फुसके बार – ०१ मार्च २०१६ आजचा अर्थसंकल्प, ऑस्कर पुरस्कार, देशविरोधी घटना व करदात्यांच्या पैशांचा हिशोब

Submitted by Rajesh Kulkarni on 29 February, 2016 - 14:51

फुसके बार – ०१ मार्च २०१६ आजचा अर्थसंकल्प, ऑस्कर पुरस्कार, देशविरोधी घटना व करदात्यांच्या पैशांचा हिशोब
.

१) आजचा अर्थसंकल्प

आजच्या बजेटवर पप्पूने ट्विट करणे हा मोठाच विनोद झाला. कसलीच दृष्टी नसलेला व दृढविश्वास नसलेला असा हा अर्थसंकल्प असल्याचे तो म्हणाला. हे शब्ददेखील त्याला कोणी पढवले कोणास ठाऊक.

अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेबद्दल भाष्य करण्यावरून चिदंबरम यांचे हात नुकतेच पोळलेले अहेत, तेव्हा त्यांनी या अर्थसंकल्पात काहीच नवीन नाही व तो निराशाजनक आहे, असे विधान केले त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. शिवाय आम्ही सत्तेत असताना आम्हाला पूर्ण बहुमत नव्हते म्हणून आम्ही धाडसी निर्णय न घेऊ शकल्याचे ते म्हणाले. वा रे कबुली.

काळ्या पैशाबद्दलची तरतुद समजली नाही. काळ्या पैशावर ४५% कर पडेल असे म्हणणे म्हणजे मग इतर रक्कम पावन झाली असा त्याचा अर्थ होतो का? खरे तर सर्वच काळे धन जप्त करणे व त्याबद्दल शिक्षा देणे हे अपेक्षित असायला हवे. आता शिक्षा तर नाहीच, पण ५५% रक्कमही त्याला पांढरी करून मिळायची, असा प्रकार आहे का? असल्यास हे योग्य आहे का?

आयबीएनलोकमतवर नरेन्द्र जाधवांना अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी बोलावले होते. त्यांना एकट्याला बोलवले, हे बरे झाले. कारण ते बोलताना एवढे हातवारे करतात व तेदेखील दोन्ही हातांनी की त्यांच्यापासून एक मीटर त्रिज्येमध्ये कोणीही असणे त्याव्यक्तीसाठी धोक्याचे ठरू शकते. क्रुडऑइलच्या किंमती जवळजवळ साठ टक्क्याने कमी होऊनदेखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती त्याप्रमाणात कमी होत नाहीत हा हास्यास्पद आक्षेप घेतला जात नाही. कारण स्वस्ताई झाली तरी रेस्टॉरंटमधल्या खाद्यपदार्थांच्या किंमती कमी करायचा आग्रह न धरता त्यावर पैसे उडवणारे ग्राहक याबाबतीत मात्र सरकारकडून अशी अपेक्षा ठेवतात तेव्हा कमाल वाटते. अशा निर्बुद्ध अपेक्षांना विरोधी पक्षांचे लोकही हेतुपुरस्सर खतपाणी घालताना दिसतात. लोकमतच्य प्रतिनिधीने याबाबत विचारलेला प्रश्न असा बाळबोध नसल्याने कौतुक वाटले. त्याने विचारले की किंमती कमी झाल्यामुळे उरलेल्या रकमेचा विनियोग व्यवस्थित होतोय का? जाधवांनी त्यावर सांगितले की क्रुडऑइलच्या किंमती कमी झाल्यामुळे जे परकी चलन सरकारकडे शिल्लक राहतो ती रक्कम आजवरची विक्रमी रक्कम आहे. मात्र उद्या रूपयाची घसरण झाली तर डॉलर्स विकत घेऊन तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो.

बाकी शेतक-यांसह ग्रामीण भागाचा जो विचार केला गेला आहे त्यात दीर्घकालीन उपाय आहे, त्यामुळे त्याचे लगेचच परिणाम दिसणार नाहीत.

२) यावेळचे ऑस्कर पुरस्कार

यावेळचे ऑस्कर पुरस्कार हे तेथील काळ्या कलाकारांवर आजवर होणा-या अन्यायाबद्दल, दुर्लक्षाबद्दल एक निश्चित विधान करणारे ठरले. यावेळी स्टेजवर कपडे उतरवण्याचा ऑस्करी विक्षिप्तपणा व विचित्र प्रकार झाला नाही.

