शब्दवेध - प्रतिसाद बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 1 March, 2016 - 02:11

नमस्कार,

हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.

आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.

तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.

आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्ला वेगळा ना, जो पदकासारखा लहान असतो आणि छातीवर लावतात. धावताना एक नंबर देतात जो छाती पोटाचा भाग व्यापुन बांधला जातो आणि मागे पाठीवर आणि पुढे पोटावर असा असतो. त्याला इंग्रजीत बिब म्हणतात. त्याला मराठीत काय म्हणावे>?? लाळेरे तर नक्कीच म्हणता येणार नाही. आणि बिल्लाही म्हणवत नाही.

उपक्रम मस्त आहे! इंग्रजी शब्द सुचवू का? Spoiler alert ला मराठी प्रतिशब्द काय आहे?
Paradigm : संस्थिती
Brain storming: कल्पना विस्फोट (प्रबोधिनीतला आवडता शब्द आहे हा!)
Dilatory: संथ

जिज्ञासा यांना poignant = evoking a keen sense of sadness or regret. अशा अर्थाचा काहीतरी शब्द हवा आहे.

Indefatigable: अम्लान, अथक (आपण व्यक्तीविशेषण म्हणून वापरत नाही पण वापरु शकतो.)

Pages