महिलादिन - शिक्षण

Submitted by बेफ़िकीर on 4 March, 2016 - 10:32

येऊ घातलेल्या महिलादिनानिमित्त काही निरिक्षणे नोंदवण्याचा मानस आहे. आजच्या लेखात शिक्षण हा विषय घेत आहे. शिक्षण घेणार्‍या व शिक्षण घेऊ पाहणार्‍या काही युवतींच्या, लहान मुलींच्या व्यथा लिहीत आहे. ह्या गोष्टी मला जश्या पाहायला मिळाल्या तश्याच येथे लिहीत आहे.
==============

गंगा - पुणे शहरापासून पंधराच किलोमीटरवर गंगा राहते. गंगा पंधरा वर्षांची आहे. खरे तर तिचे घर पुण्यात आहे, पण सध्या ती पुण्यापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या तिच्या आजोबांच्या घरी राहते. तिची आजी सावत्र आहे. त्या घरात तिचा सावत्र मामा आणि सावत्र मावशीही आहेत. सावत्र मामा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आणि अविवाहीत व कमी शिकलेला आहे. कमी म्हणजे नववी, दहावी असेल. सावत्र मावशी विधवा आहे. तिचा नवरा दारू पिऊन मेला. तो बायकोला मारहाण करत असे. ह्या सावत्र मावशीचे वय एकवीस आहे आणि तिच्या पदरात दोन लहान मुले आहेत. गंगाल सगळ्यांनी सामावून घेतलेले आहे. गंगाची आई गंगाच्या वडिलांबरोबर पुण्यात राहते व घरकामे करते. गंगाला शिकायचे आहे. गंगा दिसायला अतिशय रेखीव आहे. एखाद्याची सहज मागणी येईल इतकी सुरेख आहे. मात्र वयाने लहान आहे. सावत्र आजीकडे राहणारी गंगा सगळी घरकामे आनंदाने करते. सावत्र मावशीबरोबर ती जवळपासच्या दोन शाळांंमध्ये जाऊन तपास करून आलेली आहे. तेथे तिला वयाच्या मानाने जरा खालच्या यत्तेत प्रवेश मिळू शकतो. 'जाणार का ह्या शाळेत' असे विचारले की ती हरवल्यासारखी कुठेतरी बघत 'हा' असे म्हणते. केव्हाही बघावे तेव्हा तिच्या चेहर्‍यावर उत्साही हसू असते. तिला शाळेत घालायला आजोळचे तयार आहेत. तिला शाळेत घ्यायला शाळा तयार आहेत. शाळेत जायला गंगा तयार आहे. पण गंगाच्या मनात एक भीती आहे. काहीच महिन्यांपूर्वी ती पुण्यातल्या घरी शाळेतून परतली तेव्हा वडील खूप चिडलेले होते. ते गंगाच्या आईला जबर मारहाण करत होते. गंगा थिजून रडत होती. कोणीही मध्ये पडत नव्हते. अचानक गंगाच्या वडिलांची नजर गंगावर गेली. तिच्या हातातील दप्तर हिसकावत तिच्या वडिलांनी तिच्या सगळ्या वह्या व पुस्तके तिच्यासमोर फाडून टाकली. अव्याहतपणे शिव्या देत त्यांनी जाहीर करून टाकले की पोरीने शाळेसाठी घराच्या बाहेर पाय टाकायचा नाही. गंगा ओक्साबोक्शी रडत आहे पाहून त्यांनी जवळच पडलेला एक गज उचलून तिच्या पाठीत मारला. तीव्र वेदना सहन करत गंगा घराबाहेर पळाली आणि तिला सावरण्यासाठी तिची आई पळाली. रात्री दोघींनी आजोळी फोन केला. सकाळी आजोळचे गंगाला घेण्यासाठी आले. गंगाच्या वडिलांनी निक्षून सांगितले की हिला तिकडेच नेऊन ठेवा आणि घरकामाला लावा. हा प्रसंग सांगताना गंगा रडते. पुन्हा शाळेत जाता येईल अशी आशा वाटली की खुदकन् हसते. गंगाला कधी शाळेत जायला मिळेल की नाही माहीत नाही. मिळाले तरी ती एकंदर कौटुंबिक परिस्थितीमध्ये कितपत शिक्षण घेईल ते सांगता येत नाही. तूर्त तिला मार बसत नाही. तिच्या आईला रोज मार बसतो. ते गंगाच्या डोळ्यांआड घडते. अजून थोडी मोठी झाली की ती एक ओझे बनू लागेल. उजवली जाईल. बर्‍या घरात पडली तर शिक्षण नसो पण निदान चांगली वागणूक मिळेल. त्याबद्दल आत्ताच काही खात्री नाही. योजना खूप आहेत. 'ड्राईव्ह्ज' खूप आहेत. सवलती खूप आहेत. शाळाही खूप आहेत. इच्छाही खूप आहेत. हतबलताही तितकीच आहे. आईबाप निवडता येत नाहीत.

