पद्मा आजींच्या गोष्टी ७ : अज्ञात गृहस्थ

Submitted by पद्मा आजी on 3 March, 2016 - 15:53

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

ही गोष्ट तशी फार जुनी आहे. तेव्हा माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीच्या लग्नाचा विषय चालला होता. माझे वडील तिच्यासाठी स्थळे बघत होते. पण कुठे काही जमत नव्हते.

त्याच दरम्यान माझे मोठे काका, जे गोंदियाला जेठाभाई माणिकलाल शाळेचे मुख्याध्यापक होते ते संघाचे कार्यकर्ते असल्याने तुरुंगात गेले होते. फार कट्टर स्वयंसेवक होते. तेव्हा संघाचे कार्यकर्ते बऱ्याच वेळा तुरुंगात असायचे.

अश्याच त्या दरम्यान, एकदा माझे वडील कोर्टात जायच्या तयारीत होते. सकाळचे पक्षकार नुकतेच गेलेले, त्यामुळे वडिलांची कोर्टाची तयारी चालू होती.

तेवढ्यात आमच्या लाकडी जिन्याचा आवाज झाला. आम्ही तेव्हा अनगळ वाड्यात राहायचो. आमचा जिना फारच कुरकुरे. त्यामुळे कोणी आले किंवा गेले तर लगेच समजायचे.

वडील बघतात तर काय, एक गृहस्थ वर आले. चांगले उंच, पागोटेवाले, कपाळाला मोट्ठे गंध. वडिलांना वाटले पक्षकार आहे. म्हणून त्यांनी म्हटले आता काही भेटणे शक्य नाही कारण कोर्टाची वेळ झाली आहे.

तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, 'वकील साहेब, जर पाणी पाहिजे. देता का?'

'अहो, पाणीच काय? या जेवायला. मी बसतोच आहे.'

तो नाही नाही म्हणत असताना वडिलांनी आग्रह केला म्हणून थांबला. वडिलांनी मला सांगितले कि आईला म्हणा एक ताट अजून वाढ. तेव्हा आमच्या कडे जेवायला कोणीन कोणी असायचे, म्हणून आईनेहि काही न विचारता ताट मांडले.

जेवण शांततेत झाले. मीच वाढत होते त्यांना. जेवण झाल्यावर त्या गृहस्थाने विचारले कि वकील साहेब तुम्ही कुठल्या तरी काळजीत दिसत आहात. सुरुवातीला वडिलांनी टाळले कारण त्यांना उशीर होत होता. पण जेव्हा त्याने परत विचारले तेव्हा वडिलांनी सांगितले कि मोठ्या भावाची काळजी आहे तुरुंगात असल्यामुळे.

तो गृहस्थ म्हणाला काही काळजी करू नका. मी सांगतो ती तारीख लिहून ठेवा. त्या दिवशी सुटेल म्हणजे सुटेल. वडिलांनी फार काही आश्चर्य दाखविले नाही. तो माणूस पुढे म्हणाला तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी आहे का? तेव्हा मात्र वडिलांनी सांगितले. 'हो हो लग्न जुळत नाही आहे. बरेच प्रयत्न केले.'

तो गृहस्थ लगेच म्हणाला अहो, तुम्ही तर भेटला तुमच्या जावयाला दोन दिवसा पूर्वी. ट्रेनमध्ये. नागपूरच्या. तुमच्या शेजारीच बसला होता कि. तुम्ही बोलला त्याच्याशी.

वडिलांनी लगेच चाचपून विचारले. "तुम्हाला कसे माहिती? तुम्ही काय ज्योतिषी आहात का?'

तेव्हा तो हसला. व म्हणाला, 'अहो थोडा विचार केला कि समजते सगळे. जोतिष्य कशाला पाहिजे त्याला. चला तुम्हाला हि उशीर होतो आहे. निघतो मी."

असे म्हणत तो जिना उतरू लागला. वडील त्याला काहीतरी पुढे विचारायचे म्हणून घाईघाईत मागे गेले तर काय, त्या माणसाचा पत्ता नाही. जिना हि पूर्ण उतरला नव्हता तो. कारण आवाजावरून समजायचे कि अजून पायऱ्या शिल्लक होत्या.

वडिलांनी लगेच माझ्या भावाला पाठविले शोधायला. पण तोही परत आला, म्हणत कि कुठेही दिसला नाही तो. वाड्या समोर दोन तीन भाजीवाले असायचे. त्यांना विचारले तर म्हणे कोणी माणूस खाली उतरलाच नाही. जणू हवे मध्ये गायब झाला तो.

झाले आम्ही नंतर विसरूनही गेलो सगळे. परंतु जेव्हा दोन महिन्यांनी काका सुटला तुरुंगातून तेव्हा परत आठवण झाली. कारण त्याने जी तारीख सांगितली होती, बरोबर त्या तारखेलाच सुटला होता काका.

त्या नंतर मात्र वडिलांनी त्या माणसाने सांगितलेल्या स्थळासाठी प्रयत्न केले आणि बहिणीचे लग्न तिथे जुळले सुद्धा पटकन. तेव्हा वडील सगळ्यांना त्या माणसाची गोष्ट सांगायचे व गोष्ट सांगताना नमस्कार करायचे.

