ताब्यात घेण्यासाठी व बाकी लोक हॉटेलकडे रवाना झालो.

====================================

असो, आता पहिले रुमवर जाणे हा एककलमी कार्यक्रम. पण वाटेत सायकलीपण ताब्यात घ्यायच्या आहेत. त्या आम्ही दोन दिवस आधीच पाठवल्यात आणि एअरपोर्टशेजारीच गोडाऊनमध्ये आहेत. मग नेहमीप्रमाणे काका सरसावलेत आणि त्यांच्या मदतीला लान्स. ते सायकली घेऊन येतील आणि आम्ही पुढे जातोय.

टॅक्सीवाल्याला रघुनाथ हॉटेल माहीती नाही मग हॉटेलवाल्याला फोन करून त्याचे आणि टॅक्सीवाल्याचे संभाषण शेवटी बरीच वळणे घेत तो गल्लीच्या तोंडाशी सोडून जातोय. हॉटेलची पोरं सामान घ्यायला आलीत म्हणून कळले अन्यथा त्या गल्लीतून हॉटेल शोधून काढणे दुरापास्त होते. इतक्या थंडीचे दाराशीच एकजण लस्सी विकत उभा आहे. मनात म्हणलं भल्या माणसा का रे तु असा. पण ज्या अर्थी तो विकतोय त्याअर्थी लोक घेत असणार. त्या विकणाऱ्याला आणि विकत घेऊन पिणाऱ्यांना दंडवत घालून हॉटेल गाठले.

रुमवर जाऊन पहिल्यांदा हिटर सुरु करायचा आदेश. मग गरमा गरम सुप आणि बरोबर कांदा भजी. आहाहा क्या बात है..आत्ता कुठे जीवात जीव आला. आज तसेही काम काहीच नाही त्यामुळे रजया घेऊन पहुडणे हेच मुख्य उद्दीष्ट. असेही सकाळपासूनच्या प्रवासाने अंग चिंबून गेले आहे त्यामुळे गादीवर पाठ टेकल्यावर बरे वाटत आहे. पण आता झोपलो तर अर्धवट होईल म्हणून अबरचबर गप्पा, टकळी सुरु आहे.

दरम्यान, काका येऊन ठेपतात आणि सुवार्ता कळते की त्यांचा फोन पडला आणि स्क्रीन तुटलीये. फोन वाजतोय पण उचलता येत नाहीये. म्हणलं आनंद आहे, आमचे दोन फोन मुके आणि तुमचा आंधळा...भगवान ये कैसी बनाई जोडी.

वेळ आहेच हाताशी तर मग पॅनिअर्स सगळे उपसून पुन्हा क्रमानी नीट लावतो. मग आंघोळीचा विचार. सुदैवाने गरम पाणी आहे. थंडी इतकी की ते अंगावर पडेपर्यंत कोमट. कढत पाणी घेतले तर चटका. आंघोळ उरकून बाहेर आल्यावर हुडहुडी. पटापटा हाताशी येतील ते कपडे चढवून रजईत सूर मारतोय. बाहेर जाऊन जेवायचा उत्साह कुणालाच नाही त्यामुळे रात्रीचे जेवण रुमवरच. पण जेवणानंतर शतपावली करायची हुक्की येते. आणि गरम कपड्यांमध्य गुरफ़टून बाहेर पडतो. मला वाटेत पान दिसले ते खायचे आहे तर वेदांग, ओंकार ला जिलबीवाला. इतक्या रात्री तो गरमागरम जिलब्या तळतोय. ते बघुनच मोह होतोय आणि मी एक गरमागरम कडे टाकतोच तोंडात, तोपर्यंत त्यांना रबडीपण दिसते. मग ते रबडी, जिलबी असा फडशा पाडतायत. हेम महाशिवरात्रीचा उपास असल्यासारखा नुसताच फिरतोय. पण त्याला पान चालणार आहे. मग पानवाला गाठला तर त्याला त्याच्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यातुन फुरसत नाही. मधल्या पॉजदरम्यान त्याला मी मला हवे तसे पान बनवून घेतोय पण महाराज लक्ष देतील तर. कसेतरी बनवलेले पान तोंडात कोंबल्यावर पश्चाताप.