प्राची - आई आणि वडील शेतात मजूरी करतात. मासिक उत्पन्न साडे पाच हजाराच्या आसपास आहे. पुण्यापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटरवर त्यांचे लहानसे गाव आहे. तेथे शाळा नाही. शाळा जिथे आहे तिथे रोज चालत जाणे अवघड आहे. म्हणून प्राचीला मामाकडे ठेवले आहे. प्राचीचा मामा ज्या गावात राहतो त्या गावात बाराव्वीपर्यंत शाळा (ज्युनिअर कॉलेज) आहे. प्राची अकराव्वी सायन्समध्ये आहे. अचानक शास्त्र व गणित विषय इंग्रजीत आल्याने गांगरून गेलेल्या साठ, सत्तर विद्यार्थ्यांपैकी एक असलेली प्राची सहामाहीत गुण कमी का मिळाले ह्याचे स्पष्टीकरण जवळ असूनही ते मामाला द्यायला संकोचते. तिला चांगली समज आहे की मामाकडे तिला केवळ एक सोय म्हणून ठेवण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात ही जबाबदारी मामाची नाही. मामाने त्याच शाळेतील बारा विद्यार्थ्यांचे शिक्षण दत्तक घेतलेले आहे. हे प्राचीला माहीत आहे. पण प्राचीची थकलेली पाच हजार फी तिला स्वतःच्या तोंडाने मामाला सांगावीशी वाटत नाही. तिला त्यात संकोच वाटतो. वर्गात एक दिवसाआड वर्गशिक्षक सर्वांसमोर तिला व तिच्यासारख्या थकबाकीदार विद्यार्थ्यांना त्यांची राहिलेली फी सांगतात. बुजरा आणि मिंधा चेहरा करून प्राची कसनुसे हसून खाली बसते. दहाव्वीपर्यंत तिला सत्तर टक्क्याहून अधिक गुण मिळत होते. तिच्यादृष्टीने आता ह्यापुढील शिक्षण हे केवळ नशिबाच्या भरवश्यावर आहे. शेवटी परवा तिने हिय्या करून मामाला राहिलेल्या फीबाबत सांगितले. मामा तेव्हा काहीच बोलला नाही. दुसर्‍या दिवशी तिच्या शाळेत आला. मुख्याध्यापक (/प्राचार्य), पर्यवेक्षक व वर्गशिक्षक ह्यांना एकत्र आणून म्हणाला की माझ्या भाचीची फी राहिलेली आहे हे मला का कळवले नाही. त्यावर त्याला सांगण्यात आले की गेले काही महिने तिला हे वर्गात सांगितले जात आहे. त्यावर त्याने भांडण काढले की त्याच्या भाचीच्या थकबाकीचा उल्लेख कसा काय केला जातो. त्याने तर बारा मुलांचे शिक्षण दत्तक घेतलेले आहे. दादापुता करून शेवटी त्याच्याकडून एकरकमी फी घेतली जाते. पण हे सगळे होत असताना प्राचीच्या डोळ्यांमधून आसवांची धार लागलेली असते. जन्मदाते आई आणि वडील कोठेतरी लांब शेतात खपत असतात. त्यांना ही थकबाकी सांगण्यात अर्थ नसतो. मामाला सांगायची म्हणजे उद्धार करून घ्यायचा. तेही नको असते. सावित्रीबाई योजनेअंतर्गत गेल्या साडे चार वर्षांपासून विद्यार्थ्यांना पैसे येणे बाकी राहिलेले असते. सरतेशेवटी, उद्धार करवून घेऊन का होईना पण वर्षभराचा फीचा प्रश्न मिटला हे बघून प्राची खालमानेने आसवे टिपत आणि सूं सूं करत मामाच्या घरी निघून जाते. इकडे प्राचार्य मामाला आणि इतर संबंधितांना चहा पाजत वेगळ्याच विषयावर चर्चा करत असतात.