कार्यक्रमापूर्वीच काही काळ्या कलाकारांनी त्याबाबत आवाज उठवून अॅकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनामध्ये काळ्या कलाकारांना डावलले जात असल्यावरून आवाज उठवला होता.

कार्यक्रमाचा अँकर म्हणाला की काही जण विचारतात की तुम्ही (काळे) आजच का निषेध करत आहात? १९६०मध्ये का नव्हता. कारण साधे आहे, १९६०मध्ये आम्हाला हवे तसे फासावर लटकावले जात होते व ठारही केले जात होते. साहजिकच कोणाला ऑस्कर मिळाले याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नसे. इतका मोकळेपणा.

कार्यक्रमात स्त्री-पुरूषांच्या लैंगिक शोषणाविरूद्धही आवाज उठवला गेला. लेडी गागा हिने त्याविषयास अगदी समर्पक गाणेही सादर केले. ‘Till it happens to you, you won’t know how I feel.’

या कार्यक्रमाचे सूत्र लक्षात ठेवून द रेवेनण्ट या सिनेमाचा दिग्दर्शक अलेयांद्रो इनारुट्टू म्हणाला की Let us hope that colour of our skin becomes as irrelevant as the length of our hair.
सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या स्पॉटलाइट या सिनेमाचे निर्माते म्हणाले की या सिनेमातील लैंगिक शोषणाचा विषय अता व्हॅटिकनपर्यंत पोहोचायला हवा. या लोकांच्या अशा धाडसाबद्दल कौतुक करायला हवे.

आणि अखेर,

लिओनार्दोला यावेळीही बाहुलीने हुलकावणी दिली असती, तर आणखी काही वर्षांमध्ये त्याला थेट जीवनगौरव पुरस्कारच द्यावा लागला असता. अखेर ऑस्करवाल्यांनीच स्वत:ची आब राखली. की अॅकेडेमी ही कोणाही एकापेक्षा श्रेष्ठ समजावी?

आपल्याकडच्या पुरस्कारांमध्ये बजरंगी भाईजानसारख्या तद्दन सुमार सिनेमांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता अशी नामांकने देण्याची हिंमत होते. आताचा सिनेमा लिओनार्दोचा अभिनयाच्या दृष्टीने सर्वोत्तम सिनेमा आहे की नाही याबाबत वाद होत राहतील. मार्टिन स्कोर्सेसीचेही तसेच झाले होते. मात्र अॅकेडेमी अवॉर्ड्समध्ये दरवर्षी एवढी स्पर्धा असते की या गोष्टी होणारच. शिवाय ते टॉम क्रुज आणि टॉम हॅक्स यांच्यात फरक करू शकतात हे महत्त्वाचे.

शिवाय इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा पुरस्कार मिळाल्यावरदेखील त्याची प्रतिक्रिया अतिशय संयमित होती. त्यातही त्याने जागतिक तापमानवृद्धीबद्दल बोलण्यासाठी वेळ काढला, हेच विशेष. आपण पृथ्वीला गृहित धरायला नको. मीदेखील आजच्या दिवसाला गृहित धरत नाही, असे तो अखेर म्हणाला.

तुझ्या अनेक चित्रपटांनी जणू आम्हीच तुझ्या भूमिका जगल्याची अनुभूती आम्हाला दिली.

धन्यवाद. अगदी मनापासून.

३) यांचा टॅक्स - त्यांचा टॅक्स - पण त्या नावाखाली काहीचा अजेंडा

आम्ही कर भरतो, त्यातून देशविरोधी घोषणा देणा-या किंवा त्यांचे कार्यक्रम आयोजित करणा-यांचे शिक्षण होऊ नये असे अनेकांचे म्हणणे असते. त्यावर एक नवीनच प्रतिवाद अलीकडे दिसू लागला आहे. की जे लोक कर भरत नाहीत, त्यांच्यापैकी अगदी गरीबांपासून ते विविध स्तरावरील लोक जेव्हा जगण्यासाठी आवश्यक अशा विविध वस्तु विकत घेतात, तेव्हा त्या वस्तुंवर सरकारने लावलेला कर भरतच असतात. तेव्हा कर भरणा-यांनी उठसुट स्वत: कर भरतो यावरून गमजा करू नयेत असा यांचा आविर्भाव असतो.

