वाघ्या

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 March, 2016 - 11:55

आमच्या कॉलनीत बरीच मोकाट कुत्री होती. काही लोकांनी घरात कुत्री पाळलेली होती.
पण आज जरी कुणाला विचारलं तर सगळे वाघ्या या कुत्र्याचे नाव घेतील.
थोडे फार वाघासारखे पट्टे असलेला म्हणुन त्याचे नाव वाघ्या पडले. हा मोकाट कुत्रा होता. अशी बरीच मोकाट कुत्री आमच्या कॉलनीची सदस्यच होती. लोक त्यांना आठवणीने खाउ घालत.

त्यात वाघ्या नावाप्रमाणेच सगळ्यात शूर. चोर शिरला, तर हाच नेमका त्याला हेरायचा आणि पिच्छाच पुरवायचा. रात्री अपरात्री नवख्या माणसावर इतर कुत्री भुंकायची. वाघ्या सुद्धा कधी थोडा फार भुंकायचा पण त्याला नेमके कळायचे म्हणे की या माणसाचे चोरीचे वगैरे काही इरादे नाहीत, आणि गप व्हायचा.

पण वाघ्या मागे लागला, म्हणजे तो चोरच होता असाच ठाम समज होता आमच्या कॉलनीत.

वाघ्या इतर कुत्र्यांमध्ये जास्त मिसळायचा नाही. माणसांमध्येही जास्त कधी मिसळला नाही.
पण कॉलनीतले सगळे लोक त्याला, आणि तो सगळ्यांना ओळखुन होता.

कॉलनीच्या एका बाजुला एक मोठ्ठा नाला होता. तो ओलांडला की मोकाट शेत होते, त्या पलिकडे पायवाट रानात जायला. आम्ही मुले बोरं, चिंचा, करवंद आणायला रानात जात असू. रानात जाताना आम्हा मुलांना वाघ्याला घेउन जाणे खुप आवडायचे. पण तो येइल की नाही हे त्याच्या मूडवर असायचे. काही खाउ घालण्याचे आमिष दाखवा, कधी तो ढुंकुन सुद्धा पहाणार नाही. तर कधी, काहीच आमिष न दाखवता, “वाघ्या लु लु” म्हटले की लगेच तयार व्ह्यायचा आणि सोबत यायचा. सोबत वाघ्या गेलाय हे बघितल्यावर मोठे लोक सुद्धा निर्धास्त असायचे.

चोरांनी की अजुन कुणी वाघ्याला मारायचा प्रयत्न केला, अशी काहीशी चर्चा पण कॉलनीत चालायची.

त्यावेळी प्राणी प्रेमी लोकांच्या संघटना नव्हत्या अथवा त्यांना जास्त जोर नव्हता. तशात एका छोट्याशा गावात तर अजिबात नाही. चेकाळलेली कुत्री असली की म्युनिसिपालीटीवाले, त्यांना विष खाउ घालुन मारत. तशात एकदा कुणी तरी वाघ्याला विष खाउ घातले. वाघ्याची हालत खराब. कसला तरी विचित्रच आवाज काढु लागला, आणि उठुन निघाला. मोठ्या नाल्याकडे गेला, त्यातले पाणी प्याला. मग त्याला उलट्या झाल्या आणि तो निपचीत पडुन राहिला. वाघ्या दगावतोय याचे सगळ्यांना खुप वाईट वाटले. वेळ मिळेल तसे सगळेच त्याला जाउन बघुन येउ लागले, हळहळु लागले. दिलेले अन्न त्याने खाल्ले नाही. पाणी मात्र प्याला.

दुसर्‍या दिवशी पहाटे मात्र वाघ्या उठुन जवळच्या रेवते यांच्या अंगणात जाउन भुंकला. त्यांनी त्याला खाउ घातले त्याने खाल्ले सुद्धा पोट भर. मग तो एका झाडाखाली जाउन झोपला.