वर्षा - भर पुण्यात राहणार्‍या ह्या मुलीचे वडील एका दुकानात नोकरी करतात. आई घरकामे करते. एका मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे. दोन लहान बहिणी शिकत आहेत. वर्षाकडे मोबाईल फोन आहे. त्यावर व्हॉट्स अ‍ॅप आहे. एकदा डिस्प्ले पिक्चर म्हणून तिचेच एका रम्य घाटात एका 'नुसत्या' मोटरसायकलला खेटून आणि स्वप्नील डोळे करून आकाशाकडे बघत असलेले चित्र होते. मोटरसायकल कोणाची हा प्रश्न कोणीच विचारला नसावा कारण घरात दुसर्‍या कोणाला व्हॉट्स अ‍ॅप म्हणजे काय हे माहीत नाही. एकदा तिचे स्टेटस 'लाईफमध्ये काही टेन्शनच नाही' असे होते. तिला पुरेसे गुण मिळत नाहीत. शिक्षणाबाबतच्या घरच्यांच्या व्याख्या थेट आहेत. नावापुढे पदवी लागली की लग्नाच्या बाजारात भाव चांगला येतो. करायचंय काय बाकी शिकून? घरच्या गरीबीबद्दलची चीड वर्षाच्या देहबोलीत उघडपणे दिसते. एखाददिवशी तिच्या आईने तिला एखाद्या घरकामावर मदतीसाठी बोलावले की ती आईला सुनावते. 'आजच्या दिवसाचा पगार मला देणार आहेस का'! आई कसेनुसे हसत स्वतः काम करून मोकळी होते. वर्षा नावापुरती मदत करून चालू लागते. लग्न हे मुलीच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे हा विचार पोसणारे हे कुटुंब आहे. चार ऐवजी दोनच मुली झाल्या असत्या तर 'दोन मुलींवर थांबलात की काय' असे म्हणणार्‍या बिनडोक नातेवाईकांनी भंडावून सोडले असते. त्यामुळे चारवेळा चान्स घेतला. चुकूनमाकून कधी आई करत असलेल्या कामावर यायचे झाले तर वर्षा संपूर्ण चेहरा झाकून सोसायट्यांमधून चालत जाते. तिला एकीकडे तिची अशी ओळख होणे नको आहे आणि दुसरीकडे कशी ओळख असायला हवी व त्यासाठी काय करायला हवे ह्याची धड शिकवणही नाही आहे.

रेवा - रेवा भरतनाट्याम शिकते. लवकरच अरंगेत्रम ठरेल. दररोज वेगळे डीपी असते. फेसबूकवरील प्रोफाईल पिकवर आलेल्या सगळ्या भल्या-बुर्‍या आणि वाह्यात कमेंट्स आईला दाखवण्यात तिला काही वाटत नाही. आईही तिला 'कोणत्या कमेंटला काय उत्तर द्यायला हवे' हे सांगते. रेवा नाईट आऊटला जाते. सगळ्यांशी आदराने बोलते. पण तो आदर पुस्तकी असतो. हेही बघणार्‍याला समजते. रेवाला दुसरे काहीच जमले नाही म्हणून बाराव्वीनंतर तिने साधासा कोर्स स्वीकारला आणि तिचा तो निर्णय घरच्यांनी स्वीकारला. जेथे जेथे कसलेही सेलिब्रेशन असेल तेथे रेवा टॉपला असते. खरेतर दिसायला यथातथाच असलेली रेवा राहणीमानामु़ळे आणि आधुनिक वावरामुळे आकर्षक ठरते. सीसीडीचे बिले सहज भरू शकते. आता झुंबा डान्स शिकणार आहे असे सांगते. रोज सकाळी सातच्या सुमाराला कोणत्यातरी रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना नवीन खरेदी केलेले खाद्यपदार्थ खायला घालते. फॅशन डिझायनिंगमध्ये इन्टरेस्ट आहे असे सांगत फिरते. तिच्या लग्नाचा काहीही विचार सध्या केला जात नाही. तसा विचार करण्याचे मुळात तसेही कारण नाही आणि त्या कुटुंबाला तर नाहीच नाही. तिच्यासाठी डोनेशन भरून कोणाची सीट अडवली गेली हा कोणत्यातरी कॉलेजच्या कोणत्यातरी कोपर्‍यात धूळ खात पडलेला तपशील आता कोणी खोदत बसत नाही.