अशा प्रतिवादातला खोटेपणा त्यांच्या लक्षात येत नाही का?

कोणी स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या उत्पन्नातून कर भरणे आणि केवळ जगण्यासाठी लागणा-या वस्तुंवरील कर भरणे (खरे तर भरावा लागणे) यातला फरक न कळणा-यांच्या व तरीही असे खोडसाळ प्रतिवाद करणा-यांना काय म्हणावे? या वस्तु विकत न घेता कोणाला जगता येत असेल, तर त्यांनी जरूर तसे जगावे, असे म्हणता येईल, पण असे म्हणणेही कदाचित काहीजण या तळागाळातील लोकांच्याविरूद्धची भावना म्हणवली जाईल. तेव्हा यात प्रत्यक्ष तशा स्थितीत असलेल्यांची हेटाळणी करायची नाही, पण त्यांचा दाखला देत स्वत:च्या कमाईतून भरलेल्या कराचा योग्य पद्धतीने विनियोग व्हावा असा आग्रह धरणा-यांची हेटाळणी करणे योग्य नव्हे.

तेव्हा देशविरोधी कृती करणा-यांना पोषक अशा घटनांना विरोध केलाच पाहिजे आणि असे लोक कर भरणा-यांच्या जीवावर गमजा करत असतात हेच वास्वव आहे हे लक्षात ठेवायला हवे. लोकांनी भरलेल्या कराचा गैरवापर करण्याचा प्रकार केवळ असे देशविरोधी उद्योग करणारेच लरतात असे नाही, तर भ्रष्टाचारीदेखील करत असतात. तेव्हा केवळ देशविरोधी लोकांच्य संदर्भात अशा तळागाळातील लोंकांचा संदर्भ देणारे कराच्या गैरवापराबाबत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र सहमत होतील, हाच त्यांच्या प्रतिवादातील पोकळपणा आहे. बरे, हे तळागाळातील लोकही असा पद्धतीने कर भरतात हे गृहित धरले (त्याचा ते ज्या भंपक प्रतिवासाठी वापर करतात तो वेगळा मुद्दा) तरी त्या कराचाही चुकीच्या गोष्टींसाठी वापर केला जावा असा या प्रतिवादबहाद्दरांचा दावा असतो की काय?

तळागाळातील लोक मग ते रोजगार हमी योजनेवरील मजूर असोत, किंवा इतर कोणी, ते स्वत: जरी प्रत्यक्ष कर भरत नसतील, तरीही त्यांच्या श्रमांद्वारे का होईना त्यांचे राष्ट्रउभारणीतील योगदान असतेच असते व ते कोणी नाकारण्याचा प्रश्न नसतो.

तेव्हा केवळ गरीबातले गरीब लोकदेखील बाजारातील वस्तु विकत घेतात, व ते करताना तेही अप्रत्यक्षपणे कर भरतच असतात, या दाव्यापोटी जे स्वत:च्या कमाईतून कर भरतात, त्यांनी ते भरत असलेल्या कराचा व्यवस्थित विनियोग व्हावा असा आग्रह धरला, तर त्यांची हेटाळणी करण्याचा खोडसाळपणा तरी नको.

अर्थात या सर्वांचे मूळ कशात आहे ते वेगळे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. पण आपल्या अजेंड्यापोटी जे स्वत:च्या कमाईतून कर भरतात, त्यांची हेटाळणी करण्याच्या पातळीवर हे प्रतिवादवीर उतरतात, यातच त्यातली व्यर्थता कळते. असा भंपक प्रतिवादापोटी आपण कोणाची भलावण करत आहोत हे समजण्याचा विवेकही अशा प्रतिवादवीरांनी गमावल्याचे स्पष्ट दिसते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांच्या करातुन सरकारने ज्या शाळा काढल्या त्यातून शिकुन जे लोक परदेशात उखळ पांढरे करायला जातात त्यानी देशातील गरीब लोक किती ट्याक्स भरतात यावर चर्चा करणे , हेही एक थोतांडच आहे.

राकु. प्रॉविडेंट फ़ंडावर टॅक्स लागला. निवृत्ती नंतर फ़ंड काढताना ६०% रक्कम टॅक्सेबल आहे. हा सामान्य माणसावर अन्याय नाही वाटत तुम्हाला?