असो, आता हवीये शाही झोप. उद्याचा दिवस हातात आहे, आणि सायकली सगळ्या जोडायच्या आहेत. पण राईड जम्मू ते पुणे सायकल मोहीम नाहीये. सो निवांत

(प्रयत्नांती मार्गी मोड)

======================================================================================

http://www.maayboli.com/node/58021 - जम्मू (भाग ४)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच मजा येते आहे वाचायला! स्पाईसजेट Sad सर्व्हिस वैतागवाणीच असते बर्‍याच वेळेला. फोन पडणे वगैरे किस्से तर होतातच अशा वेळेस हमखास. सहीच!

भारी लिहिताय . इथे मजा येतेय वाचायला पण ६ डिग्रीत वावरताना कस वाटत असेल .
फोटो पण मस्त आलेत. ढगांचा फोटो अप्रतिम

धन्यवाद सर्वांना....

बहुतेक तू आता एक साहसीप्रवासवर्णन लेखक होणार मोठा. >>>>

नाय रे बाबा, आपण कुठले त्या पातळीवर जाणार. बाकीच्यांचे पराक्रम पाहिले की जाणवते की आपण किती गल्लीत आहोत ते.

इथे मजा येतेय वाचायला पण ६ डिग्रीत वावरताना कस वाटत असेल . >>>>>

भारी वाटत होतं, सतत फ्रिजमध्ये बसल्याचे फिलींग.

जमतोय ना...वाह चांगले वाटले....

धन्यवाद भास्कराचार्य, आदित्य आणि कवी मी

आशू.. वृत्तांत तुझ्या स्टाईल मधे वाचायला आवडेल. इथे काही ठिकाणी अडखळल्या सारखं वाटलं.

बाकी विमान प्रवासातील वेटिंग हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

आमच्या कडे श्रीनगरच्या चेकिंगचा एक भारी किस्सा आहे.

मस्त लिहिल आहेस, अगदि तुमच्या शेजारी बसुनच ते ते प्रसंग अनुभवतोय असे वाटते...
(अन हो, थोडा हेवाही वाटातोय.... खोट कशाला बोलू Proud )

वृत्तांत तुझ्या स्टाईल मधे वाचायला आवडेल. इथे काही ठिकाणी अडखळल्या सारखं वाटलं.

इंद्रदेवा - मान्य आहे. माझाही पहिलाच प्रयत्न. असाच एक वेगळा प्रयोग करायचा होता. इथून पुढे माझ्या शैलीतच लिहीन.

वर्षू, मनोज, हर्पेन, यो, लिंबुदा - धन्यवाद

मस्तए पण आशू.. वृत्तांत तुझ्या स्टाईल मधे वाचायला आवडेल. इथे काही ठिकाणी अडखळल्या सारखं वाटलं.>> याला सहमत!

मजा येतेय वाचायला.

स्पाईसजेटची नवीन बाब म्हणजे फ्लाईट डिले ( २ तासांपेक्षा जास्त ) किंवा रद्द झाले तर त्यांचाच विमा असतो, अर्थात तो आधी घ्यावा लागतो. त्यांच्या फ्लाईटवर खाणे विकत घेता येते कि. प्री ऑर्डर पण करू शकता. तसेच खाण्याच्या बाबतीत काय काय केबिन लगेजमधे नेता येते ( सँडविच, बर्गर वगैरे ) त्याची यादी पण त्यांच्या वेबसाइटवर आहे.

आणि ज्वालाग्राही पदार्थ सामानात असू नये हे तर सगळीकडेच ठळक अक्षरात लिहिलेले असते. असे पदार्थ नेऊन आपण सिक्यूरिटी वाल्यांना आणि सह्प्रवाश्यांना अडचणीत आणतो. ते त्यांचे कर्तव्य करत असतात.

अप्रतिम...

भाग क्रमांक टाक ना... उदा.
"जम्मू ते पुणे सायकल मोहीम - जम्मूत आगमन - भाग ३" (माझा गोंधळ झाला अरे लेटेस्ट भाग कुठला आहे ते आठवताना...)