साक्षी - वडिलांनी जबाबदारी नाकारल्यामुळे लहानपणापासून मामाकडे राहिलेली साक्षी एक हडकलेली मुलगी होती. आता ती अंगाने जरा बरी झाली आहे. मात्र चिकाटीने शिकली आहे. सायन्सची पदवी घेऊन ती आता एका डॉक्टरकडे चक्क स्वागतिका म्हणून काम करते. मामा आणि मामीच्या आश्रयाला असलेल्या साक्षीने परिस्थितीबद्दल कधी ब्र काढलेला ऐकिवात नाही. मात्र पगार सुरू झाल्यावर तो स्वतःसाठी न ठेवता किंवा आईला न पाठवता मामीच्या हातात द्यायला सुरुवात केली. मामा आणि मामीच्या डोळ्यांमधून त्या दिवशी अश्रू आले. 'हीपण आमच्याकडे असते' असे जिचे वर्णन होत असे तिचे वर्णन आता 'ही आमच्याकडे आहे म्हणून कित्येक गोष्टी बघाव्या लागत नाहीत' असे होताना आढळते. साक्षीला सर्व जाणीव आहे. तिचे आई व बाबा तिला दर आठवड्याल भेटायला येतात. गेली कित्येक वर्षे! पण ती मामा आणि मामीलाही बाबा आणि आईच मानते. डॉक्टरांकडे नोकरी करत असल्यामुळे घरातल्यांना झालेल्या किरकोळ आजारात तिचे मत महत्त्वाचे ठरते. ती पटकन् डॉक्टरांना फोन लावून सल्ला विचारते. अनेकदा घरातल्यांना दवाखान्यात घेऊन जाते. डॉक्टरांची फी स्वतः भरते स्वतःच्या घरच्यांना घेऊन आली तर! मामा आणि मामीकडून ते पैसे घेत नाही. तिच्यासाठी आयुष्य मौजमजेची जागा नाही. तिच्यासाठी आयुष्य एक तपस्या आहे जी अव्याहत सुरूच राहणार आहे. शिक्षण काही विशेष नाही. खूप आकर्षक नोकरी मिळेल अशी तिची स्वप्नेही नाहीत. पण जे मिळेल ते कसे वापरायचे ह्याचे ज्ञान आहे. तिने बी एस सी होताना आयुष्य ह्या कोर्समध्येही सायमल्टेनियसली एक पदवी मिळवलेली आहे. 'ट्रस्टवर्दी' नावाची पदवी! तिच्यावर अवलंबून राहता येते.

ह्या काही मुली! वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील! ह्यांच्याबद्दल का लिहावेसे वाटले हे नीट नाही सांगता येणार! ही काही फार प्रातिनिधिक उदाहरणे आहेत असेही नसेल. पण तरीही मला वाटते की काहीतरी उपयुक्त नक्कीच लिहिले गेले!

मुलींच्या शिक्षणाबाबत एक भयंकर अनास्था जाणवली. स्तर कोणताही असो! संसाधने वाढवल्यामुळे प्रक्रियेला चालना मिळते ह्या गृहितकापासून लांब जायला हवे आहे. इच्छाशक्तीला इंधन पुरवणे आणि पारंपारीक संकल्पनांना जोरदार तडाखे देण्याची आवश्यकता असावी. 'शिकलेच पाहिजे' असे काहीतरी व्हायला हवे आहे. आत्ता जे आहे ते 'अरे, शिका' ह्या पातळीवरचे वाटते. ते फारच बिनबुडाचे, डळमळीत आणि निरर्थक वाटत आहे.

स्टॅटिस्टिक्सचा वापर हवा तसा करता येतो. पण त्यातून नेहमी, किंबहुना बहुतेकदा योग्य चित्र दिसतेच असे नाही.

========

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हतबुध्द व्हायला होत !

परिस्थितीचा बडगा ...ह्यालाच म्हणत असावेत .

समुपदेशन, चर्चा फोल ठरतात.....जावे त्याच्या वंशा !!

औचित्य साधणारा लेख !

धन्यवाद !!

>>स्टॅटिस्टिक्सचा वापर हवा तसा करता येतो. पण त्यातून नेहमी, किंबहुना बहुतेकदा योग्य चित्र दिसतेच असे नाही.

बरोबर आहे.

जळजळीत वास्तव मांडणारा लेख..धोरणे, संख्याशास्त्र इत्यादी त्यांच्या जागी आवश्यक असलं तरी शेवटी स्वतःची इच्छा आणि परिस्थिती ह्यावर बरंच काही अवलंबून असतं.

माझे फेसबुकवरील मित्र यान्नी सान्गीत्ल्याप्रमाणे हा लेख वाचला. त्यान्नी इथे लेख छान आहे असे लिहायला सान्गीतले आहे. त्याबद्दल मी गटगकर या मित्राचे आभार मानतो. व हा लेख छान आहे.

'इच्छाशक्तीला इंधन पुरवणे आणि पारंपारीक संकल्पनांना जोरदार तडाखे देण्याची आवश्यकता असावी. 'शिकलेच पाहिजे' असे काहीतरी व्हायला हवे आहे" अगदी पटलं!!!

इतर आशियायी देशांत , मुली लग्नाला प्राथमिकता देताना अजिबात दिसून येत नाहीत. त्यांचा संपूर्ण कल स्वतः ला शिक्षीत करून आपल्या पायावर उभे राहण्याकडे दिसून येतो.

बेफिकीर - सर्व लेख वाचले, लेख वाचल्यावर सुन्न होते...

<<त्यांचा संपूर्ण कल स्वतः ला शिक्षीत करून आपल्या पायावर उभे राहण्याकडे दिसून येतो.>>
---- सहमत....