युरो,
मी काही सीएशी बोललो. त्याच्या बोलण्यात अाले कि अाता पेन्शनवरही टॅक्स पडतो. त्या धर्तीवरच हे केलेले आहे. शिवाय बजेटपूर्वी यातले पैसे काढण्यावरही काही निर्बंध टाकल्याचे फुसकेबारच्या मागच्या एका पो्सतवर निदर्शनास आणले गेले होते.

राकु गल्लत होते आहे तुमची. पेन्शन ही पूर्वी पासुन करपात्र होती. सॅलरीच्या डेफ़ीनेशन मघे पेंशन धरलेली आहे. पेंशन आणि प्रॉविडेंट फ़ंड या दोन वेगवेग्ळ्या गोष्टी आहेत.

प्रीमॅच्युअर विड्रॉवल वर कर लावणे आणि सरसकट कर लावणे यात फ़्ररक आहे. आता काही झाले तरी फ़ंडात गुंतवलेल्या रकमेवर १८% कर बसेल.

त्या दोन गोष्टी वेगळ्याच आहेत. पण त्यावर कर लावण्यामागे पेन्शनचाच तर्क लावला जात आहे असे मला म्हणायचे आहे. शिवाय आता पंतप्रधान या निर्णाचा फेरविचार करणार असल्याचे व्ृत्त आहे. पाहू या काय होते ते.

पंतप्रधान या निर्णाचा फेरविचार करणार असल्याचे व्ृत्त आहे. पाहू या काय होते ते.>> कुठल्याश्या चॅनल वर याचा फेरविचार होणार नसल्याचं दाखवलं

कोणी स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या उत्पन्नातून कर भरणे आणि केवळ जगण्यासाठी लागणा-या वस्तुंवरील कर भरणे (खरे तर भरावा लागणे)
>> स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या उत्पन्नातूनही कर भरावा लागतो. देशावर उपकार म्हणुन कोणी कर भरत नाही. भ्रमातून बाहेर पडलात तर बरे. मंदिरांमधे दिले जाणारे दान आणि सरकारला भरला जाणारा टॅक्स यामध्ये गल्लत करु नये. इतके प्रामाणिक लोक भारतात असते तर निव्वळ टॅक्स भरण्यापायी सरकारची गंगाजळी दहापट रकमेची झाली असती.

राहिला दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्या जाण्याचा प्रश्न तर खर्‍या दहशतवादी कारवायांना जो पैसा पुरवला जातो तो तुमच्या आमच्या समोर कमवला जातो. कोटींच्या क्लबमधे खेळणारे सिनेमे हे त्याचं शंभरातलं एक उदाहरण. इथे देशभक्तच हसीखुशी दहशतवाद्यांना खुले दिलसे भरभरुन मदत करतात. तिथे जेएनयुच्या पोरांना मिळणार्‍या सवलतींवर फार डोळा. त्याआधी संसदेतल्या फुकटबाजांना काही बोलण्यासाठी तोंड का उघडत नाहीत हे टॅक्सपेयर्स?

जेएनयुत देशविरोधी घोषणा झाल्या म्हणून प्रत्येक विद्यार्थी हा देशद्रोहीच आहे आणि त्यांना आपण पोसतोय हे लॉजिक किती बरोबर आहे हे विचारावं वाटते, पण असो.

गरीब लोकंवर ट्याक्सचा पैसा खर्च होतो म्हणुन श्रीमंतानी आरडाओरड करणं हा शुद्ध कृतघ्नपणा आहे.

सरकार गोरगरीबाना रेशनवर अन्न पुरवतं . त्याना सरकारी दवाखाने , मुलाना शाळा वगैरे देतं म्हणुनच हे लोक श्रीमंतांच्यासाठी घरगडी , वॉचमन , लिफ्टमन , कुरियर बॉय , पिज्झा बॉय , मोलकरेण , संडास स्वच्छ करणारे , रस्त्रे करणारे मजुर इ इ रुपात सेवा देत असतात.

गरीबानीही ट्याक्स भरावाच , असा माज श्रीमंताना असेल तर त्यानी या लोकाना दोन चार हजारावर राबवण्यापेक्षा त्यानाही घसघशीत वीस तीस हजार पगार द्यावा व टीडीएस स्वतःच कापून सरकारला जमा करावा.

पेन्शन व प्रॉविडंट यावर ट्याक्स लावण ं हे मात्र चूकच आहे.

हिंदुराष्ट्र आले !

काशी ! कितना अच्छा होता अगर हम हरा झंडा सी लेते !

Proud