ज्वालाग्राही पदार्थ सामानात असू नये हे तर सगळीकडेच ठळक अक्षरात लिहिलेले असते. असे पदार्थ नेऊन आपण सिक्यूरिटी वाल्यांना आणि सह्प्रवाश्यांना अडचणीत आणतो. ते त्यांचे कर्तव्य करत असतात.

अहो ती अतिशय बारकी ट्युब आहे. आणि ती सुद्धा प्लॅस्टिकच्या डबीत पूर्णपणे पॅक केलेली असते. आत्तापर्यंत सगळीकडे सगळीकडे घेऊन फिरलोय. कधीच अडचण आली नाही. आम्हालाही आमच्या जीवाची काळजी आहेच की. आम्ही कशाला मुद्दाम होऊन कुणाला अडचणीत आणू. पण ती जर नाही मिळाली तर आम्ही किती अडचणीत येऊ याची कल्पना होती. या प्रवासात तब्बल ११ पंक्चर्स झाली आणि अशी ठिकाणी जिथे लांबलांबवर मनुष्यवस्तीही नव्हती. हे जर सोल्युशन बरोबर नसते तर मोहीम गुंडाळून घरी यावे लागले असते.

माझा गोंधळ झाला अरे लेटेस्ट भाग कुठला आहे ते आठवताना...

अरे हाच लेटेस्ट आहे

मस्त झालाय हा भाग.

पण पराग म्हणाल्याप्रमाणे तुझ्या स्टाईल मधे जास्त आवडेल वाचायला. सतत अपूर्ण वर्तमान काळात वाचायची सवय नसल्यामुळे थोड्या वेळानी कंटाळा येतोय. (टीका करायचा हेतू नाही.. नुसता एक फीडबॅक फक्त Happy )

अरारा पोचायलाच इतका सायास पडला म्हणजे ती मोहीम पुर्ण करायचा आनंद अत्यधिक जास्त असणार हे निश्चित!

पुभाप्र.

सतत अपूर्ण वर्तमान काळात वाचायची सवय नसल्यामुळे थोड्या वेळानी कंटाळा येतोय. >>>>>>

माझा हा एक प्रयोगच होता. कितपत जमेल याबाबत साशंकताच होती. पण सगळ्यांनीच मनमोकळेपणे त्यावर मत दिल्यामुळे लक्षात आले की नाही फारसा जमला.

पुढचा भाग नक्कीच नेहमीच्या शैलीत असेल.

अरारा पोचायलाच इतका सायास पडला म्हणजे ती मोहीम पुर्ण करायचा आनंद अत्यधिक जास्त असणार हे निश्चित! >>>>>

बापु, ये तो अभी शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या

मला बोवा तू कुठल्याही स्टाईलने लिहिलस तरी चालेल.... मला काहीच प्रॉब्लेम नै हं....
मला तर बाकीचे म्हणाले म्हणून कळ्ळ तरी की अपुर्ण वर्तमानकाळ स्टाईलमधे लिहिलय, नैतर मी आपला वाचताना नजरेसमोर चित्रे तरवळण्यात दंग अस्तो...
अहो इकडची अर्ध अर्ध पान भर एकच एक वाक्य अस्लेल्या लिगल भाषेच्या वाचनापुढे वरील स्टायली म्हणजे वाळवंटातील हिरवळ वाटते आहे......

जबरी...

कसलं भन्नाट आहे हे सर्व. या भागातला काळ कुठला म्हणायचा ते आता माहीत नाही. पण एकंदरीत थरारक आहे सगळं. खूप एक्साईटमेंट आहे. त्यामुळे व्याकरण वगैरे आड आलं नाही.

हे सर्व कसं काय मिसलं मी ? कसं माफ करू स्वतःला ?

अहो, ठीक आहे

मी खूप गॅप ने लिहितो ना, त्यामुळे हे सगळे भाग मागे हरवलेत कुठेतरी. तुमच्या निमित्ताने मी पण आज या आठवणींना उजाळा दिला.
धन्यवाद

Pages