संध्याकाळ पर्यंत कित्येक लोकांनी रेवतेंकडे पायधूळ झाडली, आणि वाघ्या नेमका केव्हा आला, त्याची चाहुल घरातील कोणाला आधी लागली, त्याला दूध, भाकर, भात कसा वाढला, नंतर तो किती पाणी प्याले, इत्यादी तपशील रेवते कुटंबियांनी उत्साहाने प्रत्येकाला ऐकवले.

आणि दोनच दिवसात वाघ्या पुर्ण बरा झाला. सगळ्यांना कोण आनंद झाला. विष खाऊ घातल्यावर जाउन नाल्यातले पाणी पिउन उलट्या केल्या आणि स्वत:ला वाचवले, बघा किती हुशार आहे वाघ्या, असे सगळ्यांनी त्याच्या हुशारीचे मनापासून कौतुक केले.

सर्व काही सुरळीत सुरु झाले. मूड असला की वाघ्या आम्हा पोरांसोबत रानात येऊ लागला. कधी मधी रात्री चोर शिरला तर भुंकु लागला.

म्हातारा झाला असताना एक दिवस वाघ्या अचानक नाहिसा झाला. शोध घेउन सापडेना.
कधी तो इकडे दिसला, तिकडे दिसला अशा बातम्या / अफवा कानावर येउ लागल्या.

अखरे दोन तीन दिवसांनी रानात वाघ्याने देह टाकल्याची पक्की खबर आली. काही लोकांनी जाऊन वाघ्याला खड्यात पुरुन त्यांचा अंत्यविधी केला.

सगळे लोक हळहळले.

त्यानंतर कितीतरी वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीतील रात्रीच्या कट्ट्यात वाघ्याचा विविध कथांना उत यायचा. लहानपणापासूनच तो कसा हुशार, चोरांना कसे हुसकावून लावले, सापापासून कसे सावध केले इत्यादि गोष्टी लोक रंगवून सांगायचे आणि ऐकणारे रंगून जायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गोष्ट वाघ्याची!

असाच माझ्या मोठ्या भावाने नगरल असताना एक कुत्रा पाळलेला मोत्या! आई चिडायची दादावर त्यावरुन कित्येकदा त्याला लांबवर सोडुन आलेला दादा! पण हा पठ्ठ्या परत घरी याययचा! मग त्या मोत्याने आईलाच फार जीव लावला आणिआपलेसे केलेले. आम्ही नगर सोडे पर्यंत होता १०-१२ वर्षे!
तुमच्या ह्या वाघ्यामुळे मोत्याची आठवण आली आज!

कुत्रा हा प्राणी..
याच्याबद्दल काय सांगाव.. निखळ प्रेम करतो तुमच्यावर..
आणि प्रेम देतो सुद्धा..
छान लिह्लयं मानव..

मला माझ्या राजाची आठवण आली. तोही असाच होता. त्याचं वय झाल्यावर त्याला अशक्तपणा यायचा. औषधे चालू होती पण तो काहीच खायचा नाही. दिंवसेंदिवस खंगत चालला होता. न्यूमोनियाच निमित्त झालं आणि तो आम्हाला सोडून गेला. तुमच्या वाघ्यामुळे आज त्याची पुन्हा आठवण आली.
धन्यवाद.

धन्यवाद, preetiiii, कृष्णा, टीना, अंकु आणि संशोधक.

टिना, तुम्ही कुत्रा पाळलेला वाटते.

टिना, तुम्ही कुत्रा पाळलेला वाटते.>> होता आधी.. तो गेल्यानंतर दुसरा आणायचि अजुनतरी घरच्यांची हिम्मत झाली नाही..

वर्षू., mi_anu धन्यवाद.

टीना हम.. असेच माझ्या सासुरवाडीला झाले. एक छान कुत्री पाळली होती, ती गेली. बरेच वर्षे झाली. पण दुसरे कुत्र घेणं होत नाही म्हणतात. आणायला गेले होते एकदोनदा पण रिकाम्या हाताने परत आले.