मला माहित आहे लग्नाच्या दिवशी वडिलांनी एक पान शेजारी मांडून ठेवले होते -- त्या माणसासाठी.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचे सगळेच +१
मस्तय ! आज वाचून जास्तच आनंद झाला. माझा भगवंतावरचा विष्वास आणखी दृढ होत जातो अशाने Happy

मस्त...एकदम छान वाटलं वाचून. मलाही असे एक-दोन अनुभव आले आहेत. एक आमच्या घरातल्या एका मुलीच्या लग्नाबद्दल असंच एका अनोळखी आजोबांनी पत्रिका बघून 'एक महिन्यात लग्न होईल, खूप चांगला नवरा मिळेल' असं सांगितलं. तेव्हा सगळ्यांना ते खोटं वाटलं कारण लग्न जरी ठरलं तरी महिन्याच्या आत होणं शक्य नाही, हॉल मिळत नाही, तयारीला किती वेळ लागतो. पण त्याच आठवडयात स्थळ आलं..भेटून पसंती झाली आणि मुलगा परदेशात जाणार असल्याने खरोखर महिन्याच्या आत लग्न झालं. आज सुखाने संसार करत आहेत, मोठा मुलगा, धाकटी मुलगी असं चौकोनी कुटुंब आहे.

अजून एक किस्सा- एका मैत्रिणीने ट्रेनमध्ये भेटलेल्या ज्योतिषी बाईंना पत्रिका दाखवून 'लग्न कधी होईल' विचारलं होतं. त्यांनी 'लग्नाला २ वर्षं तरी लागतील पण तू तुझ्या होणार्‍या सासरी अनेक वेळा जातेस, लव्ह मॅरेज होईल' असं सांगितलं होतं. तिला ते काहीही कळलं नाही तेव्हा. पण झालं असं की तिच्या एका मैत्रिणीचा मोठा भाऊ परगावी होता, तो काही काळाने परत आला. त्याच्याशी ओळख झाली आणि प्रेम जमलं. घरच्यांच्या परवानगीने लग्न झालं. ती होणार्‍या सासरी खूप आधीपासून जात होतीच. पण नवरा परगावी असल्याने त्याची त्यावेळी क्धी भेट झाली नव्हती.

वडिलांनी एक पान शेजारी मांडून ठेवले होते -- त्या माणसासाठी.>>> हे खूपच आवडले.+१

नंदिनी, तुमचा अनुभव पण आहे का माबोवर लिहिलेला...वाचायला आवडेल!

छान वाटलं .. अगदी खरं सांगायचं तर माझा असल्या घटनांवर विश्वास बसत नाही, पण तूमच्या लेखनशैलीने हे किस्से अगदी सहज पटून जातात.

नेहमीप्रमाणे मस्त.
मला माहित आहे लग्नाच्या दिवशी वडिलांनी एक पान शेजारी मांडून ठेवले होते -- त्या माणसासाठी. हे छानच.

आमच्या आजोबांच्या वेळी घरची परिस्थिति खूपच कठीण असायची ... सहा मुले आणि आजोबांची फक्त भिक्षुकी अन शेती ,तीही खेडेगावात ....त्यामुळे उत्पन्न जेमेतेमच असायचे ...कित्येकदा नुसत्या भाताची पेज मिठाबरोबर खाऊन झोपावे लागायचे ...

आशा परिस्थिथीत एका संध्याकाळी एक पांथस्थ घरी आला... हिन्दी बोलत होता... मै ब्राह्मीन हू....... दूर काशी से आया हू .... आप भी ब्राह्मीन है ... खाना मिळेगा कया... मै सुबह चला जाएगा ... असे म्हणाला ....

नेमकी त्यादिवशी एकाच माणसाला पुरेल एवढेच तांदूळ घरात होते... आजीने त्याची पेज बनवून त्या पाहुण्याला दिली .... त्याने पेज खाल्ली व म्हणाला ...आज मै "तृप्त" हो गया ...व झोपला ...पण घरातील सर्वांना त्या रात्री उपास घडला ....

सकाळी कोणालाही जाग यायच्या आधी तो मनुष्य निघून गेला .....

काही दिवसांनी माझ्या धाकट्या काकांना निमसरकारी तर थोरल्या काकांना कस्टम्स मध्ये नोकरी लागली .... व हळूहळू दिवस पालटले....

त्या पांथस्था च्या रूपाने साक्षात काशी विश्वेश्वर घरी येवून जेवून गेला अशी आमच्या आजोबांची श्रद्धा ..... आजोबा १९८२ साली वारले त्यापूर्वी ३ वर्षे हट्टाने काशी ची तीर्थयात्रा करून आले!

मला सुध्दा अशी एक व्यक्ति भेटली हाेती, एका कंपनीत हाेते, शर्मा नाव हाेते खुप घाई असल्याने अर्धवट भविष्य सांगितले पुन्हा भेट झाली नाही

ही गोष्टही मस्तच!

सध्या मोबाईलवरच असल्याने हा माझा आपल्या धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद असला तरी जवळपास सर्वच वाचल्यात. वाचल्यात त्या सर्वच आवडल्यात.

अश्या गोष्टींवर माझा विश्वास बसत नाही आणि अविश्वासही दाखवत नाही. पण तरीही समोरच्याला पटावे अशी आपली शैली मस्तच.

मस्त! Happy

आहे असाच एक अनुभव गाठीशी.. त्यावेळेस खूप गरज होती नोकरीची आणि अशाच एका ठिकाणी नोकरी शोधताना भेटलेल्या एका तरुणाने रेफ़रन्स दिला होता, "इथे जा .. या व्यक्तीला भेट" त्याने ज्या व्यक्तीच नाव सांगितलं होत ती व्यक्तीही शहराबाहेर होती, खर तर कुणाचा काहीच सबंध नव्हता तरीही त्याने सांगितलं होत, तिथे नोकरीही लागली अगदी अनपेक्षितपणे.. आजही त्याचे मनापासून आभार मानते.